उद्धव ठाकरे यांचे जबरदस्त आवाहन; हिंगोलीच्या रामलीला मैदानावर महायुतीची तुफानी सभा
(१० एप्रिल २०१४)
महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा झंझावात सुरू असून आज हिंगोलीत महायुतीची दणदणीत आणि खणखणीत सभा झाली. रामलीला मैदानावर उसळलेला अभूतपूर्व जनसागर पाहून उद्धव ठाकरे म्हणाले, आता हे भगवे वादळ दिल्लीच्या दिशेने घोंघावत निघाले आहे. हे वादळ रोखण्याची हिंमत काँग्रेस-राष्ट्रवादीत नाही. ही महाशक्ती, हा ज्वालामुखी मतदानाच्या दिवशी उसळू द्या!
‘महाराष्ट्रावर गारपिटीचे अस्मानी संकट कोसळले. शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्याचे अश्रू पुसण्यासाठी सरकारला वेळ मिळाला नाही. मदतीचे तर सोडाच, पण कुणी मंत्री-संत्री गारपीटग्रस्त भागात फिरकलाही नाही. हा उद्दामपणा पाहून तुम्हाला संताप येत नाही का? मतदानाच्या दिवशी हा संताप व्यक्त करा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी औषधालाही शिल्लक ठेवू नका!’ असे जबरदस्त आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारासाठी रामलीला मैदानावर अभूतपूर्व अशी सभा झाली. उष्णतेचा तडाखा जाणवत असूनही शिवसैनिकांच्या झुंडीच्या झुंडी मैदानावर येत होत्या.

 • देशातून काँग्रेस गायब करणार
  सोनिया गांधी, राहुल गांधी मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. देशाची बदहालत करून हे मते कसे काय मागू शकतात? मते मागतात आणि वर प्रश्‍न करतात, नरेंद्र मोदी हे जादूगार आहेत काय? देशाची परिस्थिती ते कशी बदलणार? होय! मोदी जादूगारच आहेत. निवडणूक जिंकून सत्तेवर येताच, पहिली जादू करणार. देशातून काँग्रेस गायब करणार! असा ठाम विश्‍वास उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवताच उपस्थित जनसमुदायाने त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महायुतीची ताकद दिवसेंदिवस वाढतच आहे. ही ताकद काँग्रेसला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 • सोनिया ओवेसीवर गप्प का?
  अजमेरच्या दिवाणसाहेबांनी राष्ट्रीय बाणा दाखवला. पाकड्या पंतप्रधानाच्या स्वागताला जाणार नाही, असा ताठ कणा दाखवणारे दिवाणसाहेबांसारखे मुसलमान आम्हाला प्रिय आहेत. येथे राहून पाकिस्तान, बांगलादेशाचे गोडवे गाणार असाल, तर लाथ घालून हाकलून देऊ, असा खणखणीत इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. जवानांचे मुंडके छाटून पाकिस्तानी सैनिक घेऊन जातात. सोनिया गांधी कधी पाकिस्तानबद्दल, ओवेसीबद्दल तोंड उघडत नाहीत. काँग्रेसने गेली ६०-६५ वर्षे मुसलमांनाचा फक्त वापर केला. मुसलमानांनो, सोबत या, देशाशी इमान राखा. तुमच्याकडे मत म्हणून नाही, तर माणूस म्हणून बघू, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिली.
 • दिल्लीत सरकार येईपर्यंत हार-तुरे नाहीत
  महाराष्ट्रात गारपिटीने शेतकर्‍यांचे सर्वस्व धुऊन नेले. शेतकरी उघड्यावर आला. मुले-बाळे उपाशी. घरात अन्नाचा दाणा नाही. शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करेल? एवढी गंभीर परिस्थिती असताना मी हार-तुरे कसे स्वीकारू? जळगाव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडला. दूर-दूरपर्यंत कुठेही पाण्याचा टिपूस दिसत नव्हता. त्या वेळी तेथे जाणे झाले. मोठा सत्कार झाला. हार घातला. हारातील फुलांवर पाणी होते. हे पाणी कुठून आले असा प्रश्‍न पडला. हे शेतकर्‍यांचे अश्रू तर नाहीत! असा विचार येताच अंगावर सरसरून काटा आला. शेतकरी दु:खात असताना कशाला हवे हे हार-तुरे? ज्या दिवशी दिल्लीत आपले महायुतीचे सरकार येईल, त्या दिवशी हार-तुरे स्वीकारीन, अशी भीष्मप्रतिज्ञाच उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली.
 • काँग्रेसचा चेहरा कोणता?
  महायुतीने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींसारखा कणखर चेहरा देशासमोर ठेवला आहे. एखाद्याच्या नावावर निवडणूक लढवणे योग्य आहे काय? असा प्रश्‍न काँग्रेसला पडला आहे. नेहरू, इंदिरा, राजीव यांच्या नावावर काँग्रेसने निवडणुका लढविल्या नाहीत का? सोनियाही तुरुतुरू चालत पंतप्रधान होण्यासाठी गेल्याच होत्या. कलामांनी त्यांना अडवले. राहुलचा तर संबंधच येत नाही. काँग्रेसकडे चेहराच नाही. कुणाच्या नावावर निवडणूक लढवता आहात? देशातील जनतेला हे कळू द्या, असे खडेबोल उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला सुनावले. महात्मा गांधींची काँग्रेस ही केव्हाच संपली. आता सोनिया काँग्रेस उरली आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
 • गांडुळाचे नको, वाघाचे जीवन जगा
  शिवसेना हे भगव्या विचाराचे वादळ आहे. येथे गांडुळांना थारा नाही. जगायचेच असेल तर वाघासारखे जगा, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, परभणीत जोरदार पावसात महाविक्रमी सभा झाली. सभा कसली, माणसांचा महासागर उसळला होता! शिवसेना आणि वादळ हे समीकरणच आहे. नव्हे, शिवसैनिकांना वादळ अंगावर घेण्याची सवयच आहे. हे शिवरायांचे मावळे. बाळासाहेबांचे सैनिक. येथे गद्दारीला स्थान नाही. भगवा विचार पेलणारे खांदे नसतील तर या क्षणी चालते व्हा, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.
 • अशोक चव्हाणांनी ‘आदर्श’ शब्दालाच डांबर फासले!
  नांदेड : अशोक चव्हाणांनी ‘आदर्श’ शब्दच बदनाम केला. या शब्दाला त्यांनी डांबर फासले. ‘आदर्श’ शब्द उच्चारला की शरमेने मान खाली जाते. त्यामुळे ताठ मानेने जगायचे की लाजेने मान खाली घालून तोंड लपवायचे हे ठरवण्याची वेळ आली आहेे, असे खणखणीत प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. नांदेड येथे महायुतीचे उमेदवार डी.बी. पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. ओम गार्डनवर गर्दीने ओसंडून वाहणार्‍या या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करत होते.
 • काँग्रेसला मत म्हणजे इमामाला मत
  शाही इमामांची भेट घेऊन सोनिया गांधी यांनी निवडणुकीला जातीय रंग दिला. इमामाची मते धर्मनिरपेक्ष कशी? कोण देणार याचे उत्तर? ओवेसीच्या मताचा रंग कोणता? ही मतांची मस्ती आता चालणार नाही, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हा जोगवा मागण्याचे जे काम चालू आहे ते नजरेस आणून देणे, त्यातील धोका लक्षात आणून देणे हे माझे कर्तव्यच आहे. अशोक चव्हाणाला मत म्हणजे शाही इमामाला मत, असा वज्राघातच या वेळी उद्धव ठाकरे यांनी केला.