प्राचीन काळात भारतीय व्यापाऱ्यांचा भरभराटीला असलेल्या अन्य देशांशी सोने-चांदी, हिरे, मोती, कापूस यांचा व्यापार चालत असे हे प्रसिद्ध आहे. त्या काळात वाहतुकीची साधने मर्यादित होती. मात्र तरीही हा आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणात चालत होता. भारतातील संपन्नतेचा हा सोन्याचा धूर, यामुळेच अनेक परदेशी राज्यकर्त्यांच्या डोळ्यात शिरला आणि त्यांचे लक्ष भारताकडे वळले. शक, हूण यांची आक्रमणे, गझनीच्या महमदाची क्रूर टोळधाड यांच्या मागे श्रीमंत भारताची लूट करणे याच प्रेरणा राहिल्या. पुढे मुघलांनी आपला अंमल बसवला. ख्रिस्तपूर्व काळ ते अठरावे शतक इथपर्यंत ही उलथापालथ होत राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात यशस्वी टक्कर देत इतिहासाला वेगळे वळण दिले. त्यांनी रचलेल्या पायावर नंतर मराठ्यांनी कळस चढवला.
१८ व्या शतकावर राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राचा प्रभाव असला तरी उद्योग, व्यापार वाढविण्यासाठी त्याचा फायदा करून घेण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झालेले दिसत नाहीत. मुंबईच्या व्यापार-उद्योगाची भरभराट सुरू झाली, ती प्रामुख्याने १८व्या आणि १९व्या शतकात गुजरातमधून आलेल्या पारशी आणि गुजराती समाजातील पारंपरिक व्यापारी जातींमुळे. १९व्या शतकात मुंबई भारताची औद्योगिक राजधानी बनली. पारशी समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक उद्योजकांनी व्यापार करून मिळवलेली अमाप संपत्ती लोकोपयोगी कामासाठी मुक्तहस्ताने व उदार अंतःकरणाने खर्च केली. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक प्रगतीचा भक्कम पाया मराठी धुरंधरांनी घातला, पण त्यावर उद्योगधंद्याच्या जोरावर कळस चढविला, तो पारशी-गुजराती उद्योजकांनी.
मुंबई हे भारतीय वस्त्रोद्योगाचे माहेरघर मानले जात होते. या व्यवसायाची भरभराट झाल्याने हजारो गिरणी कामगारांना रोजगार मिळाला. या उद्योगाच्या अनुषंगाने अनेक छोट्या-छोट्या उद्योगाना चालना मिळाली आणि मुंबईची भरभराट झाली. टाटा, वाडिया, डेव्हिड ससून, जमशेटजी जिजीभॉय, नाना शंकरशेट, लक्ष्मणराव किर्लोस्कर अशा कितीतरी महान व्यक्तिमत्त्वांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या औद्योगिक क्षेत्रावर आपला ठसा उमटवला आहे. १९व्या शतकातील भारतातील अनेक धुरंधर उद्योजकांनी आपल्या कीर्तीचे झेंडे परदेशात रोवले. त्यांची परंपरा २१व्या शतकातही जोपासली जात आहे. ब्रिटिशांचा मूळ हेतू व्यापार आहे, हे ओळखून त्यालाच शह देण्यासाठी स्वदेशीचे शस्त्र अंतिम आणि परिणामकारक प्रहार करू शकते, हे प्रथम लोकमान्य टिळकांच्या लक्षात आले. आणि त्यांनी याच शस्त्राचा विकास करून ते भारतीयांच्या हातात दिले.
१९२० साली टिळक युगाचा अस्त झाला आणि गांधी युगाचा प्रारंभ झाला. महात्मा गांधींनी स्वदेशीचे अस्त्र अधिक व्यापक केले. त्यांनी चरखा हे साधन सर्वसामान्यांच्या हाती दिले. चरखा हे केवळ प्रतिकात्मक चिन्ह न राहता, ब्रिटिश साम्राज्याला हादरविणारे परिणामकारक हत्यार ठरले. कारण ब्रिटिशांना हवी असलेली त्यांच्या मालासाठीची बाजारपेठच खिळखिळी होऊ लागली. महात्मा गांधींच्या प्रभावळीत पुढे अनेक दूरदृष्टीचे कारखानदार उभे राहिले. शेअर बाजार आणि सहकारी चळवळ यांचीही मुळाक्षरे इथल्याच पाठीवर प्रथम लिहिली गेली. या दोन्ही गोष्टींमुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदार आणि शेतकरीही या अफाट उद्योग विश्वाचा भागीदार होऊ लागला. अठराव्या शतकाचा उत्तरार्ध ते एकविसावे शतक इतक्या दीर्घ अवधीत शेकडो कर्तबगार उद्योगपतींच्या धडपडीतून आत्ताच्या महाराष्ट्रातील उद्योग उभा राहिला.