शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे कुशल, संयमी आणि यशस्वी राजकारणी आहेत, हे सर्वांना ज्ञात आहेच. ते एक जगद्विख्यात कलावंत-छायाचित्रकारही आहेत. त्यांनी आपल्या छायाचित्रणाच्या छंदातूनच ‘महाराष्ट्र देशा’ हे  उत्तम आणि संग्राह्य पुस्तक साकारलेले आहे. ‘महाराष्ट्र देशा’ या पुस्तकाविषयी आणि छायाचित्रणाच्या छंदाविषयी… उद्धवजींच्याच शब्दात…

माझा महाराष्ट्र म्हणजे नक्की काय? इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे. महराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहासही आहे. म्हणून हे महाराष्ट्र! इतिहास अनेकांनी शब्दबद्ध केला. अनेकदा तो शब्दबंबाळही केला. महाराष्ट्र जसा आहे तसा दाखवायचा तर फक्त कॅमेरा-लाईटच्या शब्दांतच तो दिसावा. महाराष्ट्र भूमी समृद्ध करणाऱ्या अनेक ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक ‘स्थळां’चे हवाई छायाचित्रण करून, महाराष्ट्र कॅमेऱ्यात शब्दबद्ध केला. यात माझे योगदान काय? संतांच्या भाषेत सांगायचे तर- ‘फोडिले भांडार, धन्याचा तो माल, मी तो हमाल, भारवाही’ मी नेमके हेच केले. कोकणचा नितांतसुंदर समुद्र किनारा, सह्यगिरीच्या दुर्गम कडेकपारी, घनदाट अरण्य, महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करणाऱ्या गोदावरी, कृष्णा यांसारख्या नद्यांचे खळाळते प्रवाह, मालवणच्या समुद्रात विसावलेला सिंधुदुर्ग, महाराष्ट्र देशाचे छत्रपती सिंहासनस्थ झाले तो किल्ले रायगड, उभ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या खंडेरायाचा जेजुरी गड… मराठी माणसांच्या लढ्यात महाराष्ट्राला मिळालेल्या ‘मुंबई’चे वैभव, सात हजार फुटांवरून टिपताना ‘मराठी बाण्या’ने ऊर भरून येत होता. हाच माझा महाराष्ट्र. हेच तुमचे-आमचे वैभव. या वैभवाचे अनेक चिरेबंदी तट आता कोसळताना दिसत आहेत.

महाराष्ट्राच्या पुढच्या अनेक पिढ्यांच्या नजरेत व हृदयात हे वैभव ‘चिरेबंदी’ स्वरूपात जतन व्हावे यासाठीच महाराष्ट्र चित्रबद्ध करून… आपल्यासमोर सादर केला.
महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना माझ्यासारख्या महाराष्ट्राच्या नम्र सेवकाकडून मराठी भूमीचा हा चित्रबद्ध नजराणा सादर करताना मला आनंद होत आहे.

या धाडसी प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी अनेकांचे हातभार लागले. कृतज्ञता यादी मोठीच आहे. त्याही पलीकडे विशेष आभार मानावे लागतील ते सौ. रश्मीचे. सात हजार फुटांवर हेलकावणाऱ्या आणि डोंगरावर, समुद्रावर दरवाजाशिवाय धडधडणाऱ्या, हेलिकॉप्टरमध्ये बसणाऱ्या नवऱ्यास तिने थांबवले नाही. एक पत्नी म्हणून तिच्याही हृदयाचे ठोके अनेकदा चुकले असतील. पण ‘महाराष्ट्र देश’ व माझ्या हवाई भराऱ्या यात तिने आडकाठी आणली नाही.

महाराष्ट्र देशा हे फक्त पुस्तक नाही तर अनेकांच्या अथक परिश्रमांचं ते फलित आहे. पुस्तकाच्या निर्मितीत ज्यांचा हातभार लागला त्यांचे ऋण व्यक्त करणे माझे कर्तव्य ठरते.

हवाई चित्रणाच्या भराऱ्या ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली मी मारू शकलो ते लेफ्टनंट कर्नल अनिल महाजन (रिटायर्ड). हेलिकॉप्टरचे ते सारथी. त्यांचा अनुभव व मार्गदर्शनाशिवाय हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नसता. त्यांचे चिरंजीव पायलट अभिजीत महाजन यांनीही अनेकदा साथ दिली.
अविनाश भोसले यांनी या प्रकल्पासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले नसते तर प्रकल्प जमिनीवरच राहिला असता.
रवी मेनन यांचं विमानतळ परिसरातील कार्यालय हे त्या काळापुरतं आमचं दुसरं घरच बनलं होतं. हवाई चित्रणासाठी गडकिल्ल्यांची निवड करण्यात तसेच भ्रमंतीतही मिलिंद गुणाजी यांची साथ मोलाची ठरली.

‘महाराष्ट्र देशा’ चा इतिहास व त्यासाठी संदर्भ पुरविण्याचा ‘विडा’ इतिहासकार निनाद बेडेकरांनी व सतीश अक्कलकोट यांनी उचलला. गड-किल्ल्यांचा इतिहास व भूगोल पाठ असलेले माधव फडके व महेश कदम यांनीही ‘महाराष्ट्र देशा’चे प्रत्येक पानावरील इतिहासाचे संदर्भ तपासले. अशा इतिहासवेड्या माणसांमुळे हा प्रकल्प ‘अचूक’ बनू शकला.
२००३ सालापासून हवाई चित्रणास मी सुरुवात केली. त्या वेळी इशरार कुरेशी या माझ्या फोटोग्राफर मित्राने कॅमेरा, लेन्स अशा बाबतीत वेळोवेळी केलेली मदत व मार्गदर्शन मला आजही मोलाचे वाटते.

हवाई चित्रणासाठी संरक्षण खात्याच्या अनेक परवानग्या मिळविण्याचे जिकिरीचे काम सुदेश म्हात्रे यांनी केले. हवाई चित्रणातील ज्येष्ठ छायाचित्रकार गोपाळ बोधे यांच्या अनुभवाचा उपयोग झाला. आनंद कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी यांनी वेळोवेळी दिलेले सहकार्य विसरता येत नाही. बहादूर करमसिंग राजपूत हा माझा संरक्षक. हवाई भरारीतही राजपूत माझ्याबरोबर होता.

प्रत्यक्ष ‘पुस्तक’ निर्मितीत अनेकांनी सहकार्य केले. मराठी पुस्तकासाठी दिलीप जोशी आणि इंग्लिश पुस्तकासाठी अंबरीश मिश्र आणि आदित्य ठाकरे यांनी सहज, सोपे शब्दांकन केले.
पुस्तक आटोपशीर किमतीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी ‘सारस्वत बँके’चे योगदान मोठे आहे. एकनाथ ठाकूर यांच्यामुळेच ते शक्य झाले.
लेखाची अक्षरजुळणी करणारे दै. ‘सामना’चे भालचंद्र मेहेर, सुजित कदम व त्यांचे सहकारी यांचाही वाटा महत्त्वाचा आहे. संतोष पाटणकर यांनी सर्व छायाचित्रांचं उत्तम प्रोसेसिंग केल्यामुळेच देखण्या स्वरूपात हे पुस्तक समोर येत आहे. ‘अमेय प्रकाशन’चे उल्हास लाटकर यांनी देखील मोठी जबाबदारी स्वीकारली. मिलिंद नार्वेकर, विद्याधर चव्हाण आणि दिलीप मोहिते यांच्या धडपडीसही दाद द्यावी लागेल. संजय राऊत, रवी जसरा, संजय सुरे, शैलेश पाटील, भूपाल रामनाथकर या माझ्या मित्रमंडळींची साथ-सोबत नसती तर हा प्रकल्प आकारासच आला नसता. या प्रत्येकाने उत्साहाने आपापली जबाबदारी उचलली. वेळ व श्रम याबाबत प्रत्येकाने पुरेपूर झीज सोसली. त्यांचे ऋण मानलेले त्यांना आवडणार नाही.

माझ्या या आगळ्यावेगळ्या छंदाला घरातूनही प्रोत्साहन मिळाले. पत्नी, मुलं आदित्य व तेजस यांनी या प्रकल्पात मनापासून रस घेतला.
शिवसेना परिवाराचे ‘स्मरण’ केल्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणार नाही.
अनेकांचे हात या प्रकल्पासाठी पुढे आले, त्या सगळ्यांना लाख-लाख धन्यवाद! हवाई छायाचित्रण म्हणजे देशाच्या संरक्षण खात्याशी थेट संबंध. संरक्षण व नागरी विमान खात्यातील अनेक अधिकाऱ्यांनी मोलाचे सहाय्य केले…

‘महाराष्ट्र देशा’ मधील निवडक छायाचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सर्वांचे मन:पूर्वक आभार