शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंची कणकवलीत ठणकवली
गोठ्यापासून विमानतळापर्यंत खा खा खाणार्‍या राक्षसाला संपवा

(१३ एप्रिल २०१४)
विकासाच्या बोंबा ठोकणार्‍यांना दारोदारी जाऊन मतांची भीक मागावी लागते यावरून त्यांनी कोकणचा कसला विकास केला हे लक्षात घ्या.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कणकवलीत दणदणीत सभा घेऊन राणेंची ठणकवली. ‘उद्योग’मंत्री नारायण राणे यांच्या कोकणातील दादागिरीला चांगलाच सुरुंग लागला आहे. दादागिरीच्या जोरावर गोठ्यापासून विमानतळापर्यंत खा खा खाणार्‍या सिंधुदुर्गातल्या या राक्षसाला संपवा, असे जबरदस्त आवाहन उद्धव ठाकरे यांनी कोकणवासीयांना केले.
शिवसेनेत आता कुणी नाही. शिवसेनेचा बाण मी आणला आहे, अशी वल्गना करणार्‍या राणेंचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, ”माझ्यासमोर जे हजारो शिवसैनिक बसले आहेत ते खरे बाण आहेत आणि राणेंसारखी घाण शिवसेनाप्रमुखांनी एक टिचकी मारून बाहेर काढली आहे.” गोव्याहून कणकवलीत येताना टोल नाका लागला. गोव्यातील त्या टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांनी मला शुभेच्छा दिल्या. म्हणाले, ”येथे त्यांनी तोडफोड केली, मग सिंधुदुर्गात ते घरे फोडत असतील. दादागिरी संपवा त्यांची.” येत्या १७ तारखेला कोकणवासीय राणेंची दादागिरी संपविणार हे आता नक्की झाले आहे. आज काँग्रेसलाच राणे नकोसे झाले आहेत. त्यांच्या दहशतीमुळे त्यांना त्यांचा मित्रपक्ष साथ देत नाही. या माणसाची वृत्ती राष्ट्रवादीला, काँग्रेसला समजली आहे. उद्या शरद पवारांनाही समजेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना संपविण्याची भाषा करणारेच आज संपत चालले आहेत, असा टोला हाणताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘विकासाच्या बोंबा ठोकणार्‍यांना दारोदारी जाऊन मतांची भीक मागावी लागते यावरून त्यांनी कोकणचा कसला विकास केला हे लक्षात घ्या. कोकणचा विकास आम्ही करणार आहोत. इको सेन्सिटिव्ह झोनचा मुद्दा जर तुमच्या घरादाराच्या मुळावर येणार असेल तर केंद्रात सत्ता आल्यावर मी स्वत: तो अहवाल फाडून टाकीन. कोकणात उद्योग आणणार हे नक्की; पण कोकणवासीयांना त्यासाठी बेघर होऊ देणार नाही,” अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिली.

  • सगळेच मला हवे!राणेंना सर्व काही खाण्याचा कसा नाद लागला आहे हे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, ”पेट्रोल पंप माझा, सी वर्ल्ड माझा, पोल्ट्री माझी, त्यातील अंडीही माझी (प्रचंड हशा), हॉटेल माझे… हे काय चाललेय काय? कोकण म्हणजे तुमची जहागिरी आहे काय? काँग्रेसचे विजय सावंत साखर कारखाना काढत आहेत, पण राणेंना तोसुद्धा हवा आहे. राणेंनी काँग्रेस हायजॅक केली असे सावंत उघडपणे म्हणतात. खा खा खाणार्‍या या राक्षसाला आता संपवावेच लागेल अशी प्रतिज्ञा करा,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कोकणवासीयांना केले.
  • दीपक केसरकरांचे अभिनंदन!राणेंच्या दहशतीला विरोध करून त्यांच्या मुलाचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका मांडणार्‍या आणि त्यासाठी थेट राजीनामा देणारे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर अभिनंदन केले. केसरकर यांची भूमिका अत्यंत योग्य असून त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा अभिनंदनीय असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.