पंढरपूर

गेली शेकडो वर्षे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या हृदयात पिढ्यानपिढ्या सर्वोच्च श्रध्दास्थान बनून असलेलं हे तीर्थस्थान वारकरी संप्रदायाचं आणि संत-महंतांचं आदिदैवत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक संतकवीने पंढरपूर आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचा अगाध महिमा मोठ्या भक्तिभावाने वर्णन केला आहे. ’माझे माहेर पंढरी’, ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल’ अशा समर्पित भावनेने लिहिलेले असंख्य अभंग म्हणजे मराठी भाषेतील उत्कट भावकाव्य होय.
चंद्रभागेकाठी असलेल्या या तीर्थस्थानी विठ्ठल व रुक्मिणीची भव्य प्राचीन मंदिरे आहे. अलीकडे भक्तांची वर्दळ लक्षात घेऊन मंदिरात दर्शनार्थींसाठी अनेक सोयी केल्या आहेत. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे फार मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र व कर्नाटकातील लक्षावधी वारकरी दिंड्या व पालख्या घेऊन या यात्रेस पायी येतात.
मोठं तीर्थस्थान असल्याने क्षेत्री असंख्य देवालये व मठ आहेत. लक्ष्मी, पुंडलिक, विष्णुपद, त्र्यंबकेश्वर, मल्लिकार्जुन, श्रीराम, अंबाबाई, नामदेव यांची मंदिरे प्रेक्षणीय आहेत. अनेक संत-सत्पुरुषांच्या समाध्या पंढरपूरच्या परिसरात विराजमान आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नामदेवाची पायरी आहे. संत जनाबाईचं घर असलेलं गोपाळपुरा हे स्थानही प्रेक्षणीय आहे.
पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान असून या स्थानाचे महात्म्य महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात दूरवर पसरलेले आहे.
नजीकचे रेल्वे स्थानक : सोलापूर
मुंबई-पुणे-पंढरपूर : ४२९ कि.मी. (रेल्वेने), सोलापूर-पंढरपूर : ७४ कि.मी.

आळंदी

वारकरी संप्रदायात पंढरपूर इतकेच आळंदी या तीर्थस्थानासही मोठे महत्त्व आहे. पुणे शहरापासून अवघ्या २२ कि.मी. अंतरावर हे स्थान असून ते देवाची आळंदी या नावानेही प्रसिध्द आहे. इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या या गावी संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली (इ.स.१२९६). त्यामुळे आळंदीचं महत्त्व फार मोठं आहे. महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीचा सुकाळ करून वारकरी संप्रदाय निर्माण करणारे लोकोत्तर संत म्हणून सातशे वर्षे अवघ्या महाराष्ट्राने ज्ञानेश्वरांना आपल्या हृदयात जपले आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया । कळस तुकयाने चढविला’ या ओळीनुसार भागवत धर्माची धुरा खांद्यावर वाहणारे हे दोन थोर संत महाराष्ट्राच्या लोकजीवनात अखंड विराजमान झाले आहेत. देहू गाव आळंदीपासून अवघ्या ३१ कि.मी. अंतरावर आणि तेही इंद्रायणी नदीच्या काठीच आहे.
ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान, विठ्ठल-रखुमाईचे मंदिर, सोन्याचा पिंपळ अशी अनेक स्थाने या तीर्थस्थानी भक्तिभावाने पाहण्यासारखी आहेत.
या ठिकाणी आषाढी-कार्तिकी एकादशीला यात्रा भरते तसेच ज्ञानेश्वर समाधी दिनी कार्तिक कृ. त्रयोदशीला येथे उत्सव असतो. अलीकडेच आळंदी हे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे.
नजीकचे स्टेशन: पुणे
पुणे-आळंदी: २२ कि.मी., आळंदी-देहू ३१ कि.मी.

देहू

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदैव वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकान्ती बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकविले तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या ६ कि.मी. अंतरावर आहे. हा डोंगर भाविकांचे श्रध्दास्थान बनून राहिला आहे. आज या डोंगरावर जाण्यासाठी थेट पक्का रस्ता आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले तो डोहही इंद्रायणी काठीच नजीक आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते.
देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळ्याचे मंदिर आदी स्थाने दर्शनीय आहेत. तुकाराम बीजेला म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो.
नजीकचे स्टेशन: देहू रोड (मुंबई-पुणे रेल्वे मार्ग)
देहू रोड ते देहू गाव अंतर: १० कि.मी., पुणे-देहू अंतर: कि.मी.
मुंबई-देहू अंतर: १६८ कि.मी. (रेल्वेने), देहू-आळंदी: ३१ कि.मी.

चिंचवड

गणेशभक्त मोरया गोसावी यांनी स्थापन केलेल्या गणेशमूर्तीमुळे चिंचवड हे गाव पूर्वीपासूनच प्रसिध्द आहे. मोरया गोसावी यांची संजीवन समाधी येथेच आहे.
दक्षिणवाहिनी पवना नदीच्या काठी  वसलेले व चिंच-वडांनी व्यापलेले हे शहर पुण्यापासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर आहे. आता ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कक्षेत आले आहे.
अत्यंत जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द असलेल्या या गणेशस्थानाशी तुकाराम महाराज, रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज तसेच त्यानंतरच्या मराठेशाहीतील कर्त्या पुरुषांचे निकटचे संबंध होते. पेशव्यांनी तर या स्थानासाठी उदारहस्ते खर्च केला.
नजीकचे  स्टेशन: पुणे
पुणे-चिंचवड: १७ कि.मी. (रेल्वे लोकलने)

जेजुरी

पुणे जिल्ह्यातील व पुणे शहरापासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर असलेले हे तीर्थक्षेत्र खंडोबाचे जागृत स्थान संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. धनगर कोळी तसेच इतर वर्गातील ज्ञातींचेही हे कुलदैवत असल्याने येथील खंडोबाच्या दर्शनासाठी दूरदूरहून भक्त येत असतात.
हे मंदिर इ.स. १६०८ मध्ये बांधण्यात आले असून नंतरच्या काळात सभा मंडप, सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू बांधण्यात आल्या. यापैकी काही बांधकाम होळकरांनी केले आहे. १७४२ मध्ये होळकरांनीच देवळाच्या परिसरातील दगडी खांब बांधले व नंतरच्या काळात तटबंदीचे व तलावाचे काम पूर्ण केले. याशिवाय भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा व कमानी उभारल्या आहेत. एका लहानशा पठारावर सुमारे तीनशे मीटर उंचीवर डोंगराच्या कडे-पठारावर  हे खंडोबाचे मुख्य देऊळ आहे. प्रवेश द्वाराशीच नगारखाना आहे. देऊळ पूर्वाभिमुख असून ते विस्तृत आहे. देवळासमोर भले मोठे पितळी पत्र्याने मढवलेले कासव आहे. त्यावर भंडाऱ्याची उधळण केली जाते. नाना फडणविसांनी नवसाप्रीत्यर्थ एक लाख रुपये खंडोबाला वाहिले होते. देवाला सोन्याचे मुखवटे त्यातून करण्यात आले.
चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुध्द १२ ते वद्य १ असे पाच दिवस तर मार्गशीर्षात सुध्द १ते ६ असे सहा दिवस आणि नवरात्रात दसऱ्यापर्यंत दहा दिवस खंडोबाची यात्रा असते.