गिरणी कामगारांचा संप
मुंबई शहरातील गिरणी कामगारांचा संप ही या वर्षीची महत्त्वाची घटना. डॉ. दत्ता सामंत यांनी हा संप सुरू केला. मुंबईतील सर्व गिरणी कामगारांनी त्यांना पाठिंबा दिला. काही काळ काही गिरणी कामगार शिवसेनेबरोबर होते. पण नंतर ते डॉ. सामंत यांच्याकडे गेले. या संपामुळे गिरणी कामगार देशोधडीला लागले. गिरण्या बंद पडू लागल्या आणि हजारो कामगार मुंबई सोडून गेले. हा संप अनेक वर्षे चालला. हा संप मागे घेण्यात आलेला नसून अद्यापही सुरूच असल्याचे बोलले जाते.

पोलीस खात्यात असंतोषाचा उद्रेक
ऑक्टोबर १९८१ मध्ये पोलीस खात्यात असंतोषाचा उद्रेक झाला. पोलिसांच्या मागण्यांबद्दल मुख्यमंत्री अंतुले यांनी त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष एस.बी. मोहिते आणि अन्य दहा प्रतिनिधींशी ताबडतोब चर्चा केली. पोलिसांच्या चारही मागण्या ताबडतोब मान्य करण्यात आल्यामुळे त्यांचे आंदोलन थांबले. परंतु पोलिसांच्या आंदोलनात काय होऊ शकते, याची झलक सरकारला दिसून आली. मागण्या मान्य केल्याबद्दल नायगाव येथे अभूतपूर्व विजय महोत्सव साजरा करण्यात आला.

अंतुले-प्रतिभा प्रतिष्ठान-सिमेंट गैरव्यवहार
तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अ. र. अंतुले यांनी महाराष्ट्रात सिमेंटच्या वितरणात फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. प्रतिभा प्रतिष्ठान आणि सिमेंट व्यवहार यात झालेला भ्रष्टाचार पुढे अनेक वर्षे गाजत राहिला. याच कारणामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदही सोडावे लागले. कोर्टाच्या माध्यमातून ते बऱ्याच वर्षांनंतर निर्दोष सुटले, परंतु तरीही जनमानसात त्यांच्यावर डाग राहिलाच. बॅ. अ.र. अंतुले यांच्या राजीनाम्यानंतर बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

ठाकरे, पवार, फर्नांडिस एकत्र
महराष्ट्रात इंदिरा काँग्रेस फार जोरात होती. तिला सत्तेवरून दूर करणे कठीण होते. या पाश्वर्भूमीवर १९८२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस (स)चे नेते शरद पवार आणि लोकदल (क)चे जॉर्ज फर्नांडिस या त्रिमूर्ती नेतृत्वाची दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवाजी पार्कला प्रचंड सभा झाली. त्यानंतर गिरणी कामगारांचा संप मिटवण्यासाठी ठाकरे, पवार आणि जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली गिरणी मालक संघाच्या कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. गिरणी मालकांबरोबर चर्चाही केली, मात्र दुर्दैवाने गिरणी कामगारांचा प्रश्न सुटला नाही.

पोलिसांचे बंड
मुंबईतील पोलिसांचे बंड ही मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाची ठळक घटना. १८ ऑगस्ट १९८२ रोजी पोलिसांच्या बंडाची ठिणगी पडली. पोलिसांचे हे बंड मोडून काढण्यासाठी मुंबईत संचारबंदी जारी करण्यात आली. पोलिसांची ही बेबंदशाही असल्यामुळे कोणीही त्यांचे समर्थन केले नाही. मात्र पोलिसांच्या बंडामुळे सारा देश चिंताक्रांत झाला. पोलिसांनी बंड केल्यास काय घडू शकते याची जाणीव सर्वांना झाली.
शिवसेनेचा इंदिरा काँग्रेसला रामराम
९ सप्टेंबर १९८२ रोजी शिवसेनेने काँग्रेसची मैत्री साफ तोडून टाकली. शिवसेनेवर प्रेम करणारे असंख्य चाहते या निर्णयामुळे खूश झाले. गिरणी कामगारांचा संप मिटवला नाही तर काँग्रेसबरोबरची आमची मैत्री राहणार नाही, असा इशारा शिवसेनाप्रमुखांनी दिला होता. इंदिरा काँग्रेसबद्दलची नाराजी ‘मार्मिक’मधून व्यक्त करण्यात आली.

पूरग्रस्तांना शिवसेनेची मदत
कोयना भूकंपाची आठवण करून देणारी नैसर्गिक आपत्ती २७ ते २९ जून १९८३ च्या दरम्यान कोकणावर आली. सारे कोकण जलमय झाले. शासन यंत्रणा ठप्प झाली. कोकणचा मुंबईशी असलेला संपर्क तुटला. अशा वेळी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शिवसेनेने धाव घेतली. शिवसेनेचे नेते, आमदार मदत घेऊन कोकणात गेले. कोकणवासीयांचा आधार म्हणजे शिवसेना हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

शिवसेनेचे पहिले अधिवेशन
१९६६ साली स्थापना झालेल्या शिवसेनेचे पहिले अधिवेशन १८ वर्षांनंतर म्हणजेच २२ व २३ जानेवारी १९८४ साली मुंबईत स्वा. सावरकर सभागृहात घेण्यात आले. या अधिवेशनाला महाराष्ट्राच्या विविध भागांतून सुमारे ५००० प्रतिनिधी उपस्थित होते. सीमाभागातील निमंत्रितांनाही आमंत्रित करण्यात आले होते. शिवसेनेचे हे अधिवेशन म्हणजे इतर पक्षांप्रमाणे अंतर्गत लाथाळ्या आणि बेशिस्तीचे प्रदर्शन न ठरता महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांच्या मनात शिवसेनेचे हे पहिले अधिवेशन खूप काळपर्यंत स्मरणात राहणारे ठरले.

महाराष्ट्रात जातीय दंगली
मे १९८४ मध्ये महाराष्ट्रात भिवंडी, ठाणे, कल्याण, मुंबई या ठिकाणी जातीय दंगली भडकल्या. या दंगलींचे तात्कालिक कारण म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महम्मद पैगंबरांचा अपमान केला असा मुस्लिम समाजाचा गैरसमज. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी एक जाहीर निवेदन काढून आपण पैगंबरांचा अपमान केला नसल्याचे सांगितले. आपले भाषण संदर्भ सोडून छापल्याबद्दल त्यांनी उर्दू वृत्तपत्रांचा निषेध केला.

शिवसेनेचे दुसरे अधिवेशन
‘मुंबई जिंकली आता घोडदौड महाराष्ट्रात’ अशी घोषणा देत शिवसेनेचे दुसरे महाराष्ट्रव्यापी अधिवेशन २ व ३ नोव्हेंबर १९८५ रोजी किल्ले रायगड आणि महाड या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनासाठी हजारो शिवसैनिक २१९१ फूट उंचीचा रायगड चढून गेले हे वैशिष्ट्य. शिवसेनाप्रमुखांचे खुल्या अधिवेशनातील भाषण ही महाडकरांना एक पर्वणीच होती. माणसांनी मंडप फुलला होता. शिवसेनेच्या महाडच्या अधिवेशनापासून खरोखरच शिवसेना मुंबईबाहेर पडली आणि महाराष्ट्रात पसरायला सुरुवात झाली.

मुंबई महापालिकेवर भगवा
१९८५ साली झालेली मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेनेने स्वतंत्रपणे लढण्याचे ठरवले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कुर्ल्याच्या नेहरूनगर येथील सभेत प्रचाराचा नारळ फोडताना स्पष्टपणे इशारा दिला की, ही मुंबई मराठी माणसाची असून या मुंबईला हात लावून बघा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे कारस्थान करणाऱ्यांना शिवसेना रस्त्यात आडवे करील. त्यानंतर मराठी माणूस शिवसेनेच्या झेंड्याखाली एकवटला आणि महापालिका निवडणुकीत शिवसेनेला ७४ जागी विजय मिळाला. १९८५ मध्ये शिवसेनेला मिळालेले हे बहुमत म्हणजे पुढील यशाची नांदीच होती.

हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू
१९८६ मध्ये स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वार्षिक शिबिरापुढे बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केले की, मराठी माणसाला नोकऱ्यांत प्राधान्य देण्यापुरती चळवळ आता मर्यादित राहणार नाही. सत्ता काबीज करूनच भ्रष्ट प्रवृत्तींच्या तावडीतून मराठी माणसाची मुक्तता करण्याचे उद्दिष्ट ठेवीत आहे. महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्याच्या शिवसेनाप्रमुखांच्या घोषणेमुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य पसरले. तसेच मराठीच्या प्रश्नाबरोबरच शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा प्रश्नही हाती घेतला. हिंदू म्हणून जगा, अन्यथा न्याय मिळणार नाही. हिंदूंच्या रक्षणासाठी जे जे करायचे ते आम्ही करू, असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले.

‘भारत बंद’ला शिवसेनेचा पाठिंबा
२६ फेब्रुवारी १९८६ रोजी महागाईच्या प्रश्नावर ‘भारत बंद’ पुकारण्यात आला. शिवसेनेसहीत सर्व राजकीय पक्ष एकत्र झाले. जीवनावश्यक वस्तूंच्या जबरी भाववाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी केलेल्या ‘भारत बंद’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोठेही अनुचित प्रकार न होता बंद शांततेत पार पडला.

हिंदुत्वाची पहिली निवडणूक
१९८७ मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. हिंदुत्वावर झालेली ही पहिली पोटनिवडणूक. या निवडणुकीत शिवसेनेतर्फे रमेश प्रभू, भाजपातर्फे अरुण साठे, काँग्रेसतर्फे प्रभाकर कुंटे आणि जनता पक्षातर्फे प्राणलाल व्होरा असे चार उमेदवार तगडे होते. सर्व उमेदवारांनी पदयात्रांवर भर दिला. शिवसेनाप्रमुखांच्या निवडणूक प्रचाराच्या सभा सुरू झाल्या. त्यांनी उघड उघड हिंदुत्वाचा विषय सभांमधून मांडला. १४ डिसेंबर १९८७ रोजी पार्ले पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत रमेश प्रभू ११ हजार मतांनी विजयी झाले. या विजयानंतर शिवसेनाप्रमुख उद्गारले, ‘आता राज्य आमचे!’

शिवसेना महिला आघाडी
१९८८ साली शिवसेनेच्या छत्रछायेखाली महिला आघाडी या आणखी एका अंगीकृत संघटनेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील एक प्रभावी संघटना म्हणून ही संघटना महिलांचे आशास्थान बनली. महाराष्ट्रातील विविध भागांत महिला आघाडीच्या शाखा स्थापन झाल्या. अन्याय झालेल्या स्त्रियांना न्याय मिळवून देण्याचे काम महिला आघाडीने जसे हाती घेतले तसेच स्त्रियांच्या कलागुणांना उत्तेजन देणे, कायदेशीर सल्ला देणे, नोकरी-रोजगार मिळवण्यासाठी सहकार्य करणे अशी अनेक विधायक कामे महिला आघाडीने पार पाडली.

शिवसेनेचे महाराष्ट्रव्यापी तिसरे अधिवेशन
३० आणि ३१ डिसेंबर १९८८ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.पी. महाविद्यालय पुणे येथे शिवसेनेचे तिसरे महाराष्ट्रव्यापी अधिवेशन झाले. हिंदुत्वाची बुलंद गरज, शिवसेना शिवसेना या घोषणेने सारे पुणे शहर दुमदुमून गेले होते. या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनाप्रमुखांनी जाहीर केले की, काँग्रेसला ४२ वर्षांत जे जमले नाही ते अन्न, वस्त्र, निवारा आणि पिण्याचे पाणी हे प्रश्न अग्रहक्काने सोडवले जातील. शिवसेनेचे पुणे अधिवेशन तसेच त्याआधीच्या दोन्ही अधिवेशनांचा संघटनावाढीसाठी पुरेपूर उपयोग झाला.

दै. ‘सामना’ची सुरुवात
२३ जानेवारी १९८९ रोजी मध्यरात्री शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सुरू झाले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, मोठ्या थाटामाटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले. ‘सामना’चा पहिला अग्रलेख होता ‘या असे सामन्याला’. या अग्रलेखात सामना सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. सामनाच्या प्रकाशन प्रसंगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले, हिंदुत्वाचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी आणि दररोज होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ‘सामना’ हे नवे शस्त्र असेल आणि उद्या पाळी आली तर आम्हाला खऱ्या शस्त्रालाही हात घालावा लागेल.

ठाण्यात शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचे राजीनामे
ठाणे शहरात महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रकाश परांजपे हे केवळ एका मताने पराभूत झाले. निवडणुकीत शिवसेनेला घरभेदीपणा नडला. पक्षात फूट पडल्याने सर्वांनाच राजीनामे द्यावे लागले. पक्षाच्या या निर्णयाचे कौतुक केवळ ठाण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात झाले. संघटनेत शिस्त आणण्याच्या दृष्टीने हा चांगला पायंडा असल्याचे वृत्तपत्रांनी म्हटले.

विलेपार्ले पोटनिवडणूक खटला
डॉ. रमेश प्रभू यांच्या निवडणुकीविरुद्ध कोर्टात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल ७ एप्रिल १९८९ रोजी लागला. न्या. भरुचा यांनी आ. डॉ. रमेश प्रभू यांची निवड रद्द केली. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही दोषी ठरवले. डॉ. प्रभू यांनी धर्माच्या नावावर मते मागून निवडणुकीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याचे कोर्टाने सांगितले. बाळासाहेब ठाकरे आणि डॉ. रमेश प्रभू या दोघांनाही निवडणुकीसाठी सहा वर्षे अपात्र ठरवावे, अशी त्यांनी राष्ट्रपतींना शिफारस केली. या निर्णयाविरुद्ध आव्हान देणारी याचिका शिवसेनाप्रमुख आणि डॉ. रमेश प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आणि सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.

विधानसभेत दणक्यात प्रवेश
१९९० मध्ये शिवसेनेचा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर झंझावाती प्रचार केला. निवडणूक प्रचारासाठी उद्धवजी ठाकरे यांनीही अपार मेहनत घेतली. ‘आव्हान’ आणि ‘आवाहन’ अशी एक चित्रफीत बनवून, ‘व्हिडिओरथ’ वापरून शिवसेनेने गावोगावी प्रचाराची रणधुमाळी पोहोचवली. शिवसेना-भाजपा युती महाराष्ट्र जिंकणार असे वाटत होते, परंतु प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा काँग्रेस काठावर पास झाली होती. शिवसेनेचे विधानसभेत ५२ तर भाजपाचे ४१ आमदार निवडून आले. एका अर्थी शिवसेनेचे विधानसभेत लक्षवेधी प्रवेश झाला आणि शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद लाभले.

रमाधाम वृद्धाश्रमाची स्थापना
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सौ. मीनाताई ठाकरे या दोघांनी अनाथ वृद्धांची सोय व्हावी म्हणून रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे १९९० साली वृद्धाश्रम बांधला. जवळपास ३-४ वर्षांच्या श्रमाने आणि सगळ्यांच्या हातभाराने रमाधाम आणि महिलाश्रमाने आकार घेतला. आता ते एक निसर्गरम्य ठिकाण होऊन बसले आहे. हे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सौ. मीनाताई ठाकरे या दोघांनी जणू ध्यासच घेतला होता.