युवाशक्तीचा दणका
आदित्यजी ठाकरे (राजकीय प्रवास)
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे अशी राजकीय परंपरा लाभलेल्या ठाकरे घराण्यात जन्म झालेल्या आदित्य ठाकरे यांना लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने १७ ऑक्टोबर २०१० रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर युवासेनेची स्थापना झाली आणि त्याचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर मुंबईत युवा सेनेचा झंझावात सुरू झाला.
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सेनेटच्या निवडणूकीच्या निमित्ताने पहिला दणका दिला. सेनेटच्या १० पैकी ८ जागांवर विजयश्री प्राप्त करून आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठावर भगवा झेंडा डौलाने फडकवला. सेनेट निवडणूकीच्या माध्यमातून विजयाच्या श्रीगणेशा करतानाच युवासेनेने नवा इतिहासच रचला.
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या डब्याची मागणी केली. त्यानंतरच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी याविषयीची घोषणा केली होती. तसेच राज्यातील शिकाऊ डॉक्टरांचे विद्यावेतन रु. २५५० इतके अत्यल्प होते. या अन्यायाविरुद्ध त्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सर्व डॉक्टरांना जोरदार पाठिंबा दिला. यासाठी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन विद्यावेतन वाढविण्याची आग्रही मागणी केली. युवासेनेमुळे बाकीच्या पक्षांचे लक्ष पण या आंदोलनाकडे वळले.
विविध पातळीवर होणाऱ्या निवडणूकांप्रसंगी म्हणजेच लोकसभा निवडणूका, विधानसभा निवडणूका, महानगरपालिका निवडणूकांच्या वेळी शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजयासाठी तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तळमळीने काम करतात. याची प्रचीती अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी आली. स्वतः आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या साथीने राज्यभरात दौरे करून शिवसेनेच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. आगामी विधानसभा निवडणूकीतही राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता यावी, यासाठीही युवासेनेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आदित्य ठाकरे यांनी याबाबतीत युवाशक्तीला चेतवले आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवकांची ही ऊर्जा भावी काळात आपल्या शक्तीचा जोश दाखवल्याशिवाय राहणार नाही.