तरुणांचे समर्थ व्यासपीठ… युवासेना!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेची बलाढ्य अंगिकृत संघटना- युवासेनेची स्थापना केली आणि या संघटनेचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवले. महाराष्ट्रातील तरुणांचे समर्थ व्यासपीठ अशी आता युवासेनेची ओळख बनली आहे. युवावर्गाचे प्रश्न, त्यांची मत-मतांतरे, त्यांच्या अडचणी आणि समस्या मांडण्याचे युवासेना हे हक्काचे व्यासपीठ ठरले आहे.
युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘युवासेने’ची ‘युवासेवा’ सुरू झाली आहे.  ‘युवासेवे’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची चळवळ उभी राहिली आहे. विद्यार्थ्यांचे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितांचे रक्षण करणे हेच युवासेनेचे उद्दिष्ट आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांनाच स्थान देण्यात आले आहे. केवळ तक्रारींचा पाढा वाचत न बसता काहीतरी नवीन, विधायक कार्य करून दाखवण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या तरुण वर्गालाच संघटनेत स्थान देण्यात येते. युवासेना म्हणजे खऱ्या अर्थाने तरुणांनी तरुणांसाठी चालवलेली तरुणांची संघटना आहे. त्या पद्धतीने आजवर एकाही संघटनेने काम केलेले नाही. युवासेनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि दिग्गजांना सोबत घेऊन नवा देश घडवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेचा ताठ बाणा बाळगणारी ‘युवासेना’ अल्पकाळातच राज्यभरातील तरुणांचे आकर्षण ठरली आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेमुळे समाजाच्या सर्व स्तरांमधील तरुणांमध्ये एक ऊर्जा आणि चैतन्यच निर्माण झाले. तरुणांचे प्रश्न मग कोणतेही असोत, त्यांना वाचा फोडण्यासाठी सदैव अग्रेसर राहिली ती युवासेनाच! केवळ विरोधासाठी किंवा राजकारणासाठी म्हणून विरोध न करता विधायक आणि समाजहिताचे काम करण्याचा विडाच युवासेनेने उचलला आहे.
विद्यार्थांच्या हिताच्या विषयासाठी आदित्य ठाकरे स्वतः महाविद्यालयात धडक देण्यास मागे-पुढे पाहात नाहीत. तसेच शिक्षणाच्या चुकीच्या धोरणावर सरकारला धारेवर धरण्याचे काम युवासेना करत असते. विद्यार्थी कल्याणाचा झेंडा खांद्यावर घेऊन वाटचाल करताना तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे यास युवासेनेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळेच युवासेनेला शहरी, ग्रामीण सर्व भागातून व्यापक पाठिंबा आणि सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. विविध खेळ, क्रीडा स्पर्धांच्या निवड पद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्यापासून निकाल जाहीर करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी युवासेनेने पुढाकार घेऊन काम केले. संस्थाचालकांनी महाविद्यालयांच्या जागांवर टोलेजंग व्यापारी संकुले उभारण्याचा डाव रचला तेव्हा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेनेच आक्रमक आंदोलने करून महाविद्यालये बंद करून ‘शॉपिंग कॉम्प्लेक्स’ बांधण्याचे हे कारस्थान उधळून लावले. केवळ मुंबई आणि परिसरात काम न करता आदित्य ठाकरे यांनी युवासेनेचा झंझावात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवला. ग्रामीण भागात शिक्षणासोबतच कुपोषित, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, आरोग्यविषयक प्रश्न हाताळून जनसेवेचे कार्य युवासेनेने सुरू केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी मध्यंतरी मुंबईत भव्य आरोग्य शिबीरही घेतले. आवश्यक असेल तिथे ‘सेना’ आणि गरज भासेल तिथे ‘सेवा’ हा नव्या युगाचा मंत्र घेऊन युवासेनेने आपली घोडदौड सुरू केली आहे. हेच तत्त्व उराशी बाळगून उद्याचा हिंदुस्थान घडविण्यासाठी देशाला उद्याचे नेतृत्व देण्यासाठी युवासेना झटते आहे. आदित्य ठाकरे यांनी दिलेला ‘युवासेवा’ हा मंत्र घेऊन केवळ महाराष्ट्रातच नाही, तर ‘युवासेने’चे एका देशव्यापी चळवळीत रूपांतर होईल हे नि:संशय!
आदित्य ठाकरे यांनी मुंबईत अनधिकृतरीत्या असलेल्या धोकादायक गतिरोधकांविरुद्ध आवाज उठवून सगळे गतिरोधक एकसमान करण्याची मागणी मनपाकडून मान्य करून घेतली. मुंबई विद्यापीठात युवासेनेच्या मागणीनुसार प्रथमच जनता दरबार सुरू करण्यात आला. परीक्षा भवन, विद्यानगरीमध्ये जनता दरबार घेतला जातो. तसेच मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या कला, वाणिज्य, बी.एम.एस. आणि बी.एससी. शाखेचा लांबलेला निकाल युवासेनेच्या आंदोलनामुळे त्वरित जाहीर झाला आणि विद्यापीठाचे संकेतस्थळ कार्यरत नसल्यामुळे युवासेनेच्या मदत कक्षाने सुमारे १६,५७१ विद्यार्थांना निकालासंदर्भात मदत केली. तसेच मुंबईत अतिवृष्टीमुळे आणि उच्च ज्वारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शिवसेना- युवासेना मुंबई महानगरपालिका यांच्या मदत कक्षातून मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर होती.
शिक्षण, आरोग्य, रोजगार याबरोबरच तरुणांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी युवासेनेची हेल्पलाईन सेवाही सुरू करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये २४x७ खाद्यसेवा सुरू असावी, असा आदित्यजींचा प्रयत्न सुरू आहे. प्रसिद्ध सिने अभिनेता अक्षयकुमार यांच्याबरोबर सेल्फ डिफेन्स अकादमीची स्थापना आदित्यजींनी सुरू केली असून महिलांनी स्वतःचे संरक्षण स्वतःच करावे, यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यावर त्यांचा भर आहे. आदित्यजींनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठीही बरेच कार्य केलेले आहे. कॅम्पाकोलावासीयांच्या प्रश्नात रहिवाशांवर अन्याय होऊ नये, या विचारातून आदित्यजींनी प्रयत्न केलेले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्याच्या बाबतीतही आदित्यजींनी पुढाकार घेतलेला आहे. तसेच मुंबईच्या प्रसिद्ध रेसकोर्सवर जागतिक दर्जाचे थीम पार्क उभारण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबरीनेच युवासेना प्रमुख आदित्यजींचेही प्रयत्न सुरू आहेत. आदित्यजींचा आणखी एक विशेष म्हणजे ते स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी सातत्याने संपर्कात असतात.