 |
 |
काय चाललंय? आपण संतापलेले दिसताय... |
| |
माझा संताप का आहे ते जरा समजून घ्या. |
|
|
 |
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय... आपला मूड कसा आहे? |
| |
आता महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव म्हटल्यानंतर मूडचा इथे प्रश्न येतो कुठे? चांगला असायलाच पाहिजे. जर तुम्ही अस्सल मराठी असाल तर तुमच्या मूडला इथे किंमत नाहीय, त्या दिवसाला महत्त्व आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र असा सुखासुखी मिळाला नाही. मुंबईसाठी रक्ताचं सिंचन झालेलं आहे. नुसतं हुतात्मा चौक, हुतात्मा चौक म्हणायचं आणि तिथे जाऊन फुलांचे चौकोनी, त्रिकोणी, गोल हार वाहायचे... हे व्यर्थ न हो बलिदान ही नित्याची बुरसटलेली वाक्यं बोलू नका. काय चाललंय या सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रात? मराठी... मराठी... मराठी हे तरी काय चाललंय संयुक्त महाराष्ट्रात? मराठी भाषा जगवण्याचे प्रयत्न होताहेत तेही सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना! लाज वाटली पाहिजे लाज... सर्वांनाच!! हा माझा मूड आहे समजलं. माझ्या मूडमध्ये तिरस्कार आहे, संताप आहे, राग आहे, आग आहे, सर्व काही आहे. हे कोण नतद्रष्ट असले प्रश्न उभे करताहेत. हा महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव आहे, तो एका दिमाखात, मस्तीत आणि गर्वात साजरा व्हायला हवा. |
|
|
 |
या महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत माणूस पन्नास वर्षं जगण्याची खात्री नाही तिथे हे राज्य पन्नास वर्षांचे झाले... |
| |
हो. प्रश्न वयाचा आहे की राज्यकारभाराचा. माणूस राज्यकारभारामुळे पन्नास वर्षे जगू शकतो असं काही आहे का याचा आधी खुलासा होऊ द्या. मला असं वाटतं की, या असल्या राज्यकारभारामुळे माणसाचं वय कमी कमीच होत चाललं आहे. कसला हा दळभद्री कारभार? मी तर असं म्हणेन कारभार बदला, वय वाढवा! |
|
|
 |
म्हणजे राज्य मोठं झालं, पण माणसाचं वय कमी झालंय... |
| |
खरं आहे. माणसांचं म्हणाल तर कसली कद्रू वृत्तीची निघाली माणसं... स्वतंत्र विदर्भ काय मागताहेत? महाराष्ट्र तोडायची भाषा काय करताहेत...? तिकडे सीमा प्रश्न लोंबकळतच पडला आहे. मुंबई राहणार की जाणार? हे असले दळभद्री प्रश्न उभे राहताहेत. हे काय चालले आहे? मुंबई हातची जाणार म्हणतात, अरे पण कशी? ...तुम्ही नपुंसक आहात का? असाल तर सांगा आणि तुम्ही नपुंसक असाल तर मग जाऊ द्या. त्याला काय करणार? ... खबरदार, मुंबई तोडण्याची भाषा कुणी करेल तर. मुंबई महाराष्ट्राची आहे, ती महाराष्ट्राचीच राहणार! समजलं? |
|
|
 |
महाराष्ट्र निर्मितीचं बाळंतपण फार यातनादायी झालं होतं, आपण पाहिलंत ते? |
| |
पाहिलं म्हणजे? अनुभव घेतलाय. रक्त सांडताना पाहिलंय. |
|
|
 |
संयुक्त महाराष्ट्र निर्माण होतानाचा तो लढा, त्या यातना... |
| |
तेच सांगतोय. त्यावेळी आम्ही वॉर्डबॉय म्हणून काम करीत होतो, जिथे हे बाळंतपण झालं ना तिथे ! |
|
|
 |
वॉर्डबॉय कुठल्या अर्थाने म्हणताय तुम्ही ? |
| |
शुश्रूषा करायची. संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी ती धडपड होती. सगळं नीट पार पडावं, वेदनारहित व्हावं, यातना व्हायला नकोत, सगळं सुलभतेनं व्हावं यासाठीच प्रयत्न होते. पण तसं झालं नाही ही गोष्ट निराळी. मात्र आम्ही सेवा करीत होतो. मी व्यंगचित्र काढून... म्हणजे त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळची जी परिस्थिती होती त्यावर मी व्यंगचित्रं काढायचो. आठ साप्ताहिकांना मी व्यंगचित्रं पुरवायचो. ’फ्री प्रेस’मध्ये नोकरीला असतानाही निरनिराळ्या नावानं! तर अशातर्हेने व्यंगचित्रांच्या माध्यमातून आमची सेवा सुरूच होती. |
|
|
 |
महाराष्ट्र आणि मराठी माणसाला कधीच कोणती गोष्ट सहज मिळाली नाही... |
| |
नाहीच. काय करणार? |
|
|
 |
असं का? |
| |
त्याचा संदर्भ तुम्हाला देतो, पण मला ते पुस्तक अजून मिळत नाहीय. माझ्या आठवणींप्रमाणे माझ्या वडिलांनी एक पुस्तक लिहिलं होतं, त्यात तुम्हाला याचं उत्तर सापडेल. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शिवाजी महाराजांबद्दल गैर उद्गार काढले होते. मिसगाईडेड पेट्रीऑट. त्याच्यावर माझ्या वडिलांनी एक पुस्तक लिहिलं. शिवाजी महाराजांना बदमाष कोण म्हणतं? तर त्या पुस्तकात तो उल्लेख असावा असं मला वाटतं. तो उल्लेख असा होता - या जवाहरलालचा बाप, ... बाप हा शब्द मुद्दाम वापरतो. वडील, पितामह, पिताश्री हे पवित्र शब्द वापरण्याच्या लायकीचं ते घराणं नव्हतं. तर त्यांचे वडील म्हणजे बाप मोतीलाल नेहरू यांनी असे उद्गार काढले आहेत की, महाराष्ट्र हा हिंदुस्थानचा सडका, कुजका भाग आहे. तो छाटूनच टाकला पाहिजे. हे विचार ज्या घराण्यामध्ये खदखदले आहेत त्यांच्यापासूनच्या या सगळ्या अवलादी निघाल्या आहेत. त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? म्हणून महाराष्ट्राबद्दल तुम्ही म्हणालात ना मगाशी की सगळं सहज मिळालं नाही... कसं मिळणार? इतकी घाण त्या मनामध्ये गटारासारखी तुंबली असताना कुणी बांबू घालून ते साफ करीत नाही. |
|
|
 |
महाराष्ट्रासाठी जो जबरदस्त लढा झाला त्या लढ्याचे आपण साक्षीदार आहात... |
| |
हो. होतोच. आहेच. आणि अभिमान वाटतो. हे आंदोलन पाहण्याचे दुर्दैवाने म्हणा, सुर्दैवाने म्हणा मला भाग्य लाभलं याचा अभिमान वाटतो. मी स्वतः कर्फ्यू लागलेला असताना प्रेसचा पास असल्याने शुकशुकाट झालेल्या रस्त्याने चालत यायचो दादरच्या घरी. भयानक परिस्थिती वाटत होती. एक वेगळीच स्मशान शांतता होती. कर्फ्यू लागलेला. |
|
|
 |
आपला जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला. म्हणजे आपण स्वातंत्र्याचा लढाही पाहिला आणि संयुक्त महाराष्ट्राचा संग्रामही अनुभवलात. या दोन लढ्यांत काय साम्य दिसतं? |
| |
जालियनवाला बागेचं जे हत्याकांड झालं त्यावेळी गोर्यासाहेबांनी जी क्रूरता दाखविली, जी निर्घृणता दाखविली तशीच त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या आंदोलकांना चिरडण्यासाठी मोरारजीनेच दाखविली, पण तो लढा निराळ्या पद्धतीने चालू होता. ब्रिटिशांचं म्हणणं काय होतं की तुम्ही स्वातंत्र्य मागू नका. तुम्हाला बाकीचं जे पाहिजे ते द्यायला आम्ही तयार आहोत, पण महाराष्ट्राच्या लढ्याचं चित्रं वेगळं होतं. इथे जे पाहिजे ते मिळणारच नाही. उलट चेपून काढू, चेचून काढू, ठार मारू ही प्रवृत्ती इथे होती आणि ’तीही स्वकीयांकडून!’ ब्रिटिश म्हणजे गोरा माणूस हा परकीयच होता. त्यांचा हल्ला मी समजू शकतो. ते कसे स्वतःहून राज्य सोडून जातील? आपल्याला स्वातंत्र्य देतील? पण स्वकीयांचं काय? त्यांनी आपल्या लोकांबद्दल क्रूर भूमिका का घ्यावी? मोरारजीचा हुकूम काय होता? एकही गोळी फुकट जाता कामा नये. इतक्या निर्घृणपणाने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलकांवर गोळ्या घातल्या. हा डायरचा बापच म्हणायला पाहिजे
|
|
|
 |
पण मोरारजी गांधीवादी होते. |
| |
कसला गांधीवादी. ह्यं! |
|
|
 |
ते कट्टर गांधीवादी होते. त्यांनी गांधींच्या चळवळीत भाग घेतला होता. ते अहिंसावादी होते असं म्हणतात... |
| |
नशीब त्या गांधींचं की ही असली अवलाद त्यांना पाहायला मिळाली नाही मोरारजी देसाईसारखी... नाहीतर गांधींनीच आत्महत्या केली असती गोडशांनी मारण्याच्या अगोदर! |
|
|
 |
या लढ्याची नेमकी ठिणगी कुठे पडली असं आपल्याला वाटतं? |
| |
केंद्र सरकारने भिकार कमिशन, समित्या नेमायला सुरुवात केली. मला वाटतं पहिलं ते दार कमिशन होतं. तिथे ते दार उघडलं गेलं आणि तिथून ही घाण आत आली. ती अगदी महाजन कमिशनपर्यंत. त्या महाजनने वाट लावली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबई मिळाली, पण सीमा भाग गेला. |
|
|
 |
भाषावार प्रांतरचनेचे पडसाद उमटले... |
| |
हे अत्यंत घाणेरडे प्रकार होऊन बसले आहेत या देशात. भाषावार प्रांतरचनेची कल्पना काय होती आणि आता आपण तिचा वापर कसा करतो? भाषावार प्रांतरचनेचा एक उद्देश होता की प्रत्येक राज्याची एक संस्कृती आहे, संस्कार आहे तो टिकावा तो वाढावा’ आणि ही संस्कृती, हा संस्कार मिळून एक हिंदुस्थान उभा राहावा, पण झालं भलतंच! महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, तामीळनाडू, केरळ, पंजाब या खासगी प्रॉपट्या् झाल्यात सगळ्या. नको त्याचे अभिमान नको तिकडे वाढू लागले. आता कळसच होत चालला आहे तो आरक्षणाचा. |
|
|
 |
आधी आंध्र प्रदेश पेटला... |
| |
हो. सी.जी. रामलू? या रामलूने स्वतःला जाळून घेतलं तिथून सुरुवात झाली. |
|
|
 |
आणि त्यानंतर त्या ठिणग्या मुंबईत पडायला लागल्या... |
| |
त्यानंतर असं नव्हे, एक ईर्षा निर्माण झाली. अरे, मिळू शकतं, मग आपण का मागू नये? बरं, भडभुंजे बसलेच होते तिकडे दिल्लीमध्ये भडका उडवून द्यायला! |
|
|
 |
वाद मुंबईचा होता का? |
| |
मुंबईचा का असू नये? मुंबईमध्ये पहिलं राज्य होतं ते कोळी आणि भंडारी समाजाचं. हाच होता आमचा मराठी ठसा! नाना शंकरशेठ वगैरे अशी जबरदस्त मंडळी होऊन गेली या महाराष्ट्रात. त्यामुळे ठसा मुंबईचाच, मराठी माणसाचाच होता. मुंबई आमचीच होती. घाटी असतील, कोणी कोकणी असतील. मी मगाशी म्हणालो तसे भंडारी आणि कोळी तर होतेच. या समाजाचे हक्क होतेच. बघा ना भाऊचा धक्का... हा भाऊ कोण? गुजराती की पंजाबी?... दिल्लीचा की बंगाली? भाऊ म्हणजे आमचे भाऊ दाजी! त्याच्या नावाचा म्हणून तो भाऊचा धक्का! नाना शंकरशेठ यांनी जिजामाता उद्यानाच्या उभारणीत मोठा वाटा उचलला. आज तुम्ही त्याला राणीची बाग म्हणता.. राणीचा बाग काय? कोण ही राणी? मला त्याची तीप चीड आहे. तिडीक उठते. मी त्या उद्यानाला जिजामाता उद्यान हे नाव दिलंय आणि दिलंच पाहिजे. कोणी आमच्यावर मेहेरबानी करीत नाही. |
|
|
 |
आपल्याकडे नावांचे घोळच घातले जातात.... |
| |
खरं आहे. त्या व्ही.टी. स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. ते तुमचे कोण होते भिकार कलमाडी, तडमाडी, लडमाडी. त्यांना इतिहास माहीत नाही. कुठून साले आले!. येडझवे. त्यांनी बोरीबंदर म्हणजे व्हीटीला नाव देऊन टाकलं शिवाजी महाराजांचं. अरे, बोरीबंदरला म्हणजे त्यावेळच्या व्हीटी स्टेशनला नाना शंकरशेठ यांचं नाव द्यायला हवं होतं. पहिली रेल्वे ही नाना शंकरशेठ यांनी हिंदुस्थानात आणली, पण हे राहिलं बाजूलाच. कारण यांना इतिहासच माहीत नाही ना! |
|
|
 |
त्याला आता लोक सीएसटी म्हणतात... |
| |
होय. त्याची तर मला भयंकर चीड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंत तर मग सीएसटी असे उल्लेख का करता? हे कोण साले भडवे आहेत ते मला माहीत नाही हे सीएसटी म्हणणारे. कुठची अवलाद आहे ही! कुठून पडली मला माहीत नाही. सीएसटी हा उल्लेख बिलकूल चालणार नाही. निदान मराठी माणसाने तरी सीएसटी सहन करता कामा नये. छत्रपती शिवाजी टर्मिनस! टर्मिनसऐवजी तुम्हाला आणखी काही मराठी हवं तर म्हणा, पण छत्रपतींचं नाव आलंच पाहिजे. यायलाच पाहिजे. |
|
|
 |
नावांबद्दल लोकांमध्येही उदासीनता दिसते... |
| |
खरं आहे. अहो, मागे त्या गिरगावात लोकमान्य टिळक पोलीस ठाणे आहे तिथे. मला कळलं की, लोकमान्य टिळकऐवजी म्हणे लो. टी. मार्ग पोलीस ठाणे असं लिहिलं आहे. मला कळल्यावर मी स्वतः गेलो पोलीस ठाण्यात. म्हटलं हे काय चाललंय? चांगलं लोकमान्यांचं नाव असताना हे लोटी मार्ग काय आहे? कुणाला डायरीया झालाय? कुणाला हवी आहे लोटी? ही लोटी काढा. लोकमान्य टिळकांचं नाव लिहा. नाही तर मी डांबर आणलं आहे ते लावून टाकेन. तेव्हा पळापळ झाली. ’नाही, तसं करू नका, आम्ही लोकमान्यांचं पूर्ण नाव लिहितो’ वगैरे आश्वासन दिलं गेलं... लोटी काय? हे असं घडतं याला कारण तुम्ही. तुम्ही शेंदाड आहात मराठी माणसं. थंड रक्ताचे आहात. अलीकडे मॅरेथॉन झाली मुंबईत. त्यात कुणीतरी आले होते. शिवाजी महाराज आणि अफझलखानाच्या गेटअपमध्ये. शिवाजी महाराज आणि अफझलखान हातात हात घालून मॅरेथॉनमध्ये. इतकी नादान अवलाद पाहायला मिळावी या महाराष्ट्रात!! शिवाजी महाराजांनी काय दिलं होतं आपल्याला आणि आपण काय करून बसलो आहोत. कसले मराठे? चीड येते स्वतःची... आज मस्त्या करताहेत हे. अहो, तुम्हा कुणालाच संताप कसा येत नाही? काय सांगताय तुम्ही. |
|
|
 |
मुंबईच्या निमित्ताने जो लढा झाला तो लढा गुजराती बांधवांच्या विरोधी होता का? |
| |
नाही. कधीच नाही! केव्हाही होऊ शकत नाही! होता कामा नये. कारण गुजरात्यांनी झोपड्या नाही उभारल्या. धंदे केले. रोजीरोटी मिळाली. काही का असेना, पण आज बांगलादेशचे मुसलमान आणि पाकडे येताहेत, पाकिस्तानातून, बिहारमधून येताहेत, उत्तर प्रदेशातून येताहेत. त्यांचा हेतू या महाराष्ट्राबद्दल काय आहे? त्यांनी काय दिलंय या महाराष्ट्राला ते बघा. काय त्यांचा सहभाग आहे? चांगल्या सहभागाबद्दल बोलतोय मी! फक्त झोपडपट्ट्या फदफदल्या आहेत. रोगराई वाढली आहे. खरं तर मुंबईला काय धाड भरलेली नाही. मुंबई छान, सुंदर आहे, पण जे प्रदूषण वाढतंय ते या लोकांमुळे वाढलेलं आहे हे मी केव्हापासून सांगतोय. आता आणखीही काही निघालेत... कालपरवाकडे साले तेव्हा पाळण्यात मुततसुद्धा नव्हते. कारण त्यावेळी त्यांचा जन्मच झाला नव्हता, पण आता हेच लोक म्हणताहेत मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे थांबविण्यासाठी परमिट सिस्टीम आणली पाहिजे. कुठची लोक आहेत रे ही?... कळत नाही. शिवसेनेचा पहिला मेळावा ज्यावेळी शिवतीर्थावर झाला होता... २२ ऑक्टोबर १९६६... त्या मेळाव्यात... माझ्याकडे टेप आहे, कॅसेट आहे, सीडी आहे, ती ऐका. त्यावेळी वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. तेव्हा मी भाष्य केलेलं आहे की, लोंढे येण्यास सुरुवात झालेली आहे. आताच हे आवरले गेले पाहिजेत, नाही तर पुढे जड जातील म्हणून परमिट सिस्टीम सुरू करा. आता सही रे सहीवाले आलेत बरेच जन्मास. आमच्याच आशीर्वादाने म्हणा, कृपेनं म्हणा. जे मी बोलतोय तेच चाललंय त्यांचं... तोच त्यांचा मुद्दा आहे. म्हणजे शिवसेनेची कार्बन कॉपी ते वाटताहेत लोकांपुढे. शिवसेनेची कार्बन कॉपीच. |
|
|
 |
मुंबई हे स्वतंत्र राज्य व्हावं असं तेव्हाच्या भांडवलदारांना वाटत होतं... |
| |
अहो, भांडवलदार म्हणजे काय? भुसभुशीत जमिनींचे उंदीर. जमीन भुसभुशीत सगळी, पाडलं भोक आणि राहिले आतमध्ये जाऊन. काँक्रीट सिमेंट असेल तर पाडतील का भोक? |
|
|
 |
पण तेव्हाही मराठी माणसं मुंबईत बहुसंख्येने होती... |
| |
होती ना! लोंढे वाढल्यामुळेच आज टक्का कमी वाटतोय. म्हणूनच मी आता झालेल्या निवडणुकीबद्दल हाच प्रश्न प्रत्येकाला विचारतोय की, काय रे मराठी माणसाचा टक्का जास्त होता. त्यावेळेला आम्हाला एवढी का रे आघाडी नाही मिळाली, एक एक लाखाची. हां. का तर मराठी टक्का कमी झालाय, परप्रांतीय वाढलेत असा प्रचार करून तुम्हाला एक एक लाखाच्या आघाड्या. हे जे मतदान झाले हे मतदान कुठून आलं तुम्हाला? काय जादू आहे तुमच्याकडे? मतपेटीमध्ये जादू आहे की काही गुफ्तगू आहे. कुणाच्या आतमध्ये हात घालून काही केलंय? स्टॉक मार्केटमध्ये भैया धोतरात हात घालून ठरवतात ना बाजारभाव ते केलंत का तुम्ही? कशात हात घातलात तुम्ही? |
|
|
 |
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्यामध्ये पंचक होतं. त्या पंचकाने नेतृत्व स्वीकारलं. त्यात डांगे होते, प्रबोधनकार होते, एसएम जोशी, आचार्य अत्रे, वालचंद कोठारी होते... |
| |
नाही. डांगेबिंगे पंचकात नव्हते. पहिल्यांदा शंकरराव देवांनी सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र परिषद उभी राहिली, पण ऐन मोक्यावर रंगत येत असतानाच शंकरराव देवांनी राजीनामा दिला. देवगिरीकर होते. त्यांनी केव्हाच तिकीट काढून पलायन केलं त्यांच्या गावी. शंकरराव देवांनी शेवटी राजीनामा दिला. त्यावर आचार्य अत्र्यांनी टीकाही केली होती. शंकररावांकडे लुंगी असल्यामुळे ते राजीनामा कुठे ठेवणार? त्यांच्या लुंगीला खिसाच नाही. अशा पद्धतीने आचार्य अत्र्यांनी आपल्या भाषेत उत्तर दिलं होतं. त्यानंतर गडबड सुरू झाली. मग दादांनी म्हणजे प्रबोधनकारांनी आणि आप्पा पेंडसे वगैरे या लोकांनी पुढाकार घेतला. आचार्य अत्रे होतेच. तिथे मग ती पाच नेत्यांची समिती नेमली. दादा होतेच होते, आचार्य अत्रे, आप्पा पेंडसे पण होते. वा. रा. कोठारी हे ’प्रभात’चे संपादक त्यात होते. पुन्हा कोल्हापूरचे माधवराव बागल होते. ही माणसं होती. त्यांनी ही परिषद सावरून धरली. भाऊसाहेब राऊत म्हणून होते शेका पक्षाचे. त्यांच्या बंगल्यावर ही पहिली मीटिंग झाली. |
|
|
 |
पण त्या लढ्यात मुंबईतल्या कम्युनिस्टांचाही मोठा वाटा होता... |
| |
तो गिरणी कामगारांमुळे होता. त्यांच्या ताब्यात गिरण्या होत्या. सगळे कामगारही त्यांच्याच ताब्यात होते. डांगेंच्या, पण डांगे नेतृत्वाच्या पंचकात नव्हते. |
|
|
 |
गिरणी कामगारांनी मोठा लढा दिला... |
| |
होय. गिरणी कामगारांमुळेच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्यांचा त्याग विसरता येणार नाही. |
|
|
 |
मुंबई सर्वात जास्त कुठे पेटली? |
| |
कुठे पेटली म्हणजे? |
|
|
 |
मुंबईच्या कुठल्या भागात लढा पेटला. जास्त पेटलेली बघितली आपण... |
| |
नंतर सगळीच मुंबई पेटली होती ना. पहिला जो हुतात्मा झाला तो गोखले, गिरगावचा. त्याला गोळी लागली. त्यात तो गेला आणि तिथून मग सुरुवातच झाली. पहिला हुतात्मा. त्याच रस्त्याला नावही दिलेलं आहे. |
|
|
 |
असे अनेक हुतात्मे त्या लढ्यात झाले... |
| |
हो! |
|
|
 |
गोळीबार झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्या. महिला रणरागिणी बनून रस्त्यावर उतरल्या... |
| |
त्यावेळेला या रणरागिणींनी पोलिसांना जेरीस आणलं होतं. म्हणजे ती अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, देसाई नावाच्या महिला होत्या. तारा रेड्डी होत्या. भुसूभुसू कुठून निघायच्या हे पोलिसांनाही कळायचं नाही. बरं पोलिसांनी पडकून लांब कुठे तरी गाडी उभी केली ना की तिकडून दुसर्या रस्त्याने पुन्हा येऊन परत सत्याग्रह! पोलिसांना हैराणच केलं होतं अगदी. |
|
|
 |
आपल्याला त्या लढ्यातल्या काही आठवणी... |
| |
खूप आहेत हो, खूप आहेत. |
|
|
 |
विशेषतः मोरारजी देसाईंनी ज्या प्रकारचा अत्याचार केला... |
| |
मोरारजीने मला अटक करण्याचं वॉरंट काढले होतं. हे मला डॉ. नरवणेनं सांगितलं. ते म्हणाले, बाळासाहेब, तुमचं नाव आलंय काळ्या यादीत. मी म्हटलं, काय केलंय? त्यावर ते म्हणाले, ते काय माहीत नाही. तुम्हाला रात्री उचलणार. मी म्हटलं ठीक आहे, बघू या. माझी पंचाईत अशी झाली... हा जवळजवळ १९५४ की ५६च्या दरम्यानचा काळ. दादांना अटक झालेली. घरामध्ये कुणीच नाही. बिंदा लहान. बिंदाला दादांचा लळा जास्त. रोज संध्याकाळी दादा त्याला बाबागाडीतून घेऊन जायचे. त्याला फिरवून आणायचे. दादा तुरुंगात आणि मलाही पकडलं असतं तर मग माँवर जबाबदारी पडली असती, तर भयंकर असती. कारण माँ काय एवढी मोठी वयानं होती अशातला प्रश्न नव्हता. त्यावेळेला उद्धवचा जन्म झाला नव्हता. पण बिंदा आणि जयदेव होते. अगदी लहान. |
|
|
 |
पण मग मोरारजींनी वॉरंट का काढलं होतं? |
| |
सांगतो ना. मी त्यावेळी एक व्यंगचित्र काढलं होतं. मला वाटतं यशवंत देसाई होते. मुंबई हे साप्ताहिकाचं नाव. पहिल्या पानावरच ते व्यंगचित्र छापलं होतं. असंख्य कवट्या आणि त्यांच्यावर मोरारजी देसाई बंदूक घेऊन बसलाय आणि नरभक्षक मोरारजी हे टायटल. ते त्या मोरारजीला फार झोंबलं आणि त्याने अटकेचा हुकूम काढला. आता पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात भूमिगत म्हणून जो प्रकार होता. क्रांतिकारक भूमिगत व्हायचे. हा खरोखर भयंकर प्रकार होता. आता काय आम्ही माळ्यावर लपलो तरी भूमिगत. अरे आता भूमिगत कसे? वरती लपतात ना मग भूमगत कसे? हा प्रश्न कोणी कधी मनाला विचारला नाही. आम्ही आपले बहिणीकडे जाऊन राहिलो रात्री. जेवायला सकाळी घरी. झोपायला रात्री तिकडे. दोन बंगले सोडल्यास शेजारीच तिचं घर होतं. पण काही अटकबिटक झाली नाही.
|
|
|
 |
आपण कधी मोरारजींना भेटलात का!
|
| |
एकदाच. त्यांच्या त्या ओशियाना का आशियाना निवासस्थानी. |
|
|
 |
शिवसेना स्थापन झाल्यावर भेटलात.. |
| |
हो. त्यावेळेला मोरारजींनी मला १५ मिनिटांची भेट दिली. तेव्हा त्यांचा पोरगा होता तो कांती. बनेल पोरगं सालं. |
|
|
 |
भेटण्याचं प्रयोजन काय होतं? |
| |
काही नाही. त्यांनी सांगितलं, बोलवा त्यांना. आम्ही गेलो. गेलो वरती आणि भेटलो. ताबडतोब घड्याळ लावून बसायचा हा साला. येडझवा होता माणूस. घड्याळ लावूनच बसायचा. १५ मिनिटांची भेट. १० मिनिटांची भेट. टर्रर्र वाजलं की उठा. माझ्यावेळी १५ मिनिटांनी टर्रर्र वाजलं. मी जय महाराष्ट्र केला. पण त्याने मला विचारलं की, ही शिवसेना, शिवसेना काय आहे? ही ’सेना’ काय आहे? त्याचा सेनेशी काय संबंध आहे? म्हटले सेनेशी काही संबंध नाही. पण त्यात एक फोर्स असतो, जोर असतो म्हणून सेना म्हणतो. तो म्हणाला, पण सेना कशाला पाहिजे? मग मीही विचारलं, म्हटलं साल्व्हेशन आर्मी म्हणजे काय? What salvation has to do with Army? त्यावर मोरारजी गप्प. तेवढ्यात आमची घंटा वाजली. मग कांती आला लगेच दुसरं घड्याळ घेऊन आणि आधीचं घड्याळ घेऊन गेला. मग आम्ही उठून म्हटलं, ’जय महाराष्ट्र!’ पण तो काही जय महाराष्ट्र बोलला नाही. त्यानं नुसता नमस्कार केला. तो भडवा कोणत्या तोंडाने बोलेल जय महाराष्ट्र? |
|
|
 |
संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू असताना स. का. पाटील नावाचं व्यक्तिमत्त्व आडवं आलं... |
| |
हो. यावत्चंद्रदिवाकरौ मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही अशा वल्गना करणारे तेच ते पाटील. म्हणे सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. काय झाले? मुंबई जिंकली मराठी माणसाने.
|
|
|
 |
मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून त्यांचा उल्लेख व्हायचा..
|
| |
कसला सम्राट? बाकीचे सगळे गांडूळ असले की एक कुणीतरी सम्राट निघतो त्यात. ही काँग्रेसची परिस्थिती होती त्यावेळेला. बीपीसीसी त्याच्या हातात होती. तसे शरद पवारांनीसुद्धा सगळे भांडवलदार त्यांच्या ताब्यात ठेवलेत पुण्यामधले. अगदी कल्याणीपासून. केवळ पुण्यातलेच कशाला इतरही मुंबईचे भांडवलदार पवारांच्या ताब्यात आहेत.
|
|
|
 |
स. का. पाटलांबद्दल आपलं काय मत होतं?
|
| |
गेलेल्यांबद्दल वाईट बोलू नये असे म्हणतात, पण आमच्या वडिलांचे काही दुर्गुण आमच्या अंगात आहेत ते उसळून बाहेर पडतात. ’केरळ कोकिळ’ म्हणून एक पाक्षिक निघायचं काहीतरी. आठल्ये गुरुजी ते काढायचे. दादा त्यांचे फार भक्त होते. त्यांची भाषा दादांना आवडायची. त्यांचे अग्रलेख वाचायचे. हे असं असताना एकदा आठल्ये गुरुजी खुर्चीवर बसलेले. त्यांची मैफलच जमलेली, बाकी सगळे खाली जाजमावर. मध्येच आठल्ये गुरुजी दादांना म्हणाले, ’केशव माझ्याबद्दल तुमचं काय मत आहे ते यांना सांगा. सगळ्यांना कळू दे.’ दादा त्यांचे भक्त आहेत वगैरे त्यांच्या कानावर त्यावेळी गेले होते. दादा आधी नाही नको असे म्हणाले. पण आठल्ये गुरुजी ऐकेनात. त्यांचा आग्रह सुरूच होता - अरे, सांग मी सांगतोय ना, तू बोल... शेवटी दादांनी धाडस करून सांगितलं. म्हणाले, ’’गुरुजी आपण ज्यावेळेला खुर्चीवर बसता त्यावेळेला तुमच्या पायाचं तीर्थ घ्यावंसं वाटतं, पण ज्यावेळेला आपण खुर्चीवरून उठता त्यावेळी आपल्याला जोड्यानं मारावं असं वाटतं.’’ सगळ्यांच्या समोर दादा बोलून गेले. तर तुम्ही जे स. का. वगैरेंचं सांगताय त्यावर काय बोलणार, अशा काही व्यक्ती आहेत आपल्या राजकारणात.
|
|
|
 |
पण या सगळ्या लोकांनी नेतृत्व केलं काँग्रेस पक्षाचं आणि त्यांनी काँग्रेसची भूमिकाच पुढे चालवली...
|
| |
नाही आता पूर्वीची काँग्रेस कुठे राहिली नाहीच. आता काँग्रेस शिल्लक नाही! हे माझं स्पष्ट मत आहे.
|
|
|
 |
पूर्वी चिंतामणराव देशमुख होते, ते एक स्वाभिमानी निघाले...
|
| |
हो अर्थातच! दिल्लीतला एकमेव स्वाभिमानी मराठी माणूस. त्यावेळेला मी फ्री प्रेसमध्ये होतो. महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात आकस आहे असं ठणकावून सांगून या तडफदार माणसाने राजीनामा नेहरूंच्या तोंडावर फेकला आणि नेहरूंनी तो लगेच स्वीकारला. स्वीकारला तर स्वीकारला पण देशमुखांना विमानतळापर्यंत पोहोचवायलासुद्धा नेहरू गेले नाहीत. कृष्णामाचारीने राजीनामा दिला होता. त्याच्या पोरानं फ्रॉड केला. सगळं ते एक्सपोज झालं. पण ते अर्थमंत्री होते ना. त्यांनी राजीनामा दिल्यावर हेच नेहरू त्यांना सोडायला, पोहोचवायला, टाटा करायला दिल्लीच्या एअरपोर्टपर्यंत गेले. हा आकस मराठी माणसाबद्दलचा.
|
|
|
 |
चिंतामणराव देशमुखांच्या राजीनाम्याने या लढ्याला एक बळ प्राप्त झालं...
|
| |
धार आली. लढ्याला नक्कीच धार आली!
|
|
|
 |
पण हेच देशमुख नंतर राजकारणातून नाहीसेच झाले...
|
| |
हो. नंतर विलासराव देशमुख आलेना. लाथ मारली की ते उठतात. बाजूला जाऊन परत बसायला सांगतात हे आमचे देशमुख.
|
|
|
 |
आपण कधी चिंतामणराव देशमुखांना भेटलात का?
|
| |
नाही. पाहिलंय फक्त, भेट नाही झाली.
|
|
|
 |
या अशा असंख्य लोकांच्या त्यागातून आणि लढ्यातून १ मे १९६० रोजी महाराष्ट्राचा मंगल कलश आला तेव्हा आपल्या भावना काय होत्या?
|
| |
भावना म्हणजे काय? आनंदासारखी दुसरी गोष्ट कोणती असू शकते? मला एक वाक्य आठवतं. शिवतीर्थावर नेहरूंची सभा होती. त्यावेळी आपले ते महर्षी कर्वे आले होते. धोंडोपंत कर्वे. एकशेएक वर्षांचे. त्यांनी भाषण केलं. शेवटचे शब्द त्यांचे एवढेच होते की, ’माझे डोळे मिटण्यापूर्वी मुंबई महाराष्ट्राला मिळण्याचं भाग्य लाभो अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करतो.’ हे त्यांचे वाक्य होते. नंतर कर्वे गेले. अशी भयंकर तेजस्वी वाक्य उच्चारणारी, बोलणारी माणसं होती महाराष्ट्रात. आज काय आहे?”मुसलमानांना घरांची आरक्षणं द्या!’ असं बोलणारी मराठी माणसं! पहा काय दुर्दैव आहे.
|
|
|
 |
जो मंगल कलश १९६० साली आला. त्या लढ्यात सामान्य माणूस, कामगार, शेतकरी मारला गेला. त्या मंगल कलशाची मालकी आज कुणाकडे आहे?
|
| |
त्या मंगल कलशाची कोणी कुठे काँग्रेसवाल्यांनी भंगारात वाट लावली आहे त्याची काही कल्पना नाही मला. आपल्याला सगळे भंगार शोधावे लागतील की आमचा मंगल कलश तुमच्याकडे आहे का हो... अशी भंगारवाल्यांची दारं ठोठवावी लागतील. त्यात सापडला तर सापडला. पण नैराश्य येण्याचं कारण नाहीय.
|
|
|
 |
ही वेळ आपल्यावर का आली?
|
| |
कारण आपला मतदार जो आहे ना... लोकशाहीतला मतदार. तो विचारानं पक्का असायला हवा होता की नको हे सरकार पुन्हा नाही आणायचं राज्यात. नाही म्हणजे नाही. शिवसेना-भाजप युतीची सत्ता गेल्यावर तुम्ही पुन्हा पाच वर्षे काँग्रेसला दिली. त्यानंतर पुन्हा पाच आणि आता पुन्हा पाच देता... अरे काय मिळवलंत काय तुम्ही! याचा विचार करणार आहात की नाही? काँग्रेसने दिलं काय तुम्हाला? हा विचारही तुमच्या मनात येऊ शकत नाही! बरं मतपेटीमध्ये गडबड असेल तर ठीक आहे मी तुमच्यावर आरोप करणार नाही, तुम्ही दोषी नाही. पैशांचे काही कारभार झाले असतील का? तर ते झालेत हे नक्कीच. एक व्यक्ती तुमच्यासमोर आणून उभी करतो मी त्यांनी चक्क सांगितले की मी कोणत्याही पक्षाचा नाही, पण पैसे वाटपामध्ये मी होतो. पाचशे, हजार, दहा हजार, काही ठिकाणी स्लमलॉर्डस्ना तर पंचवीस लाख दिले आहेत. आम्हीही वाटलेत पैसे, सांगणारी एक व्यक्ती आहे माझ्याकडे. अशा पद्धतीने तुम्ही निवडणुका जिंकणार असाल तर काही अर्थच नाही आणि लोकशाहीलाही काही किंमत नाही. तिथे मंगल कलशाचा कसला विचार करताय तुम्ही?
|
|
|
 |
संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा प्रामुख्याने काँग्रेसच्या विरोधातला लढा होता...
|
| |
हो. त्यावेळी ती परिस्थिती तशीच होती ना! नेहरू हा कुणाचा पुत्र? मोतीलालचा. मोतीलालचे महाराष्ट्राविषयी काय विचार होते ते मी मघाशीच तुम्हाला सांगितलंय त्या नेहरूंकडून तुम्ही काय अपेक्षा करता?
|
|
|
 |
ज्या काँग्रेसच्या पुढार्यांनी मुंबईसह महाराष्ट्राला विरोध केला...
|
| |
तेच तर सांगतोय, अहो, यशवंतरावांनी मंगल कलश आणला त्याचं लोकांनी स्वागत केलं आणि लोक आधीचं सगळं विसरले. महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे असे यशवंतरावच म्हणाले होते आणि त्याच यशवंतरावांच्या हातात मंगल कलश! एवढंच नव्हे तर आणखी भयानक वाक्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही देशी वसाहतवाद आहे असे यशवंतराव म्हणाले होते. पण लोक सगळं विसरले. बरं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ म्हणजे जर देशी वसाहतवाद असेल तर मग आंध्रला तुम्ही भाषावार प्रांत दिलात तेव्हा तुमचा हा वसाहतवाद कुठे गेला होता? हे आमचं नेतृत्व दुर्दैवानं आहे. उदो उदो आम्ही करतो ठीक आहे, पण एकदा का आमचा देव घुमायला लागला की ऐकत नाही... मग काय तुम्ही धूप टाका, अमूक टाका सगळ्यातनं जातो आतमध्ये आणि घुमायला लागतो.
|
|
|
 |
मुंबई जिंकली विरोधी पक्षाने आणि पुन्हा सत्तेवर बसली काँग्रेसच...
|
| |
पक्ष असं मी म्हणणार नाही. मराठी माणसाच्या एकजुटीनं, वज्रमुठीनं जिंकली. हीच एकजूट, वज्रमूठ मला आजही महाराष्ट्रात हवी आहे... म्हणून मी नेहमी म्हणत असतो मराठा - मराठेतर, ब्राह्मण - ब्राह्मणेतर, स्पृश्य - अस्पृश्य, घाटी - कोकणी हे वाद गाडा आणि मराठ्यांची मजबूत एकजूट उभी राहू द्या.
|
|
|
 |
संयुक्त महाराष्ट्राची लढाई ही मराठी माणसाची एकजूट होती ती एकजूट का टिकली नाही?
|
| |
कारण आम्ही विद्वान माणसं आहोत, फार विद्वान! आणि त्यामुळे साहित्यिक, अमूक-तमूक, प्रत्येकाचं स्वतंत्र दालन, व्यक्तिपूजा अशा सगळ्या गोष्टी आणि या देशात आता सध्या सत्ता आणि निवडणुका एवढेच लोकांना कळते. निवडणुका हा तर ऑक्सिजन बनला आहे. प्राणवायू ठरलेला आहे. पूर्वी हा प्राणवायू असा नव्हता. पाच वर्षांनी निवडणुका लढवल्या जायच्या. वेळेत व्हायच्या, पण नंतर मतपेट्या पळवण्याचे धंदे सुरू झाले गुंडांकडून. हे काँग्रेसने सुरू केलं. मतदान झालं की पेट्या पळवायच्या. आणि उरलेल्या पेट्यातलं मतदान मोजून आपला उमेदवार विजयी करायचा. आता गुंडसुद्धा निवडणुका लढवताहेत आणि निवडून येताहेत. तुरुंगात असताना. ही तुमची लोकशाही.
|
|
|
 |
पन्नास वर्षांत विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र किती पुढे गेलाय असं वाटतं?
|
| |
तो नक्की कुठे आहे तेच कळत नाही आम्हाला. पुढे की मागे की मध्येच लटकतोय?
|
|
|
 |
एक राज्य घडवायला पन्नास वर्षांचा काळ?
|
| |
अहो, तुम्ही बघताय ना सगळं, काय चाललंय ते. टॉवर्स काय उभे राहाताहेत, झोपड्याही उभ्या राहाताहेत. तरीही लोक बेघरच आहेत. मग टॉवर्समध्ये राहणारे कोण? त्यांच्या किमती किती? कोण उद्ध्वस्त होतं? कोणाचं आपण भलं करतोय आणि आपण कोणासाठी राज्य करतोय, कोणासाठी राज्यावर बसलो आहोत? हे राज्य कोणाचे? महाराष्ट्र आहे की आणखी काही? काही नाही फक्त पैसे द्या आणि पैसे घ्या. हा असला प्रकार चालला आहे.
|
|
|
 |
मराठी माणसाच्या चाळी तुटल्या - गिरण्या गेल्या...
|
| |
हो पण सौदे कुणाचे झाले? एक मजबूत जर आपला पक्ष असता... शिवसेनेला जर लोकांनी एका मजबुतीने सत्तेवर बसवलं असतं तर आम्ही हे होऊ दिलं नसतं. युतीची सत्ता असताना सत्तेतल्या लोकांनी जेव्हा चुका केल्या तेव्हा त्यांनाही मी क्षमा केली नाही. मंत्री उडवले मी युतीच्या काळात. दोन मंत्र्यांना खुर्चीवरून खाली उतरवलंय. दोन. आता नावं नाही घेत. नाहीतर पुन्हा ते उजेडात येतील.
|
|
|
 |
कलेचा संबंध असेल, संस्कृतीचा असेल आणि उद्योग ही तीन क्षेत्र अत्यंत महत्त्वाची, त्यात आपण महाराष्ट्राला कुठे पाहता?
|
| |
कलेचा विचार करण्याअगोदर अकलेचा आधी करा. मग पुढे जाऊ आपण.
|
|
|
 |
अकलेत महाराष्ट्र पुढे गेलाय का?
|
| |
केंव्हाही. आमचा तो जन्मसिद्ध हक्कच आहे.
|
|
|
 |
अशी अक्कलवंत माणसे आपण सांगू शकाल का?
|
| |
मी याविषयी बोलू शकणार नाही. मी जर माझं नाव घातलं तर तुम्ही बोंब माराल. बरं या विषयाची मोडतोड होईल... आहेत हो चिक्कार अक्कलवंत माणसे आहेत.
|
|
|
 |
या महाराष्ट्राने लोकमान्य टिळकांपासून अनेक...
|
| |
अहो किती जुनी नावं वापरणार!
|
|
|
 |
पन्नास वर्षांतला जरी विषय घेतला...
|
| |
हे बघा. सहाणेवर आपण चंदन घासतो. चंदन घासल्यावर ते झिजत जाते. मग पुन्हा नवं चंदन घेतो, पण चंदन हे नाव राहतच. तुम्ही या नावाचा चंदनासारखा वापर करताय. मग ते टिळक असोत वा शिवाजी महाराज. ही सगळी चंदने आपापली कार्ये करून झिजले.
|
|
|
 |
नवीन चंदन निर्माण नाही झालं?
|
| |
नाही. |
|
|
 |
महाराष्ट्र याबाबतीत इतका वांझ आहे?
|
| |
नाही ना. वांझ नसताना लोकसंख्या वाढतेय. हे विशेष!
|
|
|
 |
उद्योगात महाराष्ट्र पुढे गेलाय का?
|
| |
ह्यॅ! |
|
|
 |
‘आयपीएल‘चं म्हणत नाही मी, खर्या उद्योगांविषयी म्हणतोय मी...
|
| |
होय. त्याचा विचार केला तर खरोखर जरा धस्स होतं. या महाराष्ट्राने देशाला काय दिलं नाही? किर्लोस्कर दिले, गरवारे दिले, वसंतराव वैद्य दिले. आमची सगळी मराठी माणसं ही. आज त्यांची नावं राहिलीत, पण धंदे कुठे आहेत? बाहेरून इतर आले आणि त्यांच्यावर मात करून ते पुढे चालले आहेत. मराठी माणसाचा नवीन उद्योग आहे कुठे? तसे काही आहेत, नाही असं नाही. आता दुबईला कुणीतरी मराठी साहित्य संमेलन भरवले होते. दातार. धनंजय दातार. त्यांनी संमेलनाला मोठी मदत केली होती. पण या मंडळींचा तिकडे जाऊन उत्कर्ष होतो तर इथे का होत नाही?
|
|
|
 |
अंबानी मुंबईत येऊन मोठे झाले. महाराष्ट्रात येऊन अनेक उद्योगपती मोठे झाले...
|
| |
हो ना, पण मग मराठी माणूस का मोठा होऊ शकत नाही.
|
|
|
 |
का असं वाटतं तुम्हाला की आपले लोक नोकर्या करण्यातच धन्यता मानतात...
|
| |
नाही. तसं नाही. शिवसेनेची सुरुवात झाल्यानंतर मी शिवसैनिकांना लिम्का स्टॉल्स दिले. नाक्यानाक्यावर हे स्टॉल्स दिसत होते, पण काही ठिकाणी नंतर त्या पानाच्या गाद्या बनल्या. तंबाखू, पानं, चुना, पोस्टाची कार्डं, कोका कोला, अमूकतमूक. शेवटी ते लिम्कावाले माझ्याकडे तक्रार करायला लागले की आमचं सॉफ्ट ड्रिंक ठेवल्यानंतर लिम्काच्या विरोधात कोका कोला आहे व पेप्सी आहे. ते कसं ठेवू शकता? आणि ते खरंच होतं. पण त्यामध्येही काही लोकांनी आणखी कमाल केली. दीडशे-दोनशे रुपये घेऊन घरी बसायचे आणि दाक्षिणात्य आणि भय्यांना स्टॉल्स चालवायला द्यायचे. घरबसल्या हप्ता घ्यायचा. काय करायचं या दुर्दैवाला! किती मरायचं, कोणी मरायचं? आणि का मरायचं, हा प्रश्नही येतो. तुमच्यासाठी दिले होते ते स्टॉल्स आणि तुम्ही ते विकता दुसर्यांना?
|
|
|
 |
या अशा अनुभवानंतरही...
|
| |
ऐका आणखी सांगतो. तिकडे वरळीला बाळकृष्ण गावडे होते आमचे नगरसेवक. त्यांनी झोपडपट्टीवाल्यांना जिजामाता हाऊसिंग सोसायटी बांधून दिली. सगळी मराठी माणसं होती, पण काही दिवसांनी पहातो तर त्या मराठी माणसांनी आपल्या जागा भय्यांना दिल्या पैसे घेऊन. जाऊन बघू शकता तुम्ही.
|
|
|
 |
कलेच्या विषयी म्हणाल तर लता मंगेशकरांचे नाव आपण अनेक वर्षे घेतोय...
|
| |
हो. आहेच मुळी.
|
|
|
 |
सचिन तेंडुलकर आहे...
|
| |
हो. जरूर.
|
|
|
 |
सुनील गावसकर...
|
| |
तो तर सुरुवातीचा जबरदस्त माणूस.
|
|
|
 |
क्रीडा आणि कला क्षेत्रात महाराष्ट्राने मोठं योगदान दिले आहे, पण राजकारणात महाराष्ट्र का पुढे जाऊ शकला नाही?
|
| |
कारण लता मंगेशकर असो, सचिन तेंडुलकर असो वा गावसकर असोत त्यांना जी देणगी लाभली तशी माणसं राजकारणात कुठे आहेत. राजकारणात देणगी लाभलेली नव्हे तर देणग्या घेणारी माणसं आहेत म्हणून हा घोळ आहे. लता मंगेशकर यांना आवाजाची देणगी आहे, पण राजकारणात जे आहेत त्यांना देणग्या मिळतात. देणगी - देणगीमध्ये हा फरक आहे. राजकारणात आहेत ते देणगी घेणारे लोक आहेत. हे घेणारे सामान्य लोकांसाठी काय करू शकतात? याचा विचार करा ना. देणगी या शब्दाचा फरक लक्षात घ्या.
|
|
|
 |
महाराष्ट्रात सतत देशाचं राजकारण केलं गेलं. |
| |
असं म्हणतात. वाक्यं चांगलं आहे. |
|
|
 |
पण तोच महाराष्ट्र कधीही दिल्लीवर राज्य करू शकला नाही. |
| |
काय करणार? कारण तुमच्या हातात असलेली किल्लीच तुम्ही गमावून बसलेले आहात.
|
|
|
 |
अधूनमधून शरद पवार प्रयत्न करतात. |
| |
नाही. शरद पवार यांचं राजकारण तसं कधीच मला मान्य झालं नाही. ते शब्दाचे पक्के नसतात. माझे फार फार म्हणजे ते कोणीच नसताना, काँग्रेसमध्येही कुणीच नसताना माझे मित्र होते. याच ’मातोश्री’मध्ये यायचे. प्रतिभाताई यायच्या. सुप्रियाही एवढुसं जळू आणलं होतं कापडात गुंडाळून. आता मोठी झाली. इतका जुना संबंध असतानासुद्धा... आमचे वैयक्तिक संबंध जरूर आहेत. आहेत आणि मी तरी ठेवतोच. तेही ठेवतात असं मला वाटतं. पण राजकारणात नाही. राजकारणात दिलेला शब्द पाळतील अशी खात्री नाही. |
|
|
 |
आजही महाराष्ट्र दिल्लीत हुजरेगिरी करताना दिसतोय? |
| |
गुडघे टेकलेत. काय! विलासराव काय, हे काय.. आता मध्यंतरी शाहरुख खानच्या त्या चित्रपटाबद्दल मी आवाज उठवला होता. काय पोलीस बंदोबस्त त्या चित्रपटाला. ’माय नेम इज खान’ला पोलिसांचं कडं थेटरात, पोलीस ’भरती’ नुसती. पोलीस भरती बाहेर होत नाही, पण शाहरुखसाठी थेटरात पोलीस ’भरती’. कुणाची अब्रू वाचवताय. कशासाठी वापरताय पोलीस? कुणाला वाचवताय? दुसरे ते राहुल गांधी? कोण हे राहुल गांधी? राजीव गांधींचा मुलगा...
|
|
|
 |
काँग्रेसचे युवराज आहेत ते... |
| |
युवराज. इटालियन पुत्र. केवढा बंदोबस्त आणि काय तो शो. रेल्वेतून प्रवास. लोकलने प्रवास केला म्हणे. तिकिटाच्या रांगेत उभे राहिले. अरे, एवढी तुझी परिस्थिती आली असेल तर आम्ही तुला तिकिटांचे पैसे दिले असते ना! आणि मग तिथेसुद्धा ’लोकसत्ता’सारखी वृत्तपत्रं आहेतच उदोउदो करायला. आमच्यावर बरेचदा टीकाच करत असतात. अलीकडे जरा बरं आहे. पण त्यांच्याच फोटोग्राफरने सांगितले. शिवाय मी ’टीव्ही’वर पाहिलं. राहुल गांधी एका डब्यात शिरला. सगळे डबे रिकामी होते. नाहीतर लटकलेली माणसं दिसली नसती का? रोज लोक लटकतात. दांडा धरून प्रवास करणारी कितीतरी माणसं आहेत. कसेबसे जीव वाचवून घरी पोहोचले तर पोहोचले. बायकोचं कुंकू टिकलं तर टिकलं अशी त्यांची अवस्था असते. असं असताना राहुल गांधीसाठी लोकल मोकळी कशी? तर आतमध्ये जवान ठेवले होते हत्यारी! हे कुठे समजलं, तर फोटोग्राफर ’लोकसत्ते’चा, त्याने सांगितले. त्याला राहुल गांधीचा एक फोटो काढायचा होता. खूप त्याने प्रयत्न केला, पण कंमाडोजनी राहुल गांधीला घेरावच घातला होता. म्हणून डब्याची थोडी उंची घेऊन फोटो मिळाला तर बघू या उद्देशाने तो एका डब्यात शिरला. तिकडे जवान होते ते अंगावर खेकसले, ’ए नीचे उतरो, नीच उतरो.. तो म्हणाला, मला ’एकच’ फोटो काढायचा आहे. तेवढ्यात राहुल गांधी आले आणि त्याने क्लिक मारला तेवढाच फोटो छापून आलाय तोही लोकसत्तेत. मी व्यंगचित्रकार असल्याने माझी एक हलकट नजर आहे ती फिरत असते. |
|
|
 |
दक्षिणेची जी राज्यं आहेत ती त्यांच्या भाषेच्या बाबतीत, अस्मितेबाबतीत जास्त जागरूक आहेत. |
| |
ते तर मी केव्हापासून बोलतोय. आता कंटाळा आला त्याचा. या दाक्षिणात्यांचा एक गुण घेण्यासारखा आहे तो म्हणजे त्यांचा कडवा अभिमान भाषेबद्दल... प्रांताबद्दलचा. आम्ही कोण? मराठी माणसं, आईबापाच्या पोटी जन्माला येणारी! कुणी आलं की आम्ही विचारतो कैसे हो आप, तबियत कैसी है?... काय रे भडव्या, आईला विसरलास का? मराठी बोल ना! माझ्याकडे कोणी आला आणि मुंबईऐवजी बॉम्बे बोलला की त्याला ताबडतोब थांबवतो. बॉम्बे नाही, मुंबई बोल. नाहीतर पुन्हा इथे यायचं नाही. पाऊल ठेवू देणार नाही. तिथल्या तिथे फटकावतो. छगन भुजबळ आता राष्ट्रवादीत जाऊन बसलेत. त्यांना विचारा गेटवे ऑफ इंडियाला जो मुंबईचा बोर्ड आहे त्याचं उद्घाटन मी केलेलं आहे. भुजबळ महापौर असताना. जा विचारा त्याला. किती साली ते आता आठवत नाही, पण हा महापौर केव्हा होता ते बघा. वर्ष काढा. त्यावेळेला मी केलेलं आहे. |
|
|
 |
महाराष्ट्र इंग्रजीत मागे पडला का? |
| |
डॅडी-मम्मीपुरता पुढे आहे. इंग्लिश बोलायला लावू नका आम्हाला. पण आम्ही असे अगदी डॅडी म्हणतो, मम्मी म्हणतो, आईबाबा नाही म्हणत. |
|
|
 |
का ही सवय लागली महाराष्ट्राला? |
| |
सवय कसली लागलीय? कुठेतरी विद्वत्ता दाखवायला पाहिजे ना आपण. दिखाऊपणा हा आता आपल्या रक्तात भिनलाय की काय कळत नाही. |
|
|
 |
पन्नास वर्षांनंतरसुद्धा आपल्याला मराठीचा लढा द्यावा लागतो का? |
| |
शिवसेनेमुळे हा लढा देण्याची ताकद मराठी माणसात निर्माण झाली आहे. शिवसेनेमुळेच! |
|
|
 |
तुम्हाला त्यासाठी शिवसेना स्थापन करावी लागली? |
| |
हो त्यासाठीच स्थापन करावी लागली. त्यावेळेस परिस्थितीच तशी होती. या आधीच्या भागात मी परमिट सिस्टीमबद्दल सांगितलंय. ही कल्पना मी दिली होती. शिवसेना नसती तर आणखी अधोगती झाली असती. कच्चं खाल्लं असतं तुम्हाला या लोकांनी. कच्चं! आणि मुंबईही हातची जाण्याच्या मार्गावर आहे, पण मी तशी ती जाऊ देणार नाही. कोणीही प्रयत्न करून बघा. मी स्वतः त्या युद्धात उतरेन. प्राण गेला तरी मला पर्वा नाही, पण मी उतरेन आणि मुंबईला कोणी हात लावला तर सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. |
|
|
 |
मराठीचा लढा किती काळ लढणार? |
| |
आपले लोक फार विद्वत्ता दाखवायला जातात. आम्ही विद्वान आहोत. साहित्यिकांचा एक विचार, याचा एक विचार, त्याचा एक विचार. एक गोष्ट सांगतो तुम्हाला की, एकदा काही मराठी माणसं, सिंधी माणसं, गुजराती माणसं, मारवाडी हे एकत्र एका जहाजातून प्रवासाला चालले होते. वाटेत जहाज खडकावर आपटून फुटलं. शोध सुरू झाला प्रवाशांचा. हेलिकॉप्टर भिरभिरायला लागली. त्यांनी पाहिलं तो एका ठिकाणी हालचाल होती. म्हणून खाली येऊन पाहिलं तर तिथे एका सिंधी माणसाने धंदा सुरू केलेला. काहीतरी उद्योग सुरू केला त्याने. दुसरीकडे बघितलं तर मारवाड्याने पेढी उभी केली होती. उडप्याने हॉटेल काढलं होतं. प्रत्येकानं काही ना काही उद्योगधंदा सुरू केला. सगळ्यांचा शोध लागला. कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या धंद्यात अडकला. मराठी माणसं कुठे सापडेनात. शेवटी एका खडकावर दोन मराठी माणसं दिसली. बरगड्या निघाल्या आहेत, दाढी वाढलेली, चर्चा करताहेत. रंगभूमीने चित्रपटाला मारलं की चित्रपटाने रंगभूमीला मारलं यावर चर्चा... आता बोला! आम्ही चर्चेत पटाईत. साहित्य संमेलनात दरवेळेला वादच का व्हावेत सांगा ना! एक मला असं साहित्य संमेलन दाखवा की ज्यात वाद झालेला नाही. अहो, दुबईतसुद्धा गोंधळ झाला. दुबईतसुद्धा. कारण आम्ही आमचा खाक्या सोडणार नाही वादविवादाचा. म्हणून! |
|
|
 |
हा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रात फुटीचे वारे वाहताहेत वेगळ्या विदर्भाचे, काही लोकांनी उचल खाल्ली आहे. |
| |
उचल कसली. ते आमचे आंबेडकरांचे नातू. काळा दिवस. काळी निशाणं दाखवा म्हणताहेत. अरे काय हे? ज्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पाडलं त्यांचा तू नातू. तू असे उद्गार काढावेस. महाराष्ट्राचं काही महत्त्व नसावं, कसला विदर्भ? |
|
|
 |
विदर्भ निर्माण झाल्यामुळे प्रश्न सुटतील का त्यांचे? |
| |
नाही. सुटूच शकत नाही. बघा ना. उत्तर प्रदेशचे तुकडे झाले, काय झालं तिथे! आता पस्तावताहेत. आता पुन्हा उत्तर प्रदेशात येऊ द्या म्हणताहेत. काय हालत झालीय. काय झालं तिकडे आता... नक्सलाईटस् जोर धरताहेत. छत्तीसगढचेही तेच झाले. |
|
|
 |
एका बाजूला विदर्भ फुटण्याचं संकट आहे. |
| |
अरे कसला वेगळा विदर्भ. सीमा प्रश्न आधी सोडवा. जे गेलं ते मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि तुम्ही आहे ते काय सोडताय. ही कसली भिक्कार कल्पना आहे तुमची. भिक्कार मनोवृत्ती. आणि तिकडे वेगळा विदर्भ दुर्दैवाने झाला तर सत्ता मराठी माणसाची राहणार नाही. हे तुम्हाला मी आज लिहून देतो. होणार काय? बरं, ते जाऊ द्या. मी काही बोललो की पुन्हा ते जातीयवादावर जाईल. म्हणतील, हा जातीय प्रचार करतोय. |
|
|
 |
कुणी वेगळा विदर्भ मागतोय, कुणी मुंबईचा नारा लावतोय. कोणी वेगळं कोकण मागतोय हे सगळे पाहिल्यावर हा महाराष्ट्र अखंड राहील असं आपल्याला वाटतं का? १०५ हुतात्म्यांचं हौतात्म्य वाया गेलं असं आपल्याला वाटतं का? |
| |
नाही. वाया जाणार नाही. जाऊच शकत नाही. महाराजांच्या वेळेलाही चिकार रक्तपात झालाय. मग ते बाजीप्रभू देशपांडे असोत वा हजारो मावळे असोत. मुरारबाजी असोत. त्यांनी त्याग केला म्हणून आजच्या महाराष्ट्रापर्यंत येऊन तुम्ही पोहोचलात, पण आता तोच महाराष्ट्र टिकविण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण व्हायला हवी. |
|
|
 |
शिवसेनेची महाराष्ट्राबाबत जी भूमिका आहे ती कायम राहिली आहे? |
| |
राहणारच. |
|
|
 |
तुम्ही जर शिवसेनेचे राष्ट्रीय पातळीला नेतृत्व केलंत. लोकसभा निवडणुका शिवसेनेने लढवल्या, पण मराठी माणूस आणि महाराष्ट्र याबाबत शिवसेनेने कायम आपली भूमिका ठामपणे मांडली. हीच भूमिका यापुढे कायम राहील? |
| |
राहील म्हणजे काय? राहणारच! मला धरसोडीचं राजकारण आवडत नाही. |
|
|
 |
सातत्याने आपल्यावरही टीका होत होती, कधी आपण हिंदुत्वाची कास धरलीत, कधी मराठीचा नारा दिला! |
| |
हे बघा. आता माझ्या शब्दात बोलणं कठीण असतं आणि तुम्ही छापूही शकत नाही. मला बोलायला परवानगी आहे. तशी परवानगी कोणी मला देण्याची गरज नाही. मग मी काय म्हणतो, आपण सगळे भिकारचोर आहोत. ’र’ काढू नका ’ट’ टाकू नका. आम्ही भिकारचोर! ज्यावेळी शिवसेनेला मी मराठी माणसासाठी जन्म दिला त्यावेळेस देशाचं काय होणार असा प्रश्न तुम्ही विचारला आणि इस्लामचा धोका वाढायला लागला तेव्हा मी हिंदुत्व हाती घेतले. त्यावेळी तुम्ही काय म्हणाला की आता मराठीचं काय होणार? अरे मराठीचा मुद्दा घेतला की हिंदुत्वाचं काय होणार विचारता आणि हिंदुत्व हाती घेतलं की मराठीचं काय? असं विचारता अशी अशी बाराबोड्याची माणसं, त्यांच्याबद्दल काय बोलायचं? |
|
|
 |
महाराष्ट्रात आता लढणारी पिढी उरली आहे का? |
| |
पिढी मरत नसते. आजही किती कडवट शिवसैनिक पाहिजेत तुम्हाला? असंख्य आहेत. आजही मुंबई बंद म्हटल्यावर बंद करून दाखवतो तुम्हाला. ही ताकद गेली नाही शिवसेनेची अजून. पण आमच्यावर बंधनं आहेत. मागे आम्ही बंद केला. का? तर घाटकोपरला लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाला. फर्स्ट क्लासमध्ये बॉम्बस्फोट, दोनशेच्यावर माणसं मारली गेली. गेटवे ऑफ इंडियाच्या तिथे एका मुलीवर चाकूने हल्ला झाला त्यात ती मारली गेली. ते गुंड सरळ निघून गेले. त्याची चीड येऊन मुंबई बंद केली. मुंबईचं संरक्षण कोण करणार? पोलीस आहेत की नाहीत? सरकार आहे की नाही? हे आमचे सवाल होते. पण ’बंद’ पुकारला म्हणून कोर्टाने आम्हाला दंड लावला. आर्थिक नुकसान झालं म्हणे... कोणाचं? आम्हास २० लाख आणि भाजपला २० लाख मिळून चाळीस लाख बंद पुकारल्याबद्दल. आम्हाला शिक्षा झाली. आम्ही त्या रकमेचा भरणा कोर्टात केलेला आहे. त्यामुळे आता आम्हाला बंद करताच येत नाही, पाठिंबा देऊन मोकळे होऊ शकतो फार फार तर. पण आता बंद कुणी करतच नाही. |
|
|
 |
महाराष्ट्राच्या पन्नास वर्षांच्या जडणघडणीतही आपण शिल्पकार आहात |
| |
हे बघा. हे शिल्पकार वगैरे शब्द नका वापरू. आम्ही आमचं कार्य केले, काम केलं. शिल्पकार कसले? |
|
|
 |
पण हे काम कुणीतरी करायला हवच होतं ना! |
| |
मी मुळात व्यंगचित्रकार आहे. |
|
|
 |
आपल्या हातून शिवसेना निर्माण झाली |
| |
झाली. करून घ्यायचं असेल कुणाला तरी हे कार्य माझ्या हातून. |
|
|
 |
आपण एक पिढी घडवली. तुमच्या विचारांवर, संस्कारांवर महाराष्ट्राची एक पिढी उभी राहिली. आता महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवात तुम्ही त्यांना काय संदेश देणार आहात? |
| |
महाराष्ट्र हा कारकुनांचा देश नाहीच, शूरांचा आहे. शिवाजी महाराजांपासून हे शौर्य जगाने अनुभवले आहे म्हणूनच तुम्ही आज मराठी म्हणून जगू शकता. महाराष्ट्र म्हणून आपल्या राज्यात आपल्याला जगता येतं. ते जे काही तेज आहे ते तेज नष्ट करू देऊ नका. ही मशाल अशीच, ताकदीने आम्ही मराठी आहोत या स्वाभिमानाने पुढ नेतच राहा, नेतच रहा, नेतच राहा... कुठेही कमी पडू नका.
|
|
|
 |
महाराष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल आहे असं आपल्याला वाटतं? |
| |
भविष्य उज्ज्वल करणं हे आपल्या हातात आहे. जर महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल व्हावं असं वाटत असेल, त्यांनी शिवसेनेच्या या लढ्यात भाग घ्यावा. हिरीरीने भाग घ्यावा. बघा, मी हा चमत्कार तुम्हाला करून दाखवतो. बरं! आज काही नष्ट झालंय असे मी म्हणत नाही, पण शेवटी निखार्यावर राख साचली म्हणून विझलं असं समजू नका. त्या राखेवर फुंकर मारल्यानंतर राख बाजूला होते आणि निखारा पुन्हा फुलतो. तो निखारा कमी होत असेल तर दुसरा निखारा लावा. पिढी, पिढी, पिढ्यांमागून पिढ्यांचे हे निखारे पेटते राहू द्या! राख फुंकर मारल्यावर निघून जाईल - तेजःपुंजच राहिली पाहिजे, पेटती राहिली पाहिजे. |
|
|
 |
सुवर्ण महोत्सवाच्या दिवशी आपल्याला खास करून कुणाचे स्मरण होतेय? |
| |
किती तरी नाव घेता येतील. मी तर पहिल्यांदा माझी कुलस्वामिनी, माझे पूर्वज यांचं आणि मग ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला त्या शिवरायांपासून ते अगदी सी. डी. देशमुखांपर्यंत सगळ्यांचे स्मरण होते. असे अनेक आहेत. प्रत्येकाने आपापले योगदान दिले आहे. बाबा आमटेंनी एक काम केलं. त्यांनी नक्कीच एक काम केलं. आंबेडकरांचा खास उल्लेख करायला हवा. विद्वत्तेच्या बाबतीत विद्वान होता माणूस. महर्षि कर्वेचं काम विसरता येणार नाही. या माणसांनी जबरदस्त अशी कामं करून ठेवली आहेत. हे राजकारणापासून दूर होते. त्यांचं क्षेत्र निराळं होतं. राजकारणात ते बरबटले नव्हते. त्यांनी आपला बाणा राखला होता. पण या नावांवर तुम्ही किती जगता, किती जगणार आहात. तुमच्यामधूनही आणखी नवीन नावं निघणार आहेत का की ज्यामुळे पुढच्या पिढीला मराठी म्हणून तुमचा अभिमान वाटेल, असं काही कार्य तुम्ही करू शकाल काय? कर्तृत्व घडवू शकाल काय याचा विचार करा. |
|
|
 |
शिवसेना काय करणार आहे? |
| |
शिवसेना सर्वच करते ना. आज कोण करतेय. बाकीचे आपल्या नकला करतायत ते सोडून द्या हो. बाकी हे सगळे सही रे सही कार्बन कॉपीज् आहेत शिवसेनेच्या. शिवसेना काय करणार म्हणजे काय? दुसरं कोण काम करतंय? शिवसेनाच लोकांचे प्रश्न घेऊन लढतेय, रस्त्यावर उतरतेय. पण हे लोकांनी ओळखलं पाहिजे. त्याची जाणीव मराठी माणसांनी ठेवली पाहिजे. अरे, आज आपण आहोत ते कोणामुळे आहोत? काल परवाकडे आले त्यांच्यामागे जायचे की ज्यांनी इतकी वर्षे आपली सोबत केली, आपले प्रश्न मांडले, आपले लढे दिले आणि मार्गदर्शन केलं त्यांच्या मागे जायचं, हे ठरवा तुम्ही. |
 |
|
|