प्राचीन काळापासून आजपर्यंत माणसांच्या समाजाने अनेक स्थित्यंतरे पार केली आहेत. आजच्या विकसित समाजव्यवस्थेत पोहोचण्यासाठी माणसांना अनेक समस्या सोडवाव्या लागल्या आहेत. निसर्गदत्त हक्क आणि सामाजिक अधिकार मिळावेत म्हणून माणसांना हक्क नाकारणाऱ्या सत्ताधीशांच्या, समाजघटकांच्या विरोधात आंदोलने आणि चळवळी कराव्या लागल्या आहेत. प्रत्येक काळातील जीवनपद्धती वेगळी होती. त्यातूनच सामाजिक प्रश्न निर्माण झाले. गेल्या दोन-तीन दशकांचे अवलोकन करता, समाजात जगणारा, वावरणारा माणूस अधिक आत्मकेंद्री झाल्याचे जाणवते. त्यातही आजची तरुण पिढी केवळ स्वतःचाच विचार करताना दिसते. शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा सगळ्याच प्रांतात पुरुषांच्या बरोबरीने आज महिलाही वावरत आहेत. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी ही स्थिती नव्हती.

भारतात इंग्रजांची राजवट येईपर्यंत जीवनातील सर्व अंगांविषयी धर्मशास्त्र हाच अंतिम शब्द होता. त्यामुळे तत्कालीन समाजाने सर्व आचार, विचार व संकल्पना या धर्मशास्त्राने निश्चित केल्या होत्या. यामुळे समाजाची कर्तृत्वशक्ती गोठून गेली होती. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील समाजसुधारणेचा पहिला टप्पा हा स्वातंत्र्यपूर्व काळातील अपुऱ्या राहिलेल्या कार्याची घटनात्मक पूर्ती करून त्यात परिपूर्णता आणण्याचा होता. यातील अनेक जुन्या मुद्यांत चळवळींद्वारे नवनवी भर टाकली गेली. स्त्रियांना सत्तेत वाढता सहभाग देणाऱ्या तरतुदी, सामाजिक न्यायाकरिता विभिन्न जातींच्या आरक्षणाच्या तरतुदी, गर्भलिंग परीक्षण कायदा आदी स्वरूपाच्या प्रश्नांवर केलेल्या जागरणाचा एक टप्पा राहिला. पर्यावरण, निवडणूक सुधारणा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, माहितीचा कायदा आदी प्रकारचे लढे हे पुढच्या टप्प्यात लढले गेले आणि सामाजिक सुधारणांचे क्षेत्र अधिक व्यापक बनले.

समाजातील अनिष्ट जातीभेद संपावा, समाज एकसंध व्हावा, स्पृशास्पृशांना समान वागणूक मिळावी यासाठी संतांनी आपल्या ओव्या-अभंगांतून लोकजागरण केले. १८ व्या आणि १९ व्या शतकात समाजजीवनावर वर्णव्यवस्थेचा पगडा अधिक होता. त्यामुळे जातीसंस्थेच्या वृक्षाचा पसारा अधिक वाढतच गेला. समाज अनेक जातींमध्ये विभागला गेला. श्रेष्ठ-कनिष्ठ दर्जा देऊन जाती-जातींमध्ये दरी निर्माण करण्यात आली. मात्र सामाजिक न्यायासाठी ब्रिटिशांनी अनेक कायदे केले. पुनर्विवाहाला संमती देणारा कायदा, सतीबंदी, बालविवाह बंदी आदी कायदे झाले, तरी प्रथा सुरूच होत्या. त्या थांबवण्यासाठी समाजसुधारकांनी केलेले काम मोठे आहे. कायद्याने स्त्री-पुरुषांना समान पातळीवर आणल्यामुळे स्त्रियांना न्याय हक्क मिळावेत यासाठीही चळवळी सुरू झाल्या आणि आंदोलने सुरू झाली. एका बाजूला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी राजकीय आंदोलन सुरू असतानाच, स्त्रिया आणि अस्पृश्य यांच्या सुधारणांसाठीचे कार्य सुरूच होते. गांधीजी, आंबेडकर यांच्यापासून सावरकरांपर्यंत अनेकांनी आपापल्या मार्गाने अस्पृश्योद्धाराचे कार्य सुरू ठेवले. आंदोलने, चळवळी, सत्याग्रहाच्या माध्यमातून चाललेल्या या समाजकार्यात कितीतरी विचारवंत, बुद्धिवंतांनी भाग घेतला होता.

स्वातंत्र्योत्तर काळात कायद्याच्या आधाराने समाज परिवर्तनाचे केलेले प्रयत्न व चळवळीद्वारे झालेले प्रयत्न खूपच मोलाचे ठरले आहेत. शतका-दीड शतकापूर्वीचे प्रश्न वेगळे होते. मध्यकाळातील समस्या वेगळ्या होत्या. आताच्या समस्या वेगळ्या आहेत. या सर्व कारणांमुळे समाजसुधारकांना प्रत्येक काळात वेगवेगळ्या समस्यांचा विचार करावा लागला आहे. मानवाला केंद्रभागी मानून त्याला निसर्गाने, समाजाने, राजसत्तेने दिलेले हक्क आणि अधिकार यांच्या प्राप्तीसाठी झालेल्या प्रत्येक प्रयत्नाच्या साखळीतूनच सामाजिक सुधारणांच्या इतिहासाची वीण विणली गेली आहे.