शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगरच्या प्रचंड जाहीर सभेत संतप्त सवाल
(१६ एप्रिल २०१४)
देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यास राष्ट्रीयत्व धोक्यात येईल, अशी भीती सोनिया गांधी यांना वाटते. आता काय देशभक्तीचे धडे इटालियन सोनियांकडून घ्यायचे, असा संतप्त सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सोनियाबाई, आम्हाला राष्ट्रप्रेम शिकवू नका! ते आमच्या रक्तातच आहे. शिवरायांच्या तेजस्वी विचारांचा वारसा अंगाखांद्यावर आम्ही मिरवतो, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस विसर्जित करा, अशी सूचना महात्मा गांधींनी केली होती. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विसर्जन करून गांधीजींचे हे स्वप्न आम्ही पूर्ण करणार म्हणजे करणारच, असा दुर्दम्य आत्मविश्वासही या वेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी आज मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशाल सभा झाली. उद्धव ठाकरे हे भाषणाला उभे राहताच फटाक्यांची जबरदस्त आतषबाजी सुरू झाली. आतषबाजी थांबतच नसल्याचे पाहून उद्धव ठाकरे म्हणाले, फटाके आणि मराठी माणूस दोघेही सारखेच. एकतर पटकन पेटत नाहीत. पेटले तर थांबत नाहीत. असे पेटलेले फटाके मी राज्यभर अनुभवतोय. पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. दुसरा टप्पा गुरुवारी आहे आणि तिसरा २४ एप्रिलला. मतदान कशावर कराल, असा प्रश्‍न उद्धव ठाकरे यांनी करताच जनसमुदायाने धनुष्यबाण आणि कमळावर, असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हक्काच्या शहरात आणि शिवसेनाप्रमुखांच्या बालेकिल्ल्यात आलो आहे. सभा हे केवळ निमित्त आहे. संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे व जालन्यातून रावसाहेब दानवे हे तुफानी मताधिक्याने निवडून येतील, असा आत्मविश्‍वासही

या वेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

 • हा गड अभेद्य आहे
  शिवसेनेचे काय होणार, अशी चिंता करणारे काही चिंतातूर आहेत. समोर पसरलेला हा जनसागर पाहून शिवसेनेचे काय होणार, हे त्यांनीच ठरवावे. प्रदीप जैस्वाल शिवसेनेत परतले. हर्षवर्धन जाधव सोबत आलेत. संभाजीनगरचा गड अभेद्य आहे. दरवेळी शिवसेनाप्रमुख यायचे, वचन द्यायचे अशी आठवण जागवत त्यांनी आपली सत्ता येताच सर्वात अगोदर ‘औरंगाबाद’चे संभाजीनगर करणार म्हणजे करणारच, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
 • मनमोहन कुठे आहेत?
  आपल्या घणाघाती भाषणात उद्धव ठाकरे यांनी मौनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा खडा समाचार घेतला. सोनिया, राहुल फिरताहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कुठे आहेत? सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून मनमोहन फिरतच नसल्याचा शालजोडीतला त्यांनी मारला. निवडणूक न लढवण्याचा निर्णय मनमोहन यांनी घेतला आहे. त्याबद्दल मनमोहन यांचे जाहीर अभिनंदन करून उद्धव ठाकरे म्हणाले की, हा निर्णय अगोदरच घेतला असता तर जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचली असती. अर्थतज्ज्ञ मनमोहन यांच्या कारकीर्दीत रुपयाच्या झालेल्या अवनतीचाही त्यांनी जोरदार समाचार घेतला.
 • चव्हाणांवर आरोप नाही, दर्डांचे तोंड काळे
  अशोक चव्हाण यांच्यावर ‘आदर्श’ घोटाळ्यात नुसतेच आरोप आहेत, गुन्हा दाखल करण्याचा पत्ता नाही. मात्र तिकडे जळगावात सुरेशदादा जैन यांना दीड वर्षांपासून तुरुंगात सडवत ठेवले आहे. धाराशीवमध्ये कपाळावर खुनाचा गुन्हा घेऊन पद्मसिंह पाटील उजळमाथ्याने फिरत आहेत. दर्डांचेही आत-बाहेर  चालू आहे. कोळसा घोटाळ्यात यांचे तोंड काळे झाले. अशोक चव्हाणांचे नाव घ्यायचे की नाही. सीबीआयचे लेझीम चालू! छगन भुजबळ यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप. अजित पवारांच्या नावावर ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा. सुनील तटकरे यांनी सह्याद्री गिळला. आता हिमालय गिळायला निघाले आहेत. कधी होणार यांच्या चौकशा, असा रोकडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आमच्यावर गुन्हे असल्याची राळ उठवली जाते. जनतेच्या हितासाठी गुन्हे अंगावर घेणार्‍या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे, असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी ठणकावून सांगितले.
 • ओवेसी विष ओकतोय
  रझाकारांचा वारसा सांगणारा ओवेसी आता मातला आहे. १५ मिनिटांत १०० कोटी हिंदूंचा खात्मा करण्याची गरळ त्याने ओकली. या देशातील हिंदू काय मेल्या आईचे दूध प्याले आहेत काय? संभाजीनगरात आल्यावर हा ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवायला गेला होता. त्यामुळे त्याच्या डोक्यात कोणता विखार शिजतो आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी मारला. शिवसेनाप्रमुखांनी मुसलमानांवर टीका केली, परंतु त्यांना संपवण्याची भाषा कधी केली नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.