महाराष्ट्र ही अनेक पंथ-संप्रदाय आणि धर्ममते यांची संगमभूमी आहे. इथे अनेक पंथ-संप्रदाय गुण्यागोविंदाने नांदले आहेत. नाथ, वारकरी, महानुभाव, दत्त आणि समर्थ हे पाच प्रमुख संप्रदाय महाराष्ट्रात आहेत. या पाच संप्रदायांव्यतिरिक्त जैन, बौद्ध, लिंगायत, सिंधी, शीख या एतद्देशीय धर्ममतांचाही लक्षणीय प्रभाव महाराष्ट्रात आहे.

महाराष्ट्रातील धार्मिक प्रबोधनाचा श्रीगणेशा तेराव्या शतकात चक्रधर स्वामी व संत ज्ञानेश्वर यांनी घातला. महानुभाव व वारकरी या दोन संप्रदायांनी महाराष्ट्र हे आपले कार्यक्षेत्र मानून मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती करून धार्मिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवली. एकेकाळी संतमहंतांच्या कार्याकडे टाळकुटे निवृत्तीवादी असे समजून दुर्लक्षच नव्हे तर उपेक्षेने आणि उपाहासाने पाहिले जात होते. पण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सर्वप्रथम संतांच्या सामाजिक-राष्ट्रीय प्रबोधनात्मक कार्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आणि मग संतांच्या सामाजिक दृष्टीचा खरा बोध अभ्यासकांना व समाजाला होत गेला. ‘बुडते हे जन न देखवे डोळा’ अशी व्यापक समाजकरुणा हे संतकार्याचे मूलभूत अधिष्ठान आहे. पुढे या कार्याची थोरवी पटल्यावर जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती असा त्यांचा गौरव करण्यात आला.

विविध संतसंप्रदायांमध्ये झालेल्या संत-महंतांची, मराठीपतींची, उत्तराधिकाऱ्यांची, शिष्यांची यादी खूपच मोठी आहे. आधात्मिक जागरणाबरोबरच ज्यांनी आपल्या धार्मिक कार्यातून सामाजिक कामाला प्रेरणा दिली, त्यात संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशी फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. या सर्व संत-महंतांनी एका विशिष्ट प्रेरणेने वेगळ्या स्वरूपात जनप्रबोधनाचे कार्य केले.

वस्तुतः कीर्तन हा प्रकार धार्मिक प्रचाराचा आणि संस्काराचा भाग आहे. या माध्यमाचा उपयोग सामाजिक व राष्ट्रीय प्रबोधनाकरिता करणारे अनेक कीर्तनकार झाले. आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे आणि युरोपमधील प्रबोधन युगामुळे धर्माकडे तार्किकतेने पाहण्याची वेगळी दृष्टी निर्माण झाली. ही व्यापक दृष्टी येण्यापूर्वी, धर्म हाच समाजधारणेचा एकमेव मूलभूत घटक आहे, असे मानले जात होते. अध्यात्मिक शक्तीची प्रचीती देणारे आणि विविध पंथांचा व संप्रदायांचा प्रवाह पुढे नेणारे काही संत-महंत, अनेक सत्पुरुष या कालखंडात निर्माण झाले. हिंदू परंपरेतील आशय बदलून तो समाजाभिमुख करण्याचेही अनेक सुधारणावादी प्रयत्न झाले. धर्माची भावना आपल्या सीमित आकलन शक्तीच्या पलीकडे जाऊन वैश्विक चैतन्याचा शोध घेण्यास प्रवृत्त करते आणि सुख-दुःखाच्या, आशा-निराशेच्या परिस्थितीतही मनाला अस्वस्थ करून धीर देते. ज्यांनी अशा शक्तीची अनुभूती घेतली आहे, त्याच व्यक्ती समाजाला आधार देण्यास कारणीभूत ठरतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव जसा भिन्न असतो, तसेच या शक्तीचे आकलन करून घेण्याचे मार्गही भिन्न असतात. त्यामुळे हे मार्ग भिन्न असले तरी जाण्याचे अंतिम स्थान एकच आहे, याची अनुभूती ज्यांनी घेतली, त्यांनाच आपल्याकडे संत ही संज्ञा दिली आहे. म्हणूनच ‘साधु दिसती वेगळे। परि अंतरी मिळाले ।।’ या समर्थ उक्तीचाच प्रत्यय आपल्याला विविध पंत-संप्रदायांतील आणि धर्मांतील एकूण जीवनचरित्रातून येतो.