आनंद दिघे यांचे निधन
ऑगस्ट २००१ च्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची जीप आणि एशियाड यांची पहाटे ४.०० वाजण्याच्या सुमारास समोरासमोर भीषण टक्कर झाली. दिघे यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. साऱ्या शिवसैनिकांना हा जबरदस्त धक्का होता.

शिवसेनाप्रमुखांची पंचाहत्तरी
असंख्य लोकांना प्रेरणा देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दोन कौटुंबिक अपघातानंतर अनेकदा एकाकी असत. याच दरम्यान २००२ मध्ये त्यांची पंचाहत्तरी आली. यानिमित्त मोठा समारंभ व्हावा ही शिवसैनिकांची इच्छा होती. ती त्यांनी मान्य करावी यासाठी उद्धवजी ठाकरे, मनोहर जोशी यांनी कळकळीची विनंती केली. तथापि बाळासाहेबांनी होकार दिला नाही. कारण प्रश्न अनुत्तरीत राहतात. हा वाढदिवस साजरा करण्यास बाळासाहेब का तयार नव्हते, हेही उमगले नाही.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कमांडर दत्ताजी साळवी यांचे निधन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि भारतीय कामगार सेनेचे माजी अध्यक्ष दत्ताजी साळवी यांचे ११ फेब्रुवारी २००२ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. शिवसेनेची मुलुखमैदान तोफ थंड झाली. कामगार चळवळीचा भीष्माचार्य हरपला. भारतीय कामगार चळवळीचे ते पहिले अध्यक्ष होते. शिवसेनेच्या प्रत्येक चळवळीत ते आघाडीवर राहिलेले नेते होते.

लोकसभेच्या अध्यक्षपदी मनोहर जोशींची निवड
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री मनोहर जोशी यांची मे २००२ मध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदावर एकमताने निवड झाली. जी.एम.सी. बालयोगी यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची या पदावर निवड झाली होती. लोकसभेचे अध्यक्षपद म्हणजे लोकशाहीतील सर्वोच्चपद समजले जाते. मनोहर जोशींची निवड हा शिवसेनेचा सर्वात मोठा बहुमान होता.

मुंबई, ठाणे, नाशिक, सोलापूरमध्ये भगवा
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसला देशातून बरखास्त करा असे जबरदस्त आवाहन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत २२६ जागांपैकी शिवसेनेला ९८ आणि भाजपाला ३५ जागा मिळून मुंबईवर भगवा फडकला. ठाणे महानगरपालिका निवडणुकीतही शिवसेना-भाजपा युती पूर्णपणे यशस्वी ठरली. शिवसेनेला ४६ तर भाजपाला १३ जागा मिळाल्या. नाशिकच्या निवडणुकीतही १०८ जागांपैकी शिवसेनेला ३७ तर भाजपाला २२ जागा मिळाल्या. सोलापूर येथेही शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली.

शिवसेनेचे शिर्डी येथे महाशिबीर
एप्रिल २००२ मध्ये महिन्यात शिर्डी येथे शिवसेनेचे महाशिबीर घेण्यात आले. ज्या ठिकाणी शिबीर घेण्यात आले, त्या जागेला कमांडर दत्ताजी साळवी नगर असे नाव देण्यात आले. महाशिबिराचा शुभारंभ शिवसेना नेते उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. शिबिरात वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद घेण्यात आले. या महाशिबिरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रोखठोक विचाराने शिबिरात आमि महाराष्ट्रात एकच खळबळ माजली. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा वन्ही पेटवून नवीन चैतन्य दिले.

उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख
२००३ साली महाबळेश्वर येथे पार पडलेल्या शिबिरात शिवसेनेच्या घटनेत बदल करून शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना नेते यांच्यामध्ये एक नवीन पद निर्माण करण्यात आले. हे पद म्हणजे कार्यकारी प्रमुख. शिवसेना नेते उद्धवजी ठाकरे यांची या पदावर एकमताने निवड करण्यात आली. उद्धवजींच्या नावाची घोषणा होताच जयजयकार आणि टाळ्यांचा गजर करण्यात आला. ही शिवसेनेच्या इतिहासातील ऐतिहासिक घटना होती.

डॉ. नीतू मांडके यांचे निधन
हजारो हृदयग्रस्तांना नवसंजीवनी देणारे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नित्यानंद ऊर्फ नितू मांडके यांचे हृदयविकाराच्याच तीव्र धक्क्याने २२ मे २००३ रोजी दुःखद निधन झाले. हृदयरोग्यांना आपले सर्व वैद्यकीय कसब पणाला लावून जीवनदान देणारे डॉ. मांडके यांचा हृदयानेच घात करावा, हे खरोखरच दुर्दैव होय. त्यांच्या निधनाने केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर समाजातील प्रत्येक स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.

श्रीकांतजी ठाकरेंचे निधन
१० डिसेंबर २००४ रोजी ज्येष्ठ संगीतकार, व्यंगचित्रकार, सिनेपत्रकार श्रीकांतजी ठाकरे यांचे निधन झाले. त्यांचे वय त्या वेळी ७५ वर्षे होते. त्यांच्या निधनाने संगीत, व्यंगचित्र व सिनेपत्रकारितेच्या क्षेत्रातील अवलिया काळाच्या पडद्याआड गेला. श्रीकांत ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे बंधू होत. शिवसेनाप्रमुखांबरोबर त्यांनी ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले होते.

लोकसभा निवडणूक
‘फिलगुड’ फॅक्टरच्या भरवशावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने नऊ महिने आधीच म्हणजे ६ फेब्रुवारी २००४ रोजी लोकसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेऊन तशी शिफारस राष्ट्रपतींना केली. शिवसेनाप्रमुखांबरोबरच उद्धवजी ठाकरे हे पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरले आणि त्यांनी शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. शेवटी निवडणुकांचे निकाल हाती आले. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीला २५ तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला २३ जागी विजय मिळाला. शेवटी देशाचे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांची निवड करण्यात आली.

विधानसभा निवडणूक २००४
२००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाने २७ सप्टेंबर २००४ रोजी आपला ‘वचननामा’ जाहीर केला. या वचननाम्यात शेतकरी, कामगार, बेकार तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, आदिवासी, दलित यांच्यासाठी विविध योजनांचा समावेश करण्यात आला. या निवडणुकीत शिवसेनेला ६२ तर भाजपाला ५४ जागा अशा युतीला एकूण ११६ जागा मिळाल्या. काँग्रेसला ६९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ७१ जागा मिळून आघाडी सत्तेवर आली. इतर पक्ष व अपक्षांना ३२ जागा मिळाल्या.

नारायण राणेंची हकालपट्टी
१४ एप्रिल २००५ रोजी रंगशारदा सभागृहात शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शिबीर होते. शिवसेनाप्रमुख शिबिरात येण्यापूर्वीच नारायण राणे यांनी भाषण केले. त्या भाषणात ते म्हणाले, ‘पैसे घेऊन शिवसेनेत पदे विकत घेतली जात आहेत. पदांचा बाजार भरला आहे.’ त्याच दिवशी सायंकाळी शिवसेनाप्रमुखांनी नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी केली.

रामदास कदम विरोधी पक्षनेते
विरोधी पक्षनेते म्हणून १ ऑक्टोबर २००५ रोजी रामदास कदम यांची नियुक्ती करीत असल्याचे पत्र विधानसभेचे अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी दिले. भाजपापेक्षा शिवसेनेचे आमदार अधिक असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. राणे यांच्यानंतर शिवसेनेचे आणखी १० आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याने आमचेच संख्याबळ अधिक असेल असा आग्रह धरत शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न भाजपाने केला होता. मात्र भाजपाचा दावा फेटाळून लावत अध्यक्षांनी संख्याबळाच्या आधारे हे पद शिवसेनेला दिले.

राज ठाकरे जाऊनही शिवसेना अभेद्य
२००५ च्या अखेरीस शिवसेनेचे नेते राज ठाकरे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड केले. त्यांनी नेतेपदाचा आणि विद्यार्थी सेनेचा राजीनामा दिला. राज ठाकरेंचे काही समर्थक त्यांच्याबरोबर गेले, मात्र राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडूनही शिवसेना अभेद्यच राहिली हे पुढील काळात दिसून आले.

प्रमोद महाजन यांचे निधन – युतीचे नुकसान
२२ एप्रिल २००६ रोजी वरळी येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या निवासस्थानी त्यांच्या सख्ख्या लहान भावानेच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. ३ मे २००६ रोजी प्रमोद महाजन यांची प्राणज्योत मालवली. प्रमोद महाजन यांचे निधन हा शिवसेना-भाजपा युतीला एक मोठा धक्का होता. कारण महाजन हे युतीचे शिल्पकार होते.

डॉ. दीपक सावंत यांचा दणदणीत विजय
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दि. २४ जून २००६ रोजी झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डॉ. दीपक सावंत प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले. श्रीवर्धनच्या निवडणुकीत आमदार तुकाराम सुर्वे यांचा विजय, राज्यसभेच्या निवडणुकीत राहुल बजाज यांचा विजय आणि त्यानंतर डॉ. दीपक सावंत यांना मिळालेला दणदणीत विजय… हे सारे शिवसेनेच्या भावी यशाची नांदी ठरणारे विजय म्हणता येतील.

नवीन शिवसेना भवनाचे उद्घाटन
नवीन शिवसेना भवनाचे उद्घाटन दि. २७ जुलै २००६ रोजी झाले. हा दिवस म्हणजे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस. उद्धवजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि शिवसेना भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फीत कापून नवीन शिवसेना भवनाचे उद्घाटन केले. शिवसेना भवन पाहून शिवसेनाप्रमुख प्रसन्न झाले. ‘देशाच्या राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत जे मुंबईत येतील त्या सर्वांना शिवसेना भवनाचे दर्शन घ्यावेच लागेल. तसेच नवे शिवसेना भवन विजयाचे दिवस पाहील ’ हा बाळासाहेबांनी व्यक्त केलेला विश्वास नंतरच्या काळात खरा ठरला आहे.

उद्धवजींची खंबीर आणि यशस्वी वाटचाल
२००५ आणि २००६ ही दोन वर्षे शिवसेना आणि उद्धवजींसाठी कसोटीची ठरली. या काळात उद्धवजींच्या कुंडलीत राहू-केतूचा योग असावा. मात्र यावर मात करीत उद्धवजींनी खंबीर आणि यशस्वीपणे वाटचाल सुरू केली. ‘मी शांत आणि संयमी असलो तरी डरपोक आणि नामर्द नाही. माझ्या शरीरात शिवसेनाप्रमुखांचे रक्त आहे. भगव्याशी बेईमानी करणाऱ्या गद्दाराचं रक्त नाही हे लक्षात घ्या. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसैनिक गाडल्याशिवाय राहणार नाहीत,’ असे खणखणीत उद्गार उद्धवजींनी काढल्यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आणि त्याचा परिणाम २००७ मध्ये दिसून आला. २००७ साली झालेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर साऱ्या देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. अखेर निवडणुकीत शिवसेना ८३ आणि भाजपा २८ जागी निवडून येऊन युती सत्तेवर आली. ठाण्यामध्येही ४८ जागा मिळून शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला.

उद्धवजी लढाईत जिंकले व तहातही जिंकले
मुंबई आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी शिवसेनेला सरळ विजय प्राप्त झाला. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे महापौर निवडून आले. उद्धवजींनी आपल्या बुद्धिचातुर्याने आणि युक्तीप्रयुक्तीने हे घडवून आणले. असे म्हणतात की, शिवकाळात मराठे युद्धात जिंकत व तहात हरत असत. उद्धवजी ठाकरे मात्र युद्धातही जिंकले आणि तहातही जिंकले. म्हणूनच मुंबई आणि ठाण्याव्यतिरिक्त चार महानगरपालिकांत शिवसेना सत्तेवर आली. महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह उपराजधानी नागपूरही युतीच्या ताब्यात आली.

राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणूक – शिवसेनेची भूमिका
२००७ मध्ये पार पडलेली राष्ट्रपतीपदाची निवडणूक फारच गाजली. भाजपा पुरस्कृत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून भैरोसिंह शेखावत तर काँग्रेस आघाडीच्या वतीने प्रतिभाताई पाटील निवडणुकीच्या रिंगणात होत्या. भैरोसिंह शेखावत हे भाजपाचे म्हणजेच शिवसेनेच्या मित्रपक्षाचे होते, तर प्रतिभाताई पाटील या काँग्रेसच्या आणि महाराष्ट्रीय होत्या. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. शिवसेनेने उघडउघड प्रतिभाताई पाटील यांना मराठी माणूस म्हणून आणि महिला म्हणून पाठिंबा जाहीर केला. या निवडणुकीत प्रतिभाताई पाटील विजयी होऊन पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपाच्या उमेदवार नजमा हेपतुल्ला यांना पाठिंबा दिला, मात्र यूपीएचे उमेदवार हमीद अन्सारी विजयी झाले.

प्रमोद नवलकर यांचे निधन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, रेकॉर्ड-ब्रेक स्तंभलेखक, चतुरस्र वक्ता आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी लढणारे ‘भ्रमंती ’कार प्रमोद नवलकर यांचे २० नोव्हेंबर २००७ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. नवलकरांच्या निधनाने भटक्याची भ्रमंती थांबली. प्रमोद नवलकर हे सुरुवातीपासूनच शिवसेनेचे नेते होते. अखेरपर्यंत ते शिवसेनेच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करीत राहिले. त्यांनी साहित्य क्षेत्रातही ५० पुस्तके लिहिली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेचा मोर्चा
२००८ मध्ये राज्य मंत्रिमंडळाची नाशिक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी उत्तर महाराष्ट्र पॅकेज जाहीर करण्यात यावे या मागणीसाठी तसेच याच वर्षी पाणीटंचाई, खंडित वीजपुरवठा, वाढती महागाई अशा विविध प्रश्नांवर शिवसेनेने आंदोलने केली आणि निषेध मोर्चे काढले.

२००९ लोकसभा निवडणुकीतील यश
२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुका चुरशीच्या झाल्या. शिवसेना कार्यप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि अन्य शिवसेना नेते यांनी निवडणूक प्रचार काळात महाराष्ट्र पिंजून काढला. परंतु अपेक्षित यश लाभले नाही. पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचेच सरकार सत्तेवर आले. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे २५, तर शिवसेना-भाजपा युतीचे २० खासदार निवडून आले. विशेष म्हणजे भाजपापेक्षा शिवसेना कमी जागा लढवत असूनही शिवसेनेने भाजपापेक्षा दोन जागा जास्त जिंकल्या. शिवसेनेचे ११ तर भाजपाचे ९ खासदार निवडून आले. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाचेच हे यश असल्याचे मानले गेले.

विधानसभा निवडणूक २००९
२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पुन्हा एकदा विजयी ठरली. शिवसेना-भाजपा युतीला या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांमुळे काहीसा फटका बसला. मनसेचे १३ आमदार निवडून आले. विशेषतः शिवसेना उमेदवारांचे मनसे उमेदवारांमुळे बरेच नुकसान झाले. त्यामुळे शिवसेनेचे ४४ तर भाजपाचे ४६ आमदार निवडून आले. शिवसेनेपेक्षा भाजपाचे दोन आमदार निवडून आल्यामुळे भाजपाने विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला.

आदित्य ठाकरे यांची युवासेना प्रमुखपदी निवड
२०१० साली झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर युवासेनेची स्थापना करून युवासेना प्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांची नियुक्ती केली. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेना म्हणजेच महाराष्ट्रातील तरुणांचे समर्थ व्यासपीठ अशी युवासेनेची ओळख बनली आहे. युवावर्गाचे प्रश्न, त्यांची मत-मतांतरे, त्यांच्या अडचणी आणि समस्या मांडण्याचे युवासेना हे हक्काचे व्यासपीठ ठरले आहे.

मुंबई विद्यापीठ सिनेटमध्ये दणदणीत विजय
२०१० मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने दणदणीत विजय प्राप्त केला. एखाद्या पॅनेलने १० पैकी आठ जागा जिंकण्याचा मुंबई विद्यापीठाच्या इतिहासातील हा विक्रमच ठरला आहे. आठही विजयी शिलेदारांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. सिनेट ही तुमच्या आयुष्याची सुरुवात आहे, तुम्हाला उद्याचे नेतृत्व करायचे आहे, त्यामुळे जबाबदारीने वागा, असे मोलाचे मार्गदर्शन शिवसेनाप्रमुखांनी या शिलेदारांना केले.

‘गर्जा जयजयकार’
१ मे २०१० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून आयोजिण्यात आलेल्या ‘गर्जा जयजयकार’ भव्य-दिव्य कार्यक्रमात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. लतादीदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू याच्या उपस्थितीत गायलेले आणि लाखो-करोडो देशवासीयांच्या अंगावर देशभक्तीचे रोमांच उभे करणारे महाराष्ट्रगीत पुन्हा एकदा या कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख व छायाचित्रकार उद्धवजी ठाकरे यांनी सुमारे सात हजार फुटांवरून टिपलेल्या विहंगम व विलोभनीय छायाचित्रांचा अमूल्य ठेवा असलेल्या ‘महाराष्ट्र देशा’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कोकणचा नितांतसुंदर समुद्रकिनारा, सह्यगिरीच्या दुर्गम कडेकपारी, घनदाट अरण्य, महाराष्ट्राला सुजलाम्‌सुफलाम्‌करणाऱ्या गोदावरी, कृष्णा यासारख्या नद्यांचे खळाळते प्रवाह, मालवणच्या समुद्रात विसावलेला सिंधुदुर्ग, महाराष्ट्र देशाचे छत्रपती सिंहासनस्थ झाले तो किल्ले रायगड, खंडेरायाचा जेजुरी गड, मराठी माणसांच्या लढ्यात महाराष्ट्राला मिळालेल्या मुंबईचे वैभव आदी महाराष्ट्राच्या वैभवशाली चित्रांचा संग्रह या पुस्तकात आहे. राजकारणातून थोडा वेळ काढून उद्धवजींनी हे हवाई छायाचित्रण केले आहे. या छायाचित्रांमधील काही निवडक छायाचित्रांच्या माध्यमातून आजच्या पिढीला आपल्या वैभवशाली महाराष्ट्राची ओळख व्हावी यासाठी हा छायाचित्रांचा संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या महारक्तदानाची विक्रमाला गवसणी
महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 2010 मध्ये शिवसेनेने आयोजित केलेल्या रक्तदानाच्या महायज्ञाने विक्रमाला गवसणी घालत 25 हजार 63 रक्तबाटल्यांचा विक्रम गाठला आणि या महायज्ञाची नोंद थेट “गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्‌’मध्ये केली. श्री. ठाकरे यांनी स्वतः रक्तदान करून शिवसेनेच्या रक्तदान महायज्ञाचा शुभारंभ केला. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी आपले रक्त सांडले, त्या हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ न देता शिवसेनेने महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात महारक्तदानाचा संकल्प पूर्ण केल्याचे उद्‌गार शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या प्रसंगी काढले. त्यानंतर पहिल्या पाच रक्तदात्यांमध्ये शिवसेना आमदार डॉ. दीपक सावंत, के.ई.एम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक, राज्य रक्त संक्रमण शिबिराचे डॉ. संजय जाधव, मिलिंद नार्वेकर यांचा समावेश होता.
गोरेगाव येथील एनएसई संकुलातील वातानुकूलित सुसज्ज हॉलमध्ये झालेल्या रक्तदानास सकाळी 6 वाजल्यापासून रक्तदात्यांनी रांगा लावण्यास सुरुवात केली होती. अतिशय नियोजन पद्धतीने व अत्याधुनिक प्रकारे आयोजित केलेल्या रक्तदान महायज्ञासाठी रक्तदात्यांचा ओघ वाढतच होता. मुंबई, नवी मुंबई, ठाणे नव्हे, तर संपूर्ण राज्यातून आलेले शिवसैनिक रक्तदानात सहभागी झाले होते. त्यामुळे एनएसई संकुलाच्या आवारात रक्तदानाच्या महायज्ञाचा जनसागर उसळला होता. रक्तदात्यांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे तेथील सुरक्षा व्यवस्थेलाही गर्दीचा रेटा आवरता आला नाही. महिलांची संख्याही लक्षणीय होती.
रक्तदान महायज्ञासाठी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नगर, धुळे, नंदुरबार आदी ठिकाणच्या 82 रक्तपेढ्यांमधील 600 डॉक्टार्स, 800 तंत्रज्ञ सहभागी झाले होते. रक्तदानासाठी आलेल्या रक्तदात्यांची प्रथम नोंदणी करण्यात येऊन, त्यांचे हिमोग्लोबिन व रक्दाीब तपासून त्यांना पात्र व अपात्र ठरविण्यात येत होते. त्यानंतर पात्र रक्तदात्याला रक्तदानासाठी 82 रक्तपेढ्यांपैकी एका रक्तपेढीवर रक्तसंकलनासाठी पाठविण्यात येत होते. यशस्वी रक्तदान केल्यानंतर शिवसेना व राज्य रक्तसंक्रमण शिबिरातर्फे रक्तदानाची दोन स्वतंत्र प्रमाणपत्रे देण्यात येत होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई आदींनी या वेळी रक्तदान केले; तर शिवसेना नेते दिवाकर रावते, दत्ताजी नलावडे, सुधीर जोशी, लीलाधर डाके, आमदार रामदास कदम, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, महापौर श्रद्धा जाधव, आमदार रवींद्र वायकर, आमदार विनोद घोसाळकर, अरविंद सावंत, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, बेस्ट समितीचे अध्यक्ष संजय पोतनीस, सभागृहनेते सुनील प्रभू आदी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच संदीप आचार्य, शैलेश पाटील यांनी सक्रिय सहभाग घेऊन सदर संकल्पना यशस्वीरित्या पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले. “गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्‌’मध्ये नोंद करून रक्तसंकलनाचा विक्रम केल्याबद्दल न्यूयॉर्कच्या “गिनीज बुक’च्या प्रतिनिधी सॅरा बुलक यांनी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना प्रमाणपत्र बहाल केले. यापूर्वी चंडीगड येथे 2004 मध्ये झालेल्या रक्तदान शिबिरात 17 हजार 721 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. शिवसेनेने हा विक्रम मोडून 25 हजार 63 चा विक्रमी टप्पा गाठला आहे.