बाळासाहेबांचे स्वप्न साकार करुया, आपले सरकार आणूया!
उद्धव ठाकरे यांचा घणाघात
(२१ एप्रिल २०१४)
घुसखोर बांगलादेशी, पाकड्यांना हाकलून देणारच. मतांची भीक मागणार्‍यांनो, तुम्हाला देशाचा कारभार करता येणार नाही.
‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा आम्हाला कोणतीच चिंता नव्हती. आज ते आपल्यात नाहीत तरीही आपल्याला ऊर्जा देण्याचे काम ते करीत आहेत. ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी कसोटीचीच आहे. पण बाळासाहेबांना समाधान वाटेल असे काम या निवडणुकीत करूया. आपले सरकार आणूया आणि बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,’ असे आवाहन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कल्याण व वांद्रे येथील अतिविराट सभांत केले तेव्हा लाखोंच्या गर्दीतून महायुतीच्या विजयाचा एकच जयघोष झाला.

बांगलादेशी आणि पाकड्यांविरोधात बोलण्याची तुमची हिंमत आहे काय? असा काँग्रेसला खणखणीत सवाल करतानाच मतांची भीक मागणार्‍यांनो, तुम्हाला देशाचा कारभार करता येणार नाही, आमची सत्ता येणारच आहे आणि ती येताच पाकडे आणि बांगलादेशींना आम्ही लाथ मारून देशातून हाकलून देऊ, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वांद्रे-कुर्ला संकुलातील महायुतीच्या अतिविराट सभेत बोलताना केला.
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा बुरखा टराटरा फाडत तुफान हल्ला चढविला. उद्धव ठाकरे म्हणाले, या देशाचा पंतप्रधान शाही इमाम ठरविणार नाहीत. या देशाचे नागरिक आणि भगवी मतेच देशाचा पंतप्रधान ठरवतील.

 • राहुलची सभा म्हणजे पंक्चर टायर
  वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर रविवारी राहुल गांधी यांच्या झालेल्या सभेची उद्धव ठाकरे यांनी हुर्यो उडवली. कालची त्यांची सभा म्हणजे पंक्चर झालेले टायर अशीच होती. मंचावरही पंक्चर चेहरे आणि समोरही पंक्चर चेहरे. राहुल गांधी यांनीही जातीयवादाचे आरोप करणारे तेच ते तुणतुणे वाजवले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना फटकारले.
 • थोतांड करून निवडणूक लढवणार नाही
  १४ वेळा निवडून आलोय, उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली काय? या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या विधानाचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. जेव्हा निवडणूक लढवायची तेव्हा जरूर लढेन, पण तुमच्यासारखी नाही लढवणार. एकदा शाई लावा आणि पुन्हा पुसा असे थोतांड करून निवडणूक लढवणार नाही. जाईन तर लोकांसमोर जाऊन लढेन, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
   • अजित पवारांना धू धू धुतले

उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना आपल्या भाषणातून धू धू धुतले. अजित पवार किती माजले. त्यांची मस्ती उतरवली पाहिजे. गावकर्‍यांचे पाणी बंद करण्याची भाषा करतात. ही मस्ती जिरवलीच पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. अजित पवार म्हणतात, मी उद्धव ठाकरे नव्हे, उद्धट ठाकरे आहे. आता याला मी काय करणार! मी संतपरंपरा मानतो. शिवरायांना मानतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी समर्थ रामदासांचा अभंगच ऐकवला. संत रामदास म्हणाले,

  • धटाशी आणावा धट, उद्धटाशी पाहिजे उद्धट, खटनटाशी खटनट, अगत्य करी!!
   त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही नम्रपणे वागलात तर नम्र वागेन, पण उद्धट वागलात तर माझ्याही अंगात शिवसेनाप्रमुखांचे रक्त आहे. याद राखा, असा सणसणीत इशाराच त्यांनी दिला. या वेळी शिवसेना नेते अॅड.  लीलाधर डाके, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते आमदार रामदास कदम, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर, महापौर सुनील प्रभू, भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाजपचे आशीष शेलार, अतुल भातखळकर, शायना एनसी, माधव भंडारी, रिपाइंचे अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, गौतम सोनावणे यांच्यासह महायुतीचे उमेदवार शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, किरीट सोमय्या, पूनम महाजन आणि गोपाळ शेट्टी आदी उपस्थित होते.
  • मी ठुमकते… साहेबांच्या धोरणामुळे
   उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या जाहिरातीची जबरदस्त खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे म्हणाले, चॅनेलवर जाहिराती सुरू आहेत. मी पायलट झाले… पवारसाहेबांच्या धोरणामुळे.. आणि एकाने मला मेसेज दाखवला, ‘मी आयपीएलमध्ये ठुमकते… पवारसाहेबांच्या धोरणामुळे’.
  • पर्याय आहे का?
   नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार्‍या काँग्रेसची उद्धव ठाकरे यांनी चांगलीच खिल्ली उडविली. उद्धव ठाकरे म्हणाले, हे मोदींच्या नावाने बोंबलताहेत.. ठीक आहे. मोदींना बाजूला ठेवा…. एक तरी लायक चेहरा आहे का काँग्रेसकडे? दुसरा पर्याय आहे का तुमच्याकडे? सगळे चेहरेच बरबटलेले… सरकारच बरबटलेले… हे बरबरटलेले सरकार देशाची ओळख होऊ शकत नाही. देशाला मजबूत सरकार केवळ आपणच देऊ शकतो. पंतप्रधानपदाचा विश्‍वसनीय चेहरा केवळ आपल्याकडेच आहे.