उद्धव ठाकरे यांचा खणखणीत सवाल
(१७ एप्रिल २०१४)
सगळ्या मुसलमानांशी वैर नाही. सत्ता आल्यास बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देणार.
देश अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हातात देऊ नका, असे विधान करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज खणखणीत शब्दांत समाचार घेतला. बलात्कार्‍यांचे गुणगान गाणार्‍या मुल्लामुलायमपेक्षा अर्धी चड्डीवाले शतपटीने चांगले आहेत. त्यांना संस्कृती आहे. मुलायम आणि ओवेसी तर रझाकारांची अवलाद आहे, असे आसूड ओढतानाच अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हातात देश नाही द्यायचा तर तुमच्यासारख्या बकासुरांच्या हाती देश द्यायचा का, असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
उत्तर-पश्‍चिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी वर्सोवा कोळीवाड्यांत आज उद्धव ठाकरे यांची प्रचंड सभा झाली. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, पवारांच्या विरोधात बोलायचे नाही हे मी रोज ठरवतो, पण दुसर्‍या दिवशी फुलटॉस येतो. अर्ध्या चड्डीवाल्यांवर टीका करणार्‍यांनो, अर्धा चड्डीवाला काय करू शकतो हे दादा कोंडकेंनी दाखवून दिले आहे ते जरा ध्यानात घ्या (टाळ्या). गोर्‍यांना गोरगरीबांचे दु:ख कळावे म्हणून महात्मा फुले हे पंचम जॉर्जकडे फाटक्या वेषात आले होते. ते गोरे गेले, आता कपड्यांची चेष्टा करणारे हे गोरे आले.
या वेळी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, रिपाइं नेते अविनाश महातेकर, महापौर सुनील प्रभू, महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर, उपनेते डॉ. विनोद घोसाळकर यांची भाषणे झाली. याप्रसंगी सौ. रश्मी ठाकरे, उपनेते अनंत तरे, विभागप्रमुख, आमदारअॅड. अनिल परब, रवींद्र वायकर, भारतीय कामगार सेनेचे जयवंत परब, गुरुनाथ खोत, जनता दलाचे माजी आमदार मोतीराम भावे, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, रिपाइं नेते कमलेश यादव, भाजप नगरसेवक दिलीप पटेल, महिला विभाग संघटक राजुल पटेल, साधना माने, प्रभाग समिती अध्यक्ष राजू पेडणेकर आदी उपस्थित होते.

  • महिला आताच दिसल्या का?
    काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फसव्या जाहिरातींचाही उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. महिलांना २५ टक्के नोकर्‍या पोलीस खात्यात देण्याच्या जाहिराती त्यांनी केल्या आहेत. निवडणुकीच्या वेळेसच या जाहिराती का? महिला काय आताच जन्माला आल्या का? इतकी वर्षे तुमचेच सरकार होते ना, मग झोपला होता काय, असा प्रश्‍नांचा भडिमार करतानाच आझाद मैदानात महिला पोलिसांवर हात टाकणार्‍या नराधमांना काय शिक्षा केली याचा जाब द्या, असा जबरदस्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
  • हाकलले तरी मोदी मोदी…
    उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही त्यांचे नाव न घेता टोले लगावले. आग लावणारी भाषणे करणे सोपे असते, पण घरातील चुली पेटवणे अवघड असते. शिवसेनेने चुली पेटवण्याचे काम केले असे सांगतानाच राजनाथ सिंह यांनी हाकलले तरी यांचे मोदी मोदी सुरूच आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
  • कायदे मोडून कोळी बांधवांना घरे
    सीआरझेडचा बागुलबुवा दाखवून कोळी बांधवांना घरे दिली जात नाहीत. माणसे कायद्यासाठी आहेत की कायदा माणसांसाठी आहे? आमचे सरकार आले तर असले कायदे तोडून-मोडून टाकून कोळी बांधवांना घरे देऊ अशी उद्धव ठाकरे यांनी घोषणा करताच ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणेने अख्खा कोळीवाडा दणाणून गेला.