गद्दार शोधणार तरी कुठे? अडगळीत पडलेले लोकच चढ्या भावाने विकत घेण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादी म्हणजे गद्दार पार्टी. त्यांचा नेताच खंजीर खुपसणारा असेल तर त्यांचे सहकारीही गद्दारच आहेत.
हिंदू संत, साध्वी, एवढेच नव्हे तर शंकराचार्य यांना वर्षानुवर्षे तुरुंगात सडवत ठेवण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केले. संजय दत्तला वारंवार तुरुंगाच्या बाहेर काढता. त्याला एक न्याय व साध्वी प्रज्ञासिंग आणि अतिरेक्यांबरोबर लढणार्या कर्नल पुरोहित यांना दुसरा न्याय, हे का? पण लक्षात ठेवा, या देशातील हिंदू मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. यापुढे हिंदू संतांवरील अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही, अशी जबरदस्त तोफ २३ फेब्रुवारी २०१४ रोजी डोंबिवली येथे झालेल्या महायुतीच्या महासभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डागली.
डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या मैदानावर शिवसेना-भाजप-आरपीआय-स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीची महासभा आज झाली. न भुतो न भविष्यति अशी गर्दी या सभेसाठी झाली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. डोंबिवलीत यानिमित्ताने भगवा माहोल व अपूर्व उत्साह दिसत होता. उद्धव ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन होताच टाळ्यांचा गगनभेदी गजर झाला. आपल्या तडाखेबंद भाषणात त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. केवळ हिंदू साधुसंतांना टार्गेट करणार्‍या दळभद्री सरकारची त्यांनी अक्षरश: सालटी काढली.
उद्धव ठाकरे म्हणाले, सत्तेची पुन्हा स्वप्ने पाहणार्‍या शरद पवारांच्या काळातच महाराष्ट्रात गोवारींचे हत्याकांड झाले. तुम्ही गोवारींचे खुनी आहात. दोन बोटे आमच्याकडे दाखवलीत तर बाकीची सर्व बोटे ही तुमच्याकडेच जातात. संजय दत्त सध्या तुरुंगात आहे. तो गुन्हेगार असेल तर त्याला जरूर फासावर लटकवा अशी भूमिका शिवसेनाप्रमुखांनी घेतली होती, पण तो तुरुंगात जातो काय व पुन्हा देवळातील घंटा वाजविल्यासारखे बाहेर येतो काय. त्याची दिवाळी घरी, नाताळही घरी, सारे काही घरी. मग हाच न्याय प्रज्ञासिंग ठाकूर यांना का नाही, असा रोखठोक सवालही त्यांनी केला. कर्नल पुरोहित हे कश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना जखमी झाले. त्यांच्या गुडघ्याला मार लागला. मात्र त्यांना बॉम्बस्फोटांच्या आरोपाखाली तुरुंगात सडवत ठेवले आहे. देशासाठी लढणे हा गुन्हा आहे काय? त्यांच्याविरुद्ध पुरावे असतील तर जरूर खटला चालवा.
असिमानंद यांची नुकतीच मुलाखत प्रसिद्ध झाली. त्यावरून निर्माण झालेल्या वादाचा धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले की, या मुलाखतीवरूनही बोभाटा केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणतात की, त्यांच्या मुलाखतीत तथ्य असू शकेल. अरे, मग तुम्ही झोपला आहात काय? हिंमत असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण लक्षात ठेवा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हिंदुस्थानचा मोठा आधारस्तंभ आहे. आमचे हिंदुत्व हे शेंडी-जान्हव्याचे नाही हे सरकारने आणि विरोधकांनी लक्षात घ्यावे. मुस्लिमांचा द्वेष आम्ही कधीही केला नाही. उलट देशप्रेमाची भूमिका घेणार्‍या अजमेरच्या दिवाणांचा शिवसेनेने सत्कार केला, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. हिंदुत्वाची आमची वाट ही साधी सरळ आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने हिंदू संतांचा तसेच हिंदू नेत्यांचा छळ करण्याचे न थांबविल्यास आगामी निवडणुकीत देशप्रेमी जनताच त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच त्यांनी दिला.

  • ‘हिरवा पाऊस’ वेळीच रोखा!
    काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सरकारवर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेत पाऊसही हिरवा पडतोय. त्याला वेळीच रोखा. आम्ही भगवं छत्र धरू. डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले प्रदूषण, रसायनमिश्रित पाणी व त्याकडे दळभद्री सरकारने केलेले दुर्लक्ष यामुळेच ही वेळ आली आहे. मात्र महायुतीचे राज्यात सरकार आल्यानंतर या भागातील प्रदूषणकारी कारखाने आम्ही बंद करू अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी देताच टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला.
  • ..आणि चांदीची तलवार उगारली
    शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते चांदीची तलवार भेट देण्यात आली. ही तलवार उद्धव ठाकरे यांनी उगारून दाखविताच एकच जल्लोष झाला. याच तलवारीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारवर आता वार करा अशी मागणी जनसागरातून होत होती.
  • शिवबंधन अधिकच मजबूत झालंय
    २३ जानेवारी रोजी मुंबईत एका श्रद्धेने तमाम शिवसैनिकांनी शिवबंधन आपल्या मनगटावर बांधले. त्यानंतर त्यावर अनेकांनी टीका केली, बातम्या प्रसिद्ध झाल्या. काय तर म्हणे शिवबंधन ढिलं झालंय. पण आज डोंबिवलीतील मैदानावर जमलेला अथांग जनसागर बघितल्यावर मला निश्चित खात्री झाली आहे की हे शिवबंधन अधिकच मजबूत झाले आहे. कारण शिवसैनिक हे एकनिष्ठ वाघ आहेत अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवबंधनाचे जोरदार समर्थन केले.फटकारे
  • पृथ्वीराज चव्हाण यांना बाबा म्हणतात. पण हा भोंदूबाबा आहे. या भोंदूबाबाच्या डोक्यावर राष्ट्रवादीचं ठुसठुसणारं गळू झालंय.

दहा वर्षे सरकारने या देशावर अक्षरश: वरवंटा फिरवला. मात्र या सोंगाड्यांच्या भुलथापांना बळी पडू नका. महायुतीचा मजबूत झेंडा हातात घ्या. कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी पंतप्रधान होणारच. महाराष्ट्राला आम्ही देशात नंबर वन करणारच ही शपथ घेतली आहे.
सरकारनं अन्नसुरक्षा विधेयक आणलं पण सिलिंडर एवढं महाग झालंय की हे अन्न शिजवायचं कुठे? एका ठिकाणी तर या स्वस्त धान्यामध्ये जिवंत उंदीर सापडला. सडलेले धान्य तुम्ही देत आहात. गरिबांनी ही बिर्याणी शिजवायची काय?