बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिला गेलेला मुकुंदराजाचा ‘विवेकसिंधु’ हा मराठीतील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते. त्यापूर्वीची स्त्री-गीते, कथा-कहाण्या अशा प्रकारच्या अलिखित लोकसाहित्यास मराठी वाङ्मयाचा मूलस्रोत म्हणता येईल. ‘विवेकसिंधु’ हा ओवीबद्ध ग्रंथ होता. म्हाईंभटांनी संकलित केलेला ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला पद्यग्रंथ १२७८ मध्ये सिद्ध झाला. १२व्या शतकात उदयाला आलेल्या महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर स्वामी यांच्या अनुयायांनी विविध विषयांवर गद्य व पद्य ग्रंथनिर्मिती केली. मराठी ही या पंथाचा धर्मभाषा होती. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास आणि अन्य संतकवी आणि पुढच्या काळातील पंडित-शाहीर यांनी मराठी साहित्याला वाहिलेले योगदान यामुळे मराठी वाङ्मयाचा वृक्ष बहरला, असे म्हटले जाते.

अर्वाचीन मराठी साहित्याचा प्रारंभ १८१८ पासून म्हणजे ब्रिटिश राजवट स्थिर झाल्यानंतरच्या काळात झाला. इंग्रजी विद्येचे संस्कार झालेल्या नवशिक्षितांनी पाश्चात्य वाङ्मयात रुजलेले विविध प्रकारचे साहित्य प्रकार मराठीत आणले. परिणामी काव्य, नाटक, कथा, कादंबरी, लघुनिबंध अशा पूर्वापार चालत आलेल्या व नव्याने केल्या जाणाऱ्या साहित्य निर्मितीस नवनवे धुमारे फुटले. मराठी साहित्याच्या प्रारंभीच्या काळात मोठ्या प्रमाणात लिहिल्या गेलेल्या कवितेचे अधिष्ठान भक्ती हे होते. साहजिकच साहित्याला धर्मपर, अध्यात्मपर व परलोकपर दिशा मिळाली.

  • कविता

प्राचीन मराठी कवितेत आत्मपरता होती खरी, पण तिचा गाभा आध्यात्मिक होता. अर्वाचीन कवितेत शब्दबद्ध केलेली आत्मपरता सर्वस्वी नवीन होती. केशवसुतांनी मराठी कवितेत नवी तुतारी फुंकली. त्यांनी कवितेला नवे वळण लावले. त्याचा प्रभाव रेव्हरंड टिळक, गोविंदाग्रज, बालकवी, बी, रेंदाळकर यासारख्या कवींवर पडला. त्यानंतर पुढच्या पिढीतील अनेक कवींनी मराठी कवितेच्या प्रांतात नव्या युगाला सुरुवात केली.

  • कथा

कथा हा साहित्य प्रकार एका अर्थी पुरातन आहे. महानुभाव पंथाच्या ग्रंथांत दृष्टांत कथा सांगितल्या गेल्या. त्याचप्रमाणे आटपाट नगरी सुरू झालेल्या साठा उत्तराच्या कहाण्या पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होणाऱ्या चटकदार कथा समाजमानसावर अधिराज्य गाजवून होत्या. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी लिहिल्या गेलेल्या कथांचे स्वरूप बहुतांशी भाषांतरित, अनुकरणात्मक व अद्भुतरम्य असेच होते. मराठीतील अनेक महान कथाकारांनी मराठी कथा समृद्ध केली व मराठी कथेचा बाजच बदलून टाकला.

  • कादंबरी

इंग्रजी राजवटीच्या प्रारंभानंतरच्या काळात आपल्याकडील मराठी वाचकांना कादंबरी या सर्वस्वी नव्या वाङ्मय प्रकाराचा परिचय झाला. कादंबरीचा उगम अठराव्या शतकात पाश्चात्य देशांत झाला. मराठी साहित्य विश्वात तिचे आगमन एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बाबा पद्मनजींच्या ‘यमुना पर्यटन’ (१८५७) या कादंबरीनंतर झाले, असे म्हटले जाते. त्यानंतरच्या काळात अनेक लेखकांनी मराठी साहित्यात कादंबरी वाङ्मय समृद्ध केले आहे.

  • दलित साहित्य

नकार, विद्रोह, समाजस्थितीचे विश्लेषण आणि समानता, बंधुता, न्याय या हक्कांची मागणी ज्या कलात्मकतेच्या अंगाने, पण जीवनाच्या मूल्यांशी बांधिलकी स्वीकारून केली जाते, त्या समग्र शब्दाविष्काराला दलित साहित्य म्हटले जाते. आधुनिक जीवनातील संघर्ष, प्रश्न आणि समस्या यांच्या वाङ्मय स्वरूपातील अभिव्यक्तीला हा शब्द वापरला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे समाजक्रांतीचे प्रभावी विचार मांडले, तेच दलित साहित्याचे प्रेरणास्रोत ठरले. साहित्य हे वेदना व दुःख प्रकट करण्याचे साधन आहे या जाणिवेतून १९६० नंतरच्या कालखंडात अनेक दलित आत्मकथने प्रकाशित झाली.

  • ग्रामीण साहित्य

सीताराम रायकर यांनी लिहिलेली ‘बळीबा पाटील’ ही पहिली ग्रामीण कादंबरी मानली जाते. १९६० च्या आसपास ग्रामीण साहित्य ही संकल्पना अधिक दृढ झाली. त्यांचे प्रकटीकरण साहित्यातून होऊ लागले. यंत्रयुगामुळे खेड्यांवर होणाऱ्या परिणामांचे, ग्रामीण विभागातील सर्वसामान्यांच्या जीवनावर होणाऱ्या शोकात्म परिणामांचे तरल परंतु प्रभावी चित्रण होऊ लागले.

  • वैचारिक साहित्य

वैचारिक निबंध लिहिण्याची मराठीची दीर्घ परंपरा आहे. इंग्रजी भाषेतील हा आकृतिबंध इंग्रजी शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित विचारवंतांनी मराठीमध्ये निर्माण केला. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, जोतिराव फुले अशा अनेक दिग्गजांनी तो समृद्ध केला. १०३० च्या आसपास लघुनिबंध मराठीत अवतरला. वि.स. खांडेकर हे लघुनिबंधाचे जनक, तर ना.सी. फडके हे प्रवर्तक असे मानले जाते.

बालवाङ्मय – मराठी साहित्यात बालवाङ्मयाचे दालन समृद्ध आहे. बालसाहित्याच्या प्रकृतीत, भाषेत, कल्पनाविष्कारात व शैलीत सातत्याने बदल होत गेले. परिणामी ते खूपच वाचनीय, दर्जेदार झाले. हाच अभिप्राय चरित्र-आत्मचरित्रे, प्रवास वर्णने या संदर्भात देता येईल. स्वातंत्र्योत्तर काळातील आत्मकथने आणि प्रवासवर्णने या साहित्य प्रकारांनी फार मोठी उंची गाठली.

  • समीक्षा

पौर्वात्य व पाश्चात्य साहित्यशास्त्राचे ज्ञान असलेले व त्याचे भान ठेवून लेखन करणारे पहिले समीक्षक विष्णुशास्त्री चिपळूणकर होत. १८७४-१९२० या कालखंडात मराठी समीक्षेला भक्कम पाया दिला तो विष्णुशास्त्र्यांनी. त्यानंतरच्या समीक्षापर लेखनात हरिभाऊ आपटे, वि.का. राजवाडे, शि.म. परांजपे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, न.चिं. केळकर आदी अनेक मान्यवरांनी दिलेले योगदान लक्षणीय आहे.