शिवसेनेची स्थापना
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ६ वर्षांनंतर म्हणजेच १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने स्थापन झालेल्या संघटनेचे प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना असे नामकरण केले. तेजस्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा या वचनाप्रमाणे मराठी माणसासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. ३0 ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्याला तब्बल चार लाख लोक जमले होते.

शिवसेनेची राजकीय भूमिका
शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी जरी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असे शिवसेनेचे धोरण ठरले असले तरी मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६७ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान अमराठी नेते कृष्ण मेनन यांच्याविरोधात मराठी नेते स.गो. बर्वे यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. शिवसेनेच्या पाठिंब्याने स.गो. बर्वे हे विजयी झाले.

शिवसेनेचा पहिला मोर्चा
शिवसेनेची स्थापना मुळातच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी झाली होती. कृष्ण मेनन यांचा पराभव करण्यासाठी म्हणून शिवसेनेने राजकारणात अप्रत्यक्षपणे उडी घेतली तरी शिवसेना आपल्या मूळ धोरणापासून हटली नव्हती. म्हणूनच शिवसेनेने मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी पहिला मोर्चा २१ जुलै १९६७ रोजी महाराष्ट्र विधानसभेवर काढला. या विराट मोर्चाचे नेतृत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले.

ठाण्यावर भगवा फडकला
शिवसेनेचे निवडणुकीतील पहिले पाऊल ठाणे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पडले. १३ ऑगस्ट १९६७ रोजी ठाणे महानगरपालिकेची निवडणूक होती. लोकांची नागरी कामे झटपट व्हावीत म्हणून शिवसेनाप्रमुखांनी ही निवडणूक लढवण्याचे ठरवले. या निवडणुकीत ७० टक्के मतदारांनी मतदान केले. १४ ऑगस्ट रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. एकूण ४० जागांपैकी १५ अधिकृत आणि ६ पुरस्कृत असे शिवसेनेच २१ नगरसेवक निवडून आले आणि शिवसेना सत्तेवर आली.

शिवसेना आणि सीमाप्रश्न
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला होता, परंतु महाजन कमिशनने सीमा भागातील काही मराठी भाग कर्नाटकला देऊन टाकला होता. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, खानापूर हा सर्व प्रदेश सुमारे दहा लाख मराठी भाषिकांचा होता. हा प्रदेश महाराष्ट्रात यावा म्हणून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली होती. परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश येत नव्हते. अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सीमाप्रश्नासाठी शिवसेना रणकंदन करेल असे स्पष्ट शब्दात सांगितले आणि १९६७ मध्ये बेळगाव-कारवारचा प्रश्न शिवसेनेने प्रथम हातात घेतला.

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा प्रवेश
ठाणे महापालिकेवर भगवा फडकवल्यानंतर शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे आपले लक्ष वळवणे स्वाभाविकच होते. समाजकारण करण्यासाठी सुद्धा राजकारणाची गरज आहे. त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांनी ठाणे महापालिकेची निवडणूक लढवली, जिंकली आणि नंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे ते वळले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्षाबरोबर युती केली. मार्च १९६८ मध्ये झालेल्या या निवडणुकांचे निकाल घोषित झाले तेव्हा शिवसेनेच्या पारड्यात ४२ तर प्रजा समाजवादी पक्षाला ११ जागा मिळाल्या होत्या. भविष्यकाळातल्या शिवसेनेच्या राजकीय यशाचा पाया १९६८ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांमुळे घातला गेला.

भारतीय कामगार सेनेची स्थापना
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याच्या धोरणाने सुरू झालेली शिवसेना पुढे कामगार वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी या क्षेत्रातही उतरली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ९ ऑगस्ट १९६८ या क्रांती दिनी नरेपार्कवर भरलेल्या जाहीर सभेत हजारो श्रोत्यांच्या साक्षीने शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचा चक्रांकित ध्वज फडकावला. शिवसेनेची भारतीय कामगार सेना ट्रेड युनियनिझम हा आपला धर्म मानील. कामगारांच्या हिताचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करेल. युनियनचे काम फक्त कामगारांसाठी झाले पाहिजे, असे या वेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले.

सीमाप्रश्नी शिवसेनाप्रमुखांचे पंतप्रधानांना पत्र
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे सीमाप्रश्नावर १९६९ साली शिवसेनेचे तीव्र आंदोलन सुरू झाले. हे आंदोलन करण्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांनी केंद्र सरकारला हा प्रश्न सोडवण्याची संधी दिली. २० जानेवारी १९६९ रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना शिवसेनाप्रमुखांनी पत्र पाठवून २६ जानेवारी १९६९ पर्यंत प्रश्न सोडवला गेला नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा दिला. पंतप्रधानांकडून हा प्रश्न सोडवला जाण्याची शिवसेनाप्रमुखांची अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. त्यानंतर सीमाप्रश्नावर मुंबईतील आंदोलन तीव्र झाले.

रणशिंग फुंकले, यशवंतरावांना अडवले
२७ जानेवारी १९६९ रोजी केलेल्या सत्याग्रहाच्या रूपाने उभ्या महाराष्ट्राला जणू सैन्य चालले पुढे अशी हाकच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. त्याप्रमाणे सीमावासीयांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली. माहीम, शिवाजी पार्क, पोर्तुगीज चर्च, प्रभादेवी आणि वरळीच्या नाक्यांवर सत्याग्रहींच्या तुकड्या उभ्या राहिल्या. वरळीपर्यंत पाच ठिकाणी सत्याग्रहींनी ना. यशवंतराव चव्हाणांची गाडी अडवली.

उपपंतप्रधान मोरारजींना रोखले
सीमाप्रश्नाचे हे आंदोलन सुरू असतानाच फेब्रुवारी १९६९ मध्ये भारताचे उपपंतप्रधान ना. मोरारजी देसाई मुंबई येणार असल्याचे जाहीर झाले आणि शिवसेनेने त्यांची गाडी अडवून त्यांना निवेदन देण्याचे ठरवले. मोरारजी देसाई रात्रीच्या वेळी मुंबईत आले. त्यांची मोटार अफाट पोलीस बंदोबस्तात कोठेही न थांबता अक्षरशः भरधाव वेगाने माहीम येथे शांततेत निदर्शने करणाऱ्या शिवसैनिकांना उडवून, जबर जखमी करून निघून गेली. मोरारजींच्या उर्मट अरेरावी वृत्तीमुळे आणि पोलिसांच्या विश्वासघातामुळे शिवसैनिक भडकले. लालबाग, दादर येथे भीषण रणकंदन माजले.

शिवसेनाप्रमुखांना अटक
मोरारजी देसाई यांची गाडी अडवली त्याच दिवशी रात्री उशिरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह काही नेत्यांना अटक करण्यात आली. शिवसेनाप्रमुखांसह अटकेतील नेत्यांना पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पहाटे नेण्यात आले. त्यानंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात आणि नेहमीचे मार्ग टाळून या नेत्यांना पहाटेच पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. या आंदोलन प्रसंगी नेत्यांसह शेकडो शिवसैनिकांनाही पकडून वेगवेगळ्या तुरुंगांत डांबण्यात आले होते.

शिवसेनाप्रमुखांची सुटकेनंतरची सभा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेनंतर ७६ दिवसांनी त्यांची सुटका करण्यात आली. वास्तविक शिवसेनाप्रमुख राजबंदी होते, तरीही येरवड्यात त्यांना एखाद्या सामान्य कैद्याप्रमाणे वागणूक देण्यात आली. त्यामुळे बाळासाहेबांच्या सुटकेनंतर मराठी माणसाचे मन उचंबळून आले. त्यानंतर शिवसेनेची अत्यंत विराट सभा शिवतीर्थावर झाली. त्या सभेत बोलताना सर्वच वक्ते भावनाप्रधान झाले होते. शिवसेनेच्या सीमाभागाच्या या तीव्र आंदोलनामुळे सीमाप्रश्नाला फार मोठी गती मिळाली.

भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना
१० ऑगस्ट १९६९ रोजी भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते विद्यार्थी सेनेचे उद्घाटन पार पडले. या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विद्यार्थांनी राजकारणापासून दूर राहावे, असे म्हणणाऱ्यांचा खूप समाचार घेतला. विद्यार्थांनी राजकारणात फार तर प्रत्यक्ष भाग घेऊ नये, पण त्याचं निरीक्षण आणि अभ्यास जरूर केला पाहिजे. ज्यांना उद्या या राष्ट्राची धुरा सांभाळायची आहे, त्यांनी राजकारणाबद्दल अज्ञानी राहून चालणार नाही, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले.

शिवसेनाप्रमुखांवर जीवघेणे हल्ले
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर १९६९ मध्ये दोन वेळा जीवघेणे हल्ले झाले. शिवसेनाप्रमुखांच्या नागपूर येथील सभेच्या वेळी काही गुंडांच्या टोळक्याने शिवसेनाप्रमुखांवर जीवघेणा हल्ला केला. मात्र शिवसेनाप्रमुखांबरोबर असलेल्या अवघ्या तीनच शिवसैनिकांनी परिणामांची तमा न बाळगता त्या टोळक्याला खरपूस समाचार घेतला व या टोळक्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. दुसरी घटना माहीमची आहे. माहीम चर्चजवळ मुसलमानांच्या वस्तीजवळ बाळासाहेबांच्या जीवावर बेतले होते, त्या वेळी शिवसेनाप्रमुखांनी प्रसंगावधान राखून जमावावर रिव्हॉल्व्हर रोखले आणि ते तेथून सरळ पोलीस स्टेशनला गेले.

आमदार कृष्णा देसाई यांचा खून
शिवसेना प्रखर राष्ट्रवादाचा ध्वज हाती घेऊन लालबावट्याशी आपली कडवी झुंज देत होती. ५ जून १९७० रोजी एसएससीचा निकाल जाहीर होणार होता. याच दरम्यान आमदार कृष्णा देसाई यांचा मुंबईत निर्घृण खून झाला. कृष्णा देसाई हे शिवसेनेचे विरोधक होते, परंतु वैरी मात्र नव्हते. त्यामुळे व्यक्ती गेली, भांडण संपले अशी भूमिका शिवसेनेची होती. मात्र कृष्णा देसाईंच्या हत्येत सहआरोपी म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अडकविण्याचा प्रयत्न झाला. परंतु काही काळाने शिवसेनेवरील संशयाचे ढग दूर झाले.

शिवसैनिक सदाकांत ढवण यांचा खून
नायगावचे शिवसैनिक सदाकांत ढवण यांचा २६ जून १९७० रोजी दुपारी दोघा इसमांनी नेहरूनगर येथे सुऱ्याने भोसकून खून केला. ढवण यांच्या मृत्यूच्या वार्तेने सारी मुंबापुरी ढवळून निघाली. क्षणार्धात वातावरण तंग आणि तप्त झाले. दुकाने धडाधड बंद झाली. शाळा, महाविद्यालये ओस पडली. शिवसेनेच्या गोटात संतापाची आणि दुःखाची लाट उसळली. प्रक्षुब्ध शिवसैनिकांचे तांडेच्या तांडे रस्त्यावर आले. मुंबई बंदची हाक न देताही दुकाने भराभर बंद झाली.

विधानसभेत भगवा फडकला
कृष्णा देसाई हत्येनंतर रिक्त झालेल्या परळ विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून प्रिं. वामनराव महाडिक यांचे नाव जाहीर केले आणि त्यांना मते देऊन शिवरायांचा भगवा विधानसभेत फडकवा, असे आवाहन शिवसेनाप्रमुखांनी मतदारांना केले. या निवडणुकीत कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी देसाई आणि शिवसेनेचे वामनराव महाडिक यांच्यात लढत झाली. सरोजिनी देसाई यांना नऊ राजकीय पक्षांनी पाठिंबा असूनही या पोटनिवडणुकीत वामनराव महाडिक विजयी झाले.

शिवसेना चित्रपट शाखेची स्थापना
८ मार्च १९७० रोजी चित्रपट शाखेची स्थापना झाली. कलेच्या प्रांतात जातीयता आणि प्रांतीयता यायला मुळीच स्थान नाही, असे शिवसेनाप्रमुख म्हणत असत. चित्रपटगृहाची भाडेपट्टी बदलून टक्केवारीवर आधारित असावी तसेच मराठी चित्रपटांना प्राधान्य मिळावे व मराठी चित्रपट करमुक्त असावेत, अशा मागण्या शिवसेनाप्रमुखांनी केल्या.

प्रजा समाजवादी पक्षाबरोबरची युती संपली
शिवसेना आणि प्रजा समाजवादी पक्षाची १९६८ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युती झाली होती. या युतीमुळे महानगरपालिकेत शिवसेनेला ४२ आणि प्रजा समाजवादी पक्षाला ११ अशा एकूण ५३ जागा मिळाल्या. मात्र दोनच वर्षांनी म्हणजेच १९७० मध्ये ही युती संपुष्टात आली.