परभणीत बुधवारी महायुतीचे तुफान अवतरले. पावसाच्या दणक्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दणदणीत सभा झाली. हिंदुस्थानचा पंतप्रधान आम्हीच ठरवणार… शाही इमाम नाही, असा एल्गार उद्धव ठाकरे यांनी या वेळी केला. या अतिविराट सभेने महायुतीच्या विजयावर जणू शिक्कामोर्तबच केले.
(९ एप्रिल)
”देशातील १०० कोटी हिंदूंना १५ मिनिटांत संपविण्याची भाषा ओवेसी करणार आणि आम्ही ती शांतपणे ऐकून घेणार काय? हा हिंदू मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. आम्हाला पेटवापेटवी करायची नाही, पण याद राखा! आमच्या वाटेला जाण्याचे धाडस करू नका. हा धगधगता अंगार आहे. हात घालाल तर पस्तावाल!” असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी येथील प्रचंड जाहीर सभेत दिला. पावसाच्या दणक्यानंतरही स्टेडियम मैदानावर झालेल्या दणदणीत सभेत उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले की, ”होय, हा हिंदुस्थान आहे. या देशाचा पंतप्रधान आम्हीच ठरवणार, शाही इमाम नाही!”
परभणी येथे महायुतीचे उमेदवार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारार्थ स्टेडियम मैदानावर अतिविराट सभा झाली. या सभेला मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची अक्षरश: सालटी काढली. ”शरद पवारांना शिवसेनेची काळजी लागली आहे. शिवसेनेला गळती लागली असा भ्रम त्यांना झाला. शिवसेना हा महासागर आहे. समुद्राला कधी गळती लागते काय? शिवसेना ही निष्ठावंतांची फौज आहे. मुळात ज्यांचा पक्ष गद्दारीच्या पायावर उभा राहिलाय त्यांना निष्ठेचे मोल काय कळणार! पवारांना कोणी निष्ठा समजावून सांगेल काय?” असा घणाघात या वेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

  • आक्रोश बंद करा… हक्काचे सरकार आणा!
    महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे. गारपिटीने त्याचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले. त्याला उभारी देण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते बेगुमानपणे मतांची लाचारी करत फिरत आहेत. महाराष्ट्रातून ४८ खासदार निवडून द्या. या खासदारांना घेऊन मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाईन. त्यांना सांगेन, तुमच्या सत्तेत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. पूर्वीच्या नामर्द, नेभळट, नालायक सरकारने शेतकर्‍यांची फरफट केली आहे. आमच्या गारपीटग्रस्तांचे कर्ज, वीजबिल माफ करा, अशी मागणी मी स्वत: करेन. अन्याय झाला म्हणून आक्रोश करत बसू नका. आपल्या हक्काचे सरकार दिल्लीत आणि महाराष्ट्रात आणा, असे जबरदस्त आवाहन या वेळी उद्धव ठाकरे यांनी केले.
  • मुसलमान हवा अजमेरच्या दिवाणांसारखा
    आम्ही हिंदुत्ववादी आहोत. पण या देशात हिंदुत्वावर बोललो की आम्ही धर्मांध ठरतो. आमचे हिंदुत्व द्वेष करणारे नाही. आम्हाला मुसलमान हवा तो अजमेरच्या दिवाणांसारखा. पाकड्या मुसलमानांना या देशात थारा नाही. अजमेरच्या दिवाणांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे स्वागत करण्यास स्पष्ट नकार दिला. संपूर्ण हिंदुस्थानात दिवाणांच्या बाजूने बोलणारा फक्त मीच होतो. मीच अजमेरला शिवसेनेचे खासदार पाठवून दिवाण साहेबांचा सत्कार केला. प्रखर देशाभिमानी भूमिका मांडणार्‍या दिवाणांना ‘भारतरत्न’ द्या, अशी मागणी आम्हीच केली याची आठवण करीत नरेंद्र मोदी यांची खांडोळी करण्याची भाषा आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.