उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये दणदणीत सभा
(१९ एप्रिल २०१४)
सह्याद्री कुणाच्याही पचनी पडणार नाही, अफझलखान सह्याद्री गिळायला आला होता, पण त्याचा कोथळाच पायथ्याशी पडला ही सर्व शिवाजी महाराजांची ताकद आहे. शिवरायांच्या त्याच वाघनखांनी जनता काँग्रेसचा कोथळा बाहेर काढणार असा जबरदस्त इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी येथील गोळीबार मैदानावर झालेल्या प्रचंड जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची अक्षरश: सालटी काढली.

सभेने गोळीबार मैदानावर आजवर झालेल्या सभांच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडले. या जनसागराला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, काल नाशिकला होतो. तेथे भुजबळांच्या पाठीवर वळ काढून आता इथे तटकरेंना फटके मारायला आलो आहे. शरद पवारांनी उमेदवारांचे बायोडाटा मागविले… पेण अर्बन बँक, रोहा बँक बुडवल्या. लाखो खातेदारांना गंडवले. आता रिझर्व्ह बँक बुडवायला दिल्लीत जा, म्हणून त्यांनी तटकरेंना उमेदवारी दिली. अजित पवार एकदा म्हणाले होते की, त्यांनी संस्था उभ्या केल्या. शिवसेनाप्रमुखांनी काय केले?… अरे तुम्ही भ्रष्टाचाराच्या पैशातून कारखाने – संस्था आणि तुमच्या कुटुंबीयांच्या नावाने इमले उभे केले असाल, पण शिवसेनाप्रमुखांनी या महाराष्ट्रात, या हिंदुस्थानात हिंदू आणि मराठी माणसाला उभे केले हे विसरू नका. तुमच्या दीडशे पिढ्या जन्मल्या तरी अशी माणसे तुम्हाला उभी करता येणार नाहीत. गोरगरिबांचा  पैसा खाऊन बंगले बांधलेत. कसली टीमकी वाजवतायत? सह्याद्री गिळलात, आता हिमालय गिळायला निघालायत काय? असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, सुनील तटकरे हे पवार काका-पुतणे यांचे चेले आहेत. तटकरेंवर भ्रष्टाचाराचे  अनेक आरोप आहेत आणि पवारांच्या आशीर्वादाशिवाय तटकरे काहीच करीत नाहीत. अजित पवार म्हणतात, सुप्रिया सुळेंना मतदान केले नाही तर तुमचे पाणी तोडू. यांची मस्ती वाढतेय. उद्या यांचे सरकार आले तर विकासाचा आव आणून तुमच्या जागा स्वस्तामध्ये घेतील आणि नंतर सोन्यापेक्षाही अधिक भावाने विकून टाकतील अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली. शरदकाका म्हणतात, तो आवाज माझ्या पुतण्याचा नाही. मग सोलापूरचे भय्या देशमुख जेव्हा अजित पवारांकडे पाण्याची समस्या घेऊन गेले होते तेव्हा पवार यांनी धरणात पाणी नाही मग लघवी करू का? असे वक्तव्य केले होते. तो आवाज अजित पवारांचाच होता ना? मग शरद पवारांनी का नाही त्यांची जीभ हासडली?  असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

  • शार्पनर पेन्सिलीला टोक काढतो
    मी मवाळ बोलतो असे इतरांचे म्हणणे आहे. पण लक्षात ठेवा तलवारीने पेन्सिलीचे टोक काढता येत नाही. शार्पनर गोल गोल फिरून पेन्सिलीला टोक काढतो. माझीही भाषा तशीच आहे. मी उद्दामपणे बोललो तर घरी गेल्यावर शिवसेनाप्रमुख रागावतील अशी भीती मला आजही वाटते. कारण तेच मला सांगायचे की, आपण शून्य आहोत, आपली पूर्वपुण्याई आणि जनताजनार्दनाचा आशीर्वाद यामुळेच आपण आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी  सांगितले.
  • शरद पवारांवर चारोळी
    भ्रष्टाचाराचा महामेरू…गरिबांना पिळणारू… अखंड देशाचा लुटारू… श्रीमंत भोगी
  • कुणीही आला तरी भुईसपाट करणार
    आमच्यासमोर कुणीही आडवा आला तरी त्याला भुईसपाट करणारच असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी शेकापला दिला. अरे, उमेदवार उभे करायचे होते तर अस्सल शेकापचे करायचे. हे कदम आणि जगताप यांच्यासारखे राष्ट्रवादीतून आयात केलेले उमेदवार कशाला? शेकापच्या नेत्यांचा निर्णय कार्यकर्त्यांना मान्य नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. कोळी बांधवांसोबत धनगर समाजही आपल्यासोबत आला आहे. सर्वजण भगव्याखाली एकत्र येत आहेत पण इथे कोण जातीपातीचे राजकारण करत असतील, कुणबी-मराठ्यांमध्ये जातीचे विष कालवत असतील तर ते आपले दुश्मन आहेत हे लक्षात ठेवा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.