शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा घणाघात
(१५ एप्रिल २०१४)
गिरगावात महायुतीची रेकॉर्डब्रेक सभा
छत्रपती शिवराय हे आमचा आदर्श आहेत. बलात्कार्‍यांची भलामण करणार्‍या मुलायमसिंगसारख्यांची वळवळ थांबवलीच पाहिजे. त्यांच्या मुजोरीला चाप लावायलाच हवा असे ठणकावतानाच देशात आणि राज्यात शिवशाहीचे सरकार आणा, बलात्कार्‍यांचे हातपाय तोडून फेकून देऊ, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी गिरगावच्या रेकॉर्डब्रेक सभेत केला.
मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, खान्देश, कोकणातील प्रचंड गर्दीच्या सभांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराचा झंझावात आज मुंबईत अवतरला. महायुतीचे दक्षिण मुंबईतील लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची गिरगावात रेकॉर्डब्रेक सभा झाली. या सभेत त्यांनी सोनियांपासून मुलायमसिंग यादवांपर्यंत आणि शरद पवार यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत सर्वांचाच ठाकरी शैलीत समाचार घेतला. . काँग्रेसचे अर्धवटराव पुन्हा निवडून आले आणि काँग्रेसने मुलायमचा पाठिंबा घेतल्यास मायभगिनी सुरक्षित राहतील काय, असा सवाल करताच प्रचंड गर्दीतून ‘नाही नाही’चा गजर झाला. गोध्राच्या नावाने बोंब मारता, मग कारसेवकांना मारणार्‍या मुलायमचा पाठिंबा कसा चालतो, असा सवालच उद्धव ठाकरे यांनी सोनियांना केला.

    • शिवसेनेचे वाघ दिल्लीत पाठवा
      नुसत्या ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला,’ अशा घोषणा देऊ नका, तुमचा उत्साह मतपेटीत उतरू द्या, शिवसेनेचा वाघ दिल्लीत पाठवा. मुंबईतील महायुतीचे सहाही खासदार निवडून आणा, असा मंत्र उद्धव ठाकरे यांनी दिला.
    • मनसे म्हणजे मान न मान मै तेरा मेहमा
      उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता टोले लगावले. मोदींचा उघड प्रचार करा, आपल्याला मान देऊन पंतप्रधानपदासाठी मोदींचे नाव जाहीर केले आहे. ‘मान न मान मै तेरा मेहमान’ असा प्रकार आपल्याबाबतीत घडलेला नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रचंड गजर केला. या वेळी माजी खासदार मोहन रावले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी सौ. रश्मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे. तेजस ठाकरे, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विभागप्रमुख अजय चौधरी, पांडुरंग सकपाळ, मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित, रिपाइं नेते अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, माजी आमदार दगडू सकपाळ, महिला विभाग संघटक माई परब, दीपा मंत्री, माजी महापौर श्रद्धा जाधव, युवा सेनेचे बाळा कदम, नगरसेवक सुरेंद्र बागलकर आणि सिद्धार्थ गमरे आदी उपस्थित होते.

फटकारे –

हे नासलेले, कुजलेले विकृत लोक पुन्हा केंद्रात बसले तर विक्रांतप्रमाणे देश भंगारात काढतील.

– मोदींनी काय हायजॅक केलंय त्याची काळजी करू नका. कोकणात आमच्यातून गेलेल्या घाणीने काय केले ते पाहा… (हशा).

– सोनिया गांधींनीच निवडणुकांना जातीय रंग दिला. त्यांना शाही इमामाला भेटायला वेळ आहे, पण शिवनेरीवर यायला वेळ नाही. मग तुम्ही धर्मनिरपेक्ष कसे?

– काँग्रेस मुसलमानांकडे मते म्हणून बघते तर शिवसेना मुसलमानांकडे माणूस म्हणून बघते.

– आमच्यावर टीका करता; ओवेसीबद्दल ब्र काढण्याची हिंमत का झाली नाही?

– दिल्लीत मर्दांची फौज पाठवा, जे मर्द आहेत त्यांनीच शिवसेनेत थांबावे, नामर्दांना शिवसेनेत थारा नाही.

– पृथ्वीराज चव्हाण गल्लीत दादागिरी करतात अन् दिल्लीत चाटूगिरी. अशी माणसे कसला विकास करणार?

– मुंबई पालिकेने अवघ्या तीन वर्षांत मध्य वैतरणा धरण बांधले. केंद्र सरकारने गेली १० वर्षे परवानगी नाकारून धरणाचे काम रखडवले होते, पण परवानगी मिळताच आम्ही विक्रमी वेळेत हे धरण बांधले. स्वत:चे धरण बांधणारी मुंबई महापालिका ही देशातील एकमेव पालिका आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे.

– ही निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी आहे. त्यामुळे आधी काँग्रेसला केंद्रात ठेचू मग राज्यात ठेचू. पालिका आमच्याकडेच आहे, मग बघाच तुम्ही विकास म्हणजे काय असतो.

– आम्ही रेसकोर्सच्या विरोधात कधीच नव्हतो. ज्यांना रेसकोर्सचा शौक आहे त्यांच्यासाठी मुंबईच्या बाहेर हवी तेवढी जागा द्या आणि रेसकोर्स बांधायला हरकत नाही. मात्र मुंबईतल्या रेसकोर्सच्या जागेवर जागतिक दर्जाचे मुंबईला अभिमान वाटेल असे थीमपार्क झालेच पाहिजे. आमच्या हाती सत्ता द्या, मुंबईकरांना हेवा वाटेल असे थीमपार्क आम्ही करून दाखवू.