आता सत्तेत अच्छे दिन आले म्हणून शिवसेनेला तोडून टाकलं जातंय. मी मुख्यमंत्रीपदासाठी युती तोडली म्हणून ते आवई उठवतात, अरे, तुम्हाला जर मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा नव्हती तर मग शिवसेनेच्या जागा का खात होतात? मी १८ जागा दिल्या. आणखी किती जागा कापायच्या, त्यांना ३४-३५ जागा हव्या होत्या. म्हणजे या महाराष्ट्रातील सहा जिल्हे भाजपला आंदण दिल्यासारखे झाले असते. कोणता पक्षप्रमुख स्वत:चा पक्ष असा कापेल?
फलटण, दि. २ ऑक्टोबर २०१४
शिवसेनेशी युती तोडून भाजपने छत्रपती शिवरायांच्या आणि शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाचा विश्‍वासघात केला. आता महाराष्ट्र तोडून त्यांना केक कापायचा आहे म्हणून सत्ता हवी आहे, परंतु शिवरायांचा हा महाराष्ट्र तोडण्याचे हे पाप शिवसेना त्यांना करू देणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेनेच्या प्रचाराचा झंझावात आज पश्‍चिम महाराष्ट्रात उसळला. फलटण, कराड आणि कोल्हापूर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढणार्‍या विराट सभा झाल्या. पहिली झंझावाती सभा फलटणमधील शिंगणापूर रोडवरील घडसोली मैदानावर झाली. अलोट गर्दीने भरलेल्या या सभेने फलटणमधील आजपर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक केले. प्रचंड जल्लोष आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत तरुणांचे जथेच्या जथे सभास्थानी येऊन धडकत होते. महिलांची उपस्थिती मोठी होती. भरदुपारी उद्धव ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन होताच उपस्थित जनसमुदायाची लाट उसळली. उद्धव ठाकरे यांच्या या सभेने पश्‍चिम महाराष्ट्रातील भल्याभल्यांना धडकी भरली. या सभेस शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते, आमदार विजय शिवतारे, शिवसेनेचे फलटणचे उमेदवार डॉ. नंदकुमार तासगावकर, वाई-खंडाळा-महाबळेश्‍वरचे उमेदवार डी. एम. बावळेकर, कोरेगावचे उमेदवार हणमंतराव चवरे, माण-खटावचे उमेदवार रणजितसिंह देशमुख, बारामतीचे उमेदवार ऍड. राजेंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेला आलो तेव्हा महायुती होती, आता एकटा आलोय, पण माझ्यासोबत देव-देवता आणि शिवसेनाप्रमुखांचा आशीर्वाद आहे. शिवसेनेशी युती तोडून भाजपने छत्रपती शिवराय आणि शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाचा विश्‍वासघात केलाय, त्यांना भगव्याची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाट नव्हती असं मी म्हटलं नव्हतं. मोदी लाट होती तर मग सातार्‍यात ती का चालली नाही? जयललिता, ममता यांच्यापुढे ती का टिकली नाही? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मोदी लाट महाराष्ट्रात चालली ती फक्त शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादामुळेच असे निक्षून सांगताच सभेतून जल्लोष उसळला.
महाराष्ट्र लुटला, मजुरांसाठी टंचाईग्रस्त ठेवला
कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले सत्तेत राहून सम्राट झाले, बाबा-दादाच्या टोळीने महाराष्ट्र लुटला, सात पिढ्या ऐषोरामात जगतील एवढं करून ठेवलं असे सुनावताना उद्धव ठाकरे म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रात युतीचं सरकार असताना धरणं बांधली, पाणी अडवलं, पण १५ वर्षांत या सत्ताधार्‍यांना साधे कालवेदेखील बांधता आले नाहीत. काही तालुके त्यांनी मुद्दाम टंचाईग्रस्त आणि पाण्यासाठी टेन्शनमध्ये ठेवले. या साखरसम्राटांना मजुरांच्या टोळ्या मिळाव्यात म्हणून हे राजकारण कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले सहकारसम्राट खेळत आहेत याची जाणीव उद्धव ठाकरे यांनी करून दिली. यावेळी शिवसेना एकटी आहे, तामीळनाडूत जयललिता, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशात मायावती महिला असूनही त्या त्यांच्या ताकदीवर सत्ता आणू शकतात मग महाराष्ट्रात शिवसेना का जिंकू शकत नाही? शिवसैनिकांनो, जिद्द बांधा, शिवसेनेच्या भगव्याशिवाय दुसरं कोणतंही फडकं पश्‍चिम महाराष्ट्रात फडकणार नाही अशी शपथ घ्या, असे जबरदस्त आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
…आता शिवसेना नकोशी का झाली?
शिवसेना ही मर्दांची आहे, युती तुटली तरी प्रत्येक जागेवर आपण उमेदवार उभा केला आहे. उमेदवार आयात करण्याची वेळ आपल्यावर आली नाही, असे बजावून उद्धव ठाकरे म्हणाले, युती तुटल्यानं माझं अंत:करण तुटलं, सोन्यासारखं सत्तेचं ताट महाराष्ट्रातील जनतेनं समोर वाढवून ठेवलं होतं आणि आता तुम्ही छत्रपतींचा आशीर्वाद मागता, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रानं आशीर्वाद दिले होते, पण मग आज तुम्हाला शिवसेना नकोशी का वाटते? शिवसेना आपल्या सोबत राहिली तर तुम्हाला महाराष्ट्राचा केक कापता येणार नाही, पण लक्षात ठेवा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शिवसेना तो कधीही तोडू देणार नाही.
आपल्यासोबत आशीर्वाद
शिवसेनाप्रमुखांची ही शिवसेना संपविण्यासाठी केंद्राचं मंत्रिमंडळ महाराष्ट्रात उतरत आहे. त्यांचे हत्ती, घोडे, अंबार्‍या येणार आहेत. महाराष्ट्राची शकलं करणारी ही मंडळी एका बाजूला तर दुसरीकडे बाबा-दादा या लुटारूंची टोळी आहे याची जाणीव शिवसैनिकांना करून देताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्यासोबत फक्त जनतेचे आणि शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आहेत. हे आशीर्वाद काय आहेत ते या निवडणुकीत आपण दाखवून देऊ.
दादा-बाबाला पाठवू काशीला!
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जाहिराती तयार झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या लोकधारेत आणि परंपरेतील या जाहिरातीत सर्वसामान्य साधा माणूस असेल. वासुदेव, गोंधळी अगदी बाल्या डान्सदेखील घेतलाय आणि महाराष्ट्र लुबाडायला, तोडायला निघालेल्यांचे मर्दन करण्यासाठी आई तुळजाभवानीला ‘बये दार उघड’ म्हणून साकडेही घालणार आहे, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी एका गाण्याचा हवाला दिला. ‘नको हे लबाड आपल्या राशीला, दादा-बाबाला पाठवू काशीला.’ या गाण्यातील बाबा-दादाच्या नावाला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. अहो, पण हेच दादा-बाबा सध्या एकमेकांच्या झिंज्या उपटतात, त्यांच्या नावावर आक्षेप घेण्यासारखं आता काय उरलंय, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी त्यांचा समाचार घेतला.
बाबांची सही
टीव्हीवरील कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जाहिरातीची उद्धव ठाकरे यांनी चांगलीच खिल्ली उडवली. या जाहिरातीत बाबा सही करताना दाखवले आहेत. मुख्यमंत्र्यांकडील फायली सहीविना पडून आहेत, सह्या करताना त्यांचा हात लकवा मारल्याप्रमाणे थरथरतो अशी टीका शरद पवार यांनी केली होती. त्यामुळे मी तसा नाही, मी सह्यासुद्धा करू शकतो हे दाखविण्याचा खटाटोप बाबांनी जाहिरातीतून केला आहे. पक्षाच्या चिन्हापेक्षा बाबांच्या सहीलाच जास्त महत्त्व असल्याचे सांगताच सभेत खसखस पिकली.
भिडे गुरुजींचा आशीर्वाद हा शुभसंकेत
‘‘मी सांगलीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करताना शुभसंकेत घडला. ऋषितुल्य संभाजी भिडे गुरुजींचा आशीर्वाद मिळाला आणि अंगावर रोमांच उभे राहिले,’’ असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘युती तोडू नका असे भिडे गुरुजी तळमळीने फोन करायचे. पण, मी युती तोडलेली नाही; भाजपने जाणीवपूर्वक युती तोडलेली आहे. याच्या यातना होत आहेत. प्राणपणाने लढून भाजपला साथ केली. परंतु ‘अच्छे दिन’ येताच हिंदुत्व, शिवसेना, भगवा त्यांना नकोसा झाला आहे. कधीही शिवजयंती साजरी न करणार्‍यांना आज शिवरायांचा पुळका आला आहे. भिडे गुरुजींनी प्रेमाने बांधलेला फेटा हा राजमुकुटापेक्षाही श्रेष्ठ आहे.’’ कोल्हापुरात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गर्दीने उसळलेल्या पेटाळा मैदानात गुरुवारी दणदणीत जाहीर सभा झाली. यावेळी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १० उमेदवारांना विजयी करण्याचे जबरदस्त आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), चंद्रदीप नरके (करवीर), सुजीत मिणचेकर (हातकणंगले), विजय देवणे (दक्षिण कोल्हापूर), उल्हास पाटील (शिरोळ), सत्यजित पाटील (शाहूवाडी), नरसिंग पाटील (चंदगड), संजय घाडगे (कागल), प्रकाश आबीटकर (राधानगरी) आणि मुरलीधर जाधव (इचलकरंजी) हे उमेदवार उपस्थित होते.