शिवशक्ती-भीमशक्ती युती
२३ जानेवारी २०११ रोजी मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर भेट घेतली. त्या वेळी बाळासाहेबांनी शिवशक्ती-भीमशक्तीची युती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. रिपाइं नेत्यांनी बाळासाहेबांच्या इच्छेचा मान राखला आणि शिवशक्ती-भीमशक्ती युती होण्याच्या दिशेने पावले पडत गेली. त्यानंतर २२ मे २०११ रोजी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने चुनाभट्टी येथे सोमय्या मैदानावर ‘निर्धार पक्का’ मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून आलेल्या आंबेडकरी जनतेने प्रचंड प्रमाणात हजेरी लावली आणि त्यांनी शिवशक्ती-भीमशक्ती युतीवर शिक्कामोर्तब केले.

‘पाहावा विठ्ठल’ पुस्तकाचे प्रकाशन
१ मे २०११ रोजी वरळी येथील जांबोरी मैदानावर शिवसैनिकांच्या विराट सभेत शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरीच्या वारीचे हवाई चित्रण केलेल्या ‘पाहावा विठ्ठल’ या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर पालखीतून पुस्तक आणण्यात आले. पाच वारकऱ्यांच्या हस्ते आणि ‘बोला पुंडलिक वरदा हारी विठ्ठल’च्या गजरात, ढोलताशे-फटाक्यां च्या आतषबाजीत हे प्रकाशन झाले. या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात ‘या देशात काय चालले आहे, देश कुठे चालला आहे… विठ्ठला तुझ्या पायाखालच्या दोन विटा काही काळापुरत्या आमच्या हातात दे, मग त्याचा वापर शिवसैनिक कसा करतात ते सांगायला नको!’, अशा खणखणीत शब्दांत राज्यकर्त्यांना इशारा दिला. या प्रकाशन सोहळ्यात शिवसैनिकांबरोबर वारकऱ्यांचीही मोठी उपस्थिती होती. भक्ती आणि शक्ती एकत्र आल्यावर या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणी हिंमत करणार नाही, असा इशारा शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला.

जैतापूरवासीयांचा आवाज दिल्लीत आवाज
९ ऑगस्ट २०११ रोजी जैतापूरवासीयांचा आवाज शिवसेनेने संसदेत बुलंद केला. जैतापूरवासीयांचा प्रश्न ज्वलंत आहे. व्यथा मांडण्यासाठी ते हजारोंच्या संख्येने दिल्लीत आले होते. त्यांच्या वेदनांकडे लक्ष देऊन चर्चेची तयारी दाखवा, अशी जोरदार मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. मात्र जैतापूर प्रश्नी संवेदनशून्य असलेल्या सरकारने ती फेटाळताच जोरदार घोषणा देत दोन्ही सभागृहांतून शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला.

शिवसेनाप्रमुखांचे देहावसान
१७ नोव्हेंबर, २०१२ रोजी दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांनी घड्याळाचे काटे थबकले आणि काळीज हेलावून सोडणारी एक दु:खद बातमी आली. हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या या बातमीने त्या दिवशी मुंबईत सागराच्या लाटा नि:शब्द झाल्या. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी निरव शांतता मुंबईसह महाराष्ट्रात पसरली. येत होता आवाज तो फक्त हुंदक्यांचा आणि वाहत होता पूर तो फक्त अश्रूंचा. एक सम्राट अंतर्धान पावला होता. ज्यांनी ४६ वर्षे या महाराष्ट्रात झंझावात केला. मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसांसाठी ज्यांनी वाणी, लेखणी आणि कुंचल्याने भल्याभल्यांना दरदरून घाम फोडला. मराठी माणसांच्या, हिंदूंच्या, राष्ट्रभक्त एतद्देशीय नागरिकांच्या हृदयावर अधिराज्य केले! आणि म्हणून ते होते हिंदुहृदयसम्राट!! कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शून्यातून विश्व निर्माण करणारे महामानव! एका ते:जपुंज शिवसूर्याचा अस्त झाला होता. अथांग सागराला लाजवले अशी अंत्ययात्रेला अलोट गर्दी. ‘बाळासाहेब परत या’, ‘बाळासाहेब परत या’, ‘परत या’ असा हृदयद्रावक आलाप त्यांच्या अंत्ययात्रेत होत होता, हे अभूतपूर्व आहे, यातच त्यांचे सारे मोठेपण, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व सामावलेले आहे. साहेबांवर निरतिशय प्रेम करणाऱ्या, विक्रमी गर्दीचा उच्चांक गाठणाऱ्या शोकमग्न जनतेच्या साक्षीने हा सम्राट १८ नोव्हेंबर, २०१२ रोजी अनंतात विलीन झाला.

उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुखपदी निवड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून २३ जानेवारी २०१३ रोजी शिवसेना भवनात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे उपनेते, खासदार, आमदार, पदाधिकारी असे सुमारे दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आली. या प्रसंगी ‘उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात आल्या. युवासेना ही संघटना यापुढे शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून कार्यरत राहील, भूमिपुत्रांच्या न्यायहक्कासाठी लढा यापुढेही कायम राहील, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या विचाराशी तडजोड होणार नाही, महिलांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्यात येईल, असे महत्त्वपूर्ण राजकीय ठराव या कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आले.

लोकसभेसाठी पाच पक्षांची महायुती
लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर शिवसेना-भाजपा युतीने सोशल इंजिनीयरिंगचा प्रयोग करताना पाच पक्षांची महायुती साकारली. यात रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय समाज पक्ष हे अन्य तीन पक्ष महायुतीत सामील झाले. तसेच शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांनीही निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून महायुतीत प्रवेश केला. या सोशल इंजिनीयरिंगमुळेच महाराष्ट्रात महायुतीला घवघवीत यश प्राप्त झाले.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश प्राप्त झाले. देशभरात भाजपाला चांगले यश मिळाले, तसेच महाराष्ट्रात महायुतीने दणदणीत विजयाची नोंद केली. महाराष्ट्रात भाजपाने २४, शिवसेनेने २० जागा लढवल्या होत्या, तर महायुतीतील मित्रपक्षांना ४ जागा सोडण्यात आल्या होत्या. यापैकी भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागी विजय संपादन केले. महायुतीतील घटक पक्षांना एका जागी विजय प्राप्त झाला. अशा रीतीने ४८ जागांपैकी तब्बल ४२ जागी महायुतीचे उमेदवार विजयी झाले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या झंझावातामुळे महायुतीला हा ऐतिहासिक विजय मिळाला. युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांनीही महाराष्ट्रभर प्रचार दौरे करून तरुणांमध्ये जनजागृती केली.

गोपीनाथ मुंडे यांचे निधन
महाराष्ट्राचे लोकनेते, भाजपाचे लढवय्ये नेते, केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने साऱ्यांनाच धक्का बसला. गाडीला झालेला भीषण अपघात आणि त्यानंतर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आठच दिवसांत आलेल्या या वृत्तामुळे भाजपसह महाराष्ट्राला जबरदस्त हादरा बसून कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने दिल्लीतील हक्काचा आवाज गमावल्याची भावना व्यक्त झाली. लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयात सिंहांचा वाटा असलेल्या मुंडेंना नरेंद्र मोदी यांनी अत्यंत महत्त्वाच्या ग्रामविकास खात्याची जबाबदारी दिली होती. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या नेहमीच्या धडाक्यात काम सुरू केले होते. त्यासाठी ते दिल्लीत होते. औरंगाबाद येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी ते दिल्लीहून मुंबईकडे निघाले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचा तो प्रवास अखेरचा ठरला.

सीमाप्रश्नी शिवसेनेचे आंदोलन
२०१४ मध्ये येळ्ळूर येथे मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते आणि हातकणंगल्याचे आमदार सुजित मिणचेकर यांना बेळगावमध्ये पत्रकार परिषद घेण्यास कर्नाटक सरकारने मज्जाव केला. कर्नाटक पोलिसांनी पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहचून ती बंद पाडली. या दमदाटीचा निषेध करण्यासाठी या दोन्ही नेत्यांसह शिवसेना कार्यकर्त्यांनी शिनोळी येथे कर्नाटक सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली व पुतळ्याचे दहन केले. सीमाभागातल्या मराठी बांधवांवर सुरू असलेल्या कानडी अत्याचारावरून शिवसेनेने लोकसभेत आवाज उठवला. सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी शिवसेना खासदारांनी केली. या वेळी झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. याआधीही शिवसेनेने सीमावासीयांसाठी वेळोवेळी आंदोलने केलेली आहेत. शिवसेना नेहमीच सीमावासीयांच्या मागे उभी राहिली आहे.

विधानसभेत एकहाती निवडणूक लढवुनही शिवसेनेचे घवघवीत यश. शिवसेना सत्तेत सामील.
कृपया खालील लिंकवर क्लिक करा :

शिवसेना आमदार
शिवसेना मंत्री
शिवसेना पालकमंत्री