जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता भगिनीनों आणि बांधवांनो,

दसऱ्याच्या हार्दीक शुभेच्छा आपला ५० वा दसरा मेळावा, ही परंपरा आपण कायम ठेवली आहे. ५० च नाही तर येणारी कित्येक वर्ष ही परंपरा शिवतीर्थावर अशीच सुरू राहणार आहे. विषय खूप आहे, ५० वर्षांपूर्वीच्या आठवणी मनात साठणं कायम आहेत. पहिला मेळावा मला अंधुकसा आठवतो, आजच्यासारखेच तुडुंब मैदान भरलेले असायचे, तेव्हा मी माँच्या मांडीवर बसून भाषणे ऐकायचो. आम्ही जेव्हा कदम मॅन्शनमध्ये रहात होतो १९ जूनला नारळ वाढवण्यात आला, घरचीच मंडळी होतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून नारळ वाढवला. त्या नाराळाच्या पाण्याचे थेंब उडाले तेव्हा वाटलंही नाही की हे थेंब मला भिजवून टाकतील.

शिवसेनाप्रमुखांनी मला तुमच्या रूपाने खरे सोने , है वैभव मला दिले, ही केवढी पुण्याई आहे. मी शिवसेना पुढे घेऊन जाणार म्हणजे जाणारच. विधानसभेत आपण एकाकी लढलो, समोर किती रथी महारथी होते, त्यांचा अश्वमेध शिवसेनाप्रमुखांच्या मर्दांनी महाराष्ट्रात रोखला. सगळ्यांनी कौतुक केले माझ्या नेतृत्वाचे मात्र हे तुमचे कौतुक आहे. २५ वर्ष मित्र मानले तो अंगावर येईल असे वाटले नाही, पाठीत वार करेल असे वाटले नाही.

मध्ये मध्ये कोणाला तरी फुरफुरी बाकी असेल असेल तर आज युती तोडा आणि अंगावर या, पाठीतून वार करू नका, समोरून या मग आम्ही तुम्हाला दाखवू की सर्जिकल स्ट्राईक कसा असतो. मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की तुमचा नेता कोण ते ठरवा आणि अंगावर कोण येणार ते सांगा. आमच्या मनात पाप नाही, जर तुम्ही अंगावर आलात तर आम्ही लेचेपेचे नाही. गेले काही दिवस या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष होते, मेळावा होणार की नाही. अरे कोणाची हिम्मत हा मेळावा रोखण्याची. पत्रकारांनी मला विचारलं, तेव्हा पाऊस होत होता.तेव्हा मी त्यांना सांगितले की दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर भेटू. आणि आज आपण सगळे इथे आहोत.

अनेक समस्यांचा जो रावण आहे त्याचे दहन करणारे कोणीतरी राम जन्माला येणार आहे का ? सगळे प्रश्न तसेच आहेत. किती दिवस नुसती शस्त्राला फुले वाहत राहायची, ती शस्त्र पण म्हणत असतील अरे कधीतरी काढा की आम्हाला बाहेर नाहीतर गंज लागेल. आपल्या सैनिकांनी सीमारेषा पार करून त्यांना ठोकून काढले. याबद्दल मी सैन्याचे आणि पंतप्रधानांचे जाहीर अभिनंदन करतो. मी स्वत: मोदींना फोन केला आणि म्हटले की ‘यही मोदी हमे चाहीये’. याचा अर्थ हा नाही की आम्ही सगळे विसरून त्यांच्याशी चर्चेला लागलो. पण जे चांगले आहे त्याला चांगले म्हणणारे आम्ही आहोत, आमचे मन कोते नाही.

मोदीजी अशी कारवाई कारवाई करा की केवळ पाकव्याप्त काश्मीरच नाही तर संपूर्ण पाकिस्तानही हिंदुस्तान म्हणून जगाच्या पाठीवर ओळखले गेले पाहीजे अशी कारवाई करा. काही दिवसांपूर्वी हवाईदल प्रमुख बोलले की लष्कराचा पूर्ण वापर केला असता की आपण पाकिस्तानला कधीच नेस्तनाबूत केले असते. सर्जिकल स्ट्राईक केल्याची माहिती सैन्याच्या जबाबदार अधिकाऱ्याने आपल्याला दिली. या कारवाईनंतर काही सडक्या मेंदूच्या माणसांनी शंका उपस्थित केल्या,त्यात राहुल गांधीसुद्धा होते. ‘रक्ताची दलाली’ हा शब्द कुठून शिकलायत ? बोफोर्समधून ? ज्यांनी याबाबत शंका उपस्थित केल्या त्यांचे मेंदू सडके आहे, त्यांच्यात धमन्यांमध्ये भारतमातेचे रक्त नाही, तर लाहोरच्या गटाराचे पाणी आहे.

सैन्यावर अविश्वास कसा दाखवू शकता? २०-२५ वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख जे बोलले ते केले असते तर आज ही वेळ आली नसती. पाकिस्तानचा कलाकार येतो, राजकारणी येतो, मागे तो कसुरी आला, पुस्तकाच्या प्रकाशनासाठी काय कोडकौतुक त्याचे, त्याचा विरोध शिवसैनिकांनी केला, आणि मला अभिमान आहे त्यांचा, शिवसेनाप्रमुखांनी तेव्हाच सांगितलेले होते पाय ठेऊन देऊ नका या पाकड्यांना. हेच सरकार त्यावेळीस होते, त्यावेळी संरक्षणासाठी हेच सरकार त्यांच्या पाठिशी उभे राहिले. शिवसैनिकांना देशभक्त ठरवण्याऐवजी जगभर देशद्रोही ठरवण्यात आले. सैन्य हे जनतेतून निर्माण होत असते. समाजात नेभळटपणा असेल तर सैनिक म्हणेल की मी शहीद व्हायला आलोय मात्र हा षंढ लाल गालिचे घालून पाकड्यांना बोलावतोय.

पुरावा मागणाऱ्यांना पुरा आणि मग काय ते करा, पुरावा कसला मागताय ? सैनिकांनी या लोकांना उद्देशून म्हटले की एक दिवस आम्ही ज्या परिस्थितीत राहतो त्या परिस्थितीत राहून दाखवा. त्या परिस्थितीत २०-२५ किलोचे ओझे उचलत आपल्या देशासाठी लढत असतात. सैनिकांवर अविश्वास दाखवणारे करंटे आहे. अशा सैनिकांवर अविश्वास दाखवणारे पाकिस्तानची वळवळणारी अवलाद आहे,जी इथे आली आहे.

मुंबईतील रेसकोर्सची २०० एकर पेक्षा जास्त जागा आहे, त्या जागेवर वॉर म्युझियम बनवा, लोकांना कळू द्या, बंदुका कशा असतात, रणगाडे. कसे असतात. पाकिस्तानात वाहिन्यांवर बंदी टाकण्याची मागणी होतेय. तो जावेद मियांदाद उलटलाय आणि म्हणतोय की हिंदुस्तानचा ऑलआऊट करा. इम्रान खान म्हणतोय की मोदीना उत्तर कसे द्यायचे ते मी दाखवतो. एकदा काय तो फैसला करा, पाकिस्तान बरोबर संबंध कसे ठेवायचे, खेळ,कला, राजकारण संबंध कसे ठेवायचे हे ठरवा.जे अंगावर येतायत त्यांना साफ करणे हे आम्हाला शिवरायांनी शिकवले आहे.

‘महाराष्ट्र घडतोय’ अशा जाहिराती वाचल्या, पण राज्यात जे काय चालले आहे ते बघितल्यानंतर घडतोय का बिघडतोय असा प्रश्न निर्माण झालाय. देशात कुठेतरी अस्वस्थता आहे. मोदी काळा पैसा आणतील आपल्या खात्यात टाकतील असे वाटत होते. व्यापारी परेशान आहे. काळा पैसा काढा, मात्र जशा धाडी या भागात टाकताय तशा धाडी तुम्ही भेंडीबाजार सारख्या एरियात टाकणार का? यामध्येही सर्वधर्मसमभाव पाहिजे.

देशात चर्चा होत असते, ही निवडणूक झाली की ती निवडणूक सुरू असते. त्यात पंतप्रधानांपासून सगळे जण अडकून बसतात. देशाची जबाबदारी पंतप्रधानांकडे आहे, राज्याची मुख्यमंत्र्यांकडे दिलीय. पंतप्रधान देशाचा असतो, तर मग ते एका पक्षाच्या प्रचाराला कसे जाऊ शकतात? मुख्यमंत्री एखाद्या व्यासपीठावर जाऊन एकाद्या उमेदवाराला विजयी करा असं कसे म्हणू शकतात? निवडणुकीत पंतप्रधान त्यांचा ताफा घेऊन कसे फिरू शकतात?

जर पंतप्रधान ७०,८० हजार कोटींची आश्वासने देत फिरत बसले तर मग विश्वास कोणावर बसेल ? साहजिकच आहे पंतप्रधानांवर बसेल. ज्या अच्छे दिनाचा वायदा करून सत्तेवर आले तेच अच्छे दिन गळ्यात अडकलेले हाडूक आहे असे भाजपावाले म्हणत आहेत.आसाम वगळता अन्य राज्यातल्या निवडणुकात तिथल्या लोकांनी प्रादेशिक पक्षांना निवडून दिले. कारण भ्रम दूर झाला आणि लोकांना कळाले की चांगले कोण आणि वाईट कोण. एकत्र निवडणुका जरूर घ्या,मात्र त्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र व्यासपीठावर जाऊन प्रचार करता कामा नये.

बाळासाहेबांचं म्हणणे होते की आर्थिक निकषावर आरक्षण द्या.आरक्षण कशाला मी तर न्यायहक्कच म्हणेन.जर मराठ्यांना न्यायहक्क दिले असते तर आज मराठ्यांना रस्त्यावर उतरावे लागले नसते. आरक्षणाच्या मुद्दावरून समाजामध्ये खदखद आहे. कोपर्डीतील चिमुरडी गेली आणि त्या ठिणगीनंतर हा वणवा पेटला. शाळा ते घर आणि घर ते शाळा हा प्रवास या मुलींसाठी जीवघेणा ठरतो. या वाटेवर नराधम तिची शिकार करतात. न्यायप्रक्रियेतील दिरंगाईबाबतचा संताप रस्त्यावर उतरला, हा उद्रेक आहे आणि शिवसेना ही या उद्रेकासोबत आहे.कोणी न्यायहक्क मागत असेल तर शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील.कोणालाही न्याहक्कापासून वंचित ठेवत येणार नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी मर्दासारखे काम केले, त्यांनी विरोध मोडून काढत आरक्षण देणार म्हणजे देणारच अशी भूमिका घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही असाच कणखरपणा दाखवावा. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता न्यायहक्क मिळाला पाहिजे.

मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, त्यांना न्यायहक्क मिळाला पाहीजे आणि त्यासाठी शिवसेना तुमच्या सोबत आहे. आमचे पवार साहेब त्यांचे लेझीम नेहमीच सुरू असते. ‘ग्यानबा तुकाराम,ग्यानबा तुकाराम’ सुरूच असते एक दिवस पुढे जातायत दुसऱ्या दिवशी पाठी आलेले दिसतात. अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतो असे खुद्द मुख्यमंत्री म्हणाले आहेत. जर असे असेल तर त्यात बदल घडला पाहीजे. कायद्याचा गैरवापर कोण करतो ? त्याला प्रथम शिक्षा द्या.

आजच एक जाहिरात वाचली, महाराष्ट्र घडतोय,आमचाच आहे महाराष्ट्र, आम्हीही सत्तेत आहोत, पण महाराष्ट्र घडतोय की बिघडतोय याचा विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी मराठवाड्यात एक विद्यार्थिनी स्वाती पिठलेनी आत्महत्या केली काऱण ८ दिवस तिने शाळेला दांडी मारली. तिला बसचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते. अंतर इतके मोठे असते आणि त्यादरम्यान तिच्यावर अत्याचार झाला असता तर जबाबदार धरायचे कोणाला? तिच्या आईने दारोदार फिरून शिक्षणासाठी पैसे जमा केले. त्या मुलीने विचार केला की माझ्यासाठी जर आईला शिक्षणासाठी हात पसरावे लागत असतील तर माझ्या जगण्याचा काय उपयोग. अशा घटना घडणार असतील तर मग कसे म्हणणार घडतोय महाराष्ट्र?

मी ताबडतोब दिवाकर रावते यांना फोन केला आणि संपूर्ण मराठवाड्यात विद्यार्थ्यांचा एसटी मार्फत प्रवास मोफत करा असे सांगितले, त्याचा फायदा राज्यातील ४ लाख विद्यार्थ्यांना झाला, याला म्हणतात शिवसेना,असे निर्णय घ्या.

मुसलमानांना धर्माच्या आधारावर सवलती देऊ शकत नाही अशी भूमिका शिवसेनेन तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे मांडली होती.

स्वामीनाथन आयोग का स्वीकारायचा नाही ? शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी कोणी केली ? तेव्हा शरद पवारांनी त्याचे श्रेय घेतले,तेव्हाही मी त्यांना प्रश्न विचारला की असा एक तरी पक्ष नेता दाखवा ज्याने कर्जमुक्ती मिळावी यासाठी मेळावे घेतले होते. आजचं केंद्रातले सरकार देशवासीयांची शेवटची आशा असेल ती आशा यशस्वी व्हावी हीच मी प्रार्थना करतो. माझे आणि भाजपाचे पटले नाही तरी मी ही प्रार्थना करतो.

राधाकृष्ण विखे-पाटील..त्यांचं तर नाव घेण्याचीही लायकी नाही. मी माफी मागितली,का नाही मागायची? त्या माझ्या माता भगिनी आहेत, मी सोनिया गांधींसमोर नतमस्तक नाही झालो तुमच्यासारखे. देवीचे आगमन घरात झालेले असताना माता भगिनींना माझ्याबद्दल, शिवसेनेबद्दल,सामनाबद्दल किंचीतही शंका राहता कामा नये. महापालिकेत येऊन दाखवा आमच्या अंगावर, शिवसेना ही मुंबईची आहे,मुंबई ही शिवसेनेची आहे बघायचे असेल तर पालिका निवडणुकीत सामोरे या.

आलात सोबत आनंदात राहू, सोबत येणार असाल तर आनंदात या, तुमच्या मागे भिकेचा कटोरा घेऊन येऊ असं वाटत असेल तर आजिबात येणार नाही. दिवाळीच्या आसपास मी शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत येणार आहे. युतीचा विचार तुम्ही करू नका.

अनेकांना वाटले होते की यंदा दसरा मेळावा होणार नाही, पण पाऊसही आम्हाला अडवू शकला नसता. जे काम तुम्ही केलेत, जो विश्वास तुम्ही दिलात तो विश्वास पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, कितीही संकटे आले तरी त्याच्या छाताडावर जाऊन भगवा फडकावल्या शिवाय राहणार नाही.