लोककला आणि लोकसाहित्य या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभ्यास क्षेत्राचा महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करणे आवश्यक आहे. लोकविद्या, लोकसंस्कृती, लोकधर्म, लोकवार्ता असे अनेक शब्द यासाठी वापरले गेले आहेत. अर्थच्छटांचा विचार करता लोकसाहित्य हा शब्द व्यापक अर्थाने विचारात घेतला जातो. त्यात लोकजीवनाच्या म्हणजे मानवी एकजिनसी समूहजीवनाच्या, जीवनसारणीतील मौखिक परंपरा, वर्तन परंपरा आणि वस्तू किंवा साधन परंपरा यांचा विचार केला जातो. या तीनही परंपरा आणि वस्तू किंवा साधन परंपरा यांचा विचार केला जातो.

लोकजीवन प्रवाह हा खरे तर लोकमानसाचा अनुभूतींसह, परिवर्तनात्मकतेने, तरी लोकजीवनाचे एकात्मपण घट्ट राखीत नित्य वर्तमानात प्रवाहित राहणारा सारणीस्रोत असतो. आरंभबिंदूपासून लोकजीवनाच्या अनंततत्त्वापर्यंत या प्रवाहाचे अस्तित्व असते. माणूस वर्तमानात इतिहास जगत असतो. लोकजीवनाचे जगणेच मुळी लोकसाहित्यात असते. त्यामुळे सर्व प्रकारची शास्त्रे आणि सर्व कला यांना लोकजीवन प्रवाहातूनच अर्थात लोकसाहित्यातून सर्व प्रकारची प्राथमिक सामग्री मिळालेली असते. दिव्यत्वाची प्रचीती हीदेखील मिळालेल्या अनुभूतीतून प्रतिभाज्ञानाने आलेली असते.

डॉ. दुर्गा भागवत यांनी निर्देशित केल्याप्रमाणे अठराव्या शतकाच्या अखेरीस लोकसाहित्याच्या अभ्यासास लोकसाहित्याचा अभ्यास म्हणून सुरुवात झाली. याचाच अर्थ लोकसाहित्याच्या शास्त्रीय अभ्यासाची परंपरा दोनशे-सव्वादोनशे वर्षांची आहे. प्रामुख्याने एकोणिसाव्या शतकात भाषाशास्त्रीय संप्रदायात लोकसाहित्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. लोकसाहित्य हे वर्तमानात होणाऱ्या बदलांसह आणि संदर्भांसह, समग्र पारंपरिक लोकजीवनाचे दर्शन घडविते, तर लोककला लोकजीवन प्रवाहातील वैशिष्ट्यांचे, म्हणजेच मौखिक परंपरा आणि वस्तू परंपरा यांचे कलात्मक अर्थात व्यंजनात्मक दर्शन घडविते. लोककलांमध्येही स्थल-काल-परिस्थितीसापेक्ष लोकजीवनाचे प्रत्ययकारी दर्शन घडविता येते. लोककला एवढेच काय अभिजात कलांचा, लोकबंधात्मक अर्थात लोकतत्त्वीय म्हणजेच लोकधारणा करणाऱ्या सूत्रांच्या आधारे अभ्यास केला, तर त्या त्या विशिष्ट काळातील लोकजीवनाचे दर्शन घडू शकते.

कोणत्याही कालखंडातील लोकजीवनाचा अभ्यास करताना बदलती रूपे आणि बदलते संदर्भ यांसह लोकसाहित्याच्या आणि लोककलांच्या लोकसाहित्य शास्त्रीय अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. यातूनच लोकजीवन समग्रतेने प्रकट होत असते. त्यात स्वाभाविकच आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा सर्वच अंगांचा समावेश असतो. या सर्व अंगांचे दर्शन घडविण्याचे, निदान जीवन कसे होते किंवा आहे, याचे प्रत्ययकारी सूचन करण्याचे कार्य लोकसाहित्य आणि लोककला यातून घडते. वर्तमानातील बदलते संदर्भ, लोकजीवनाची आणि लोककलांची रूपे बदलू शकतात आणि कालांतराने त्या रूपांचाच लोकसाहित्य म्हणून विचार करावा लागतो.

लोकसाहित्याच्या आणि लोककलांच्या संदर्भात आधुनिक महाराष्ट्राचा विचार करताना, पाश्चात्य शास्त्रांपूर्वीचा महाराष्ट्र डोळ्यांसमोर असणे आवश्यक आहे. इंग्रजी राजवटीत आधुनिक विचारधारांमुळे एकूण लोकजीवनाला आणि लोककलांना प्रचंड हादरे बसले. परंतु नवे संदर्भ येत राहिले. बदलती रूपेही समोर दिसू लागली. लोकसाहित्याच्या अभ्यासामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि वाङ्मयीन क्षेत्रांना अभ्यासाची एक दिशा मिळाली आहे.

१९५० नंतर लोकसाहित्याच्या अभ्यासाला शास्त्रीय बैठक देण्यास सुरुवात झाली. जागतिक अभ्यास क्षेत्र, भारतीय अभ्यास क्षेत्र, सैद्धांतिक चर्चा याकडे अभ्यासकांचे लक्ष वेधले गेले. सामाजिक प्रबोधनाची व शिक्षणाची जी परंपरा इंग्रजी अंमलात सुरू झाली होती, त्यातून परिवर्तन घडत गेले. लोकजीवन परंपरा प्रवाहात जे प्रक्रियात्मकतेने घडत असते, त्यातून समाजाची वीण घट्ट होत असते. भाषाशास्त्रीय संप्रदाय, निसर्गरूपवादी संप्रदाय, भ्रांत कल्पनावादी संप्रदाय, स्पष्टीकरणवादी संप्रदाय, मानववंशशास्त्रीय संप्रदाय, सजीवावशेषत्ववादी संप्रदाय, स्पष्टीकरणवादी संप्रदाय, ऐतिहासिक व भौगोलिक संप्रदाय अशा विविध मार्गांनी लोकसाहित्याचा अभ्यास करता व मांडता येतो. या अभ्यासाने एकात्म मानवी जीवनाचे यथार्थ जीवन घडण्यास मदत होते. एकात्म भारतीय राष्ट्राच्या परंपरेत आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करण्यात लोकसाहित्य अभ्यास क्षेत्रातील अभ्यासकांचे, कलावंतांचे आणि संस्थांचे योगदान मोठे आहे.