महाराष्ट्र राज्याची स्थापना
१९५० ते १९६० पर्यंतचे दशक हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्याचा काळ म्हटले जाते. मराठी भाषिक महाराष्ट्र राज्यासाठी या काळात जो लढा झाला, त्या वेळी मराठी माणसाच्या एकजुटीचे दर्शन घडले. मोर्चे, आंदोलने, निदर्शने, निषेध सभा, जाहीर सभा यांनी भरून गेलेले हे दशक ठरले. अखेरीस १ मे १९६० रोजी स्वतंत्र मराठी भाषिक ‘महाराष्ट्र’ राज्याची स्थापना झाली.
‘मार्मिक’चे प्रकाशन
‘मार्मिक’चे प्रकाशन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या इतिहासातूनच सुरू झाले. मराठी माणसाचे असे मत झाले की, लढ्याशिवाय मराठी माणसाला काही मिळत नाही. आपण संघटित झालो तरच आपले हित साधू शकतो हेही मराठी माणसाला कळून चुकले आणि नेमकी त्याच वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’ची सुरुवात केली. १३ ऑगस्ट १९६० पासून ‘मार्मिक’चे प्रकाशन सुरू झाले. ‘मार्मिक’ हे नावही प्रबोधनकार ठाकरे यांनीच दिलेले आहे.