५ जून १९६६ !

यंडुगुंडूंचे मराठी माणसाच्या हक्कांवरील आक्रमण परतवून लावण्यासाठी शिवसेनेची लवकरच नोंदणी सुरू होणार ! विशेष माहितीसाठी ‘मार्मिक’चा पुढील अंक पाहा ! – संपादक

१९ जून १९६६ !

‘मार्मिक’च्या आवाहनाला तुफान प्रतिसाद ! नोंदणीचे २ हजार तक्ते अवघ्या तासाभरात संपले !
प्रबोधनकार ठाकरे यांनी नाव दिलेल्या ‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राची रीतसर स्थापना !

३० ऑक्टोबर १९६६ विजयादशमी !

शिवसेनेच्या स्थापनेनंतर शिलंगणाचं सोनं लुटण्याचा दिवस. याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अवघा मराठी एकवटला !
स्थळ : शिवाजी पार्क.
वेळ : सायं. ५.३०.
दुपारी चारपासूनच शहराच्या विविध भागांतून अलोट गर्दी. व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह श्रीकांत ठाकरे, रामराव आदिक, प्रा. स. अ. रानडे, अॅड. बळवंत मंत्री आणि प्रबोधनकार ठाकरे !
शाहीर साबळे यांच्या बुलंद आवाजात महाराष्ट्र गीत सुरू झालं आणि मराठी जनसमुदायाच्या अंगावर रोमांच फुलले !
प्रबोधनकारांचं ते ऐतिहासिक ठरलेलं वाक्य याच सभेतील ! प्रबोधनकार म्हणाले, ‘माझा बाळ आज मी अवघ्या महाराष्ट्राला देत आहे!’ त्यानंतर भाषण झालं ते शिवसेनाप्रमुखांचं. घोषणांच्या आणि फटाक्यांच्या धुमधडाक्यात शिवसेनाप्रमुखांनी तोफा डागायला सुरुवात केली. अवघा मराठी माणूस एकेक शब्द मनात साठवू लागला आणि त्याचं रक्तही तापू लागलं…. बाळासाहेब म्हणाले… ‘मराठी माणूस जागा झाला आहे.. यापुढे तो अन्याय सहन करणार नाही ! राजकारण हे गजकर्णासारखं असतं. त्यामुळे शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करील! ही संघटना मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी झगडणार असली तरी जातीयवाद नाही ! मराठी माणसाशी संकटकाळातही जो मैत्री करतो तोच मराठी !
बाळासाहेबांनी मराठी मने चेतवली. शिवाजी पार्कवर एकच कल्लोळ झाला ! मराठी माणूस जागा झाला आणि…..
शिवसेनेचा जन्म झाला !

१९ जुलै १९६६ - मराठी मनाचे ‘मार्मिक’ शपथपत्र

शपथपत्र

  • मराठी माणसानं मराठी माणसाला मदत करावी आणि त्याची भरभराट होईल याकडे लक्ष द्यावं.
  • मराठी माणसानं आपली मालमत्ता अमराठी माणसाला विकू नये आणि असा व्यवहार कुठे होत असल्यास त्याची माहिती तातडीने जवळच्या शाखेवर द्यावी.
  • मराठी दुकानदारांनी आपला माल शक्यतो मराठी घाऊक व्यापाऱ्यांकडूनच विकत घ्यावा आणि आपल्या ग्राहकांशी सौजन्याने वागावं.
  • मराठी मालकवर्गाने फक्त मराठी माणसालाच कामावर ठेवावं.
  • तरुण मराठी मुलांनी उत्तम इंग्लिश बोलायला शिकावं. तसंच इंग्रजी स्टेनो-टायपिंगही त्यांनी शिकलं पाहिजे.
  • मराठी माणसानं आपला आळस झटकून स्वत:च्या सहकारी, गृहनिर्माण संस्था स्थापन कराव्यात. तसंच नोकरीसाठी कोठेही जाण्याची तयारी दाखवावी.
  • मराठी सण-समारंभ आणि उत्सव यामध्ये आपल्या मराठी बांधवांबरोबर मोठ्या संगतीने सहभागी व्हावे.
  • मराठी माणसांच्या संस्था, शाळा, आश्रम यांना उदारपणे मदत करून त्यांच्या कार्यात सहभागी व्हावं.
  • धंदे आणि उद्योग व्यवसाय यामधील मराठी माणसाला खाली बघायला न लावता उलट त्याला शक्यतो मदत करावी.
  • मराठी बांधवांशी उद्दामपणे आणि बेफिकिरीने वागू नये. उलट मराठी माणूस अडचणीत असल्यास इतरांनी त्यास संघटितपणे मदत करावी.

१९६७ - पहिला भगवा..... ठाण्यावर !

शिवसेना स्थापन झाली आणि मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात जणू एक मराठी झंझावात आला. मराठी मंडळं, संस्था, गणेशोत्सव मंडळं, दहिकाला उत्सव समिती, व्यायामशाळा यातील जिगरबाज मराठी तरुणांना आपलं हक्काचं व्यासपीठ मिळालं…. ‘मार्मिक’ तर ‘मराठी’ यज्ञ चेतवतच होता. त्यात धडाका सुरू झाला बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांचा. बाळासाहेबांचे तिखटजाळ शब्द मराठी माणसांना भिडू लागले. प्रबोधनकारांचा व्यंगचित्रकार पुत्र एवढीच ओळख जणू ‘बाळ ठाकरे’ यांना अमान्य होती. सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार आणि जे पटत नाही त्याच्यावर जबरदस्त शरसंधान हे बाळासाहेबांच्या वक्तृत्वातील भन्नाट मिश्रण मराठी माणूस डोक्यावर घेऊ लागला. त्याला नर्मविनोदाची जोड मिळाल्यानंतर तर बाळासाहेबांची गणना महाराष्ट्रातील उत्कृष्ट वक्त्यांत केली जाऊ लागली. भट्टी अशी जमू लागली. मार्मिक, तडाखेबंद भाषणे आणि मराठी माणसांची होणारी कोंडी, हे रसायन खदखदलं आणि ठाणे पालिका निवडणुकीत या मराठी असंतोषाचा पहिला स्फोट झाला ! १९६७ साली लोकसभा निवडणुकीत राजकीय डावपेचांचे पहिले शड्डू ठोकून झाल्यानंतर ठाणे पालिका निवडणुकीत शिवसेना वाजत-गाजत उतरली. या पहिल्या-वहिल्या ढाल-तलवार युध्दाचा निकाल होता १७ जागा! ४० पैकी १७ जागा जिंकून शिवसेनेने पुढच्या झंझावाताची चुणूक आनंदलेल्या मराठी मनाला आणि मराठीद्वेष्ट्यांना दिली !

१९६८ ! - आणि मुंबईकरही भडकला...!

भाजपसह प्रदीर्घ काळ युती करून १९९५ साली महाराष्ट्राची सत्ता काबीज करणाऱ्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत १९६८ साली पहिल्याच फटक्यात धडाकेबाज यश मिळवलं. या पहिल्याच चढाईसाठी शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्ष या राष्ट्रीय पातळीवरील पक्षाबरोबर युती केली होती. प्रा. मधू दंडवते यांच्या पुढाकाराने प्रजा समाजवादी पक्षाने शिवसेनेपुढे मैत्रीचा हात पुढे केला आणि शिवसेना देईल तेवढ्याच जागा लढविण्याची अटही मान्य केली. शिवसेना आणि प्रजा समाजवादी पक्ष या युतीची पहिली जाहीर सभा झाली ती २८ जानेवारी १९६८ रोजी कामगार मैदानावर. या सभेत भाषण करताना प्रा. मधू दंडवते म्हणाले, “सध्या देशातील विविध राज्यांत प्रादेशिक भावना उफाळून आल्या असून, त्यांना समजून घेतलं पाहिजे, शिवसेना हा राष्ट्रहितावर संपूर्ण निष्ठा असलेला पक्ष आहे.”
शिवसेना-प्रसप युतीला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि एक प्रकारे काँग्रेसच्या राजवटीवरचा आपला असंतोषच वैफल्यग्रस्त मराठी युवकांनी व्यक्त केला. शिवसेनेने पदार्पणातच ४२ जागांची मुसंडी मारली ! युतीतील भागीदार प्रसपला ११ जागा मिळाल्या. राजकारणात युतीची शक्ती बाळासाहेबांनी प्रथमच वापरून ती यशस्वीही करून दाखविली !

१९७० – हिंदुत्वाचा पहिला बिगुल…! १९७० …!

१९७० सालीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खरे तर हिंदुत्वाचा बिगुल वाजवला होता. परळमध्ये सर्वप्रथम विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेने प्रिं. वामनराव महाडिक यांना रिंगणात उतरवले. त्या वेळी जनसंघ, हिंदू महासभा अशा स्वतंत्र पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. ही पहिली-वहिली विधानसभा निवडणूक शिवसेनेने जिंकली आणि बाळासाहेब म्हणाले की, “आमचा विजय हा हिंदुत्वाचा म्हणजेच पर्यायाने खऱ्या राष्ट्रीयत्वाचा विजय आहे. हिंदू असल्याची आम्हाला जराही लाज वाटत नाही.”

१९८७ – मानाचा मुकुट… ‘हिंदुहृदयसम्राट’!

शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख यांचे हिंदुत्वाशी नाते शिवसेना-भाजपा युतीमुळे जडले, असा सर्वसाधारण समज आहे, पण तो खरा नाही. १९८७ मधील विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची तुतारी फुंकून जिंकली आणि तेथून शिवसेनेचा हिंदुत्वाचा पुकारा सुरू झाला, असेही समजले जाते. म्हणजेच शिवसेना-भाजपा युतीचे धागे हिंदुत्वाच्या पटावर घट्ट होण्याआधीच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाची ध्वजा फडकावली होती. यथावकाश मग जनतेने त्यांच्या शिरी ‘हिंदुहृदयसम्राट’ हा मानाचा मुकुट चढवला !

१९८६ - घोडदौड महाराष्ट्रात !

मराठवाडा आणि शिवसेनेचा एक खास जिव्हाळ्याचा संबंध आहे. मुंबई आणि ठाणे वगळता शिवसेनेला आपल्या राज्यव्यापी अस्तित्वाची आणि भविष्यातील वाटचालीची जाणीव जर कुठल्या प्रांताने करून दिली असेल तर ती मराठवाड्याने. १९८५-८६ साली औरंगाबाद शहरात शिवसेनेची फक्त एक शाखा होती. पण मराठी अस्मितेची मशाल पेटविण्यात शिवसेना नेते यशस्वी झाली आणि मराठवाड्यातील गावागावांत अस्वस्थ असलेला बेरोजगार मराठी तरुण उत्स्फूर्तपणे शिवसेनेच्या शाखा स्थापन करू लागला. मराठवाड्यात गावागावांत भगवा फडकावला जात होता आणि ‘मातोश्री’तील हिंदुहृदयसम्राटाला हत्तीचं बळ मिळत होतं. या धडाक्याची सुरुवात शिवसेनेने बरोबर दोन वर्षे आधी म्हणजे १९८४ साली मुंबईतील राज्यव्यापी अधिवेशनात केली होती. पुढच्याच वर्षी म्हणजे १९८५ साली शिवसेनेचं राज्यव्यापी दुसरं अधिवेशन कोकणात महाडमध्ये वाजत-गाजत झालं. शिवसेनाप्रमुखांनी या अधिवेशनात दिलेला नारा होता, आता घोडदौड महाराष्ट्रात !
१९८६ साली शिवसेनेने सदस्य नोंदणीचा कार्यक्रम संपूर्ण राज्यात आयोजित केला. ‘गाव तिथे शाखा’ आणि ‘घर तिथे सैनिक’ हा शिवसेनेचा अघोषित एककलमी कार्यक्रम होता.
शिवसेनेने या काळात आयोजिलेल्या भगव्या सप्ताहानंतर राज्यात शिवसेनेच्या २० हजारांहून अधिक शाखा स्थापन झाल्या. या शाखांचाच पुढे विस्तार झाला. घराघरांत शिवसेनेचे कट्टर सैनिक निर्माण झाले !

१९९० - मराठी ‘टक्का’ वाढला....

९ ऑगस्ट १९६८ रोजी परळच्या नरे पार्कवर भारतीय कामगार सेनेच्या स्थापनेचा भगवा फडकला. सेनेने हळूहळू मुंबईच्या कामगार क्षेत्रात आपले बस्तान बसवले. ‘टी. माणेकलाल’, ‘एल अॅन्ड टी’, ‘पार्ले बॉटलिंग’ अशा कंपन्यांत भारतीय कामगार सेनेने आपली ताकद दाखवून दिली. मात्र तरीही हे वर्चस्व पुरेसे नाही तर मुंबईतील हजारो कंपन्यांत मराठी कामगारांचा टक्काही वाढला पाहिजे, असे शिवसेनाप्रमुख वारंवार बोलून दाखवत.
या पार्श्वभूमीवर मग बँक, विमा कंपन्या आणि अन्य सार्वजनिक उपक्रमांमध्ये भूमिपुत्रांचा आवाज उठविण्यासाठी स्थानीय लोकाधिकार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. हे वर्ष होतं १९७२! लगेचच रिझर्व्ह बँकेपासून भारतीय आयर्विमा महामंडळ, बँक ऑफ बरोडा आदी ठिकाणी शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समित्या स्थापन झाल्या. नोकऱ्या, बदल्या व बढत्यांमध्ये मराठी भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे का, त्यांना हेतुपुरस्सर डावलले जात आहे का, हे या समित्या डोळ्यांत तेल घालून पाहत. त्याचा अपेक्षित परिणाम झाला. सुशिक्षित मराठी भगव्या झेंड्याखाली एकवटू लागला. पुढच्या दहा वर्षांत समितीचं काम दिसू लागलं. विविध उपक्रमांत २५ टक्क्यांवर असलेला माणूस मग ८० टक्क्यांवर वाढला. स्थानीय लोकाधिकार समिती म्हणजे मराठी माणसाचा आवाज झाला. १९९० साली शिवसेनेने प्रथमच राज्यभरात आपले उमेदवार उभे केले तेव्हा मराठवाड्यापर्यंत पोहोचले ते स्थानीय लोकाधिकार समितीचेच कार्यकर्ते. प्रचार कसा करायचा याचं तंत्र या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या खेड्यापाड्यांतील शिवसैनिकांना शिकवलं.

१९९५ - शिवशाहीचा सुवर्णकाळ

१९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीची सत्ता महाराष्ट्रात आली. त्यामुळे १९९५-१९९९ हा काळ शिवशाहीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. शिवशाहीचे सरकार महाराष्ट्रात आल्याने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले. शिवसेना-भाजपा युतीला १३४ जागी विजय मिळाला. काँग्रेसला केवळ ८४ जागी यश मिळाले. काही अपक्षांच्या मदतीने मंत्रालयावर भगवा फडकणार हे स्पष्ट झाले. शिवसेना-भाजपा युतीच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक शिवसेना भवनमध्ये घेण्यात आली. या संयुक्त बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी श्री. मनोहर जोशी, तर उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे गोपीनाथ मुंडे यांचे नाव शिवसेनाप्रमुखांनी जाहीर केले. या बैठकीला भाजपाचे ज्येष्ट नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. दुसऱ्याच दिवशी १४ मार्च १९९५ रोजी शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर यांनी जोशी-मुंडे यांना अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मनोहर जोशी यांच्या रूपाने एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. याच काळात मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकला आणि शिवसेनेचे १५ खासदार लोकसभेवर निवडून आले. हे सारे आनंददायी होते.

२० एप्रिल १९९६ : ज्येष्ठ सुपुत्र बिंदुमाधव यांचे अपघाती निधन

१९९५ सालची विधानसभा शिवसेना-भाजपा युतीने जिंकली. ‘याची देही याची डोळा’ मा. शिवसेनाप्रमुखांचे शिवशाही व विधानसभेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यानंतर लगेच १९९६ ची लोकसभा निवडणूक होणार होती. शिवसेना आपल्या सर्वशक्तीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरली. मा. बाळासाहेब प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईबाहेर गेले होते. त्या दिवशी बाळासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र बिंदुमाधव यांच्यावर महासंकट कोसळले. त्यांच्या गाडीला जबरदस्त अपघात झाला. त्या अपघातात बिंदुमाधवांचं दुर्दैवी निधन झालं. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. ठाकरे कुटुंबीयांवर दु:खाची कुऱ्हाड कोसळवणारी ही परिस्थिती मोठी गंभीर होती. अत्यंत कठीण प्रसंग होता. मुंबईतील शिवसेनेच्या नेत्यांनी मनाचा दगड करून ही दु:खद वार्ता बाळासाहेबांना कळवली. माझ्या लाडक्या बिंदुमाधवचं निधन! तेही अपघाती निधन! अरेरे ! बाळासाहेब कमालीचे सुन्न झाले. प्रचार दौरा अर्ध्यावर सोडून बाळासाहेबांनी मुंबईकडे धाव घेतली. मुलाच्या निधनाची बातमी ऎकून बाळासाहेब कमालीचे कासावीस झाले होते. त्यांचा गळा दाटून आला होता. श्वासही कोंडला होता. बिंदुमाधवाचा पार्थिव देह पाहून त्यांचा बांध फुटला. दु:खाचा ओघ वाहू लागला. असह्य दु:खामुळे डोळ्यांतून अश्रूंच्या अखंड धारा वाहू लागल्या. बिंदुमाधवचा मृत्यू बाळासाहेबांच्या मनस्वी पितृहृदयाला सहन होत नव्हता. कुठल्याही क्षणी ते सर्वार्थाने कोलमडून पडतील अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.

६ सप्टेंबर १९९५ - माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचे निधन

प्रबोधनकार ठाकरे यांचा लाडकी सून, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली, शिवसेनेच्या विशाल रमाधाम वृद्धाश्रमाच्या संचालिका, शिवसैनिकांची माऊली माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचे ६ सप्टेंबर १९९५ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कर्जत येथे दुःखद निधन झाले. संवेदनशील, धीरगंभीर, स्नेहमयी, प्रकाशमयी माँसाहेबांच्या जीवनज्योतीवर क्रूर काळाने फुंकर घातली. या घटनेने हिमालयासारखे श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गदगदून आले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. बाळासाहेबांसह सारे जण हमसाहमशी रडू लागले. पुत्र बिंधुमाधवच्या निधनानंतर सहा महिन्याच्या आतच पुन्हा एकदा बाळासाहेबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

१९९७ - मुंबई महापालिका निवडणुका

राज्यातील ९ महानगरपालिका आणि सर्व जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका शिवसेना-भाजपा युती म्हणूनच लढविणार असल्याचा निर्णय शिवसेनाप्रमुख आणि प्रमोद महाजन यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला. ठाण्यात सभा घेत असताना काँग्रेसच्या ४२ पिढ्या खाली उतरल्या तरी महाराष्ट्रापासून मुंबई अलग करू देणार नाही, असे जाहीर केले. युतीच्या वचननाम्यात अनेक वचने जनतेला देण्यात आली. त्यात मुंबई स्वच्छ, सुंदर आणि सुसंस्कृत करण्याचे मुख्य अभिवचन देण्यात आले. अखेर निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि १६९ जागांपैकी शिवसेना-भाजपा युतीला १०८ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला अवघ्या ३७ जागा मिळाला. ठाणे, उल्हासनगर येथे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. परंतु शिवसेना-भाजपा इतरांपेक्षा पुढे राहिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांतही १० जिल्हा परिषदा शिवसेना-भाजपाला मिळाल्या.

२००२ मुंबई, ठाणे, नाशिकवर भगवा

२००२ मध्ये झालेल्या मुंबई, ठाणे आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीने भगवा फडकवला. मुंबई महापालिकेत शिवसेनेने ९८ तर भाजपाने ३५ जागा जिंकून पुन्हा एकदा सत्ता मिळवली. ठाण्यामध्ये शिवसेनेला ४६ आणि भाजपाला १३ जागा मिळाल्या, तर नाशिकमध्ये १०८ जागांपैकी शिवसेनेला ३७ व भाजपाला २२ जागा मिळून पूर्ण बहुमत मिळाले.

२००३ - उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख

२००३ साली शिवसेनेमध्ये प्रथमच घटनेत बदल करण्यात येऊन शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना नेते यांच्यामध्ये एक नवीन पद निर्माण करण्यात आले, ते म्हणजे कार्यकारी प्रमुख. महाबळेश्वरच्या शिबिरात शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे यांची या पदासाठी एकमताने निवड करण्यात आली. उद्धवजींच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. जयजयकार आणि टाळ्याच्या गजरात उद्धवजींच्या नावाची घोषणा करण्यात आली.

२००७ - प्रतिष्ठा पणाला… भगवा पुन्हा फडकला

२००७ ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर साऱ्या देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. कोण हरणार, कोण जिंकणार, याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये रोज चर्चा होत होती. शिवसेनेतील फुटीनंतर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला हादरा मिळेल, हा भ्रम खोटा ठरवीत मुंबईकरांनी शिवसेना-भाजपाच्या पदरात १११ जागा टाकून मुंबईवरचा भगवा कायम ठेवला. शिवसेनेला ८३ तर भाजपाला २८ जागा मिळाल्या.

२०१० - युवासेना स्थापना; आदित्य ठाकरे यांची युवासेना प्रमुखपदी निवड

२०१० साली झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर युवासेनेची स्थापना करून युवासेना प्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांची नियुक्ती केली. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेना म्हणजेच महाराष्ट्रातील तरुणांचे समर्थ व्यासपीठ अशी युवासेनेची ओळख बनली आहे. युवावर्गाचे प्रश्न, त्यांची मत-मतांतरे, त्यांच्या अडचणी आणि समस्या मांडण्याचे युवासेना हे हक्काचे व्यासपीठ ठरले आहे.

२०१२ - मुंबई महापालिकेत पुन्हा भगवा

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युतीने बाजी मारली. शिवसेनेला ७५ तर भाजपाला ३२ जागी विजय प्राप्त झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्घवजी ठाकरे यांनी या निवडणुकीत पुन्हा एकदा बाजी मारून टीकाकारांची तोंडे बंद केली. उद्धवजींना राबवलेली ‘करून दाखवले’ ही संकल्पना साऱ्यांना भावली.

२०१२ - शिवसेनाप्रमुखांचे देहावसान

१७ नोव्हेंबर, २०१२ रोजी दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांनी घड्याळाचे काटे थबकले आणि काळीज हेलावून सोडणारी एक दु:खद बातमी आली. हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या या बातमीने त्या दिवशी मुंबईत सागराच्या लाटा नि:शब्द झाल्या. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी निरव शांतता मुंबईसह महाराष्ट्रात पसरली. येत होता आवाज तो फक्त हुंदक्यांचा आणि वाहत होता पूर तो फक्त अश्रूंचा. एक सम्राट अंतर्धान पावला होता. ज्यांनी ४६ वर्षे या महाराष्ट्रात झंझावात केला. मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसांसाठी ज्यांनी वाणी, लेखणी आणि कुंचल्याने भल्याभल्यांना दरदरून घाम फोडला. मराठी माणसांच्या, हिंदूंच्या, राष्ट्रभक्त एतद्देशीय नागरिकांच्या हृदयावर अधिराज्य केले! आणि म्हणून ते होते हिंदुहृदयसम्राट!! कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शून्यातून विश्व निर्माण करणारे महामानव! एका ते:जपुंज शिवसूर्याचा अस्त झाला होता. अथांग सागराला लाजवले अशी अंत्ययात्रेला अलोट गर्दी. ‘बाळासाहेब परत या’, ‘बाळासाहेब परत या’, ‘परत या’ असा हृदयद्रावक आलाप त्यांच्या अंत्ययात्रेत होत होता, हे अभूतपूर्व आहे, यातच त्यांचे सारे मोठेपण, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व सामावलेले आहे. साहेबांवर निरतिशय प्रेम करणाऱ्या, विक्रमी गर्दीचा उच्चांक गाठणाऱ्या शोकमग्न जनतेच्या साक्षीने हा सम्राट १८ नोव्हेंबर, २०१२ रोजी अनंतात विलीन झाला.

२०१३ - उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुखपदी निवड

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ जानेवारी २०१३ रोजी शिवसेना भवनात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे उपनेते, खासदार, आमदार, पदाधिकारी असे सुमारे दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आली. या प्रसंगी ‘उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात आल्या. युवासेना ही संघटना यापुढे शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून कार्यरत राहील, भूमिपुत्रांच्या न्यायहक्कासाठी लढा यापुढेही कायम राहील, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या विचाराशी तडजोड होणार नाही, महिलांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्यात येईल, असे महत्त्वपूर्ण राजकीय ठराव या कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आले.

२०१४ - लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाने महाराष्ट्रात ४८ पैकी तब्बल ४२ जागा जिंकून विक्रम केला. या निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. शिवसेनेचे केवळ दोनच उमेदवार पराभूत झाले. तेही खूपच कमी मतांनी. अशा प्रकारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड सुरू आहे.

२०१४ - विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश

विधानसभेत एकहाती निवडणूक लढवुनही शिवसेनेने ६४ आमदार विजयी. शिवसेना सत्तेत सामील.
कृपया खालील लिंकवर क्लिक करा :