भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या युवकांनी देशासाठी बलिदान करून स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या स्वातंत्र्याची फळे चाखणार्या काँग्रेस सरकारने देशाची वाट लावली. महिलांवरील अत्याचार, शेतकर्यांच्या आत्महत्या, महागाई, एकामागून एक बाहेर पडणारे घोटाळे आणि भ्रष्टाचार यामुळे जनता हवालदिल झाली आहे. या नालायक काँग्रेसचा बळी देऊन त्यांच्या छाताडावर भगवा फडकवणारच. कितीही मांजरे आड आली तरी वाघाच्या चालीनेच पुढे जाणार, असा जबरदस्त आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
(२३ मार्च २०१४)
उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी २३ मार्च २०१४ रोजी अंधेरी येथील शेर-ए-पंजाबसमोरील मैदानात तिन्ही पक्षांच्या पदाधिकार्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देश अराजकाच्या दिशेने वाटचाल करतोय असा इशारा दिला होता. कित्येक वर्षांपूर्वी दिलेला हा इशारा आजही खरा ठरतोय. देश अराजकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. आज वर्तमानपत्रांत एकीकडे ‘शहीद दिना’ची जाहिरात छापून येतेय तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, घोटाळे यांच्या बातम्या. याच स्वातंत्र्यासाठी शहिदांनी बलिदान केले का, हेच स्वातंत्र्य त्यांना अपेक्षित होते का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

 • पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये कशाला येता?
  हिंदुत्व म्हटले की शिवसेना-भाजपला धर्मांध ठरवले जाते. मात्र तिथे पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना जितेंद्र आव्हाड मध्ये जातात. शिवसेनेची सुपारी घेऊन आलात का, असे पोलिसांना विचारले जाते. कशासाठी हे सारे मतांच्या लाचारीसाठीच ना? गुन्हेगार, दहशतवाद्यांना कशाला पाठीशी घातले जातेय. मात्र महायुतीचे सरकार आले तर पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनच्या आड येणार्‍यांची मानगूट पकडू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
  या वेळी शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे, महापौर सुनील प्रभू, शिवसेना उपनेते आमदार विनोद घोसाळकर, विभागप्रमुख अनिल परब, आमदार रवींद्र वायकर, पालिका सभागृह नेते यशोधर फणसे, विभाग संघटक राजूल पटेल, उपविभाग प्रमुख सुभाष कांता सावंत, भाजपचे जयप्रकाश ठाकूर, रिपाइंचे कमलेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दिलीप माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी या मेळाव्यादरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे बसपाचे कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाले. उद्धव ठाकरे व विनोद तावडे यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
 • गल्लीत दादागिरी, दिल्लीत लाचारी
  या सरकारचे मंत्री दिल्लीत आपले म्हणणे मांडूच शकत नाहीत. यांची गल्लीत दादागिरी आणि दिल्लीत लाचारी सुरू असते, अशी नेभळट माणसं निवडून देताय म्हणून हे घडतंय. जे सरकार शेतकर्‍यांचे अश्रू पुसू शकत नाही…ते सरकार सर्वसामान्य माणसांना कसं जगू देणार? असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.
 • ही पडद्यावरची भूमिका नाही!
  शिवसेना कायम भूमिपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी लढली. स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अनेक भूमिपुत्रांना नोकर्‍या मिळाल्या. या लोकाधिकार समितीचे गजानन कीर्तिकर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आहेत. ते भूमिपुत्रांची भूमिका लोकसभेत आवर्जुन मांडतील. त्यामुळे पडद्यावरची भूमिका करणार्‍यांना भूमिपुत्रांची भूमिका कळणे कठीण आहे, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी या वेळी काढला. कीर्तिकर यांना शिवसेनेचा खासदार म्हणून निवडून देण्याचा, महायुतीचा खासदार दिल्लीत पाठविण्याचा निर्धार करा, कारण हाच खासदार कायम तुमच्यासोबत असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 • जखमांवरच्या खपल्या कशाला काढता?
  काही झाले तरी गुजरात दंगलींचा विषय काढून नरेंद्र मोदींकडे बोट दाखवले जाते. पण त्याआधी गोध्रा हत्याकांड झाले, हे विसरू नका. मुंबईत राधाबाई चाळ जाळली गेली तेव्हा, दंगली, बॉम्बस्फोट झाले तेव्हा शरद पवारच मुख्यमंत्री होते, हे ते विसरले का? जनतेच्या जखमांवरच्या खपल्या काढण्यातच त्यांना धन्यता वाटते का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
 • अजित पवार शिवांबू पिण्याचा सल्ला देणार का?
  आदिवासी समाजाच्या विजयकुमार गावित यांच्यावर कारवाई केली जाते. त्यांच्या वैद्यकीय शिक्षण खात्याचा कारभार अजित पवार यांनी हाती घेतला आहे. ते आता काय सांगणार, शिवांबू पिण्याचा सल्ला देणार का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
 • शरद पवारांच्या पायाखालची वाळू सरकली – विनोद तावडे
  मोदी आणि महायुतीच्या झंझावातापुढे राष्ट्रवादीचे काही चालणार नाही हे लक्षात येताच शरद पवार यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनी लोकशाहीची थट्टा सुरू केली आहे. नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी १७ एप्रिलला सातार्‍यात मतदान करा. ती शाई पुसून २४ एप्रिलला मुंबईत मतदान करा असा सल्ला आज दिला. लोकशाहीची थट्टा करणार्‍या शरद पवार यांनी जनतेची माफी मागावी, असेही विनोद तावडे म्हणाले.
 • मुंबईतून निवडून जाणार्‍या खासदारांनी काय केले? – सुभाष देसाई
  मुंबईतून निवडून जाणार्‍या कॉंग्रेसच्या खासदारांनी काय केले? हे विचारण्याची वेळ आज आली आहे. निवडणूक येताच ‘खासदार आपल्या दारी’ नावाने पोस्टरबाजी करणार्‍या गुरुदास कामत यांनी मुंबईचे सोडाच, साधे मतदारसंघातील रेल्वे व अन्य प्रश्‍न सोडवले नाहीत. आज पुन्हा ते तुमच्या दारात मते मागण्यासाठी उभे असून त्यांना दारातच उभे करा आणि गजानन कीर्तिकर यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केले.