सहकार हा मुळातच लोकशाहीप्रधान असून शैक्षणिक व सांस्कृतिक मूल्यांवर त्याचा भर असल्यामुळे केवळ प्रत्येक व्यक्तीच्या हिताचे संरक्षणच नव्हे, तर त्याचा गुणोत्कर्ष साधण्याचीही आपली जबाबदारी आहे, असे सहकार मानतो. त्यासाठी समाजरचनेच्या सर्व थरांतून सत्ता खेळली जावी आणि पसरली जावी अशी सहकाराची भूमिका असते. महाराष्ट्रातल्या संतांनी ‘एकाकरिता सर्व आणि सर्वांकरिता एक’ या सहकारी भूमिकेला पोषक वातावरण निर्माण करण्याचे महान कार्य केले आहे. ‘एकमेका सहाय्यक करू, अवघे धरू सुपंथ’ असा सहकार युगाचा संदेश संत तुकारामांनी दिला आहे. त्यामुळे भारताची सहकार चळवळीची नांदी महाराष्ट्रानेच केली, असे म्हणता येईल.

भारतात महाराष्ट्रातच १९०४ साली सहकारी पतसंस्था कायदा संमत होऊन या चळवळीला विधिवत संस्थात्मक रूप आले. १९११ साली बॉम्बे सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेची झालेली स्थापना हा सहकारी चळवळीच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा होय. १९१२ साली नवा सहकारी कायदा संमत झाला. कर्जाशिवाय मालपुरवठा व खरेदी-विक्री या क्षेत्रांत सहकारी चळवळीने पदार्पण केले. सहकारी खरेदी-विक्री संघ, दूध पुरवठा संघ, बी-बियाणे पुरविणाऱ्या सोसायट्या असे अनेक क्षेत्रात सहकारी संघ निर्माण होऊ लागले.
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सहकारी चळवळीने नवे रूप धारण केले. कारण देशात लोकप्रतिनिधींचे सरकार आले व सहकार खात्याच्या कारभारात मुंबई सरकारने पहिला क्रमांक पटकावला. शेतकऱ्यांना कारखानदार करण्याचे स्वप्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी साकार केले. निरनिराळ्या प्रकारच्या औद्योगिक सोसायट्या, जंगल कामगार सहकारी संघ, महिलांच्या सहकारी संस्था, घरबांधणी संस्था, इत्यादी विविध क्षेत्रांत सहकारी संस्थांनी आपला विस्तार केला आणि शेतकऱ्यांचे उद्ध्वस्त जीवन सुखमय करण्याचे महान कार्य या चळवळीने साधले. सर्वसाधारण माणूस हा उत्पादक नसला तरी ग्राहक असतोच. व्यापाऱ्यांकडून ग्राहकोपयोगी वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण करून अथवा साठेबाजी करून व अव्वाच्या सव्वा भाव आकारून ग्राहकवर्गाची नाडवणूक केली जाते. त्या दृष्टीने सर्वसाधारण ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी विविध सहकारी ग्राहक भांडारांची सुरुवात करण्यात आली.

राज्य सहकारी बँकेची जडणघडण करण्याचे महत्त्वाचे कार्य वैकुंठभाई मेहता यांनी केले. तर धनंजयराव गाडगीळ यांनी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून सहकाराला बैठक मिळवून दिली. त्यांनी सुरू केलेल्या पीक कर्ज योजनेमुळे ग्रामीण भागातील विकासाला नवी दिशा मिळाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विशेषतः महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सहकार चळवळ महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. शेतकऱ्यांना सबल करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात सहकारी बँकिंगची सुरुवात झाली. पुढे विविध नागरी सहकारी बँका महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू झाल्या आणि ही चळवळ फोफावत गेली. महाराष्ट्रातील सहकार चळवळ सशक्त आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील सहकार चळवळीचे काम अनुकरणीय आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात राज्यात सहकार चळवळीत अनेकांनी योगदान दिलेले आहे. अगदी तालुका पातळीपर्यंत सहकाराचे जाळे पोहोचले आहे.