महाराष्ट्र हा लढवय्यांचा देश आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट कोसळले, तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने आपले योगदान दिले. वास्तविक सैन्य ही पूर्वापार चालत आलेली संकल्पना आहे. भारतीय युद्धविद्या ही वेदांएवढीच प्राचीन आहे. परंतु ही सैन्ये अधिक राजनिष्ठ होती. महाभारताच्या युद्धात साऱ्या भारतातील शेकडो राजांचे मिळून हजारो सैनिक कौरवांच्या वा पांडवांच्या बाजूने लढले. नंद वंशाचे राज्य उलथवून टाकून चंद्रगुप्ताला राज्य मिळवून देणाऱ्या चाणक्याने सैन्याच्या अत्यावश्यकतेविषयी मते व्यक्त केली आहेत. मधल्या काही शतकांत आक्रमकांच्या टोळधाडी येतच राहिल्या. अशा हतबल वातावरणात १७व्या शतकात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मोगलांच्या आक्रमकांनंतर, इस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने ब्रिटिश आले नि येथेच स्थिरावले व भारतीयांना त्यांनी गुलामगिरीत लोटले. तथापि ब्रिटिश सैन्यही सुरुवातीला भारतासाठी एक असे नव्हते. रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई ‘ब्रिटिश रियासती’च्या दुसऱ्या खंडात लिहितात : त्या वेळी इंग्रजांच्या तीन फौजा अगदी वेगळ्या होत्या. एक बंगालची, दुसरी मुंबईची व तिसरी मद्रासची. हल्ली जसे हिंदुस्थानाचे सर्व सैन्य एक आहे व लष्करी खाते एका सेनापतीच्या ताब्यात राहते, तसा प्रकार त्या वेळी नव्हता. शिवाय इंग्रजी लष्करात सर्व गोरे अंमलदार व काही गोरे शिपाई व मुख्य भरणा एतद्देशीय शिपाई यांचा होता. गोऱ्यांची पलटणे वेगळी व हिंदी पलटणे वेगळी होती, सरमिसळ नव्हती. १८५७ साली स्वातंत्र्य समर झाले. तेव्हा त्यात नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांनी नेतृत्व केले.
ब्रिटिश साम्राज्याचा एक घटक या नात्याने पहिल्या महायुद्धात भारताने दोस्त राष्ट्रांच्या विजयाला मोठा हातभार लावला. तसेच दुसऱ्या महायुद्धातही ब्रिटिशांच्या व दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धाचे पारडे फिरविण्यात भारतीय जवानांचा महत्त्वाचा सहभाग होता. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारतीय संरक्षण दलाला स्वतःचा कमांडर-इन-चीफ मिळाला. राष्ट्रपती हे सर्व दलांचे घटनात्मक प्रमुख झाले. १९५५ साली कमांडर-इन-चीफ हे पद रद्द करण्यात आले आणि भूदल, नौदल व हवाई दल या तिन्ही दलांना स्वतंत्र प्रमुख नेमण्यात आले. संरक्षण दले ही संपूर्ण देशाची असतात, मात्र त्यावर ठसा असतो, तो लढणाऱ्या सैनिकांचा, नेतृत्व करणाऱ्या वीरांचा आणि ओघाने हे सैनिक वीर ज्या प्रांतातून येतात त्यांचा. युद्धे लढताना नियोजन लागते आणि युद्धे संपल्यावर युद्धांचा इतिहास, त्यांचे विश्लेषण, मीमांसा हेही गरजेचे असते.