नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी दणदणीत सभा झाली. अलोट गर्दीने बाजार समितीचे विस्तीर्ण मैदान फुलून गेले होते. उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारची पिसेच काढली. गणपतीबरोबर या भ्रष्ट आघाडी सरकारचेही विसर्जन करा, असे आवाहन त्यांनी केले.

नांदेड, दि. ६ (प्रतिनिधी) – ‘कोणत्याही धर्माला आमचा विरोध नाही. माणुसकी हाच धर्म आम्ही मानतो. आम्ही ज्या भूमीला माता मानतो तिला तुम्हीही आई माना, बस्स! मग आमचे भांडण नाही. अरे, हा हिंदुस्थान हिंदूंचाच आहे. पण तुम्ही लव्ह जिहादच्या वल्गना करणार असाल तर आमचा लव्ह हिंदुस्थान आहे. शिवसेनेचे वाघ जिवंत असेपर्यंत ही हिरवी कीड वाढवायला कुणाची माय व्याली नाही!’ असा सज्जड दम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोहा येथील विक्रमी सभेत भरला. दोन दिवसांनीच गणरायाचे विसर्जन होणार आहे. तेव्हा राज्यातून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचेही कायमचे विसर्जन करा, असे जबरदस्त आवाहनही त्यांनी यावेळी केले.
लोहा येथील बाजार समितीच्या विस्तीर्ण मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दणदणीत सभा झाली. आज मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन. हाच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मॉंने दिलेला जनसेवेचा वसा घेऊन मी आपल्या दर्शनाला आलो आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच मैदानावर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. माणुसकी हाच आमचा धर्म आहे. कोणत्याही धर्माला आमचा विरोध नाही, परंतु येथे राहून मातीशी बेइमानी करणार असाल तर ते खपवून घेतले जाणार नाही. आम्ही ज्या भूमीला आई मानतो तिला तुम्हीही आई माना, बस्स! झगडा बंद! पण या मातीत राहून लव्ह जिहादच्या वल्गना करणार असाल तर गाठ आमच्याशी आहे. शिवसेनेच्या वाघांमध्ये ही हिरवी कीड उपटून टाकण्याची धमक आहे, असा सणसणीत दम यावेळी उद्धव ठाकरे यांनी भरला. तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या हाजीसया दर्ग्याला विकासासाठी मदत करू, असेही ते म्हणाले.
येत्या सोमवारी राज्यभर गणेश विसर्जनाची धूम असणार आहे. त्यानंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीत तुम्ही सत्ताधारी कॉंग्रेस- राष्ट्रवादीचेही कायमचे विसर्जन करून टाका, असे खणखणीत आवाहन त्यांनी यावेळी केले. आपण मोरयाला पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप देतो, पण या कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांची मात्र ‘कायमचेच जा, पुन्हा येऊ नका,’ अशा शब्दांत पाठवणी करावी लागणार आहे. महाराष्ट्रात कधी या दोन पक्षांची राजवट अस्तित्वात होती हे कळताच कामा नये, असेही ते म्हणाले.
माजी आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवबंधन धागा बांधून भगवा ध्वज त्यांच्या खांद्यावर दिल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, पक्षा-पक्षातला फरक काय असतो ते तुम्हाला आता कळेल. राष्ट्रवादीत तुम्ही गुदमरत होतात. आता इकडे आलात. माझ्याकडे बघा, मी कोणत्याही पदावर नाही. मुख्यमंत्री, मंत्री वा निवडणूक लढवणारा नेता नाही. तरी राज्यात जिथे जिथे जातो तिथे तिथे माझ्या सभांना लाखा लाखांची गर्दी होते. ही उद्धव ठाकरे नव्हे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची कमाल आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा विसर पडू देऊ नका. शिवबंधन हे तुम्हाला जोडण्याचे निमित्त आहे. खरे बंधन हृदयाचे आहे. त्यामुळे यापुढची कारकीर्द चांगल्या कामांनी भरू द्या, तुमच्या कामांचा प्रताप महाराष्ट्राला दाखवून द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बोगस जाहिरातींचे कागद कॉंग्रेसवाल्यांच्या थोबाडावर मारा!
या निवडणुकीत आपला निभाव लागणार नाही याची पक्की खात्री असलेल्या कॉंगे्रस-राष्ट्रवादीवाल्यांनी जाहिरातींसाठी अमाप पैसा ओतला. त्या जाहिरातींचे कागदच उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवले. रस्त्यांचे चौपदरीकरण, व्याज-कर्जमुक्ती, क्रीडा धोरणात विकास, सिमेंट बंधारे, औद्योगिकीकरण अशा अनेक क्षेत्रांत महाराष्ट्र पुढे असल्याच्या थापा या जाहिरातींमधून आघाडी सरकारने मारल्या. यातील तुम्हाला काही मिळाले काय, असा प्रश्‍न त्यांनी समोर उपस्थित जनतेला विचारताच सर्व मैदानातून ‘नाही!’ असाच आवाज उठला. या जाहिरातींचा पैसा एखाद्या चांगल्या योजनेत लावला असता तर असे शेण खायची वेळ आली नसती, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. एकदा आणि एकदाच फक्त आपले सरकार निवडून द्या. ज्यांनी ज्यांनी पैसा खाल्ला त्यांना उलटे टांगून त्यांच्या पोटातून हा पैसा बाहेर काढीन, असा विश्‍वास त्यांनी दिला.

राष्ट्रवादीला लागली कळं, पक्ष थेंब थेंब गळं…
तुमच्याकडे दुबार-तिबार पेरण्या कराव्या लागल्या. पण यातून हाती किती लागणार? तुम्हाला दिलासा द्यायला तरी कुणी आले काय? आपले माजी कृषिमंत्री शरद पवारही आता पक्षाला वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. काय वाट्टेल ते करा, पण पक्ष फुटू देऊ नका, असे सांगण्याची वेळ त्यांच्यावरच आली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली. पक्ष तुमच्या ताब्यात राहिलाय कुठे? शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही आपली गद्दार पार्टी वाढवली, ती पण आता फुटू लागली. राष्ट्रवादीला लागली कळं, पक्ष थेंब थेंब गळं अशी अवस्था झाल्याची खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली. शिवशाहीच्या काळातील कामे मोजा, हवे तर भ्रष्टाचारही काढा आणि आघाडी सरकारचीही कामे आणि भ्रष्टाचार काढा, एकदा होऊन जाऊ द्या, असे आव्हान त्यांनी दिले.
शिवसेना सचिव आदेश बांदेकर, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोेरात, हिंगोलीचे जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव, शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते अमोल कोल्हे, खासदार रवी गायकवाड, संजय जाधव, आमदार प्रदीप जयस्वाल, मीरा रेंगे पाटील, जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ठाणेकर कुटुंबीयांचे सांत्वन
शिवसेनेचे मुखेड तालुकाप्रमुख शंकर ठाणेकर केवळ तुमचाच नव्हता तर तो आमचाही, बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक होता. शंकरच्या मारेकर्‍यांचा शोध घेऊन त्यांना फासावर लटकविण्यासाठी शिवसेना संपूर्ण पाठपुरावा करेल आणि मी तुमच्यामागे खंबीरपणे उभा राहणार असून न्याय मिळवून देणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणेकर कुटुंबीयांचे सांत्वन करताना सांगितले. यावेळी शंकर पाटील ठाणेकर यांचा मुलगा मंगेश, सासरे व्यंकटराव पाटील, मेहुणे राजेश पाटील, संतोष भायेगावे, भाची जयश्री गणेश भायेगावकर आदी उपस्थित होते.