डॉक्टरने वडिलांना विचारावं, मुख्यमंत्री करताना शिवसेनाप्रमुखांनी शिक्षण विचारले होते काय?
रत्नागिरीच्या प्रचंड सभेत उद्धव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्राची सालटीच काढली.
(१४ एप्रिल २०१४)
रत्नागिरी म्हणजे सावरकर, लोकमान्य टिळक, बॅ.नाथ पै, मधु दंडवते आणि आमचे सुरेश प्रभू… किती मोठी नावे. किती मोठी परंपरा. पण ही परंपरा गुंडागर्दी करून तोडली… म्हणूनच गुंडांशी लढायला मी शिवसैनिक दिलाय… नारायण राणेंचा मुलगा डॉ. नीलेश राणे आपल्या डॉक्टरकीचा टेंभा मिरवतोय… अरे, शिक्षण शिक्षण काय करतोस, ‘डॉक्टर’ने आपल्या वडिलांना विचारावं की त्यांना मुख्यमंत्री करताना शिवसेनाप्रमुखांनी शिक्षण विचारले होते काय? रिबेका मार्क आल्या तेव्हा तुझे वडील कोणत्या भाषेत बोलत होते, असा घणाघाती सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला तेव्हा तमाम रत्नागिरीवासीयांनी ‘शिवसेना झिंदाबाद…’, ‘कोकणी माणूस भडकला, भगवा झेंडा फडकला’ अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून सोडला.
रत्नागिरीत महायुतीचे तुफानच अवतरले. शिवसेना- भाजप – रिपाइं महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची प्रमोद महाजन संकुलात प्रचंड प्रचंड सभा झाली. या वेळी उसळलेल्या भगव्या झंझावाताने शिवसेनाप्रमुखांच्या सभेची आठवण जागवली.
‘कोकण, शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख हे नातं अतूट आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे, कोकण माझं… पण या कोकणातील ही जागा शिवसेनेकडे नाही याची खंत शिवसेनाप्रमुखांना होती. विनायक राऊत हे कडवे आणि निष्ठावान शिवसैनिक. पण या निवडणुकीत जी खालच्या पातळीवर जाऊन टीका सुरू आहे ती मी मुंबईत बसून पाहत होतो. अरे, शिक्षण शिक्षण काय करता. चार अक्षरं गिरवली म्हणजे कोण शहाणा होतो काय? राणेंच्या टीकेला आमच्या विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत पुरावे दाखवून चोख उत्तर दिलंय. पण त्यांना ते वाचता तरी येतं का हे मला माहीत नाही… नारायण राणेंनी स्वत:चे उद्योग सोडून महाराष्ट्रात दुसरे कोणते उद्योग आणले? आणि त्यांचा तो डॉक्टर आहे का कसाई? तुझे शिक्षण तुझ्या कृतीतून दिसायला हवे. शिकला असाल तर कुठेतरी नोकरी मागा, नाहीतरी केंद्रात जाऊन काय दिवे लावलेत ते लोकांनी पाहिलेच आहे. मग शिक्षण काय चाटायचंय, अशी ठाकरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ते म्हणाले, वसंतदादा पाटील सातवी शिकले, पण महाराष्ट्रात जे कर्तबगार मुख्यमंत्री झाले त्यांच्यामध्ये त्यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे. माझे आजोबा शाळा शिकू शकले नाहीत. स्वत: शिवसेनाप्रमुखांना फी भरायला नव्हती म्हणून सातवीतून शाळा सोडावी लागली. पण पुढे त्यांनी हा इतिहास उभा केला.

  • जीभ लांब केली आणि बूट चाटले
    नारायण राणेनी दादागिरी केली, मस्ती केली म्हणून काँग्रेसने त्यांना निलंबित केले. टीका करताना त्यांची जीभ केवढी बाहेर येत होती. जीभ इतकी बाहेर आली की पटकन बूट चाटले आणि निलंबन रद्द झाले असे जबरदस्त तडाखे उद्धव ठाकरे यांनी लगावले.
  • रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, श्रीधर नाईक, अंकुश राणेंचा खून कोणी केला?
    चिपी विमानतळासाठी जागा बळकावली. किती दिवस झाले तरी ते विमानतळ होतंय. सी वर्ल्डचा प्रकल्प आणत आहेत. पण गोरगरिबांच्या जमिनी बळकावून विकास करणार असाल तर आम्ही ते होऊ देणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी बजावले. रमेश गोवेकर, सत्यविजय भिसेंचा खून कोणी केला, श्रीधर नाईकांचा खून कोणी केला, अंकुश राणेला कोणी मारले याचा शोध बाकी आहे. महायुतीचे सरकार सत्तेवर येणारच आहे. ते आले की ही सर्व प्रकरणे उकरून बाहेर काढली जातील हे लक्षात ठेवा, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
  • ज्या तबरेजला गोळ्या घातल्या तो मुसलमान नव्हता का?
    जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणण्यासाठी ज्या तबरेज सायेकरला गोळ्या घातल्या तो मुसलमान नव्हता काय, असा मर्मभेदी सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. नारायण राणेंची साखरीनाटे येथील सभा ऱद्द झाली. मी पोलीस न घेता साखरीनाटेमध्ये एकटा जाऊन दाखवतो. तुम्ही एकटे येऊन दाखवा असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले. ते म्हणाले, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला आमचा विरोध आहे. तुम्ही तो इतर राज्यांत घेऊन जा. काही टक्के विजेसाठी आम्हाला कोकणचा विनाश करायचा नाही. आम्ही वीज विकत घेऊ पण हा प्रकल्प आम्हाला नको, असे त्यांनी ठणकावून सांगितले.