हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले… भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी महाराजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये शिवाजीराजेंचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात शिवाजी महाराजांना महत्त्वपूर्ण स्थान आहे.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्या पोटी जन्म झालेल्या शिवाजीराजांनी १६८० पर्यंत हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार हाकला. ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजीराजांचे निधन झाले. त्यानंतरही इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे शिवाजीराजे संस्थापक होते.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोलाची माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या दोन हजार सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण असले तरी युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तर व्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांच्याकडून, तर परकीय सत्तेविरुद्ध लढा करण्याकरिता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले. जिजाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीती शास्त्राचे शिक्षण दिले. शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इ.च्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक संत तुकाराम महाराज यांचे महत्त्वाचे मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.
महाराजांचे शिवाजी हे नाव कसे पडले याची एक आख्यायिका आहे. शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले, असे सांगितले जाते. जिजाबाई पुण्यात राहायला गेल्या त्या वेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकात्मक सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. जिजाबाई या शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.
शिवाजी महाराजांचे लढावू आयुष्य, सुरुवातीचा लढा, पहिली स्वारी आणि तोरणागडावरील विजय, शहाजीराजांना अटक, जावळी प्रकरण, आदिलशहाशी संघर्ष, अफझलखानाचा वध, प्रतापगडावरची लढाई, कोल्हापूरची लढाई, सिद्धी जोहरचे आक्रमण, पावनखिंडीतील लढाई, पुरंदराचा तह, मोगल साम्राज्याशी संघर्ष, शाहिस्तेखान प्रकरण, सुरतेची पहिली लूट, मिर्झाराजे जयसिंग प्रकरणे, आग्य्राहून सुटका, सवर्त्र विजयी घोडदौड, राज्याभिषेक, दक्षिणेतील दिग्विजय असा शिवाजीराजांचा एकंदर इतिहास मन भारावून टाकणारा आहे. १६ व्या शतकात शिवाजीराजांनी महाराष्ट्रात जी शिवशाही आणली तशीच शिवशाही पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचे स्वप्न हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले आणि शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांना त्यांचे पिताश्री प्रबोधनकार ठाकरे यांनी संघटना स्थापन करण्याची प्रेरणा दिली होती. या संघटनेचे नाव प्रबोधनकारांनीच ‘शिवसेना’ असे ठेवा असे सुचवले होते. शिवसेना म्हणजेच ‘शिवाजीची सेना’ असे त्यांना अभिप्रेत होते. छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोऱ्याला ‘मावळ’ आणि खोऱ्यातील सैनिकांना ‘मावळे’ असे म्हणत. तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ‘शिवसैनिक’ संबोधले जाते. शिवाजीराजांच्या काळातील ‘मावळे’ तसेच शिवसेनेच्या काळातील ‘शिवसैनिक’ यांच्यात समानांतर आहे. बाळासाहेबांचे ‘शिवसैनिक’ हे मावळ्यांच्या आवेशातच आधुनिक काळातील महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी आपले योगदान देत आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेल्या स्वप्नानुसार १९९५ साली महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार आले होते. आता पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पुन्हा साकारण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे हे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या साथीने मैदानात उतरले आहेत.