युती सरकारच्या सुराज्यातील काही ठळक कामे

१९९५ ते १९९९ हा कालावधी म्हणजे शिवसेनेचा तसेच महाराष्ट्राचा सुवर्णकाळ. १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले! एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकला आणि लोकसभेत शिवसेनेचे १५ खासदार निवडून आले. हे सारे आनंददायी होते. एक गोष्ट मात्र निश्चित की, हा काळ शिवसेनेच्या वैभवाचा, ऐश्वर्याचा, अस्मितेचा आणि अभिमानाचा! शिवाजी पार्कवरच्या १४ तारखेच्या सभेत देवदुर्लभ असा शपथविधी झाला. ऐतिहासिक, अविस्मरणीय, अभूतपूर्व आणि ‘न भूतो, न भविष्यती’ असा हा शपथविधी सोहळा राज्यातील जनतेने पाहिला आणि त्यांना कृतकृत्य वाटले, धन्य झाल्यासारखे वाटले. समारंभाच्या वेळी शिवाजी पार्क दुथडी भरून वाहत होते. ‘महाराष्ट्र कोहिनूर’ या पुस्तकात श्री. अशोक चिटणीस यांनी या समारंभाचे असे वर्णन केले. “मनोहर जोशी १४ मार्च ९५ रोजी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ भव्य सोहळ्यात घेणार म्हटल्यावर, युतीमधील शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांत पराकोटीचा उत्साह संचारला होता. मुंबई आणि उपनगरांतून, ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर वगैरे ठिकाणांहून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शाखा-शाखांतील शिवसैनिक मिळेल त्या वाहनाने, झुंडीच्या झुंडीने, भगवी निशाणे फडकवीत आणि भवानीमाता, शिवसेनाप्रमुख, शिवसेना आणि मनोहर जोशी यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत शिवतीर्थाच्या दिशेने जात होते. वातावरणातील उत्साह, जल्लोष आणि आनंद शब्दातीत होता. शिवतीर्थावर व्यासपीठाच्या दृष्टीने मोक्याची जागा बैठकीस मिळविण्याचा साऱ्यांचाच प्रयत्न होता. लेझीम, ढोल, ताशे, झांज आणि टाळ्या वाजवीत जथ्थेच्या जथ्थे दुपारपासून गुलालाची उधळण करीत, भगवे ध्वज उंचावीत आणि फडकवीत शिवतीर्थाच्या दिशेने जाताना दिसत होते. वातावरणास एक विलक्षण उत्साहाची, उन्मादाची आणि आनंदाची झिंगच आलेली होती. रस्त्यांवर मोठमोठे फलक, बॅनर्स, पताका आणि कमानी उभारलेल्या होत्या. वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तांतील आकडेवारीनुसार, त्या दिवशी शपथविधी समारंभात एक लाखाहून अधिक श्रोतृसमुदाय उपस्थित होता. भगव्या ध्वजांमुळे भगवा समुद्रच व्यासपीठासमोर उसळताना दिसत होता. जयजयकाराच्या घोषणांनी तुतारी, ढोल, ताशा आणि लेझीमच्या नादाने आसमंत दुमदुमला होता. संपूर्ण राष्ट्राच्या इतिहासातील हा एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अभूतपूर्व असा शपथविधी समारंभ होता. फटाक्यांच्या आवाजाने आणि आतषबाजीने दीपावलीचा सण त्या वर्षात पुन्हा एकदा अवतरल्याचा भास होत होता. शिवाजी पार्क मैदानाच्या चारही बाजूंच्या उंच इमारतींतील गॅलऱ्या, खिडक्या आणि गच्च्या माणसांनी फुललेल्या होत्या. शिवतीर्थावरील अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या देखण्या व भव्य पुतळ्याजवळ भव्य, उंच आणि रुंद व्यासपीठ उभे केलेले होते. व्यासपीठासमोरच्या पहिल्या रांगेत शिवसेनेचे भाग्यविधाते आणि ‘किंगमेकर’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अतिशय प्रसन्न, तृप्त अशा हास्यमुद्रेने बसलेले होते. शिवतीर्थावर गेल्या तीस वर्षांत व्यासपीठासमोर श्रोत्यांत व प्रेक्षकांत ते प्रथमच बसलेले असावेत! गळाबंद पांढरा शुभ्र झब्बा आणि सलवार, गळ्यात रुद्राक्षांची एक पदक असलेली दुहेरी माळ, काळ्या मोठ्या फ्रेमचा चष्मा आणि कपाळावर उभा ठसठशीत कुंकुमतिलक! स्वप्नपूर्तीचा आनंद त्यांच्या डोळ्यातून आणि हसण्यातून प्रतीत होत होता.” पत्रकारांनी गोपीनाथ मुंडे यांना शिवसेना-भाजपाचे संबंध कसे असतील असे विचारले असता मुंडे म्हणाले, “हम बने तुम बने, इक दूजे के लिए.” मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांनी आपल्या पहिल्याच भाषणात “युतीचं सरकार अन्न, वस्त्र, निवारा पुरविण्यास वचनबध्द आहे,” असे सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे १५ मार्च १९९५ रोजी मंत्रालयात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले. त्यांनी शिवतीर्थावर अफाट महासागराच्या, मावळत्या सूर्याच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शपथ घेतल्यानंतर हातात भगवा झेंडा घेऊन मंत्रालयात प्रवेश केला होता. सर्वत्र उत्सवाचे वातावरण होते आणि ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा ऐकू येत होत्या. दोन्ही नेते मंत्रालयात येताच फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली आणि आज बाळासाहेब ठाकरे मंत्रालयात आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणेच फिटले. गुढीपाडव्याला प्रथमच ‘वर्षा’ बंगल्यावर भगवी गुढी उभारण्यात आली. शिवसेनेचे नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री प्रमोद नवलकर यांनी पुढाकार घेऊन ही गुढी उभारली. ते स्वत: गिरगावातील कार्यकर्त्यांसह चांदीची गुढी घेऊन वर्षावर आले होते. मुख्यमंत्र्यांनी जनता दरबार घ्यायला सुरुवात केली. नव्या गृहनिर्माण मंत्र्यांसह त्यांनी शिवसेना भवनामध्ये जनता दरबार घेतला. असंख्य नागरिकांच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी त्यांनी स्वीकारली. जवळजवळ चार तास मुख्यमंत्री निवेदने स्वीकारीत होते. ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल आणि शिवसेनाप्रमुख यांच्या उपस्थितीत ‘पाऊल पडते पुढे’ ही पुस्तिका प्रसिध्द केली.
ही पुस्तिका म्हणजे युतीच्या राज्यकाळात शासनाने राबविलेले/सुरू केलेले अनेक जनहितवादी उपक्रम व योजना, शासनाची कामगिरी, शासनाचे धोरण, शासनाची दिशा असल्यामुळे थोडक्यात पुस्तिकेतला मजकूर पुढे देत आहे, अधिक माहितीसाठी संबंधित मुद्द्यावर क्लिक करा…

शिवशाही