विदर्भात प्रचाराचा झंझावात अमरावतीत महायुतीची तडाखेभंद… प्रचंड… प्रचंड सभा शाई पुसाल, पण शेतकर्‍यांच्या पत्नींचे कुंकूही पुसलेत त्याचे काय? अमरावतीत उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शाई पुसून दुसर्‍यांदा मतदान करा असा सल्ला राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी दिला आहे. बोटाला लावलेली शाई पुसाल, पण शेतकर्‍यांच्या पत्नींचे कुंकूही पुसलेत त्याचे काय, असा संतप्त सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना केला. महायुतीचा झंझावात शनिवारी अमरावती जिल्ह्यात पोहोचला. तिवसा येथे अमरावतीचे महायुतीचे उमेदवार शिवसेना उपनेते खासदार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तडाखेबाज भाषण झाले. या सभेला प्रचंड… प्रचंड गर्दी लोटली होती.
(५ एप्रिल)
शाई पुसून दुसर्‍यांदा मतदान करा, असा सल्ला राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी दिला आहे. बोटाला लावलेली शाई पुसाल, पण शेतकर्‍यांच्या पत्नींचे कुंकूही पुसलेत त्याचे काय? असा संतप्त सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना केला. मतदारांची अशी थट्टा उडवता? असे खडे बोल सुनावतानाच उद्धव ठाकरे यांनी आता शिवसैनिक एकदाच हातावर शाई लावून मतदान करतील आणि तुमचे डिपॉझिट जप्त करतील, असा ठाम विश्‍वास व्यक्त केला.
महायुतीचा झंझावात आज अमरावती जिल्ह्यात पोहोचला. तिवसा येथे अमरावतीचे महायुतीचे उमेदवार शिवसेना उपनेते खासदार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तडाखेबाज भाषण झाले. सायंकाळची वेळ असल्याने मैदानावर लावलेल्या हायमास्टभोवती चिलटांची गर्दी झाली होती. तोच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. निवडणुकीचे वारे वाहत आहेत तसे काँग्रेस-राष्ट्रवादीची चिलटं घोंघावू लागली आहेत, अशी सुरुवात त्यांनी करताच सभेत एकच खसखस पिकली. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना चांगलेच फैलावर घेतले. शिवसेना आता संपली असे म्हणणार्‍या शरद पवार यांना सगळीकडेच गळती शोधायची सवय लागली आहे. कुठे गळती दिसते का हे शोधत ते हातात कटोरा घेऊन फिरत आहेत, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. शिवसेनाप्रमुखांनी आमच्या मनात जे बीज रोवले आहे त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. गळती झाल्याने आता शुद्ध सोने उरले आहे. या निष्ठावान शिवसैनिकांच्या मनातील शिवसेना संपवणे पवारांना शक्य आहे काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच समोर बसलेल्या विशाल जनसमुदायाने हात उंचावून ‘नाही’ असा प्रतिसाद दिला. सगळीकडून अशी सोंगे जमा करून पक्ष उभा करता येत नाही, असे सांगत त्यांनी पवारांच्या ‘शाई’ विधानाचाही खरपूस समाचार घेतला.

  • महायुतीचे सरकारच शेतकर्‍यांचे कर्ज माफ करील
    आत्महत्या करणारा प्रत्येक शेतकरी हा काँग्रेस- राष्ट्रवादीला शाप देऊन फास गळ्याला लावत आहे. ज्यांनी राज्याचा सत्यानाश केला त्यांना पुन्हा डोक्यावर घेऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी या वेळी केले. महायुतीचे सरकार आल्यास आम्ही शेतकर्‍यांचे कर्ज माफ करू, वीज बिल माफ करू अशी ग्वाही त्यांनी जनतेला दिली.
  • मोदींना पाठिंबा देणारा शिवसेनाच पहिला पक्ष
    गेल्या वर्षी मी दिल्लीत गेलो असताना पत्रकारांनी विचारले की देशाचा नेता कोण? त्या वेळी देशाला नेताच उरला नसल्याचे मी स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर लगेच भाजपने आपला नेता म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव घोषित केले. त्याचबरोबर शिवसेनेने त्यांना पाठिंबा जाहीर केला. मोदींच्या पाठीशी उभा असलेला शिवसेना पहिलाच पक्ष असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.