महायुतीच्या पांडवांनी वज्रमूठ आवळली; रणशिंग फुंकले… रेकॉर्डब्रेक महासभेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार!

मुसलमानांवर अन्याय झाला म्हणून ते अतिरेकी बनले तर दोष कुणाचा असे शरद पवार म्हणतात, मग शेतकर्यांवर गुराढोरांप्रमाणे पोलिसी अत्याचार करणार्या काँग्रेस आघाडी सरकारमुळे शेतकरी अतिरेकी झाले तर त्याचा दोष तुम्ही स्वीकारणार का, असा खडा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. शेतकर्यांच्या केसाला जरी धक्का लावाल आणि आसूड उगाराल तर उद्याची नालबंदी तुमची असेल असे पोलिसांना ठणकावले. शिवसेना, भाजप, रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष या महायुतीच्या महासभेत उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकारवर जोरदार कोरडे ओढले.
(२९ जानेवरी २०१४)
शिवसेना, भाजप, रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष या महायुतीची पहिली सभा पंचगंगेच्या तीरावरील महाराष्ट्राचे मँचेस्टर असलेल्या इचलकरंजीमधील विस्तीर्ण थोरात मैदानावर दिनांक २९ जानेवारी २०१४ रोजी झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, रिपाइं नेते रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर या महायुतीच्या पाच नेत्यांनी एकत्र येत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात एल्गार केला. या पहिल्या महासभेने महायुतीच्या प्रचाराचा झंझावात महाराष्ट्रात सुरू केला. सभेपूर्वी कोल्हापुरात करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर सभास्थानी हे नेते येताच एकच जल्लोष झाला.
शेतकरी, कामगार, राज्यातील टोल आणि मंत्र्यांचा भ्रष्टाचार प्रश्नी चौफेर हल्ला चढवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची लक्तरे वेशीवर टांगली. या महायुतीच्या पहिल्याच महासभेत त्यांनी पाच पक्षांच्या पांडवांची ही वज्रमूठ देशातील आणि राज्यातील सत्ता काबीज करेल, असा निर्धार व्यक्त केला.

 • कारखाने तुमच्या बापाचे आहेत का?
  कोल्हापुरात उद्योजक आणि व्यापार्यांचे शिष्टमंडळ महायुतीच्या नेत्यांना भेटले. महाराष्ट्रात वीज महाग आहे, जागा मिळत नाही म्हणून आम्ही कर्नाटकात चाललो आहोत असे सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ”तुम्ही सहा महिने थांबा. तुम्हाला कर्नाटकात जाण्याची वेळ येणार नाही. विजेचे दर आम्ही कमी करूच पण जागाही देऊ. हा विश्वास मी देतो. शेतकर्यांचा दौलत कारखाना बंद पडलेला आहे. राष्ट्रवादी खरेदी करायला निघाले आहेत. सर्व कारखाने तुमच्या बापाचे आहेत का? आम्ही शिवशाही आणतो आहोत. हा कारखाना शेतकर्यांचाच राहील असे सांगताच सभेत जल्लोष झाला.
  काँग्रेसविरोधी असणारी सर्व मते एकत्र करून त्यांना कायमस्वरूपी गाडण्यासाठीच ही पंचमहायुती आहे असे ठामपणे सांगून प्रचंड रोष असणारी तमाम जनताच आता काँग्रेस आघाडीला गाडण्यासाठी आतूर झालेली आहे. पुढील महायुतीची सभा बीडमध्ये घेणार आहोत. आता थांबायचे नाही. येत्या १६ फेब्रुवारीला बीड येथे महासभा तर २५ फेब्रुवारीला महायुतीचा मुंबईत महामोर्चा, विराट महामोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी सत्तापरिवर्तन अटळ असल्याची ग्वाही दिली.
 • पश्‍चिम महाराष्ट्राला अॅटमबॉम्ब लावलाय
  दोन्ही काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रात आमचे राजकीय विरोधक आहेत. त्यांच्याच घरात जाऊन प्रथम अॅटमबॉम्ब लावायचा म्हणून ही महासभा येथे घेतल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगताच संपूर्ण सभा उसळून उठली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. आम्हाला सत्ता खुर्च्या मिळवण्यासाठी नको आहे. जनतेच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत असे नमूद करून उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवार म्हणतात सध्या निवडणुकीत कोणतीही हवा नाही. हवाच नाही तर तुम्हाला घाम का फुटतो? खरंच सध्या महायुतीची हवाच नाही तर लाट आहे. या लाटेचे पाणी तुमच्यात कुठून आणि कसे घुसेल आणि दोन्ही काँग्रेस या लाटेत बुडून जातील.
 • पांडवांच्या सभेत दु:शासन नाही!
  महायुतीचे वारे पाहून आपल्या पाच पक्षांमध्ये सहावा भिडू म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना तुम्ही घेणार की काय? अशी शंका खासदार राजू शेट्टी यांनी सभेत उपस्थित केली. त्याचा संदर्भ घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, पांडवांच्या सभेत दुशासन आणि दुर्योधन येईल का? पांडवांमध्ये पवार येणार नाहीत आणि त्यांना फोडाफोडी करता येणार नाही. त्यांच्या या रोखठोक भूमिकेवर सभेत एकच जल्लोष झाला.