मुंबईवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, तुमची फडफड इकडे नको!
उद्धव ठाकरे यांचा घणाघात…अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा!
(२३ जानेवारी २०१६)

– हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

आताच ज्यांना हळद लागली त्यांना मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याची स्वप्ने पडत आहेत. स्वप्ने पडायला हरकत नाही. झेंडा फडकवा हो, कुठेही फडकवा… पण जो आधी फडकतोय तो नीट बघा… तो फडकतोय की नुसताच तडफडतोय ते पहा… तुम्हाला दिल्ली विधानसभेवर झेंडा फडकवायचा होता, फडकला का… बिहार विधानसभेवरही फडकवायचा होता, फडकला का? त्यामुळे ही अशी फडफड फडफड इकडे करू नका. इकडे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल

मुंबईचे गल्लीबोळ तरी तुम्हाला माहीत आहेत काय? इकडे शिवरायाचा आणि शिवसेनाप्रमुखांचा मर्द शिवसैनिक समर्थ आहे. त्याच्या हाती जो भगवा आहे ना तोच भगवा मुंबई महापालिकेवरच नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेवरही फडकल्याशिवाय राहणार नाही.

शिवसैनिक कसा असतो हे रमेश वाळूंज याने दाखवून दिले. रमेश वाळूंज हा आपला शिवसैनिक दोन मुलींना वाचवताना गेला. तो बुडणार्‍या मुलींचे फोटो काढत बसला नाही. त्याने घरी पत्नी आणि मुलगी आहे याचा विचार केला नाही. आपल्यानंतर घरदार कोण चालवेल हे त्यांनी पाहिले नाही. पाण्यात उडी मारताना त्या मुली हिंदू आहेत की मुस्लिम याचा विचार केला नाही. त्या मराठी आहेत की अमराठी याचाही विचार केला नाही. हीच शिवसेना आणि हीच आमची शिकवण आहे. यालाच म्हणतात हिंदुत्व आणि यालाच म्हणतात राष्ट्रीयत्व!

अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा!

– शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा सांगितले, माझे हिंदुत्व शेंडी- जाणव्याचे हिंदुत्व नाही. देवळात घंटा बडवणारा हिंदू मला नको. अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. त्यामुळे अतिरेक्यांना बडवणारा हिंदू या देशात उभा राहणार आहे की नाही? शिवसेनाप्रमुखांच्या भाषेतच सांगायचे तर जयंत्यामयंत्या साजर्‍या करणे म्हणजे त्यांच्या मार्गावरून चाललोय असे नाही. त्यांनी जो विचार दिला तो स्वीकारला पाहिजे.

दादरीचे समर्थन नाही!

– सध्या सहिष्णू-असहिष्णुतेचे वातावरण सुरू आहे. मी हत्येचे समर्थन करत नाही. दादरीचे तर नाहीच नाही असे सांगतानाच हिंदू धर्माची जरा बाजू घेतली तर असहिष्णू ठरवले जाते. पुण्यात सावन राठोड याला केवळ हिंदू असल्याने पेटवले. हे असहिष्णुतेच्या व्याख्येत बसते की नाही माहीत नाही, त्यावर कुणी चर्चा करणार की नाही माहीत नाही,. त्याचा कोणी निषेधही करणार की नाही माहीत नाही पण हिंदू मेला हे खरे आहे. इकडे आम्हाला सल्ले मिळतात. लोकसंख्या वाढवा. कशाला? मरायला की मारून घ्यायला असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. असहिष्णुतेच हे वातावरण नवीन नाही. शिवसेनाप्रमुखांनी कधी त्याची पर्वा केली नाही. मी हिंदू आहे असे म्हणणारे ते एकमेव युगपुरुष होते.

परंपरा खंडित होऊ देणार नाही.

– आपले तीन सण आहेत. २३ जानेवारी, १९ जून आणि १३ ऑगस्ट. हीच आपली परंपरा असून ही परंपरा कुठेही खंडित होऊ देणार नाही.

आम्ही ईदचे बकरे बनून जायचे का? हिंदूंना ‘त्यांच्या’ भाषेत उत्तर द्यावेच लागेल..

– ‘इसिस’चे हस्तक मुंबईत पकडले. मराठवाड्यातही पकडले. ‘इसिस’चे जाळे देशभरात खोलवर पसरले आहे. आम्ही त्यांच्याकडे केवळ ईदचे बकरे बनून जायचे का? चालवा आमच्या मानेवर सुरा चालवा असे म्हणायचे का? सरकार जर आमचे संरक्षण करायला समर्थ नसेल तर हिंदूंनाही त्याच भाषते उत्तर द्यावेच लागेल. ही शिकवण जर आपण पाळली नाही तर शिवसेनाप्रमुखांचा जयजयकार करण्याचा अधिकार आपल्याला नाही. मग स्वतःला वाघ म्हणून घेऊ नका, शेळ्या-मेंढ्या म्हणवून घ्या.

एकमेव नेता, युगपुरुष

– मुंबईवर कोणतेही संकट आले तरी शिवसैनिकच सर्वात प्रथम धावून जातो. जीवाची पर्वा करत नाही. त्यामुळे शिवसेनाप्रमुख आणि मुंबईकरांचे नाते घट्ट आहे, हाती कोणतीही सत्ता नाही… कोणतेही पद नाही… पोलीस नाही… असे असतानाही १९९२—९३ मध्ये मुंबई शिवसैनिकांच्या भरवशावर वाचविणारे शिवसेनाप्रमुख एकमेव नेते आणि युगपुरुष होते.

पाकड्यांशी चर्चा किती काळ करणार?

– सध्या हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू आहे. ही चर्चा किती काळ सुरू राहील माहीत नाही पण हल्ले होत आहेत. पठाणकोटवर हल्ला झाला. पुन्हा कधी कुठला हल्ला होईल माहीत नाही. आपण मात्र मागील पानावरून पुढे जातोय. आपण पुरावे द्यायचे आणि त्यांनी नाकारायचे हेच सुरू आहे. खलित्यामागून खलिते दिले. पठाणकोटचा बदला घेऊ असे संरक्षणमंत्री म्हणाले. पण कसा घेणार बदला? चर्चा करून? पाकबरोबर चर्चा करून करून त्यांना थकवून टाकू की पुन्हा पाक चर्चा करणारच नाही. या सगळ्याचा संताप येतो. हळुवारपणे चिडीचे रूपांतर थंड गोळ्यात होते की काय असे वाटते. किती काळ चालणार असे, किती काळ करायची चर्चा? पाकबरोबर चर्चा करण्याचा काही उपयोग आहे काय? पाकला त्यांच्या भाषेतच उत्तर देऊ ही भाषा कोण शिकविणार? आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार कधी?