आजही तुमचं पहिलं प्रेम ‘मराठी’ आहे काय?
अर्थात! मराठीला मी कधीच विसरू शकणार नाही. शक्यच नाही. प्रथम मराठीच! हिंदूंची, हिंदुत्वाची गरज का भासली? याची कारणंही महत्त्वाची आहेत. देशहिताची आहेत. समजा उद्या हिंदुस्थानात गडबड झाली, महाराष्ट्रात झाली असं समजू. तर एकाकी महाराष्ट्र लढू शकणार नाही. इस्लामच्या विरोधात एकाकी महाराष्ट्र लढू शकणार नाही. महाराष्ट्र! गुजरातचा तर प्रश्न नाही. तिकडे मोदी चांगली बाजू लढवताहेत. पंजाब, बंगाल कोणाचा आम्हाला उपयोग? जो तो आपल्यापुरतंच बघतो. हिंदू माणूस आपण एकवटू शकतो. आमच्या हिंदुस्थानात आणि हिंदू म्हणूनच मी जरा हिंदुत्वावर जोर मारला. याचा अर्थ असा नाही की, मी मराठीला साफ विसरलो! विसरूच शकत नाही. स्वतःच्या आईला कोण विसरणार?

‘मराठी’चा वाद चाललाय सध्या…
त्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राविरुध्द वातावरण निर्माण झालंय. तिकडे लालू जे काही करतोय त्यामुळे बिहाऱ्यांविरुध्द वातावरण निर्माण होत नाही असं तुम्हाला वाटतं काय? ही जी त्यांची प्रांतीय भावना आहे तीही अजून महाराष्ट्रात निर्माण होत नाही. ते माझं दु:ख आहे. आम्ही म्हणे कडवट मराठे. कशाला शिवरायांचा अभिमान सांगता आणि जयंत्या आणि मयंत्या साजऱ्या करता? तुम्हाला अधिकार काय शिवरायांचं नाव घेण्याचा? अहो, त्या ‘व्ही.टी.’ स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. त्याला तुम्ही अद्याप ‘सी.एस.टी.’ म्हणता? लोकमान्य टिळक पोलीस स्टेशन पाटी काय लावली? तर ‘लो.टि. पोलीस स्टेशन’ तिकडे मी आंदोलन केलं व त्यांनी सांगितलं ‘लो.टि.’ काढा. लोकमान्य टिळक पोलीस स्टेशन हे नाव असलेली पाटी त्यांनी लावली. आम्हीही आंदोलन केली आहेत ना! इंग्रजी नावाच्या पाट्यांवरती डांबर फासणं हे शिवसेनेचं पहिलं आंदोलन करायला लावलंय. मी स्वतः उतरलो होतो रस्त्यावर. काही ठिकाणी तर डांबर मी लावलंय.
‘हिंदी भाषकांच्या प्रश्नांवर सर्व उत्तर भारतीय खासदार, तर ‘तामीळ’ प्रश्नांवर सगळे दक्षिणेचे खासदार एकत्र आले…
होय. तुम्हीच बघा.

‘मराठी’च्या प्रश्नावर आपले खासदार कधीच एकत्र येत नाही…
होय. हेच तर दूर्दैव आहे महाराष्ट्राचं? सगळ्यांनीच मराठीचा अभिमान बाळगायचा. शिवाजी महाराजांच्या जयंत्या आणि मयंत्या साजऱ्या करायच्या. बाजीप्रभू देशपांड्यांचे पोवाडे गायचे. थोडी तरी लाज? थोडी तरी शरम? इतिहास घडला म्हणून तुम्हाला महत्त्व आहे. महाराष्ट्राचे मराठी म्हणून. जरा तपासा हो तो इतिहास.
देशाच्या राष्ट्रपतीपदी एक मराठी व्यक्ती आपण बसवलीत…
होय, तो मराठीचा अभिमान. जो आहे ना, तो मी बाळगलाय. बाकी कोणी नाही.

हाच मराठीचा अभिमान देशाच्या पंतप्रधानपदी मराठी नेता बसावा म्हणून बाळगणार का?
तो मराठी आहे यापेक्षा तो कोण आहे यालाही महत्त्व आहे. तो कोण आहे तेही पाहिलं पाहिजे.
शिवसेनेबरोबरच, महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याच्या दिशेने उद्धव ठाकरे यांची वाटचाल सुरू आहे…
उद्धवची वाटचाल काहीतरी व्हावं म्हणून नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तो तीव्रतेने भाग घेतोय. शेतकऱ्यांसाठी कोण रडणार? कोण लढणार? हजारो शेतकरी फासावर लटकून, विष खाऊन मरताहेत. त्यांची जाण कुणाला नाही. पुन्हा ते भारनियमन. पोरं अंधारात अभ्यास करून कंदिलावर परीक्षा देत आहेत. आमचे एकेकाळचे मित्र सुशीलकुमार शिंदे हे ऊर्जामंत्री असताना तर त्यांनी सांगितलं होतं, सत्ता हाती येताच शेतकऱ्यांची वीज बिलं माफ! आणि सत्ता हाती आल्यानंतर घूमजाव! त्यांनी स्वत:हूनच जाहीर केलं की, निवडणुकीच्या तोंडावर असं बोलावं लागतं, हे सर्व त्यांनी निर्लज्जपणानं सांगितलेलं आहे. हा छापील मजकूर वर्तमानपत्रामध्ये आलेला आहे.

वर्ष मावळतंय, मागच्या वर्षात शिवसेनेच्या वाट्याला संघर्षच आला. संघर्षाचा काळ आता संपलाय काय?
संघर्षाचा काळ कधी संपत नसतो. प्रसंगानुसार त्याकडे पाहावं लागतं. किती झालं तरी, दारूगोळाही उगीच फुकट कशाला घालवायचा याचाही विचार करावा लागतो. मी तर सतत संघर्षच केला. संघर्षातूनही आज दिसतेय ती शिवसेना उभी राहिली. संघर्षातूनच ती आणखी पुढे जाईल.
शिवसैनिकांना काय संदेश द्याल व महाराष्ट्रालाही…
आपल्या शिवसेनेवर निष्ठा आहेत. जिद्द आहे. ती महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी हिमतीने वापरा, कडवटपणाने वापरा. त्यात तुम्ही कुठेही कमी पडणार नाही याची मला स्वतःला खात्री आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता आणायची म्हणजे आणायची. त्या निष्ठेने आजपासूनच कामाला लागा, अशी मी आपणास नम्र विनंती करीत आहे.
साभार – सामना २४ डिसेंबर २००८