परळ येथे महायुतीचा प्रचंड मेळावा… राष्ट्रवादी कॉंग्रेस ही फुटपाडी राष्ट्रवादी आहे. त्यांना जागा दाखवून त्यांच्या छाताडावर पाय ठेवायला माझे शिवसैनिक पुरेसे आहेत – उद्धव ठाकरे

परळच्या कामगार मैदानावर शुक्रवारी २८ मार्च २०१४ रोजी महायुतीचा मेळावा प्रचंड गर्दीत पार पडला. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिवसेना नेते मनोहर जोशी आणि दक्षिण-मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत एकीकडे धनदांडगी काँग्रेस आणि दुसरीकडे सर्वसामान्य जनशक्ती अशी ही लढाई आहे. त्यामुळे नुसती पत्रके वाटून चालणार नाही. घराघरात जाऊन प्रचार करा, लोकांशी संवाद साधा. गाफील राहू नका, हवेत राहू नका, असे खणखणीत आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. शिवसेना, भाजप, रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीच्या वतीने परळच्या कामगार क्रीडा मैदानात कार्यकर्त्यांचा मेळावा प्रचंड गर्दीत पार पडला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतानाच महायुतीच्या कार्यकर्त्यांना ‘जागते’ राहण्याचा कानमंत्र दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, ही देशाची निवडणूक आहे. त्यामुळे पेपरवाल्यासारखे घराघरात पेपर टाकू नका. त्यासाठी कार्यकर्त्यांची गरज नसते. कार्यकर्त्यांनी घराघरात जावे… मग तो मतदार काँग्रेसचा असला तरी त्याच्या घरी जा, त्याला त्याच्या प्रश्नांची जाणीव करून द्या, त्याच्याशी संवाद साधा. घराघरात पोहचला नाहीत तर शोभायात्रांना, पदयात्रांना अर्थ उरणार नाही असे सांगतानाच शिवसेनेने सर्वात जास्त मतदार नोंदणी केली आहे. या मतदारांना मतदानासाठी बाहेर काढा, असा कानमंत्रही उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेनेला गळती लागली आहे, तिचा विचार करा असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता त्याची उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. पवार काहीही म्हणोत. त्यांना बोलू द्या. काका-पुतण्या जेवढे बोलतील तेवढा आम्हाला फुलटॉस मिळेल. मग षटकार मारायला बरे असते असे सांगतानाच पवार साहेब, तुमचा पक्षच गळतीमधून निर्माण झाला आहे. गळतं तिथं वाडगं घेऊन जाताय आणि पक्ष उभा केलाय. तुमचा पक्ष आहे कुठे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तर किडूकमिडूक गेले तरी शिवसेनेत गळती झाल्याचे छापून येते असे सांगतानाच शिवसैनिक हीच आमची ताकद असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

(२८ मार्च २०१४)

 • शिवरायांचे स्मारक उभारणार
  प्रत्येक निवडणुकीत शिवरायांचे स्मारक समुद्रात उभारण्याचे काँग्रेस आश्वासन देते, करीत मात्र काहीच नाही. महायुतीच हे स्मारक उभारील. तिथे जातीचेच पाहिजेत, असा टोला लगावतानाच २१ तारखेला मुंबईतल्या सभेत काँग्रेसचा समाचार घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 • मनसेचा बुद्धिभेद
  मनसेकडून बुद्धिभेद केला जात आहे. पण धनुष्यबाण हेच आपले चिन्ह आहे. त्यामुळे जोमाने काम करा. राहुल शेवाळे यांना निवडून द्या, असे आवाहन भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केले.
 • मुस्लिम एकगठ्ठा मतांची मस्ती उतरवा!
  मुंब्य्रात कोम्बिंग ऑपरेशन रोखले जाते. पोलिसांना अडविण्यासाठी जीतेंद्र आव्हाड कडमडतो. कशासाठी? मुसलमानांची वस्ती म्हणून. आणि हे फक्त पाहत राहायचे. कारण तुम्हाला कोण समजतात ते… शेळ्या-मेंढ्या… जाती-पातीत फुटलेले… तुम्ही तर मते देणारच आहात. मुसलमानांची एकगठ्ठा मते दिल्ली दाखवते… त्यांना चुचकारल्याशिवाय जिंकू शकत नाही ही जी मस्ती आहे ती आपल्याला मोडीत काढायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
 • बांगलादेशींचे अश्रू पुसणारे सरकार
  आसाममध्ये बांगलादेशी घुसखोर दंगल घडवतात. पण काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या बांगलादेशींचे अश्रू पुसतात. बांगलादेशी घुसखोरांचे अश्रू पुसणारे हे सरकार आहे. तेच सरकार तुम्हाला हवे आहे काय, असा सवाल करतानाच पुन्हा चुकून जरी काँग्रेसचे सरकार आले तर देशात मोगलाई येईल, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.
 • पृथ्वीबाबा हळू, त्यात झालं गळू
  एकटी मुंबई केंद्राला दीड लाख कोटींचा कर देते, पण मुंबईच्या पदरात फुटकी कवडी पडत नाही. तिकडे ममता बॅनर्जी आणि नितीशकुमार केंद्रातून पॅकेज आणतात. आपले मुख्यमंत्री काय आणतात? काहीच नाही. पृथ्वीराजबाबा मुळातच हळू, त्यात झालं गळू अशी त्यांची अवस्था, अशा शब्दांत पृथ्वीबाबांची खिल्ली उडवतानाच दोन वर्षांचा आमचा कर आम्हाला परत द्या. एकटी मुंबई दोन वर्षांत महाराष्ट्राला कर्जमुक्त करील एवढी ताकद मुंबईत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
 • आता तुमच्याकडे चेहरा कुठाय?
  शरद पवार म्हणतात, पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करून कुणी मते मागत नसतो. काँग्रेसने आजपर्यंत नेहरू-गांधींच्या नावाने मते मागितली तेव्हा आमच्याकडे चेहरा नव्हता. तुमच्याकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार कुठाय, असा सवाल आम्हाला केला जायचा. आता आमच्याकडे चेहरा आहे, तुमच्याकडे चेहरा कुठाय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
 • आमचा राहुलच चांगला!
  उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. त्या राहुलपेक्षा आमचा राहुल (शेवाळे) नक्कीच चांगला, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच हशा उसळला. हाच धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्या राहुलने जेवढी विकासाची कामे केली तेवढी कामे काँग्रेसच्या राहुलनेसुद्धा केली नाहीत. त्या राहुलने फक्त गरिबांच्या घरात राहण्याची नौटंकी तेवढी केली.
 • देशाची छी: थू कुणामुळे?
  आज मात्र गुंतवणूकदारच काय साधे पर्यटकही हिंदुस्थानात येत नाहीत. भ्रष्टाचार्‍यांचा देश, बलात्कार्‍यांचा देश अशी हिंदुस्थानची ओळख झालीय. परदेशात हिंदुस्थानची छी: थू होतेय… कुणामुळे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.