बीड येथे १६ फेब्रुवारी २०१४, रविवार रोजी महायुतीची दणदणीत रेकॉर्डब्रेक सभा झाली. धानोरा रोडवरील अटलबिहारी वाजपेयी मैदानावर झालेल्या या सभेने आजवरच्या सर्व सभांचे विक्रम मोडीत काढले. काँग्रेस  नावाची चळवळ कधीच संपली असून आता केवळ भ्रष्ट वळवळ शिल्लक राहिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ही वळवळ उखडून फेका, असा जबरदस्त महाएल्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा घोंगडी आणि काठी देऊन शेतकर्‍यांनी सत्कार केला.
(१६ फेब्रुवारी २०१४)
एकेकाळी काँग्रेस  ही चळवळ होती. आदराने बघावे असे टोलेजंग नेते या पक्षात होते. मात्र आताच्या काँग्रेस  नेत्यांकडे पाहून मान शरमेने खाली जाते. ती कॉंग्रेस आणि चळवळ केव्हाच संपली असून आता काँग्रेसची केवळ भ्रष्ट वळवळ शिल्लक राहिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ही वळवळ उखडून फेका, असा जबरदस्त महाएल्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीड येथील महायुतीच्या दणदणीत सभेत केला. महायुतीच्या नेत्यांवर आकसबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मात्र महायुतीचे सरकार येताच हे गुन्हे मागे घेऊन ज्यांनी हे पाप केले आहे त्यांनाच तुरुंगात डांबल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

  • शेतकर्‍यांनो, आत्महत्या करू नका!
    उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या भोकर तालुक्यातील दिगंबर शंकर वसुरे या शेतकर्‍याचे छायाचित्रच सभेत उंचावून दाखवले. दोन वर्षांपासून ऊस उभा आहे. कारखाना ऊसच नेत नसल्यामुळे या वसुरेंनी गळफास घेतला. कुणावर गुन्हा दाखल करायचा? हे नालायक, नपुंसक सरकार आहे. महायुतीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करणार्‍या मंत्र्यांवरच शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठी गुन्हे ठोकायला हवेत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
  • सोळा मुखी रावणाचे दहन
    देशात आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे भयंकर तण माजले आहे. राज्यात तर भ्रष्टांचेच सरकार आहे. या सरकारमधील तब्बल १६ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. येत्या २८ तारखेला या १६ मंत्र्यांचा पुतळा असलेला रावण दहन करण्यात येणार असल्याची घोषणा या वेळी उद्धव ठाकरे यांनी केली.