शिवसेनेचे पहिले महापौर डॉ. हेमचंद्र गुप्ते
शिवसेनेला मिळालेले पहिले महत्त्वाचे राजकीय पद म्हणजे मुंबईचे महापौरपद. १९७१ साली शिवसेनेने महापौरपदासाठी उमेदवार म्हणून डॉ. हेमचंद्र गुप्ते यांना उभे केले. महापौरपदाच्या निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत डॉ. हेमचंद्र गुप्ते यांना संघटना काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे डॉ. गुप्ते महापौरपदी निवडून आले. डॉ. हेमचंद्र गुप्ते महापौर झाले आणि १९७१ मध्येच डॉ. हेमचंद्र गुप्ते यांच्या महापौरपदाच्या कारकीर्दीतच ‘मुंबई महानगरपालिका सभागृहाचे कामकाज मराठीतून चालावे’ हा ठराव काही उपसूचनांसह संमत झाला. तेव्हापासून मुंबई महापालिका कामकाजाचे मराठीकरण झाले.

पुण्यामध्ये शिवसेनेचा मोर्चा
शिवसेनेने सतत मराठी माणसाच्या नोकरीचा आग्रह धरला होता. त्यासाठी मोर्चे काढणे, निदर्शने करणे हे काम सुरूच होते. पुण्यामध्ये शिवसेनेने काढलेला मोर्चा खूपच गाजला. हा मोर्चा १२ जुलै १९७१ रोजी शनिवारवाड्यापासून निघून लक्ष्मी रोड, सोन्या मारुती चौक, फडके हौद, दारूवाला पूल, स्टेशन रोड मार्गे जिल्हाधिकारी यांच्या कचेरीवर गेला. या मोर्चाचे नंतर सभेत रूपांतर झाले आणि नंतर जिल्हाधिका-यांना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने स्थानिक लोकांना ८० टक्के नोकरीत अग्रहक्क द्यावा, अशा प्रकारचा कायदा करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.

शिवजयंती सुट्टीची मागणी
शिवजयंतीची सुट्टी द्या अशी मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आग्रहाने केली. ते म्हणाले एक वेळ महाराष्ट्र दिनाची सुट्टी नाही दिली तरी चालेल, परंतु जे महाराष्ट्राचे दैवत आहे, त्याच्या जयंतीची सुट्टी सरकारने का देऊ नये? असा प्रश्न बाळासाहेबांनी एका भाषणात उपस्थित केला.

भाववाढीविरोधात आंदोलने
शिवसेनेने भाववाढीविरोधात अनेक वेळा आंदोलने केली. आठ दिवसांत हॉटेल मालकांनी खाद्यपदार्थांचे भाव उतरविले नाहीत तर त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आंदोलन शिवसेना करील असा इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका सभेत दिला.

विधानसभा निवडणुका
१९७२ चे वर्ष महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांनी गाजले. या वेळी शिवसेना प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरली होती. शिवसेना निवडणुकीसंबंधी धोरण जाहीर करणार म्हणून ९ जानेवारी १९७२ रोजी शिवाजी पार्क मराठी माणसांनी नुसता फुलला होता. शिवसैनिकांनी या निवडणुकीतही खूप मेहनत घेतली. ११ मार्च १९७२ रोजी सर्व निकाल घोषित झाले. शिवसेनेचे फक्त एकच उमेदवार निवडून आले ते म्हणजे प्रमोद नवलकर. प्रमोद नवलकरांच्या विजयाने गिरगावात उत्साहाला अपार उधाण आले.

विधान परिषदेतही शिवसेनेचा प्रवेश
मुंबई महानगरपालिकेतर्फे दोन प्रतिनिधी विधान परिषदेवर पाठवायचे होते. त्यापैकी एक प्रतिनिधी सत्तारुढ पक्षाचा आणि एक विरोधी पक्षाचा जाणार होता. यासाठी चार अर्ज आले होते. मुंबई महानगरपालिकेचे १७८ नगरसेवक होते. त्यापैकी ११५ नगरसेवकांनी मतदान केले. या निवडणुकीत शिवसेनेचे मनोहर जोशी निवडून आले. जोशी हे विधान परिषदेवर जाणारे पहिले शिवसेना आमदार ठरले.

एअर इंडियावर शिवसेनेचा मोर्चा
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला आणि म्हणूनच नोकर भरतीच्या वेळी जेथे जेथे मराठी माणसावर अन्याय होत असे, त्या त्या वेळी शिवसेना त्या अन्यायाचा प्रतिकार करीत असे. एअर इंडियासारख्या मोठ्या कंपन्या नेहमीच बिगर मराठी लोकांची भरती करीत असत. म्हणूनच एअर इंडियाच्या निषेधार्थ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी एअर इंडियाचे चीफ पर्सोनेल मॅनेजर एस.के. नंदा यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. ‘मराठी माणसांना प्राधान्य द्या’, ‘महाराष्ट्रद्वेष्ट्या नंदा, बंद कर तुझा धंदा’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

वंदे मातरमचा विषय गाजला
१९७३ च्या सुरुवातीलाच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली. त्याच काळात वंदे मातरमचा विषय गाजला आणि पुन्हा एकदा शिवसेनेला ४० जागा मिळाल्या. १९७३ च्या जानेवारी महिन्यात महापालिका आयुक्तांनी एक परिपत्रक काढून महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये वंदे मातरम हे गीत म्हटले जाईल असे जाहीर केले. त्यावर काही मुस्लिम नगरसेवकांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी केली की, वंदे मातरम हे गीत उर्दू शाळांतून म्हणण्याची सक्ती केली जाऊ नये. त्यांच्या मागणीनुसार आयुक्तांनी या गीताबाबत उर्दू शाळांना सूट दिली. या प्रकरणी महानगरपालिकेत चिंता व्यक्त करणारी सभा तहकुबी मांडण्यात आली आणि सभा एकमताने तहकूब झाली.

सुधीर जोशी सर्वात तरुण महापौर
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वात तरुण उमेदवार सुधीर जोशी महापौर म्हणून निवडून आले. विशेष म्हणजे महापौरपदासाठी निवडणूक १९३३ मध्ये सुरू झाली व तेव्हापासून या पदावर आरुढ होणारे सुधीर जोशी हे सर्वात तरुण महापौर ठरले. ते त्या वेळी ३२ वर्षांचे होते. सुधीर जोशी यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर महापालिकेत प्रचंड जयजयकार झाला. मुंबई महापालिका जिंकल्याबद्दल शिवसेनेची ऐतिहासिक विराट सभा शिवतीर्थावर झाली.

प्रबोधनकार ठाकरे यांचे देहावसान
संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार, बंडखोर समाजसुधारक, झुंजार पत्रकार, प्रभावी वक्ते आणि नाटककार, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे २० नोव्हेंबर १९७३ रोजी कलानगर येथील मातोश्री बंगल्यामध्ये दुःखद निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. वार्धक्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. दुसऱ्या दिवशी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मातोश्री बंगल्यावरून त्यांची अंत्ययात्रा निघाली आणि तीन तासांनंतर दादरच्या स्मशानभूमीत पोहोचली. जनता जनार्दना, ही सेवा तुझ्या दरबारी रुजू होवो, हे त्यांच्या वाढदिवशीचे उद्गार एका कापडी फलकावर त्यांच्या चित्रासह रेखाटले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. एक समर्पित जीवन समाप्त झाले.

महागाईविरोधात आंदोलन
शिवसेनेचा जन्म समाजकारणातून झाला. म्हणून ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात अन्याय झाला, अत्याचार झाला, अतिरेक झाला, त्या वेळी शिवसेना त्याविरुद्ध उभी राहिली. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच सतत महागाई वाढत आहे. परंतु महागाई आकाशाला भिडली. या महागाईविरुद्ध शिवसेनेने ठिकठिकाणी आंदोलन केले आणि सर्वसामान्यांना दिलासा दिला. तसेच शिवसेनेने स्वस्त धान्य आणि भाजी विक्री मोहीमही राबवली. शिवसेनेने चालवलेल्या भाववाढविरोधी मोहिमेस यश आले आणि दोन दिवसांत मुंबई शहरातील अनेक वस्तूंचे भाव उतरले. शिवसेनेने सर्व प्रकारच्या भाववाढीविरुद्ध, काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध, भ्रष्टाचार करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध सतत आंदोलने केली.

सीमा प्रश्नावर ‘मुंबई बंद’
लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर संयुक्त आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना नेहमीच सीमा प्रश्न हातात घेऊन लढत होती. सीमा भाग महाराष्ट्रात येण्यासाठी, सरकारचे डोळे उघडावेत म्हणून १८ डिसेंबर १९७३ रोजी ‘मुंबई बंद’ करण्यात आली. बेळगावात व कर्नाटकात मराठी भाषिकांवर सतत भयानक अत्याचार होत असताना, महाराष्ट्र शासनाचा लवचिकपणा पाहता आणि केंद्राच्या कुंभकर्णी झोपाळूपणाला गदगदून जागे करण्यासाठी ऐतिहासिक मुंबई बंद करून शिवसेनेने मराठी जनतेच्या भावना किती तीव्र आहेत, याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ
१९७४ सालची सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची स्थापना. या महासंघाने अत्यंत पद्धतशीरपणे, मेहनतपूर्वक शिवसेनेचे मूळ ध्येय पुढे नेण्याचे काम केले. सरकारी वा खाजगी आस्थापनांमधून सर्वत्र मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठी लोकांना नोकऱ्या मिळवण्याच्या कामाला महासंघाने चौकट मिळवून दिली. विविध आस्थापनांमधून स्थानीय लोकाधिकार समितीचे कामकाज सुरू झाले होते. स्थानीय लोकाधिकार महासंघाची स्थापना झाली आणि मुंबईतल्या सुशिक्षित तरुणांमध्ये उत्साहाचे वारे पसरले.

दुकानांवर नामफलक मराठी हवेतच
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील प्रत्येक दुकानावर मराठी पाट्या असल्याच पाहिजेत, दुकानदारांनी आपल्या पाट्या मराठी भाषेत लिहाव्यात अन्यथा डांबर फासले जाईल, असा इशारा दिला. त्यानंतर काही भागात शिवसैनिकांनी या विषयावर मिरवणुका व मोर्चे काढले. बऱ्याच दुकानदारांनी पाट्या बदलल्या. सर्वसाधारणपणे दुकानदारांचे सहकार्य मिळाले. व्यापाऱ्यांच्या विनंतीवरून मराठी पाट्या लावण्याबाबत १५ ऑगस्टची दिलेली मुदत वाढविण्यात आली.

सतीश प्रधान ठाण्याचे नगराध्यक्ष
ठाण्याच्या नगराध्यक्षपदाची निवड प्रथमच सामान्य मतदारांमधून व्हावयाची होती. शिवसेनेने पद्धतशीर आणि धूमधडाक्याने प्रचार केला. त्याचा परिणाम मतदानाच्या दिवशी दिसून आला. मतमोजणी केंद्रावर हजारोंच्या संख्येने आलेले शिवसैनिक थंडीची पर्वा न करता शिवसेनेचा जयजयकार करीत होते. थोड्याच वेळात शिवसेनेवर होणारा मतवर्षाव दिसू लागला आणि शिवसेना व्यतिरिक्त अन्य उमेदवारांनी मतमोजणी केंद्रातून आपला गाशा गुंडाळला. शिवसेनेचे उमेदवार ठाणे जिल्हाप्रमुख सतीश प्रधान हे प्रथमपासूनच आघाडीवर होते. दुपारी मतमोजणी संपली तेव्हा सतीश प्रधान हे आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत दणदणीत मताधिक्क्याने विजयी झाले आणि ठाणे महापालिकेवर भगवा फडकला.

शिवसेनेचा आणीबाणीला पाठिंबा
दि. २६ जून १९७५ रोजी साऱ्या भारतात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याची राष्ट्रपतींनी घोषणा केली. अंतर्गत गडबडीमुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचे सांगून त्यांनी आणीबाणी जाहीर केली. त्यानंतर अनेक नेत्यांची धरपकड करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र आणीबाणीला पाठिंबा दिला. यासंदर्भात बाळासाहेबांनी ‘मार्मिक’मध्ये, ‘आणीबाणीत राष्ट्राभिमानी उभे करा, मेंढरे नकोत!’ आणि ‘शिस्तपर्व सुरू झाले’ असे दोन अग्रलेख लिहिले.

मनोहर जोशींची महापौरपदी निवड
१९७६ हे आणीबाणीचे वर्ष. आणीबाणीमुळे विरोधी पक्षांचे नऊ नगरसेवक स्थानबद्ध झाले होते आणि त्यामुळे आघाडीचे बळ ६३ नगरसेवकांचे राहिले होते. याउलट काँग्रेस ५२, मुस्लीम लीग १० आणि उजवा कम्युनिस्ट ३ शिवाय एक अपक्ष यामुळे काँग्रेसची मते ६६ अशी होती. काँग्रेसतर्फे उमेदवार होते बाबुराव शेट्ये तर शिवसेनेचे उमेदवार मनोहर जोशी होते. जोशी यांचा पराभव उघड दिसत होता. काँग्रेसचे बाबुराव शेट्ये यांनी विजयाची जोरदार तयारी केली होती. ५ एप्रिल १९७६ रोजी अचानक विजयाचे पारडे फिरले. विरोधी गटाचे उमेदवार मनोहर जोशी विजयी झाले. जोशी यांना ६५ तर पराभूत उमेदवार बाबुराव शेट्ये यांना ६३ मते मिळाली. तीन मते बाद ठरली. काँग्रेस पक्षाची सहा मते फुटली होती. काँग्रेसला हा मोठा धक्का होता.

शिवसेनेची पक्ष घटना
शिवसेनेच्या संदर्भातील या काळातील महत्त्वाची घटना म्हणजे शिवसेनेची पक्ष घटना प्रथमच तयार करण्यात आली. या घटनेत संघटनेचे सर्वोच्च नेतृत्व शिवसेनाप्रमुख यांच्याकडे राहील, असे जाहीर करण्यात आले. १३ सभासदांची कार्यकारिणी समिती ठरविण्यात आली. राष्ट्रीय विचार व संस्कार असणारे शिस्तबद्ध तरुण घडविणे व सत्तेच्या आणि चळवळीच्या राजकारणापेक्षा सामाजिक कार्याची व जनसेवेची आवड जनतेत निर्माण करणे हे धोरण जाहीर करण्यात आले.

शिवसेना भवनाचे उद्घाटन
११ जून १९७७ रोजी मुंबईच्या दादर भागात मध्यवर्ती ठिकाणी समारंभपूर्वक शिवसेना भवनाचे उद्घाटन झाले. शिवाजी पार्कवरील ही इमारत फुगे व सेना ध्वज यांनी सुशोभित करण्यात आली होती. समारंभासाठी निरनिराळ्या ठिकाणचे सैनिक मिरवणुकीने आले होते. सेना भवनात या सगळ्यांना जागा मिळू न शकल्यामुळे बऱ्याच सैनिकांनी रस्त्यावर ठाण मांडले. या प्रसंगी उद्घाटनाचे भाषण करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले, ‘शिवसेना भवन ही शिवसैनिकांची हक्काची वास्तू आहे. तिचे आम्ही केवळ राखणदार आहोत. या वास्तूचं पावित्र्य प्रत्येकाने राखलं पाहिजे. हे भवन महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलायला लावीलच, पण त्याचबरोबर हे एक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र बनलं पाहिजे, असा माझा आग्रह आहे.’

बाळासाहेब ठाकरे-करुणानिधी यांची भेट
१६ मे १९७८ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि द्रमुकचे नेते करुणानिधी यांची हॉटेल ऑबेरायमध्ये अर्धा तास ऐतिहासिक भेट झाली. या भेटीबाबत बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, आम्ही सर्व विषयांवर चर्चा केली. राज्याच्या स्वायत्ततेबाबत त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रत पाठवून देण्याची विनंतीही त्यांना केली. शिवसेनाप्रमुख आणि करुणानिधी यांच्या या भेटीबाबत नंतर बराच काळ वृत्तपत्रांतून गाजत राहिली.

शिवसेना-मुस्लिम लीग युती
शिवसेना आणि मुस्लिम लीग कधी एका व्यासपीठावर येतील, असे चुकूनही वाटले नव्हते. शिवसेना आणि मुस्लिम लीग यांची मैत्री कशी होणार? असेच सर्वांना वाटत असे. परंतु मार्च महिन्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम लीगचे नेते बनातवाला यांची जाहीर सभा दक्षिण मुंबईत मस्तान तलाव येथे झाली. मुस्लिम बांधवांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहन केले की, ‘तुम्ही जय महाराष्ट्र बोला, तुम्हाला सर्व मिळेल.’ हा एक चमत्कारच होता. साऱ्या मुंबईत या विषयाची चर्चा सुरू होती. मात्र ही युती पुढे काही टिकली नाही.

शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द
शिवसेनेच्या स्थापनेपासून म्हणजेच १९६६ पासून दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा भव्य मेळावा होत असे. या मेळाव्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्य मार्गदर्शन होत असे. इतर नेत्यांची सुद्धा भाषणे होत असत. परंतु बाळासाहेब ठाकरे आजारी पडल्यामुळे ११७९ साली प्रथमच दसऱ्याचा मेळावा रद्द करण्यात आला. बाळासाहेबांची प्रकृती खूपच बिघडली होती.

शिवसेनेचे मराठी माणसांच्या नोकऱ्यांसाठी मोर्चे
महाराष्ट्रात ८० टक्के नोकऱ्या मराठी माणसांना मिळाल्या पाहिजेत, म्हणून शिवसेना आग्रही होती. याच मागणीसाठी शिवसेनाप्रमुखांनी डॉक लेबर बोर्डावर मोर्चा नेला. मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोकांचीच गोदीमध्ये भरती केली जात आहे. साधा गोदी कामगार म्हणूनही मराठी माणसांना घेतले जात नाही, याच्या निशेधार्थ शिवसेनेचा प्रचंड मोर्चा डॉक लेबर बोर्डाच्या कचेरीवर नेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनाप्रमुखांनी केले होते.