बोलणारा नव्हे, करून दाखवणारा नेता ‘मा. उद्धवजी ठाकरे’
शिवसेनेचे मुखपत्र दै. ‘सामना’चे विश्वस्त म्हणून सुरुवातीला काम पाहात असताना उद्धवजी ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे नियोजन यशस्वीपणे केले आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांची चर्चा सुरू झाली. उद्धवजींनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरल्यानंतर त्यांच्यातील वेगळ्या कलागुणांची जाणीव सर्व जगाला झाली. आज ते एक जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. उद्धवजी एक उत्तम चित्रकारही आहेत. स्वतः कलावंत असलेल्या उद्धवजींना कलाकारांबद्दल, शेतकरी बांधवांबद्दल तसेच वारकऱ्यांबद्दलही जिव्हाळा आणि आपुलकी आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांबद्दल तसेच वन्य प्राण्यांबद्दलही उद्धवजींना प्रेम आहे, हे त्यांनी वेळोवेळी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण याच तत्त्वानुसार उद्धवजींची वाटचाल सुरू आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला यश मिळवून दिलेल्या उद्धवजी ठाकरे यांची नंतर महाबळेश्वर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या शिबिरात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख या पदावर एकमताने निवड झाली. जयजयकार आणि टाळ्यांच्या गजरात उद्धवजींच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्याआधी शिवसेनेत शिवसेनाप्रमुख हे सर्वश्रेष्ठ नेते आणि त्यानंतर अन्य शिवसेना नेते अशी रचना होती. २००३ मध्ये यात प्रथमच बदल करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करून प्रथमच कार्यकारी प्रमुख हे पद निर्माण करण्यात आले. ही शिवसेनेच्या इतिहासातील ऐतिहासिक घटना होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या योद्ध्याने ४० वर्षे शिवसेना नावाचा यज्ञ चेतवला, मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस एक केला होता. शिवसेनाप्रमुखांनी ज्याच्या हाती शिवसेनेची सूत्रे दिली, तो शिवसेनेचा कार्यकारी प्रमुख म्हणजेच उद्धवजी ठाकरे हे तितकेच यशस्वी ठरले आहेत, हे अलीकडच्या काळातील अनेक निवडणुकांनी सिद्ध केले आहे. जिद्दी आणि खंबीर नेते असलेल्या उद्धवजींच्या तडफदार नेतृत्वाखाली शिवसेनेची नवी जडणघडण झाली आहे. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली मध्यंतरीच्या काळात मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, लोकसभा निवडणुकांत शिवसेनेने दमदार कामगिरी केली. या सर्व ठिकाणी फडकलेला भगवा म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या कर्तबगारीच्या निशाण्या आहेत.
उद्धवजींना मुंबईकरांसाठी मनापासून काहीतरी करावयाचे होते. त्यांनी `मी मुंबईकर’ ही चळवळ हाती घेतली. वांदे येथील रंगशारदा सभागृहात `मी मुंबईकर’ या मोहिमेअंतर्गत मेळावा घेण्यात आला. मुंबई नगरी फक्त श्रीमंतांसाठी नाही, तर गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सुद्धा आहे. त्यात जातपात आणि धर्म वगैरे न मानता सर्वांना नागरी सुविधा मिळायलाच हव्यात, अशी ठाम भूमिका उद्धवजींनी घेतली.
उद्धव ठाकरे यांच्या दमदार पावलांचे मराठी मनालाही कौतुक आहे आणि त्यांच्याविषयी आकर्षणही आहे. ही पावले आता महाराष्ट्राला भाग्योदयाकडे नेणार हे आता अटळ भविष्य आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या वाट्याला नाकर्ते सत्ताधारी आले आहेत. त्यांनी हा सुफलाम् सुजलाम् प्रदेश इतका ओसाड करून टाकला आहे की, ज्याच्या घामाने येथे धान्याचे मोती पिकतात, तो बळीराजा शेतकरीही पार खचला आहे. त्याच्या आत्मघाताने महाराष्ट्राच्या नावाला काळिमा फासला गेला आहे. रयतेच्या, शेतकऱ्यांच्या दाणा-पिकाची काळजी घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रदेशात हे आक्रीत घडावे, याची राज्यकर्त्यांना खंतही नाही आणि खेदही नाही. त्यामुळे महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांच्या जुलमी कारभाराने त्रस्त झालेला आहे. जनतेत असंतोष खदखदतो आहे. हे काळे चित्र बदलण्यासाठी जनता शिवसेनेकडे आणि उद्धवजींच्या नेतृत्वाकडे मोठ्या आशेने पाहते आहे.
२००७ साली उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेनेचे सारे लगाम आले तरी त्यांची घोडदौड खरे तर त्याआधी दहा वर्षांपूर्वीच सुरू झाली होती. दरम्यानच्या काळात बऱ्याच उलथापालथी घडून गेल्या. संकटे कधी कधी एकटी-दुकटी येत नाहीत, पण अशी कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्यांचा धैर्याने मुकाबला करून ती यशस्वीपणे परतवून लावणारा खरा योद्धा असतो. उद्धवजी ठाकरे हे असेच योद्धे आहेत. उद्धवजी हे एक प्रगल्भ आणि चतुर राजकारणी आहेत. कुणाला कधी अंगावर घ्यायचे याचे पक्के आडाखे मनात तयार ठेवूनच त्यांची वाटचाल सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वभाववैशिष्ट्य असते. उद्धवजी काहीसे अबोल आहेत, मात्र ते स्पष्टवक्ते आहेत. भल्याभल्यांना त्यांनी एखाद्या नामांकित पैलवानाच्या थाटात धोबीपछाड लावून तोंडावर आपटत मी बोलणारा नव्हे, तर करून दाखवणारा आहे, याची प्रचीती आणून दिली आहे.
कट्टर मावळ्यांची साथ घेऊन उद्धवजींची पुढची वाटचाल सुरू झालेली आहे. शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद, महाराष्ट्रातील जनतेचे प्रेम आणि पक्षासाठी छातीचा कोट करून लढणाऱ्या शिवसैनिकांचे बळ या शिदोरीच्या जोरावर उद्धवजींची पुढील वाटचाल सतत यशाच्याच मार्गावर होईल, यात शंका नाही.