शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आकाशमार्गातून टिपलेल्या छायाचित्रांनी साकारलेल्या ‘महाराष्ट्र देशा’ या संग्राह्य पुस्तकाप्रमाणेच ‘पहावा विठ्ठल’ हेही अनोखे पुस्तक आहे. उद्धवजींनी पंढरीची वारीही आकाशातून केली आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने ती निर्विघ्नपणे पार पडली.  आकाशात डोके सुन्न करणारा आणि भणभणणारा वारा आणि खाली अथांग पसरलेला भक्तिसागर…  पंढरीच्या वारीच्या काळात उद्धवजींनी आकाशमार्गातून टिपलेल्या  छायाचित्रांनी साकारलेल्या ‘पहावा विठ्ठल’ या अनोख्या पुस्तकाविषयी…

पंढरीच्या वारीच्या प्रत्येक दिंडीत, प्रत्येक पालखीत, प्रत्येक फडात इतकेच काय पण मृदंग-टाळांच्या गजरात, कोसळणाऱ्या पावसात, मातीच्या गंधात, झुळझुळणाऱ्या निर्झरात-एकच महामंत्र अखंडपणे निनादत असतो-‘विठ्ठल-विठ्ठल’.

पंढरीचा पांडुरग केवळ मंदिरात न राहता लक्षावधी वारकऱ्यांसमवेत ब्रह्मांड व्यापतो. ‘अनंत रुपे अनंत वेषे देखिले म्या त्यासी । बापरखुमदेवीवरू खूण बाणली तैसी॥’ हा ज्ञानेश्वर माऊलींचा ‘पहावा विठ्ठल’ अनुभव वारीतील लक्षावधी वारकऱ्यांच्या रूपात मा. उद्धवजींनी ‘याचि देही’ घेतला, ‘याचि डोळा’ टिपला, चित्रांकिता केला.
विठूनामाच्या गजराने ‘मातलेल्या’ वारकऱ्यांना पाहून या वारीचा हेवा स्वर्गातील देव-गंधर्वादिकांनाही वाटत असणार. स्वर्गातून वारीसोहळा देवांना कसा दिसत असेल, हे आजपर्यंत कोणालाच माहीत नव्हते. पण ती किमया कॅमेऱ्याच्या माध्यमातून, अंतरिक्ष छायाचित्रणातून मा. उद्धवजींनी केली आहे. हेलिकॉप्टरमधून अशा स्वरूपाचे छायाचित्रण करण्यासाठी वाघाचेच काळीज हवे! शिवसेनेच्या वाघाच्या शक्तीला मा. उद्धवजींनी भक्ती आणि युक्तीची जोड देऊन या चित्रग्रंथात त्रिवेणी संगमच सादर केला आहे. वारकऱ्यांना गीता आणि भागवत हे दोन्ही पवित्र ग्रंथ जीव की प्राण आहेत. भागवताच्या एकादश स्कंधात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या शिष्योत्तमाला भक्ती-ज्ञानाचे बोधामृत पाजले आहे. त्याचे नाव उद्धव! इथेही असा भक्तीचा ग्रंथ निर्माण करण्याची प्रेरणा ज्यांच्या मनात जागली त्यांचे नावही उद्धवच आहे. हा मंगल योगायोग अधिक आनंददायी अहे.
‘महाराष्ट्र देशा’तून धारकरी आणि ‘पहावा विठ्ठल’मधून वारकरी अशा महाराष्ट्र संस्कृतीच्या दोन्ही अंगांचे समग्र दर्शन घडविण्याचे भाग्य मा. उद्धवजींना प्राप्त झाले आहे. आदिशक्ती तुळजाभवानी आणि आदिभक्ती विठूमाऊली दोहींचा कृपाप्रसाद त्यांना पावला आहे. अरूपाचे रूप’ कॅमेऱ्याच्या माध्यमातून साकार करण्याचे कौतुक मा. उद्धवजींनी केले आहे.
‘जे न देखे रवि ते देखे कवि’ अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच आता ‘जे न देखे सूर्यसखा सोयरा । ते देखे उद्धवजींचा कॅमेरा ।’ अशी नवी म्हण मराठीत रुजेल. महाराष्ट्र संस्कृती आणि मराठी भाषा मातेच्या गर्भाप्रमाणे जपणाऱ्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शुभाशीर्वाद या ग्रंथाला अगोदर लाभले आहेतच.
आता श्रीतुळजाभवानी आणि श्रीविठ्ठल यांच्या कृपेने, माऊलींच्या प्रसादाने आणि तुकोबांच्या आशीर्वचनाने मा. उद्धवजींच्या तिसऱ्या नेत्रातून हिमालय आणि भारतातील थोर मंदिरांचे असेच अद्‌भुत दर्शन भाविकांना घडावे अशीच अपेक्षा केली जात आहे.

‘पहावा विठ्ठल’ मधील निवडक छायाचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.