उद्धव ठाकरे यांचा घणाघात
(२० एप्रिल २०१४)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांचा झंझावात रविवारी ठाण्यात अवतरला. सेंट्रल मैदानावर झालेली ही सभा प्रचंड… प्रचंड गर्दीची ठरली. मैदानाचा कानाकोपरा गर्दीने भरून गेला होता. आसपासच्या रस्त्यांवरही ट्रॅफिक जाम झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादान नेत्यांनी सारा देश नागडा केलाय… त्यांना कायमचे गाडून टाका असे घणाघाती आवाहन उद्धव ठाकरे यांनी करताच तमाम ठाणेकरांनी वज्रमुठी उंचावून शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
गेली ६५ वर्षे देश काँग्रेसवाल्यांच्या ताब्यात आहे, पण केवळ महागाई, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, गोरगरीबांची लूट यापलीकडे काहीच मिळाले नाही. भूमिपुत्रांच्या जमिनींवरही यांच्या नेत्यांनी दरोडा टाकला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हाफ चड्डीवाल्यांच्या हाती देश देणार काय, असा प्रश्‍न विचारला पण अखंड देशाचा लुटारू व श्रीमंत भोगी असणार्‍या नादान नेत्यांनी सारा देश नागडा केला आहे. त्यांना कायमचे गाडा, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्यात केला.
शिवसेना-भाजप-आरपीआय-स्वाभिमानी शेतकरी संघटना-राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचे उमेदवार राजन विचारे व डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी सेंट्रल मैदानावर आयोजित केलेल्या अतिविराट महासभेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात खास ठाकरी शैलीने काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या ठिकर्‍या उडविल्या. ते म्हणाले, आजच सकाळी खेडमधून मुंबईत आलो. संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीची भगवी लाट आहे. इथं माझ्यासमोर बसलेली सगळी जिवंत माणसं असून ही गर्दी बघितल्यानंतर राष्ट्रवादीवाले फूक मारून उगीचच त्यांची हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आजपर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या टोळीने देशाला लूट लूट लुटले आणि आमच्या उमेदवारांवर गुन्हा दाखल असल्याचे सांगतात. पण हे गुन्हे तुमच्यासारख्या खून, दरोड्याचे नसून लोकांसाठी केलेल्या आंदोलनांचे आहेत. कल्याणमधील मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचे चुलतभाऊ गणेश पाटील यांच्या कुटुंबाची जमीन स्वत: राजू पाटील यांनीच हडप केली. सगळेच चुलतभाऊ असे कसे?
आमच्याकडे श्रीकांत शिंदे हा खरा डॉक्टर उमेदवार उभा आहे, तर तिकडे संजीव नाईक हा बोगस डॉक्टर असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, नुसती अक्षरं गिरवून शहाणपण येत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी बँकाही लुटल्या असून त्यांनी आता कार्यअहवालापेक्षा भ्रष्टाचाराचा अहवाल प्रसिद्ध करावा. छगन भुजबळ लोकसभेत गेल्यानंतर माझी जागा घेतील असे शरद पवार म्हणतात, म्हणजे ते घोटाळ्यांची जागा घेणार. शरद पवार यांच्याशी आमचे व्यक्तिगत भांडण नाही, पण तुम्ही राजकारण नासवलं. यांची माणसं फोड, त्यांची माणसं फोड हे धंदे केले. शिवसेनाप्रमुखांनी घडवलेली माणसं स्वत:कडे घेतली व त्यांना बिघडवून टाकले. पवारांनी स्वत:चा पक्षही कॉंग्रेस फोडूनच स्थापन केला अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. या लोकांचे सरकार पुन्हा आले तर आपल्या घरादारावर वरवंटा फिरेल असा इशाराही त्यांनी दिला. ठाणे जिल्ह्याचे अनेक प्रश्‍न आहेत. येथून लाखो लोक रोज मुंबईत जातात पण त्यांचे प्रश्‍न कधीही मांडले गेले नाहीत. गल्लीत दादागिरी व दिल्लीत फक्त चाटूगिरी या मंडळींनी केली. त्यांना आता कायमचा धडा शिकवा!

  • राहुल गांधींविरुद्ध तक्रार करणार
    राहुल गांधी यांनी आज मुंबईतील जाहीर सभेत आपल्या अकलेचे दिवाळे काढले. शिवसेना जातीधर्मांमध्ये तेढ निर्माण करीत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, नसलेल्या गोष्टी आमच्यावर लादल्या जात असून ही दंडेलशाही कधीही खपवून घेणार नाही. राहुल गांधींविरुद्ध आम्ही निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करणार असून त्यावर आयोग काय निर्णय देते हे बघणार आहोत. मी निवडणूक लढवली तर तुमचे काय होईल? मी स्वत: १४ वेळा निवडणूक लढवली, पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्याचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, निवडणूक न लढविता मी तुम्हाला एवढे सळो की पळो करून सोडतो, पण निवडणूक लढवली तर तुमचे काय होईल याचा विचार करा.