शिवसेनेच्या युवासेनेने आयएएस, आयएफएस, आयपीएस या केंद्रीय प्रशासकीय सेवांच्या बाबतीत एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. या परीक्षांत यशस्वी झालेल्या मराठी अधिकाऱ्यांचा सत्कार करून न थांबता या सेवांमध्ये मराठी टक्का वाढविण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. याअंतर्गत १०० उमेदवारांची निवड करून त्यांना वर्षभर मोफत प्रशिक्षण देऊन ‘तयार’ करण्यात येणार आहे.
मराठी माणसाला महाराष्ट्रात नोकरीत डावलेले जाऊ नये यासाठी शिवसेनेची स्थापना करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शिवविद्या प्रबोधिनी’च्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या प्रबोधिनीची जबाबदारी शिवसेना उपनेते विजय कदम हे सांभाळीत आहेत.
केवळ नोकरीपुरता विचार न करता शासकीय सेवेतील उच्चपदांसाठी मराठी तरुण तयार करण्याचा निर्धार शिव विद्या प्रबोधिनीतर्फे करण्यात आला आहे. यातूनच आयएएसच्या पूर्व परीक्षेपासून ते थेट मुलाखतीपर्यंत या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण तसेच त्यांना अपेक्षित असणारी सर्व मदत करण्यात येते. आयएएसच्या मुख्य परीक्षेत यश मिळवायचे तर दिल्लीतील कोचिंग क्लासेसना पर्याय नाही, असा एक गैरसमज आहे. मात्र हा गैरसमज दूर करण्याचा शिवसेनेच्या शिव विद्या प्रबोधिनीचा प्रयत्न आहे. शिवसेनेने गेली काही वर्षे आयएएसच्या परीक्षेत यशस्वी होणाऱ्यांचे सत्कार केले, आता मराठी सनदी अधिकारी घडविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. महाराष्ट्रात सध्या कार्यरत असलेल्या सनदी अधिकाऱ्यांमध्ये या उपक्रमातून मराठी टक्का वाढेल, असा शिवसेना-युवासेनेला विश्वास वाटतो.
दिल्लीत राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रतिवर्षी दोन लाख रुपये अभ्यासक्रमासाठी व दोन लाख रुपये राहण्यासाठी खर्चावे लागतात. गरीब विद्यार्थ्यांना इतका खर्च परवडत नाही. पुस्तके, मार्गदर्शक मिळत नाही. या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मराठी तरुणांना शिवसेनेकडून ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाची सविस्तर माहिती आणि अर्ज प्रबोधिनीच्या www.shivvidyaprabodhini.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आगामी काळात केवळ यूपीएससी तसेच आयआयटीच्या प्रवेश परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सुसज्ज ग्रंथालय निर्माण करण्याचीही युवासेनेची योजना आहे.