महायुतीचा एल्गार… काँग्रेस-राष्ट्रवादीची चिरफाड… कर्जमुक्तीच हवी!

कर्ज माफ करायला शेतकरी गुन्हेगार आहेत काय? – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सणसणीत सवाल
सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीची केवळ घोषणा करते. अरे माफी गुन्हेगाराला देतात. शेतकरी गुन्हेगार आहे काय? असा जळजळीत सवाल करतानाच कर्जमाफी नव्हे, आम्ही कर्जमुक्तीची घोषणा करत आहोत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. रविवारी यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे यांची जबरदस्त आणि तुफानी सभा झाली. राज्यातील नाकर्त्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारची चिरफाड करणारे तडाखेबंद भाषण उद्धव ठाकरे यांनी केले. या वेळी उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाने शिवसेना झिंदाबादचा नारा देत जणू महायुतीचाच एल्गार केला.
(६ एप्रिल)
सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीची केवळ घोषणा करते. अरे, माफी गुन्हेगाराला देतात. शेतकरी गुन्हेगार आहे काय? असा सणसणीत सवाल करतानाच आम्ही कर्जमुक्तीची घोषणा करत आहोत असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज यवतमाळमधील प्रचंड सभेत जाहीर केले.
आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यातील शेतकऱ्यांना रडवलं, आता लोकसभा निवडणुकीत शेतकरी काँग्रेस-राष्ट्रवादीला रडवणार, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारचा समाचार घेतला.
यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार खासदार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचंड जाहीर सभेत ते बोलत होते. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या भावनेलाच हात घालत त्यांनी आपले भाषण सुरू केले. चोहोबाजूंनी शेतकरी संकटात आहे. अशा परिस्थितीत मतं मागायला आम्हाला लाज वाटते. आम्ही त्यांचे प्रश्न घेऊन सातत्याने सरकारशी भांडलो. एकवेळ दगडाला पाझर फुटेल, पण या सरकारला पाझर फुटला नाही असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लाज असेल तर त्यांनी मतं मागायला येऊ नये, अशा कडक शब्दांत ठणकावले. विदर्भाने शिवसेनेवर सातत्याने प्रेम केले. यंदाही सगळे उमेदवार निवडून द्या आणि सगळे प्रश्न माझ्यावर सोपवा, असे आश्वासन त्यांनी समोर बसलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला दिले.

  • आधीच बाबा हळू,
    त्यात झालं गळू
    गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्यास असमर्थ ठरलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उद्धव ठाकरे यांनी चांगलेच फैलावर घेतले. मदतीत आचारसंहितेची अडचण हे केवळ नाकर्त्यांचे निमित्त आहे. आधीच बाबा हळू, त्यात झालं गळू. हे गळू तुम्ही किती दिवस जपणार, असा सवालही त्यांनी केला.
    महायुतीत महाराष्ट्राचे दर्शन : सुभाष देसाई
    महायुतीत संपूर्ण महाराष्ट्राचे दर्शन होते. राज्यातील प्रत्येक समाजघटकाने महायुतीला पाठिंबा देऊन आमच्यावर मोठा विश्‍वास टाकला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी महायुती निश्‍चितच विजयी होईल, असा विश्‍वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.