निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसच्या रावणाला जनतेची दया येते. आताही तेच घडते आहे. रावण हा रावणच! त्याने कितीही गोंजारले तरी त्याचे खरे रूप काही बदलणार नाही. महायुतीची ही जबरदस्त वज्रमूठ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रावणाला गाडणार आणि त्यांच्या छाताडावर भगवा फडकवणारच, असा एल्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १ मार्च रोजी आयोजित महायुतीच्या महाशिबिरात केला.

गोरेगावच्या नेस्को संकुलात महायुतीचे महाशिबीर जबरदस्त उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. महायुतीच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचे वाभाडेच काढले. काँग्रेसच्या पुतना मावशीला सध्या पान्हा फुटला आहे असे टीकास्त्र सोडून ते म्हणाले, पाच वर्षे आपण आंदोलने करतो, मतदारसंघ बांधतो, पण निवडणुका आल्या की काँग्रेसवाले ब्रिटिशांची नीती अवलंबतात. फोडा आणि तोडाचे राजकारण करून निवडणुका जिंकतात. आजवर असेच घडत आले आहे. पण आता त्यांच्या या गलिच्छ राजकारणाला बळी पडू नका. पानिपतच्या युद्धात या तोडाफोडीमुळेच पराभव झाला, पण आता त्याची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. हा इतिहास पुसून टाकत महायुतीचे पाच पांडव काँग्रेसला गाडून टाकल्याशिवाय राहणार नाहीत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
(१ मार्च २०१४)

 • काँग्रेसला त्यांची जागा दाखवा!
  निवडणुकीतील जागावाटपावरून खेचाखेची करायची नाही हे महायुतीच्या नेत्यांनी ठरविले आहे असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, जे काही जागावाटप झाले आहे त्यात कुणाच्या वाट्याला काय आले आहे याचा हिशेब करण्यापेक्षा काँग्रेसला त्यांची जागा दाखवून द्या!
 • आम्ही करून दाखवतो, मग बोलतो…मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही गेल्या २० वर्षांत कामे केली आणि त्यानंतर आम्ही ‘करून दाखवले’ असे सांगतो, मात्र निवडणुकीच्या तोंडावर २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण, पाणी फुकट देणार अशा घोषणा करून काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल केली जात आहे. काँग्रेस आघाडी सरकारची अवस्था खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशीच झाली असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
 • संरक्षणमंत्र्यांचा लुंगी डान्स सुरू आहेनौदल प्रमुखांनी जबाबदारी ओळखून राजीनामा दिला, पण खरे कारण गेल्या दहा वर्षांत पाणबुड्याच खरेदी करण्यात आल्या नाहीत. हेलिकॉप्टर खरेदी केली, पण त्यातसुद्धा घोटाळा झाला. संरक्षणमंत्री एण्टोनी आणि अर्थमंत्री चिदंबरम यांचा लुंगी डान्स पुंगी डान्स सुरू आहे. पूर्वीची काँग्रेस आता राहिली नाही. ती तर केव्हाच संपली असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या भ्रष्ट आणि नियोजनशून्य कारभारावर जोरदार टीका केली.
 • शिवसेनाप्रमुखांनी सोशल इंजिनीयरिंग केलेजानकर यांनी या वेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुक्तकंठाने गौरव केला. शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्रात सोशल इंजिनीयरिंग चांगल्या प्रकारे केले. त्यामुळेच तळागाळातला माणूस आमदार, मंत्री बनू शकला. त्यांच्या या सोशल इंजिनीयरिंगमुळेच महायुतीत आल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले. या वेळी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई, महापौर सुनील प्रभू, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर आणि भाजपचे प्रवक्ते विनय सहस्रबुद्धे आदींची भाषणे झाली. याप्रसंगी शिवसेना नेते सुधीर जोशी, मनोहर जोशी, अॅड. लीलाधर डाके, गजानन कीर्तिकर, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, दिवाकर रावते, शिवसेना नेते रामदास कदम, भाजपचे नेते राम नाईक, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, रिपाइं नेते अर्जुन डांगळे, तानसेन ननावरे, भूपेश भुल्लर, गौतम भालेराव, सुमंतराव गायकवाड, दयाल बहादुरे, आमदार रवींद्र वायकर, उपनेत्या नीलम गोर्‍हे, विभागप्रमुख विनोद घोसाळकर, अॅड. अनिल परब, उपमहापौर मोहन मिठबावकर आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक आदी उपस्थित होते. याशिवाय महायुतीचे लोकसभेचे शिलेदार खासदार अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, शिवसेना सचिव आमदार विनायक राऊत, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, राजन विचारे, गोपाळ शेट्टी आणि किरीट सोमय्या आदी उपस्थित होते. या संपूर्ण महाशिबिराचे सूत्रसंचालन शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी केले.
 • क्षणचित्रे
  उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि शिवसेना जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनी संपादित केेलेले ‘घोटाळेबाज’ हे पुस्तक उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
  शिवसेना उपनेते अरविंद सावंत यांच्या कार्याचा आढावा घेणारे एमटीएनएल स्थानीय लोकाधिकार समितीने संपादित केलेल्या ‘मावळा’ या कार्यअहवालाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
  आमदार रवींद्र वायकर यांच्या कार्याचा आढावा घेणार्‍या कार्यअहवालाचे आणि आकोटचे आमदार संजय गावंडे यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
 • मुलायमचा पाठिंबा कसा चालतो?मागच्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही निवडणुका जिंकलो. पण आमचे हिंदुत्व म्हणजे मुसलमानांच्या विरोधात नाही, तर राष्ट्रीयत्व आहे. म्हणूनच मोदींच्या नावाने काँग्रेस आघाडी चळाचळा कापते आहे. शरद पवारांना मोदीभेटीबद्दल विचारले तर ते ”अतिरेक्यांना तर भेटलो नाही ना?” असा प्रतिसवाल करतात. पण टीका होताच त्यांना गुजरातमधील नरसंहार आठवतो. गोध्रा हत्याकांडाची ती प्रतिक्रिया होती हे पवार विसरतात. अरे, न्याय मागायला आलेल्या गोवारींना तुम्ही चिरडलेत, शिखांना मारलेत, करसेवकांवर बेछूट गोळ्या चालवणार्‍या मुलायमसिंगांचा पाठिंबा तुम्हाला कसा चालतो, असा थेट सवाल करून, हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केलेत तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला ठणकावले.
 • जहाज बुडतेय
  राष्ट्रवादी काँग्रेसने मारूनमुटकून आपली यादी जाहीर केली आहे. काँग्रेस अजून चाचपडतेय. त्यांचे जहाज बुडणार हे त्यांना पुरते कळले आहे. म्हणूनच बुडणार्‍या त्यांच्या जहाजात कुणीच बसण्यास तयार नाही, असा टोला हाणतानाच काही मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येतील अशीच स्थिती आहे. पण गाफील राहू नका. तशी चूक बिलकूल करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांना बजावले.
 • भगव्यावरची निष्ठाच जिंकेल
  छत्रपती शिवाजी महाराजांनी सालेरचा किल्ला पुरेसे सैन्य नसतानासुद्धा केवळ भगव्यावरील निष्ठेने जिंकला. या निवडणुकीतदेखील छत्रपतींच्या भगव्यावरील आणि शिवसेनाप्रमुखांवरील निष्ठा, महायुतीची एकजूट याच्या जोरावर ही निवडणूक आपणच जिंकणार आहोत. प्रत्येकाने आपणच उमेदवार आहोत असे समजून झोकून द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.