शिवसेनेचा अतिअतिविराट रेकॉर्डब्रेक दसरा मेळावा

 •  तुम्हाला मुफ्ती मोहम्मद चालतो, मग थोडं शिवसेनेचंही ऐका… पाकिस्तानी झेंडा चालत असेल तर भगव्याला नजरेआड करु नका…
 •  नाहीतर हाच भगवा तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही!
 •  मंदिर वही बनायेंगे, पर तारीख नही बतायेंगे!
 •  महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवून दाखवेन!
 •  हिंदुत्व आणि मराठी माणसांचा विषय कदापि सोडणार नाही!
 •  पाकिस्तानात घुसा, पाडा त्यांचे मुडदे!
 •  गाईवर कसली चर्चा करता? हिंमत असेल तर महागाईवर बोला!
 •  किती काळ सत्तेत राहायचं, हे आम्हाला चांगलं कळतं.

‘‘तुम्हाला मुफ्ती मोहम्मद सईद चालतो, तर मग थोडं शिवसेनेचेही ऐका. तुम्हाला कश्मीरात फडकलेला पाकिस्तानी झेंडा चालत असेल तर मग भगव्याला नजरेआड करू नका… भगव्याला विसराल तर हाच भगवा तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही, ’’ असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. शिवतीर्थावर अति अतिविराट रेकॉर्डब्रेक गर्दीत शिवसेनेचा सुवर्णमहोत्सवी दसरा मेळावा प्रचंड जल्लोषात, दणक्यात साजरा झाला. या वेळी उद्धव ठाकरे यांची तोफ चांगलीच धडाडली. ढोंगी हिंदुत्ववाद्यांची सालटी काढताना उद्धव ठाकरे कडाडले, ‘‘हिंदुस्थानला हिंदुराष्ट्र घोषित करा आणि देशात समान नागरी कायदा लागू करा. आम्ही आहोत तुमच्यासोबत. मग कोण गाय कापतं ते बघून घेऊ!
महाराष्ट्राच्या इतिहासाचे सोनेरी पान ठरलेला शिवसेनेचा यंदाचा सुवर्णमहोत्सवी दसरा मेळावा. राज्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी विचारांचे सोने लुटायला शिवतीर्थावर आले होते. शिवतीर्थाचा प्रत्येक कोपरा गर्दीने तुडुंब भरला होता. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे देशाचेच नव्हे तर पाकिस्तानचेही लक्ष लागले होते. आणि मग शिवतीर्थावर घोंगावले महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाला दिशा देणार्‍या विचारांचे तुफान…
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी साद घालत विजयादशमीचा उत्सव आणि श्रीराम व रावणाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, श्रीरामाने रावणाला लंकेत घुसून मारले. आपण जर रामाला मानत असू तर जा, घुसा पाकिस्तानात आणि पाडा त्यांचे मुडदे! ‘मंदिर वही बनाएंगे’च्या घोषणा देऊन काही उपयोग नाही, असेही त्यांनी बजावले.

दसरा मेळाव्यावर शत्रू आणि मित्रांचंही लक्ष
शिवतीर्थावर काय बोलणार, असे विचारणारे अनेक फोन मला आले. तोफा धडाडणार, काय बोलणार, कोण असेल या तोफेसमोर… भाजप? ते तर आमचे मित्र आहेत. पाकिस्तानचेसुद्धा लक्ष आहे. विशेष म्हणजे दसरा मेळाव्यावर एकाच वेळी शत्रूचे आणि मित्रांचेही लक्ष आहे. असा दसरा मेळावा झाला नाही, होणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा जोरदार घोषणा घुमल्या.

सत्तेत किती काळ राहायचं हे आम्हाला चांगलं कळतं
आमची बांधिलकी जनतेशी आहे, सत्तेशी नाही असे स्पष्टपणे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, जे पटत नाही ते रोखठोक बोलायचे हा शिवसेनाप्रमुखांचा वारसा आम्हाला मिळाला आहे. तुम्हाला आवडत नाही, पटत नाही म्हणून आम्ही आमची भूमिका गुंडाळून ठेवणार नाही. मुख्यमंत्र्यांना यापूर्वीही सांगितले आणि आताही जाहीरपणे सांगतो, राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेने वाघ पाठवले आहेत. त्या मंत्र्यांच्या कामाचा, अनुभवाचा वापर करून घ्या. राज्याला सुजलाम् सुफलाम् बनवूया. सत्तेत आम्ही गेलो आहोत. आता आम्हाला काम करू द्या. आम्ही काही बोललो की लगेच बातम्या येतात की आमचं पटत नाही म्हणून. अरे, सत्तेत किती काळ राहायचं हे आम्हाला चांगले कळतं, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बातम्या पेरणार्‍यांना फटकारले.

हे आमचे हिंदुत्व
दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलले. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, औरंगाबादचेही आता संभाजीनगर असे नामकरण झालेच पाहिजे. अफजलखानाचे थडगे प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे, तर औरंगजेबाची कबर औरंगाबादेत आहे. हे दोघेही राक्षस होते, महाराष्ट्रावर चालून आलेले. काही दिवसांपूर्वी ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवायला गेला होता. मला सांगा, तेव्हा त्या ओवेसीच्या डोक्यात काय विचार असतील? पवित्र असतील? बिलकूल नाही. मीसुद्धा कबरीवर माथा टेकायला तयार आहे. हे आहे आमचे हिंदुत्व. पण ती कबर देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या अब्दुल हमीदची असेल. जा, त्याच्या कबरीवर माथा टेकवा, नवस मागा. अहो तुमच्या पोटी देशप्रेमी मुलगा जन्माला येईल!

सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या, गावागावात मोहीम सुरू करा!
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील शाहीर अमरशेख आणि हिंदुत्वाच्या लढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या असीम कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, सावरकरांना ‘भारतरत्न’ मिळालेच पाहिजे. त्यासाठी शिवसैनिकांनी गावागावात जावे आणि प्रत्येक गावात मोहीम राबवावी असे आदेशही त्यांनी दिले. भगवे मन कधीच मरू शकत नाही. ही ठिणगी जिवंत आहे आणि ती कधीही वणवा बनू शकते, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना दिला.

हेच हिंदूंच्या बाबतीत घडलं तर?
मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार याकूब मेमनला फासावर लटकवल्यानंतर तथाकथित पुरोगाम्यांनी गळे काढले. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘याकूबला फाशी दिल्यावर त्याच्यावर कसा अन्याय झाला याच्या चर्चा रंगल्या होत्या. याकूबचा कुणाला एवढा पुळका येत असेल तो हिंदूंच्या बाबतीत का येत नाही? नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या मारेकर्‍यांना फासावर लटकवायलाच हवे, पण पहिल्या दिवसापासून या हत्या हिंदुत्ववाद्यांनीच केल्या अशी बोंब ठोकली जात आहे. समीर गायकवाडला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तर ‘सनातन’वर बंदी आणा अशी मागणी होत आहे. हे कशासाठी? साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित यांना कितीतरी वर्षे तुरुंगात डांबून ठेवले आहे. त्यांची केस अजूनही सुरू झालेली नाही. उद्या हे सारे निर्दोष सुटले तर काय करणार तुम्ही? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कधीतरी म्हणाले होते, निरपराध मुसलमानांना तुरुंगात सडवले तर त्यांच्याकडून वाईट प्रतिक्रिया उमटू शकतात. मग हेच हिंदूंच्या बाबतीत घडले तर? या प्रश्‍नाचे उत्तर पवारांकडे आहे का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

भाजपच्या पोटात का दुखतं?
आम्ही पाकिस्तानबद्दल काही बोललो तर भाजपच्या पोटात का दुखतं, असा रोकडा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणसाला शिवसेनेने काय दिले, अशी बकबक टीकाकार करतात. पण गेल्या पाच पिढ्या शिवतीर्थावर ही अलोट गर्दी उसळते म्हणजेच शिवसेनेेने मराठी माणसाला काहीतरी दिले आहे. माझ्यासोबत शिवसैनिक आहेत तोपर्यंत टीकाकारांची मला पर्वा नाही असे सांगतानाच हिंदुत्व आणि मराठी माणसांचा विषय शिवसेना कदापि सोडणार नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवून दाखवणारच, असा वज्रनिर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे
अयोध्येतील राम मंदिरावरून उद्धव ठाकरे यांनी टीकेचे बाण सोडले. ‘मंदिर वही बनाएंगे, पर तारीख नही बताएंगे’ असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच एकच हशा पिकला. कधी होणार ते राम मंदिर, असा सवाल करतानाच ते पुढे म्हणाले, बरे झाले राम-रावणाच्या काळात चॅनेलवाले नव्हते… नाहीतर ‘चर्चे’त राम-रावण म्हातारे झाले असते आणि रामायण घडलेच नसते. असले फालतू रामायण आम्हाला परवडणारे नाही.

गाईवर नको महागाईवर चर्चा करा!
देशात सध्या गाईवर चर्चा सुरू आहेत. हिंमत असेल तर गाईवर नको महागाईवर चर्चा करा, असा ठाकरी टोला उद्धव ठाकरे यांनी सरकारला लगावला. सत्तेत असताना महागाईवर लक्ष जात नसेल तर जनतेला तोंड दाखवू शकणार नाही, असेही त्यांनी सुनावले.

‘शिवप्रकाश’ द्यायचाय
स्वातंत्र्यापासून वर्षानुवर्षे विजेपासून वंचित राहिलेल्या माझ्या ग्रामीण भागातील जनतेला लखलखीत प्रकाश द्यायचाय. त्यासाठी मी ‘शिवप्रकाश’ योजना तयार केली आहे. या योजनेतून अंधारलेली गावे प्रकाशमान करेनच, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला.

दादरीमुळे देशाची मान खाली गेली!
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्यासाठी पायघड्या घालणार्‍या सुधींद्र कुलकर्णी यांना शिवसैनिकांनी चांगलाच धडा शिकवला. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कसुरीच्या पुस्तकात शाई होती. आम्ही त्यांना उत्तर शाईनेच दिले. विचाराचे उत्तर विचारानेच दिले.’’ तो ओवेसी म्हणाला होता, २५ कोटी मुसलमान १५ मिनिटांत हिंदुस्थानातील हिंदूंचा खातमा करतील. २५ वर्षांपूर्वी खासदार शहाबुद्दीनही असेच म्हणाला होता. तेव्हा मुसलमानांची संख्या होती १४ कोटी. शहाबुद्दीन गेले पण त्यांची अवलाद वळवळतेय. आणखी २५ वर्षांनी काय होईल याचा विचार करा. हिंदू नसतील तर हे निधर्मीही शिल्लक नसतील. हा देश शिल्लक नसेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. कुलकर्णींना शाई फासली म्हणून देशाची मान खाली नाही गेली, तर तुम्ही दादरीकांड घडवलंत म्हणून देशाची मान खाली गेली असा घणाघातही त्यांनी केला.

तुम्हाला जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर का ठेवता येत नाहीत?
१९९५ मध्ये शिवशाहीचे सरकार होते. शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवले होते. आताही युतीचे सरकार आहे. तुमचा मुख्यमंत्री आहे. मग तुम्हाला जीवनावश्यक वस्तूंचे दर का स्थिर ठेवता येत नाहीत, असा मर्मभेदी सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला. आम्ही सेंच्युरी कोणाची पाहायची… विराट कोहलीची की डाळीची? कांद्यावरून सरकार गडगडू शकते तर महागाई वाढल्यानंतर काय होईल याचा विचार करा, असा इशाराही त्यांनी दिला.
लाल किल्ल्यावर गुलाम अलींचा कार्यक्रम ठेवा
हिंदूंनी दहा मुले जन्माला घालावी असे आवाहन करणार्‍या हिंदू नेत्यांचीही ठाकरे यांनी पिसे काढली. ते म्हणाले, हिंदूंची दहा मुले तुम्ही पोसणार आहात का? अरे, असली शेळ्यांची पैदास नको. शंभर शेळ्यांपेक्षा एक वाघ बरा. गुलाम अलींची गाणी आम्हालाही आवडतात. पण सीमेवर आपले जवान रक्त सांडत असताना इथे गुलाम अलीचे गाणे ऐकायचे? मग लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘ए मेरे वतन के लोगो, जरा याद करो कुर्बानी’ या गाण्याच्या रेकॉर्डस् तोडून टाका, जाळून टाका. त्या गाण्याचा काहीच उपयोग नाही. लाल किल्ल्यावर गुलाम अलींचा कार्यक्रम ठेवा आणि टाळ्या वाजवा, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवतीर्थावर सातच्या सुमारास आगमन झाले. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर येताच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. सौ. रश्मी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

हारतुरे नाकारले
महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळाने होरपळत असल्याने उद्धव ठाकरे यांनी आजच्या मेळाव्यात कोणतेही हारतुरे स्वीकारले नाहीत. शेतकरी दुष्काळाने होरपळत आहेत. त्यामुळे शिवसेना अशा कठीणप्रसंगी शेतकर्‍यांच्या पाठीशी असून त्यामुळेच आजच्या कार्यक्रमात हारतुरे स्वीकारण्यात येणार नसल्याचे मेळाव्याच्या सुरुवातीलाच जाहीर करण्यात आले होते.

परंपरेनुसार शस्त्रपूजन
उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर आल्यानंतर परंपरेनुसार शस्त्रपूजन केले. उद्धव ठाकरे यांनी तलवारींना कुंकुमतिलक लावल्यानंतर या तलवारींची ओवाळणी केली.

हायटेक शिक्षण, आरोग्यसुविधा, अंधार्‍या गावात ‘शिव सौरऊर्जे’चा उजेड आणि दुष्काळग्रस्तांना लाखमोलाचा आधार…
शिवतीर्थावर उलगडला शिवसेनेचा ‘अश्‍वमेध’
आठवीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी महापालिका आणि खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना केलेले टॅबचे वाटप, व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे देण्यात येणार्‍या हायटेक शिक्षणाची सुरुवात, टेलिमेडिसीनच्या माध्यमातून दुर्गम भागात करण्यात येणारे उपचार, वर्षानुवर्षे अंधारात गडप झालेल्या आदिवासी पाड्यांत दिलेला शिव सौरऊर्जेचा उजेड आणि दुष्काळाने होरपळणार्‍यांना दिलेला लाखमोलाचा आधार अशा शिवसेनेने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त केलेल्या कामांचा अश्‍वमेधच आज शिवतीर्थावर उलगडवून दाखवण्यात आला त्यावेळी शिवतीर्थावर जमलेल्या लाखो शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात येणार्‍या या कामांचे प्रचंड टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले. शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेने गेल्या काही महिन्यांत जोरदार कामे केली. या कामांचा पट चित्रफितीच्या माध्यमातून आज दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर उलगडवून दाखवण्यात आला. स्वतः उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री आणि शिवसेना नेत्यांनी महाराष्ट्रातील गावागावात जाऊन प्रचंड कामे केली. त्या कामांचा पट चित्रफितीद्वारे उलगडून दाखवण्यात आला. १५ मिनिटांच्या या चित्रफितीत शिवसेनेची कामे दाखवतानाच या कामांचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले आहे.

दुष्काळग्रस्तांसाठी लाखोंचे अर्थसहाय्य

 • यावेळी शिवसेना विभाग क्रमांक १०च्या वतीने विभागप्रमुख, आमदार सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना दुष्काळ निधीसाठी ५ लाखांचा धनादेश सुपूर्द केला.
 • भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी शिवसेनाप्रमुखांना चाफ्याचा हार अर्पण करतानाच शिवसेना दुष्काळ निधीसाठी ५ लाखांचा धनादेश दिला. तसेच मराठवाडा आणि विदर्भ विभागासाठी चार पोकलेन मशीन देण्यात आल्या.
 • शिवसेना चित्रपट सेनेच्या वतीने ५ लाखांचा धनादेश देण्यात आला.
 • स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर आणि शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांनी दुष्काळासाठी ५ लाखांचा निधी दिला.
 • शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी दुष्काळासाठी १ लाख १ हजार ५०१ रुपयांचा निधी दिला.
 • मुंबई पोर्ट ट्रस्टमधील स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने २५ हजारांचा धनादेश दिला.
  शिवसेनेचा सुवर्णमहोत्सवी दसरा मेळावा गुरुवारी शिवतीर्थावर जल्लोषात साजरा झाला. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना नेते मनोहर जोशी, सुधीर जोशी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अ‍ॅड. लीलाधर डाके, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार गजानन कीर्तिकर, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, शिवसेना उपनेते खासदार आनंदराव अडसूळ, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, खासदार राहुल शेवाळे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, महापौर स्नेहल आंबेकर, शिवसेना चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष शरद पोंक्षे आणि शिवसेना विभागप्रमुख आमदार अ‍ॅड. अनिल परब उपस्थित होते. शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले.

फटकारे
कबरीवर माथा टेकायला तयार आहे, पण अब्दुल हमीदच्या!
औरंगजेब या अफजलखानाच्या कबरीवर माथा टेकला जातो. या डोक्यांमध्ये काय विचार असतील? पवित्र असतील… कदापि नाही. कबरीवर जाऊन माथा टेकायला मी तयार आहे… पण ती कबर औरंगजेब या अफझलखानाची नसेल. ती माझ्या भारतमातेचा सुपुत्र अब्दुल हमीदची असेल! हे आमचे हिंदुत्व आहे. औरंगजेबाच्या कबरीवर मुलगा व्हावा म्हणून नवस करायला जातात. त्यांना मी एकच सांगेन. तुम्हाला नवस करायचा आहे ना, तो अब्दुल हमीदच्या कबरीवर करा. तुमच्या पोटी देशप्रेमी मुलगा जन्माला येईल.

आधी डाळीला संरक्षण द्या, मग पाकड्यांना!
पाकिस्तानबद्दल बोलल्यावर भाजपच्या पोटात का दुखतं,,, रावसाहेब दानवे म्हणतात, पाकिस्तानी संघाला संरक्षण देऊ. आजच बातमी आली आहे. नागपुरात २५ लाख रुपयांच्या डाळीची चोरी झाली, आधी डाळीला संरक्षण द्या, मग पाकड्यांना संरक्षण द्यायची भाषा करा.

– कांद्यावरून सरकार गडगडलं, ही फार जुनी गोष्ट नाही. त्यातून धडा घ्या. महागाई वाढल्यानंतर काय होईल याचा विचार करा.

– शिवशाहीचं सरकार असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठवले होते. त्यावेळेला जमलं ते आता का जमत नाही? आम्ही सेंच्युरी कोणाची बघायची कोहलीची की डाळीची?

सुवर्ण महोत्सवाचा टॅटू
दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर येणार्‍या तरुणांमध्ये टॅटू काढण्याचीही क्रेझ होती. पण हे टॅटू होते शिवसेनेच्या वाघाचे, बाळासाहेबांच्या नावाचे आणि शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवाचे. हातावर हे टॅटू गोंदवून शिवसैनिक अभिमानाने मिरवत होते. पुण्याच्या सदाशिवपेठ येथील तरुणांनी शिवसेनेचे मोफत टॅटू काढण्याचा हा उपक्रम राबवला होता. ‘रामा टॅटू’ या संस्थेअंतर्गत १५ तरुण शिवसैनिकांनी हा उपक्रम हाती घेतला होता.
भगवी उपरणी, बॅच, कॅसेटस्साठी गर्दी
भगवी उपरणी, शिवसेनेचे बॅच, शिवसेनाप्रमुखांच्या भाषणांच्या कॅसेटस् घेण्यासाठी झुंबड उडाली. हे साहित्य विकण्यासाठी आजीपासून नातीपर्यंत कुटुंबंच्या कुटुंबं शिवाजी पार्कच्या रस्त्यावर बसली होती. यात प्रमोद भोईटे हे शिवसैनिक आपल्या कुटुंबासह हा एकमेव व्यवसाय करीत आहेत. शिवसेनाप्रमुखांमुळे आपल्याला जगण्याचा आधार मिळाल्याचे भोईट म्हणाले.
आस दसरा मेळाव्याची…
कोणत्याही परिस्थितीत मेळाव्याला पोहोचायचे ही आस प्रत्येक शिवसैनिकामध्ये असते. आपल्या अपंगत्वावर मात करीत अनेक शिवसैनिक या मेळाव्यात सामील झाले. दौंडहून व्हीलचेअरवरून दाखल झालेले मोहन यादव, माहीम येथील गिरीश पाटील यांच्याप्रमाणेच दोन्ही पाय अधू असताना एक अपंग शिवाजी पार्कवर पोहोचला. त्याच्या प्रयत्नांना दाद देत अखेर पोलिसांनी उचलून या तरुणाला मैदानात आणले.

शिवसेना बाप आहे… त्यापुढे झुकावेच लागते – संजय राऊत
महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थानने शिवसेनेला आपला आधार मानले. हा महाराष्ट्र, हिंदुस्थान आणि जगसुद्धा गेली पन्नास वर्षे शिवसेना आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर वाकत होता, झुकत होते. तीच परंपरा यापुढेही कायम राहील. मोठा भाऊ… छोटा भाऊ ही काय भानगड आहे? त्याचे बर्थ सर्टिफिकेट कोणी दिले? काल लहान असलेला भाऊ आज मोठा कसा झाला? जीवशास्त्रामध्ये काही नवीन नियम आलेत का असे फटकारे लगावत, शिवसेना बाप आहे आणि त्यापुढे झुकावेच लागते असे ठाम प्रतिपादन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी या मेळाव्यात केले. पुढच्या वर्षी विजयादशमीला शस्त्रपूजनात एके-४७ हवी. कारण कसुरींसारख्यांना रोखण्यासाठी शिवसेनेला सीमेवर जावे लागेल अशी परिस्थिती आहे, असे खासदार राऊत म्हणाले. अखंड हिंदुराष्ट्राचे स्वप्न साकारायचे असेल तर पाकिस्तानची भूमी बघून या असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितल्यामुळेच आपण पाकिस्तानच्या दौर्‍यावर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर गेलो होतो, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. राज्यातील जनता महागाईशी लढतेय. आज जनतेला आधारकार्डापेक्षा शिवसेनेचा आधार अधिक वाटतोय. देशातील सर्व राजकीय पक्ष हिजड्यांच्या भूमिकेत गेल्याने देशाच्या आशा शिवसेनेकडे लागल्या आहेत असे सांगतानाच हिंदुस्थानात, महाराष्ट्रात ताठ मानेने जगायचे असेल तर शिवसेनेच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन यावेळी राऊत यांनी केले.

…तर शेतकरी संपला असता – रामदास कदम
शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेने दुष्काळग्रस्त भागात शेतकर्‍यांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी धावून गेले नसते, जमीन अधिग्रहण कायद्याला शिवसेनेने विरोध केला नसता तर महाराष्ट्रातील शेतकरी संपला असता, असे ठणकावून सांगितले. अनेक पक्षांचे नेते मराठवाड्याच्या दुष्काळी भागात नौटंकी करण्यासाठी गेले होते, मात्र उद्धव ठाकरे यांनी तिथे जाऊन शेतकर्‍यांना प्रत्यक्ष मदत केली, असे कदम यावेळी म्हणाले. पाकिस्तानी खेळाडू हिंदुस्थानात आले तर त्यांना संरक्षण देण्याची भाषा करणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीवेळी मुंबईत केलेले भाषण पुन्हा ऐकावे आणि पाकिस्तानबाबतचे त्यांचे धोरण स्पष्ट करावे, असा सल्ला त्यांनी दिला. जे हिंदुस्थानच्या भूमीवर राहून पाकिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालतात त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे असेही ते म्हणाले.

‘शिवसेना’ असेपर्यंत पाकिस्तानची डाळ शिजणार नाही – शरद पोंक्षे
शिवसेना नावाची चार अक्षरे जोपर्यंत या हिंदुस्थानात जिवंत आहेत तोपर्यंत पाकिस्तानची डाळ इथे शिजणार नाही असे सांगतानाच कसुरींसारख्या पाकिस्तानींना विरोध करणार्‍या शिवसैनिकांनी आजही शिवछत्रपतींची अवलाद इथे आहे हे दाखवून दिल्याचे शिवसेना उपनेते व शिवसेना चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष शरद पोंक्षे यावेळी म्हणाले. पाकिस्तानी गायकाला आणि पुस्तक प्रकाशनाला शिवसेनेने केलेला विरोध ही राष्ट्रभावनेची ज्योत होती आणि प्रत्येक माणसाच्या मनातील ज्योत शिवसेनेने मांडली. कसुरींविरुद्धच्या आंदोलनावर टीका करणार्‍यांना कसाबच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या पोलिसांच्या, नागरिकांच्या कुटुंबीयांना गुलाम अलींचे गाणे ऐकावे वाटेल का? कसुरींचे पुस्तक वाचावे असे वाटेल का असे जाऊन विचारा, असे पोंक्षे म्हणाले. अफझलखानाचा कोथळा काढणार्‍या शिवरायांच्या काळात गांधी नव्हते हे बरे झाले. नाहीतर आज शिवतीर्थावर कव्वालीचा कार्यक्रम असता असे पोंक्षे म्हणाले.