शिवसेनेचा रौप्य महोत्सव
१९९१ हे शिवसेनेचे रौप्य महोत्सवी वर्ष. शिवसेना स्थापन होऊन २५ वर्षे झाल्याने शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. रौप्य महोत्सव जोरात साजरा करावा, असे ठरविण्यात आले. रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात रक्तदान मोहीम घेण्याचे शिवसेनेने ठरवले. अभूतपूर्व अशा रौप्य महोत्सवी सोहळ्यात बोलताना शिवसेनाप्रमुखांनी, शिवसेनेत आमूलाग्र बदल करण्याची घोषणा केली. संघटनेत शिरणाऱ्या अनिष्ट प्रवृत्ती आम्ही दूर करू. कोणत्याही प्रकारची गटबाजी शिवसेनेत होऊ देणार नाही, असे ठणकावून सांगितले.

शिवसेनाप्रमुखांची न्यायसंस्थेवर टीका
आमदार सुभाष देसाई, मधुकर सरपोतदार, वामनराव महाडिक, सूर्यकांत महाडिक, चंद्रकांत पडवळ, चंद्रकांता गोयल, डॉ. डी.आर. देशमुख, राज पुरोहित या शिवसेना-भाजपा युतीच्या आमदारांनी ज्वलंत हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक लढविली अशा आशयाच्या याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. यापैकी काहींची निवड न्या. सुरेश होस्बेट यांनी रद्द ठरविली. न्या. सुरेश होस्बेट यांनी वामनराव महाडिक यांच्या निवडणूक खटल्यावर निर्णय देताना बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ताशेरे मारले. यानंतर ८ ऑगस्ट १९९१ च्या सामनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी न्यायसंस्थेवर जोरदार टीका केली आणि न्यायसंस्थेलाच काही प्रश्न विचारले. त्यामुळे खळबळ माजली.

भारत-पाक क्रिकेट सामन्यास विरोध – शिवसेनेचा विजय
२८ ऑक्टोबर १९९१ रोजी भारत-पाक सामना मुंबईत घेण्याचे ठरविण्यात आले आणि शिवसेनेने या सामन्यास विरोध करण्याचे जाहीर केले. २८ एप्रिललाच ‘मुंबई बंद’ करण्याचा इशारा देण्यात आला. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानविरुद्ध रणशिंग फुंकले. वानखेडे स्टेडियमवर हिंदुस्थान-पाकिस्तान सामना आयोजित केलाच, तर तो उधळून लावूच, पण स्टेडियमही पेटवून भस्मसात करू, अशी घोषणा बाळासाहेबांनी केली. त्यानंतर १५-२० शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियममध्ये घुसून खेळपट्टीवर कुदळी चालवल्या आणि तेल ओतले. शेवटी पाकिस्तानने भारताचा दौराच रद्द केला.

बाबरी मशीद उद्ध्वस्त – शिवसेनाप्रमुखांचे निर्भीड उत्तर
१९९२ साली बाबरी मशीद पाडण्यात आली. या घटनेने सारा देश हादरून गेला आणि देशाच्या अनेक भागांत हिंदू-मुस्लिम दंगली उसळल्या. या वेळी भाजपाचे एक नेते म्हणाले की, शिवसैनिकांनी बाबरी मशीद तोडली. त्यावर ताड्कन उत्तर देताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, ‘जर शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली असेल तर अशा शिवसैनिकांचा मला अभिमान वाटतो. ’ बाळासाहेबांच्या या निर्भीड उत्तराने शिवसेना देशव्यापी ठरली आणि बाळासाहेब ठाकरे हे हिंदूंचे एकमेव नेते म्हणून देशात अग्रेसर राहिले.

महागाई-दुष्काळ, सरकारविरुद्ध शिवसेनेचा ‘महाराष्ट्र बंद’
राज्य सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे दिवसेंदिवस महागाई शिगेला पोहोचली. अपुऱ्या व अनियमित धान्य पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाल्यामुळे शिवसेनेने ८ मे १९९२ रोजी महागाईविरोधात आंदोलन पुकारले. जनतेने या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्यातील भीषण दुष्काळ व तीव्र पाणीटंचाई यासंदर्भात राज्य सरकार कोणतीही उपाययोजना करू शकले नाही, म्हणून सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी पुकारलेला महाराष्ट्र बंद १०० टक्के यशस्वी झाला.

मुंबईतील दंगल व शिवसेनेवर बंदीची मागणी
मुंबईमध्ये १९९३ साली हिंदू-मुस्लिमांमध्ये भीषण दंगल उसळली. माहीम येथे रात्री ११ च्या सुमारास काही दंगलखोरांना गोळीबार केला तर भेंडीबाजारामध्ये भोसकाभोसकीत २५ जण जखमी झाले. मग ही दंगल मुंबईभर पसरू लागली. या दंगलीत १६ पोलीसही जखमी झाले. हा सर्व उद्रेक बाबरी मशिदीच्या मासिक श्राद्धदिनी सुरू झाला. दंगलीच्या काळात तीन दिवसांत मृतांची संख्या ५६ झाली. दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुखांनी आपला वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द केला. याच दरम्यान शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली. त्या वेळी शिवसेनाप्रमुखांनी प्रतिक्रिया दिली की, हाती शस्त्र घेतलेल्या काश्मीर, पंजाबमधील देशद्रोही पाक अतिरेक्यांचा आधी बंदोबस्त करा आणि मगच शिवसेनेवर बंदी घाला.

भीषण बॉम्बस्फोट
दि. १२ मार्च १९९३ हा देशातील काळा दिवस. या दिवशी जनसामान्यांच्या आयुष्याच्या चिंधड्या उडाल्या. अवघ्या तीन तासांत मुंबईत १३ ठिकाणी महासंहारक बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोट प्रकरणी १८९ राष्ट्रद्रोह्यांविरुद्ध न्या. जे.एन. पटेल यांच्या खास न्यायालयात ९३९२ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोपपत्राप्रमाणे दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आमि मोहम्मद डोसा यांच्या बॉम्बस्फोटाच प्रमुख आरोपी करण्यात आले.

तुळजापूर येथे महिला आघाडीचे अधिवेशन
तुळजापूर येथे ४ आणि ५ जून १९९४ रोजी दोन दिवस शिवसेनेच्या महिला आघाडीचे अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनाचे उद्घाटन सौ. मीनाताई ठाकरे यांनी केले. या अधिवेशनात ग्रामीण शिवसेना महिला आघाडी समस्या, महिला आघाडीकडून अपेक्षा, महिला आघाडी आणि जनआंदोलन आदी विषयांवर चर्चा झाली. तसेच निवडणुकीतील महिला राखीव जागा आणि राजकारण या विषयावर चर्चासत्रही घेण्यात आले. या अधिवेशन काळात संपूर्ण तुळजापूर शहर भगवे झाले होते.

नाशिक येथे शिवसेनेचे चौथे राज्यव्यापी अधिवेशन
१९९४ साली नाशिक येथे शिवसेनेचे चौथे अधिवेशन जोरात, थाटामाटात पार पडले आणि शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. नाशिकनगरीत शिवसेनेच्या अधिवेशनाने कुंभमेळाच भरत असल्याचे चित्र उभे राहिले. या अधिवेशनाची सुरुवात दिमाखदार झाली. राज्यात सुरू असलेला राजकीय गोंधळ थांबविण्यासाठी, भ्रष्ट राजवट उलथून टाकण्यासाठी जगदंबेच्या आशीर्वादाने आणि शिवरायांच्या प्रेरणेने आम्हाला धर्माच्या नावाने गोंधळ घालावाच लागेल, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले. सौ. मीनाताई ठाकरे यांनी जगदंबेला साकडे घातले.

शिवशाहीचा सुवर्णकाळ
१९९५ ते १९९९ हा कालावधी म्हणजे शिवसेनेचा सुवर्णकाळ. १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला १३४ जागांवर विजय मिळाला तर काँग्रेसला फक्त ८४ ठिकाणीच यश मिळाले. काही अपक्षांच्या मदतीने मंत्रालयावर भगवा फडकणार हे स्पष्ट झाले. अखेर महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले. १४ मार्च १९९५ रोजी मनोहर जोशी यांच्या रूपाने एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला.
१९९५ ते १९९९ दरम्यान शिवसेनेने केलेल्या विविध कामांवरती दृष्टीक्षेप

ज्येष्ठ सुपुत्र बिंदुमाधव यांचे अपघाती निधन
१९९५ सालची विधानसभा शिवसेना-भाजपा युतीने जिंकली आणि ‘याची देही याची डोळा’ मा. शिवसेनाप्रमुखांचे शिवशाही व विधानसभेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यानंतर लगेच १९९६ ची लोकसभा निवडणूक होणार होती. शिवसेना आपल्या सर्वशक्तीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरली. मा. बाळासाहेब प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईबाहेर गेले होते. त्या दिवशी बाळासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र बिंदुमाधव यांच्यावर महासंकट कोसळले. त्यांच्या गाडीला जबरदस्त अपघात झाला. ठाकरे कुटुंबीयांवर दु:खाची कुऱ्हाड कोसळवणारी ही परिस्थिती मोठी गंभीर होती. शिवसेनेच्या नेत्यांनी मनाचा दगड करून ही दु:खद वार्ता बाळासाहेबांना कळवली. लाडक्या बिंदुमाधवचं अपघाती निधन! ही बातमी ऐकून बाळासाहेब कमालीचे सुन्न झाले. प्रचार दौरा अर्ध्यावर सोडून बाळासाहेबांनी मुंबईकडे धाव घेतली. बिंदुमाधवचा पार्थिव देह पाहून त्यांचा बांध फुटला. दु:खाचा ओघ वाहू लागला. बिंदुमाधवचा मृत्यू बाळासाहेबांच्या मनस्वी पितृहृदयाला सहन होत नव्हता. कुठल्याही क्षणी ते सर्वार्थाने कोलमडून पडतील अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचे निधन
प्रबोधनकार ठाकरे यांचा लाडकी सून, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली, शिवसेनेच्या विशाल रमाधाम वृद्धाश्रमाच्या संचालिका, शिवसैनिकांची माऊली माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचे ६ सप्टेंबर १९९५ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कर्जत येथे दुःखद निधन झाले. संवेदनशील, धीरगंभीर, स्नेहमयी, प्रकाशमयी माँसाहेबांच्या जीवनज्योतीवर क्रूर काळाने फुंकर घातली. या घटनेने हिमालयासारखे श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गदगदून आले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. बाळासाहेबांसह सारे जण हमसाहमशी रडू लागले. पुत्र बिंधुमाधवच्या निधनानंतर सहा महिन्याच्या आतच पुन्हा एकदा बाळासाहेबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

शिवसेनाप्रमुखांवर शस्त्रक्रिया
११ फेब्रुवारी १९९६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करणारे डॉ. नितू मांडके म्हणाले की, हिंदुस्थानच्या हृदयसम्राटाचे हृदय माझ्या हाती होते. एका सम्राटाच्या हृदयावरील ही बायपास सर्जरी म्हणजे आव्हानच. पण त्या क्षणी भावना नव्हत्या. होते ते फक्त एक पेशंट आणि एक सर्जन. हा या देशाचा एक हिंदुहृदयसम्राट आहे, तो देशासाठी फीट असला पाहिजे आणि अखेर बायपास १०० टक्के यशस्वी झाली.

शिवसेनेवर निवडणूक आयोगाकडून संकट
१९९६ च्या डिसेंबरमध्ये शिवसेनेवर निवडणूक आयोगाकडून नवीन संकट निर्माण करण्यात आले. आयोगाने नोटीस दिली की, शिवसेनेने पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्यात. त्यासाठी पक्षघटनेत बदल करावा व तशी हमी २४ डिसेंबरपर्यंत द्यावी. या आदेशामुळे शिवसेना अस्वस्थ झाली. पक्षांतर्गत निवडणुकांसंबंधी निवडणूक आयोगाला आदेश देता येतो का, हा मूलभूत प्रश्न निर्माण झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच पक्षाचे कायमचे अध्यक्ष असल्याचे आयोगाला कळवण्यात आले. परंतु आयोगाने ही भूमिका अमान्य केली. शेवटी शिवसेना भवनात प्रतिनिधींची सभा घेण्यात आली. या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच पक्षाचे तहहयात अध्यक्ष राहावेत, असा ठराव मनोहर जोशी यांनी मांडला आणि लीलाधर डाके यांनी त्यास अनुमोदन दिले. टाळ्यांच्या कडकडाटात हा ठराव संमत करण्यात आला.

लोकसभेत शिवसेनेचे यश
१९९६ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश प्राप्त झाले. शिवसेनेचे १५ खासदार निवडून आले. या विजयानंतर शिवसेनाप्रमुखांनी ‘हा शुभ दिवस हिंदुस्थानात उगवणारच होता’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेसचे पानिपत झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. राष्ट्रपतींनी भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांना मंत्रिमंडळ बनवण्यास निमंत्रित केले. वाजपेयींनी सरकार स्थापन केले खरे, परंतु ते केवळ १३ दिवसच टिकले.

मुंबई महानगरपालिकेत विजय
१९९७ मध्ये राज्यातील ९ महानगरपालिका आणि सर्व जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका शिवसेना-भाजपाने युती करूनच लढवल्या. युतीच्या वचननाम्यात अनेक वचने जनतेला देण्यात आली. शिवतीर्थावरील युतीच्या प्रचंड सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा नेते प्रमोद महाजन यांनी मुंबई महापालिकेत भगवी क्रांती करण्याचे आवाहन मतदारांना केले. निवडणुकांचे निकाल जाहीर झाले तेव्हा १६९ जागांपैकी शिवसेना-भाजपा युतीला १०८ जागा तर काँग्रेसला अवघ्या ३७ जागा मिळाल्या.

लोकसभा मध्यावधी निवडणूक
१९९८ साली निवडणूक आयोगाने लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेला सहा तर भाजपाला चार जागा मिळाल्या, मात्र देशात भाजपा आणि मित्रपक्षांना २४५ जागा मिळाल्या, तर काँग्रेस आघाडीला केवळ १६६ जागांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले आणि भाजपाची सत्ता देशात आली. शिवसेनेचे सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.

लोकसभा-विधानसभा पहिली निवडणूक
१९९९ साली महाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या दि. ४ आणि ११ सप्टेंबर या तारखा जाहीर झाल्या. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रचाराला बाहेर पडले आणि एकापाठोपाठ एक अवघ्या महाराष्ट्रात सभा घेऊन वातावरण तापवू लागले. ६ ऑक्टोबर १९९९ रोजी लोकसभेचे निकाल जाहीर झाले. त्यात भाजपाला १८२, शिवसेनेला १५ तर इतर घटक पक्षांना मिळून एकूण २९६ जागा रालोआला मिळाल्या. त्यामुळे लोकसभेत रालोआची सत्ता आली, मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला १३० जागा मिळाल्या आणि सत्तेसाठी १५ जागा कमी पडल्या.

शिवसेनाप्रमुखांना अटक व सुटका
मुंबईत १९९२-९३ मध्ये उसळलेल्या जातीय दंगलीच्या संदर्भात शिवसेनाप्रमुखांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून अत्यंत परखडपणे आपले विचार मांडले होते. त्यापैकी दोन अग्रलेखांची प्रक्षोभक अशी नोंद करून पोलिसांनी शिवसेनाप्रमुखांविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्याच्या आधारे २५ जुलै २००० रोजी शिवसेनाप्रमुखांना तसेच कार्यकारी संपादक संजय राऊत आणि मुद्रक-प्रकाशक सुभाष देसाई यांना ‘तांत्रिक’ अटक करण्यात आली. मात्र कालबाह्य झालेला खटला न्या. रद्दबातल केला. बाळासाहेबांची सुटका झाल्यानंतर पंतप्रधानांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले.

शिवसेनेचे अमरावती येथे महाशिबीर
२००० साली अमरावती येथे शिवसेनेचे महाशिबीर घेण्यात आले. या अधिवेशनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून एक, तर काही जिल्ह्यांतून दोन अशा ५० हिंदुत्ववादी ज्योती अमरावतीत आल्या. अखंड महाराष्ट्राचा गजर करीत सजवलेला रथ अमरावतीत फिरला. अधिवेशनात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे तसेच अन्य शिवसेना नेत्यांची जोरदार भाषणे झाली. अमरावतीच्या शिबिरात शिवसेनेला नवीन चैतन्य मिळाले. एक अलौकिक असे शिबीर अमरावतीला झाले. पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आणि शिवसेनेने विजयाचा आणखी एक टप्पा गाठला.