(१२ एप्रिल २०१४)
महायुतीच्या प्रचाराचे जबरदस्त तुफान
नाशकात उद्धव ठाकरे यांची विराट… अतिविराट सभा
कोकण, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भानंतर उद्धव ठाकरे यांच्या सभांचा झंझावात शुक्रवारी नाशकात अवतरला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर महायुतीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची विराट अतिविराट सभा झाली. नाशकातील घोटाळेबाज भस्मासुर आणि भ्रष्टासुराचा मतदानयंत्रात राजकीय वध करा असे खणखणीत आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
नाशिक-मुंबईपासून दिल्लीच्या महाराष्ट्र सदनापर्यंत घोटाळे करणारे छगन भुजबळ म्हणजे सर्वव्यापी भ्रष्टासुर आहे. दिसेल तिथे घोटाळे करणार्‍या या नाशकातल्या भस्मासुर आणि भ्रष्टासुराचा मतदान यंत्रात राजकीय वध करा, असे खणखणीत आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची दणदणीत आणि खणखणीत सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झाली. या वेळी प्रचंड गर्दीने लोटलेल्या बळीराजा आणि मतदारराजाने वज्रमुठी उंचावून फुटणार नाही, तुटणार नाही, देशात आणि राज्यात शिवशाहीचे तोरण बांधणारच, असे वचन उद्धव ठाकरे यांना दिले.
भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांची आठवण जागवली. ते म्हणाले, ही प्रचंड गर्दी पाहून १९९४च्या शिवसेनेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने झालेल्या शिवसेनाप्रमुखांच्या सभेची आठवण होतेय… याच मैदानाने विधानसभेवर भगवा फडकविला होता. आता लोकसभेवर पुन्हा भगवा फडकेल याची खात्रीच नव्हे तर विश्‍वास आहे, असे त्यांनी सांगतानाच टाळ्यांचा प्रचंड गजर झाला. भ्रष्टाचार, घोटाळ्यांचा पंचनामा करतानाच उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि छगन भुजबळ यांना जोरदार तडाखे लगावले. पालकमंत्री छगन भुजबळ यांचा समाचार घेताना ते म्हणाले की, नाशिकचे प्रश्‍न बिकट आहेत. ज्या गंगापूर धरणातून पिण्याचे पाणी पुरवले जाते तेथे यांनी बोट क्लब सुरू केले. बोटी फिरतायेत. त्याचे डिझेल-पेट्रोल पाण्यात मिसळेल. त्याने माझ्या नाशिककरांना जे आजार उद्भवतील त्याची जबाबदारी पवार-भुजबळ घेणार आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित करून ते म्हणाले की, विकास-विकास म्हणून दाखवायचा. माणसांची थडगी उभारायची. त्यावर इमारती बांधायच्या… असा विकास तुम्हाला मान्य आहे का, असा प्रश्‍न करताच जनसमुदायातून नाही… नाहीचा नारा घुमला.

भ्रष्टाचाराचे महामेरू, हिंदुस्थानचे लुटारू, श्रीमंत भोगी! उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवारांना खा-खा सुटली आहे, ते स्वत:ला जाणता राजा म्हणवतात. पण छत्रपती शिवाजी महाराज हे एकच जाणता राजा झाले. दुसरा कुणी होऊच शकत नाही. गरिबाच्या  भाजीच्या देठाला हात लावता कामा नये, असा हुकूम त्यांनी आपल्या सैन्याला दिला होता. ते शिवराय कुठे आणि स्वत:च्या संस्थांसाठी दुकान, कंपन्या, कुटुंब आणि बगलबच्च्यांसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी हडप करून त्यावर इमले बांधणारे हे नालायक जाणते राजे कुठे? त्या जाणत्या राजाला निश्‍चयाचा महामेरू म्हणत; पण पवार तर भ्रष्टाचाराचे महामेरू! बळीराजाची पिळवणूक करणारे, अखंड हिंदुस्थानचे लुटारू आहेत. शिवराय श्रीमंत योगी होते, हे श्रीमंत ‘भोगी’ आहेत. भोग भोग भोगतायत. आता तुमचे संपले. देशात, राज्यात आग पेटलीय. तुमच्या पापाचा घडा फोडायला जनताजनार्दन आतूर झाला आहे असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. चल फूट म्हणायचे! मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले की, मतदान करताना कुणी मध्ये फूट पाडायला आले, तर त्यांना ‘चल फूट म्हणायचे.’ आम्ही मोदींचा मुखवटा लावून आलो नाही, स्वच्छ चेहर्‍याने समोर आलोय. मी मोदींना आडमार्गाने पाठिंबा देत नाही, मी सरळ मार्गाने जाणारा माणूस आहे. ज्यावेळी नरेंद्र मोदींचे नाव ठरवत होते, त्यावेळी राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी माझ्याशी बोलले. शिवसेनेशी बोलल्यानंतर नरेंद्र मोदींचे नाव जाहीर झाले. आज मोदींच्या मजबूत नेतृत्वाची देशाला गरज आहे, ते पंतप्रधान होणारच. शिवसेनेत असताना पवारांनी भुजबळांना मंत्रीपदाचे तुकडे फेकले आणि ते शेपूट हलवत गेले. पण शिवसैनिक म्हणजे वाघाची औलाद आहे. त्यांच्या वाट्याला जाऊ नका. गुंडागर्दी कराल तर जशास तसे उत्तर देऊ. जर कोणी चालून आला तर हात जागेवर ठेवणार नाही, तुमच्या भुजातले बळ तुमच्याकडे असू दे. माझ्यासमोरचा जनसमुदाय हा धगधगता निखारा आहे.